निकालपत्र
निकाल दिनांक – २७/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ नुसार सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदार यांचे तक्रारीतील थोडक्यात कथन असे की, सामनेवाले क्र.१ ही मोबाईल उत्पादीत कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहे व सामनेवाले क्र.३ व ४ हे सामनेवाले क्र.१ कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडुन दिनांक २५-०७-२०१६ रोजी सामनेवाले क्र.१ या कंपनीचा सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर याचा आयएमईआय नं. ३५९०५७०६३८२०६९७ चा चार्जर क्रमांक ४०१५डब्ल्यु४९२००१७८ हा रक्कम रूपये २१,५११/- या रकमेस विकत घेतला. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांचेकडुन घेतलेल्या मोबाईलची गॅरंटी व वॉरंटीबाबत चौकशी केली असता सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारास सदर मोबाईल हॅण्डसेटला एक वर्षाची गॅरंटी असून बॅटरी व चार्जर यांना सहा महिन्यांची गॅरंटी असल्याचे सांगितले होते. तक्रारदार यांनी विकत घेतलेला हा मोबाईल वापरत असतांना त्याच्या डिस्प्लेला ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रॉब्लेम आला. सदरचा हॅण्डसेट तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ कडे दाखविला असता सामनेवाले क्र.३ यांचेकडे सदर सामनेवाले क्र.१ मोबाईल हॅण्डसेट कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर असल्यामुळे त्यांचेकडे दाखविण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दिनांक १०-१०-२०१६ रोजी सामनेवाले क्र.३ कडे मोबाईल हॅण्डसेट दाखविला असता सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदारास सदरचा मोबाईल हॅण्डसेट दुरूस्तीसाठी त्यांचेकडे ठेवावा लागेल, असे सांगुन दिनांक १०-१०-२०१६ रोजीचे जॉब कार्ड क्रमांक बी१डब्ल्यु११६१००३०२०६१ तयार केले व सदर मोबाईल हॅण्डसेटला डिस्प्ले ब्लिंकींगचा प्रॉब्लेम असल्याबाबत सांगतले. त्यानुसार सदरचा हॅण्डसेट तक्रारदारास रिपेअर करून दिला. परंतु पुन्हा पुन्हा सदर हॅण्डसेटचा तोच प्रॉब्लेम येऊ लागला. दिनांक १४-०७-२०१७ रोजी सदर मोबाईल हॅण्डसेट तक्रारदाराने सामनेवाले क्र.३ यांचेकडे आणुन दाखविला व पुन्हा सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराकडून सदरचा हॅण्डसेट ठेवुन घेऊन त्यास जॉब कार्ड नं. डब्ल्यु ११७०७१४०१४६८ असा तयार करून सदर मोबाईल हॅण्डसेट रिपेअर झाल्यानंतर आम्ही तुम्हास कळवितो, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.३ कडे वारंवार चकरा मारल्या. परंतु सदर हॅण्डसेट अद्याप पावेतो रिपेअर झाला नाही, असे सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदारास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कंपनीचे टोल फ्रि नंबरवर संपर्क केला. परंतु तेथे तक्रारदाराला त्यांनी तुमचा मोबाईल रिपेअरकामी आवश्यक असणार स्पेअर पार्ट आम्ही नगर ऑफीसला पाठविलेला आहे व तुम्ही दोन दिवसानंतर तुमचा हॅण्डसेट घेऊन जा, असे कळविले. त्यानंतर दिनांक २५-०७-२०१७ रोजी सामनेवाले नं.४ यांनी तक्रारदारास त्यांचे मेल आयडीवर मेलद्वारे सदर मोबाईल दुरूस्तीसाठी रक्कम रूपये २१,३६३.४६ इतका खर्च अपेक्षीत असल्याचे इस्टिमेट पाठविले. त्यानंतर तक्रारदार सामनेवाले क्र.३ यांचेकडे सदर सामनेवाले नं.४ यांनी पाठविलेल्या इस्टिमेट घेऊन आले असता सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदारास सदर मोबाईल जर तुम्हाला रिपेअर करून पाहिजे असेल तर तुम्हाला सदरचा खर्च करावा लागेल अन्यथा तुमचा मोबाईल आहे त्या परिस्थितीत पुन्हा घेऊन जा, असे सांगितले. ही बाब ऐकुण तक्रारदारास धक्का बसला.
वास्तविक पाहता तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ या कंपनीचा सामनेवाले क्र.२ यांचेकडून घेतलेल्या मोबाईलला एक वर्षची गॅरंटी असल्यामुळे सामनेवाले यांनी सदर हॅण्डसेटला प्रॉब्लेम आल्यानंतर तो बदलुन देणे आवश्यक होते. परंत तसे न करता रक्कम रूपये २४,२००/- च्या मोबाईल हॅण्डसेटचा दुरूस्ती खर्च रक्कम रूपये २४,२००/- च्या मोबाईल हॅण्डसेटचा दुरूस्ती खर्च रक्कम रूपये २१,३६३.४६ ची मागणी केली. या सर्व सामनेवाले यांचे वर्तन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करणारे आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान ग्राहक, विक्रेता असा संबंध आलेला आहे. सामनेवाले यांनी मोबाईल हॅण्डसेट बदलुन दिला नाही म्हणुन तक्रारदाराने दिनांक १२-०८-२०१७ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवुन मोबाईल हॅण्डसेट विना मोबदला दुरूस्त अथवा नवीन मोबाईल हॅण्डसेट देण्याबाबत कळविले. परंतु सदरची नोटीस मिळूनही सामनेवाले यांनी कोणतेही उत्तर दिले नाही अथवा सदर मोबाईल हॅण्डसेट दुरूस्त अथवा बदलुन दिला नाही. त्यामुळे तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले. तक्रारदाराने परिच्छेद क्रमांक ७ मध्ये सामनेवाले क्र.२ यांच्याकडुन सामनेवाले क्र.१ कंपनीचा खरेदी केलेला मोबाईल हॅण्डसेट बदलुन देण्याचा योग्य आदेश व्हावा, सामनेवालेने तक्रारदार यांना विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास दिला, त्याबद्दल तक्रारदार यांना सामनेवालेकडुन नुकसान भरपाई रक्कम रूपये १०,०००/- तसेच या तक्रारीचा संपुर्ण खर्च रक्कम रूपये १०,०००/- द्यावा, अशी विनंती केली आहे.
३. तक्रारदार यांनी निशाणी २ वर शपथपत्र, निशाणी ६ वर दस्तऐवज यादीसोबत एकुण १४ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केलल्या आहेत. त्यामध्ये तक्रारदाराचे मोबाईलचे बीलाची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराचे मोबाईल रिपेअरचे जॉबशीटची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराचे मोबाईल रिपेअरचे इस्टीमेटची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराने पाठविलेल्या ई-मेलची झेरॉक्स प्रती, सामनेवाले यांनी पाठविलेले ई-मेलची झेरॉक्स प्रती, सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारास पाठविलेल्या खराब पार्ट संदर्भातील फोटोसह मेलची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराने सामनेवाले यांना मेलद्वारे पाठविलेल्या नोटीसची झेरॉक्स प्रत, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ ते ४ यांना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत, सामनेवाले यांना नोटीसची पोहोच पावती, तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ ते ४ यांना R.P.A.D. केलेल्या पावतींची झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
४. सदर तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १३ (१) (क) नुसार नोटीस काढण्यात आली. त्यानुसार सामनेवाले क्र.१ ते ४ हजर होऊन मे. मंचात निशाणी १४ वर म्हणणे दाखल केले आहे. सामनेवालेने तक्रारदाराची तक्रार संपुर्णपणे अमान्य केली असुन त्यांचे कथन की, सदरचे मोबाईलमध्ये उत्पादकीय दोष नाही. सामनेवाले क्र.१ यांनी सामनेवाले क्र.२,३ व ४ यांना सदरील सर्व्हीस सेंटर चालविणेबाबत अधिकार दिलेले आहे. सामनेवाले क्र.१ यांच्या उत्पादनावर मुळ खरेदीच्या काळापासुन १ वर्षाची वॉरंटी देतात आणि कंपनीने दिलेल्या अटी शर्ती या उभय पक्षांवर बंधनकारक असतात. सामनेवाले क्र.१ कंपनीच्या अटी व शर्ती या परिशिष्ट-३ ला जोडलेल्या आहेत. सामनेवाले यांनी मोबाईलसोबत युझर गाईड दिलेले आहे, त्यामध्ये फोन वापरतांना घेण्याचे सावधानतेबाबत उल्लेख केलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने दिलेले निर्देश योग्य रितीने पाळले नाही तर सामनेवाले कोणत्याही नुकसानीस जबाबदार राहणार नाही. पाणी आणि धुळ या संदर्भात कंपनी कोणतीही हमी देत नाही. या संदर्भात हेही चे तकार पुढीलप्रमाणे सामनेवालेने कथन केले आहे. ‘ If water or liquid gets on the micro USB port, the micro SD card, the micro SIM card and the headset connector, wipe it off with a dry cloth.’ याप्रमाणे मायक्रो यु.एस.बी. पोर्ट, मायक्रो एस.डी.कार्ड, मायक्रो सिम यांवर पाणी किंवा द्रव पदार्थ असेल तो कोरड्या कापडाने धुवून टाका. त्याचप्रमाणे या पार्टमध्ये पाणी गेल्यास त्याबाबत कुठलीही हमी दिఀली जात नाही. स्पिकर मध्ये जर पाणी गेले तर स्पिकर पुन्हा वापराण्यापुर्वी ३ तास सुकवावा असे नमुद केलेले आहे. तक्रारीत नमुद हॅण्डसेट मध्ये द्रव पदार्थ गेल्यामुळे तो बिघडला तर तो दुरूस्त करून देणे अथवा बदलुन देणेबाबत सामनेवाले जबाबदार नाही, असे अटी शर्तीमध्ये नमुद आहे.
तक्रारीत नमुद मोबाईल हॅण्डसेटचा संपुर्ण वॉरंटी पिरीयड झाल्यानंतर तक्रारदार हा सामनेवाले क्र.१ सर्व्हीस सेंटरमध्ये दिनांक १४-०७-२०१७ रोजी डिस्ले ब्लिन्कींग व ऑटो ऑफची तक्रार घेऊन आला. हमी कालावधी संपण्याचे ९ दिवसाचे आत तक्रारदाराने सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधला. सर्व्हीस सेंटरने कोणताही वेळ न दडवता तक्रारदाराचे हॅण्डसेटची तपासणी केली. सर्व्हीस सेंटरला असे दिसुन आले की, मोबाईल हॅण्डसेटमध्ये द्रव पदार्थ गेल्यामुळे तो खराब झाला. हॅण्डसेटच्या आजु बाजुला सर्वत्र स्क्रॅचेस होते, दिसत आहे. तक्रारदाराने सदरची हॅण्डसेटचा वापर योग्यरितीने केलेला नाही. हॅण्डसेटच्यामध्ये द्रव पदार्थ गेल्याने हॅण्डसेटचे नुकसान झाले, ही बाब स्पष्ट करणेसाठी छायाचित्र परिशिष्ट-आर जोडले आहे. सामनेवाले क्र.२ यांनी म्हटले आहे की, WRT (Water Resistance Test) मध्ये त्यांनी द्रव पदार्थ आत शिरल्यामुळे सदर हॅण्डसेटचे नुकसान झाले आहे. तक्रारदाराचा हॅण्डसेट हा व्यवस्थितीरित्या बंद केला नाही, म्हणुन सदरच्या हॅण्डसेटमध्ये पाणी गेले व व्यवस्थित वापर न केल्यामुळे काही लहान क्रॅचेस पडल्यामुळे हॅण्डसेटच्या आत द्रव पदार्थ गेला. तक्रारदाराचे हॅण्डसेटची वॉरंटी पुर्ण झाल्यामुळे हॅण्डसेट दुरूस्तीची किंमत सांगण्यात आली. परंतु तक्रारदाराने दुरूस्तीसाठी नकार दिला आणि सर्व्हीस सेंटरलकडे हॅण्डसेट जमा केला नाही. तक्रारदारच्या निष्काळजीपणामुळे सदर मोबाईल हॅण्डसेटचे नुकसान झाले आहे. तक्रारदाराने हॅण्डसेट वापरण्यापुर्वी वॉरंटीच्या अटी व नियमानुसार काळजी घेणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने हॅण्डसेट काळजीपुर्वक वापरला नाही आणि त्याचा मोबाईल हॅण्डसेटमध्ये द्रव पदार्थ गेल्यामळे खराब झालेला आहे. तक्रारदाराचे मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचा मुळ उत्पादीत दोष नव्हता. सदर मोबाईलमध्ये मुळ उत्पादकीय दोष असल्याचेबाबत सिध्द करण्यास तक्रारदार अपयशी ठरला आहे. योग्य व कोणताही पुरेसा पुरावा दिलेला नाही. जर मोबाईलच्या हॅण्डसेटमध्ये दोष असता तर तक्रारदाराने सुरूवातीला सामनेवालेचे सर्व्हीस स्टेशनला आला असता. परंतु वॉरंटी कालावधी संपण्याच्या ९ दिवस आगोदर प्रथमच सर्व्हीस सेंटरला संपर्क साधला आणि तोही सदरील मोबाईल हॅण्डसेटमध्ये द्रव पदार्थ आत शिरल्यावर सदर हॅण्डसेट खराब झाला. म्हणुन वर नमुद कारणावरून सदरची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सदरील तक्रारदाराने तक्रारीचे आधारे केलेला आरोप सिध्द करण्यासाठी कोणताही तज्ञाचे मत, शपथपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही योग्य नाही. वॉरंटीच्या कालावधी संपल्यामुळे सामनेवालेने दुरूस्तीचा खर्च तक्रारदारास सांगितला. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी, असे सामनेवालेने नमुद केले आहे.
सामनेवालेने सदरचे म्हणणेसोबत दस्तऐवजांमध्ये अटी व शर्तीची प्रत दाखल केलेली आहे. तसेच मोबाईल हॅण्डसेटचे फोटो, सामनेवाले क्र.२,३,४ यांच्यातर्फे प्रकरण चालविणेचेबाबत सामनेवाले क्र.१ यांनी दिलेले अधिकार पत्र इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत. निशानी १५ ला तक्रारदारातर्फे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहेत. निशाणी १७ वर सामनेवाले यांनी दिलेल्या पत्राची प्रत जोडलेली आहे. सामनेवाले यांनी निशाणी १९ ला पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. निशाणी २० ला तक्रारदारातर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आलेला आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवालेने दाखल केलेला लेखी जबाब, पुराव्याचे शपथपत्र तसेच निशाणी १९-अ वर सामनेवालेने दाखल केलेला लेखी युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवालेने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
६. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडुन सामनेवाले क्र.१ या कंपनीचा सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर याचा आयएमईआय नं. ३५९०५७०६३८२०६९७ चा चार्जर क्रमांक ४०१५डब्ल्यु४९२००१७८ हा मोबाईल विकत घेतला व सदरील मोबाईल हा सामनेवाले क्र.२,३ व ४ या सर्व्हीस सेंटरकडे दुरूस्तीसाठी दिला. ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. म्हणुन तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२) - तक्रारदार व सामनेवाले यांचे म्हणणे विचारात घेता तसेच सदर प्रकरणात दाखल असलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदाराने सामनेवाले २ कडुन सामनेवाले क्र.१ चा उत्पादीत मोबाईल सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर याचा आयएमईआय नं. ३५९०५७०६३८२०६९७ चा चार्जर क्रमांक ४०१५डब्ल्यु४९२००१७८ हा मोबाईल रक्कम रूपये२४,२००/- एवढ्या किंमतीला दिनांत २५-०७-२०१६ रोजी विकत घेतला होता. त्याचा इनव्हॉईस क्रमांक ६७०००२२९२ असा होता.
तक्रारदाराने विकत घेतलेल्या मोबाईलमध्ये ऑक्टोबर २०१६ मध्ये डिस्प्लेचा प्रॉब्लेम आला व सदरचा हॅण्डसेट सामनेवालेक क्रमांक २ कडे दाखविल्यानंतर सामनेवाले क्र.३ यांच्याकडे अधिकृत सर्व्हीस सेंटर सामनेवाले क्र.३ कडे सदरचा मोबाईल पाठविला असता त्याचा जॉब कार्ड क्रमांक बी१डब्ल्यु११६१००३०२०६१ तयार केले व सदर मोबाईल हॅण्डसेटला डिस्प्ले ब्ल्किींगचा प्रॉब्लेम असल्याबाबत सांगतले. त्यानुसार सदरचा हॅण्डसेट तक्रारदारास रिपेअर करून दिला. परंतु पुन्हा तोच प्रॉब्लेम येऊ लागला. तक्रारदाराने दाखल केलेले निशाणी ६ सोबतचे दस्त क्रमांक वर तक्रारदाराने सामनेवाले क्र.४ कंपनीला केलेल्या ई-मेल मध्ये दिसुन येते की, तक्रारदाराने दिनांक ०३-१०-२०१६ रोजी त्याच्या या मोबाईला रिपेअर करण्यास सामनेवाले क्र.३ दाखविले आहे. परंतु सदरील मोबाईल परत मिळालेला नाही. पंधरा दिवसांनी मोबाईलची वॉरंटी संपलेली आहे. मोबाईल हॅण्डसेट परत मिळाला नाही कारण मोबाईल सर्व्हीस सेंटरमध्ये रिपेअर झालेला नाही. मोबाईल बदलुन द्यावा किंवा नवीन हॅण्डसेट द्यावा किंवा हॅण्डसेटचे पैसे द्यावे याबाबत नमुद आहे. या म्हणण्यावर सर्वात शेवटी सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराचे हॅण्डसेट दुरूस्तीचा प्रयत्न सुरू आहे, शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मेलमध्ये नमुद आहे. त्याच प्रमाणे निशाणी ६/५ ला ३ ऑक्टोबर २०१६ रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडे ई-मेलद्वारे तक्रारीचे निराकरण करण्याबाबत कळविल्याचे दिसुन येते. त्यावर निशाणी ६/६ ला ई-मेल द्वारे सामनेवाले क्र.१ तर्फे उत्तर देण्यात आले की, तुमच्या हॅण्डसेटची दुरूस्तीचे प्रयत्न चालु आहे आणि संबंधीत विभाग तुमच्या समस्या निराकरणाच्या दृष्टीने प्रयत्नशिल आहे आणि तसेच अजुनकाही चौकशी करावयाची असल्यास टोल फ्री नंबर वर करावी, असे तक्रारदारास कळविले.
तक्रारदाराने विकत घेतलेला मोबाईलमध्ये सुरूवातीपासूनच मोबाईलचा डिस्पलेचा प्रॉब्लेम आला. त्यानंतर डिस्प्ले ब्लीन्कींग प्रॉब्लेम झाला व वॉरंटी पिरीयडमध्ये असतांना वरील नमुद कागदपत्रांवरून तक्रारदाराने सामनेवालेशी संपर्क साधला. त्यानंतरही तक्रारदाराचा हॅण्डसेटला वेळोवेळी प्रॉब्लेम आला. तक्रारदाराने विकत घेतलेल्या मोबाईलमध्ये सुरवातीपासुनच दोष असल्याने तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे तक्रार केली. तसेच सामनेवाले क्र.२ हा सामनेवाले क्र.३ कडे दुरूस्तीसाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार सामनेवाले क्र.३ कडे दुरूस्तीसाठी दिला. मोबाईल वॉरंटी पिरीयडमध्ये असतांना दिनांक १०-११-२०१६ रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडे ई-मेल द्वारे संपर्क साधुन मोबाईलच्या डिस्प्ले ब्लिकींगचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे बिघाड होत असल्याने सामनेवालेने बदलुन द्यावा किंवा पैस परत करण्यात यावे, याकरीता तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडे ई-मेल पाठविला. सदरचे ई-मेलची प्रत निशाणी ६/५ ला जोडली आहे. या दस्ताचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदाराने विकत घेतलेला मोबाईल सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर याचा आयएमईआय नं.३५९०५७०६३८२०६९७ मध्ये झालेला बिघाड वॉरंटी कालावधीमध्ये झालेला दिसुन येतो. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता जॉब कार्ड क्रमांक बी१डब्ल्यु११६१००३०२०६१ दिनांक १०-१०-२०१६ असे स्पष्ट केल्याचे दिसुन येते. याचा अर्थ मोबाईल रिपेअरींगसाठी तक्रारदाराने दिनांक १०-१०-२०१६ रोजी सर्वप्रथम दिल्याचे स्पष्ट होत. तक्रारदाराचा मोबाईल त्याने विकत घेतल्यापासून ३ महिन्यांचे आत सदर मोबाईलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तक्रारदाराने मोबाईल रिपेअरींगसाठी दिला होता, असे दिसुन येते. मोबाईल हॅण्डसेट पुर्णपणे दुरूस्त करून देणे आवश्यक असतांना सामनेवालेने त्यांची विक्रेता या संबधाने जबाबदारी असतांनासुध्दा मोबाईल हॅण्डसेटमध्ये दुरूस्ती करून दिली नसल्यामुळे वेळोवेळी तक्रारदाराचे मोबाईल हॅण्डसेटमध्ये वेळोवेळी बिघाड झाल्याचे तक्रारीत तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरून दिसून येते. संपुर्ण दुरूस्ती न करता तसेच वेळोवेळी मोबाईल हॅण्डसेटच्या बिघाडामुळे तक्रारदारास त्रास सहन करावा लागला आहे. मोबाईल हॅण्डसेटच्या वॉरंटी पिरीयडमध्ये खराब झालेला असल्याने दुरूस्ती करून देणे आवश्यक असतांना सामनेवालेने विनाकारण तक्रारदाराचा वेळ वाया घालवाला. वॉरंटी कालावधीत हॅण्डसेट दुरूस्त करून देणेऐवजी वॉरंटी पिरीयड नाकारून सामनेवालेने तक्रारदाराचा मोबाईल हॅण्डसेटचा दुरूस्ती खर्च रक्कम रूपये २१,३६३.४६ ची मागणी केली. वास्तवीक सदरील हॅण्डसेटची किंमत रूपये २४,२००/- ही असल्याचे कागदपत्रांवरून दिसुन येते. सदरचा दोष हा उत्पादीत दोष असल्याचे सिध्द होते.
सामनेवाले क्र.३ यांनी सामनेवाले क्र.१ कंपनीचा नादुरूस्त मोबाईल व्यवस्थित दुरूस्त करून न वॉरंटीमध्ये दुरूस्तीसाठी घेऊन मोबाईल दुरूस्त न दिल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले क्र.२ हा मोबाईल विक्रेता असुन त्यांनी तक्रारदारास विकलेला तक्रारीत नमुद वर्णनाचा मोबाईलमध्ये उत्पादीत दोष असल्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी दिलेली नाही. सामनेवाले क्र.१ या उत्पादकीय दोषास जबाबदार आहे व सामनेवाले क्र.३ हे सामनेवाले क्र.१ चे अधिकृत सर्व्हीस सेंटर असुन त्यांनी तक्रारदाराचा मोबाईल व्यवस्थित दुरूस्त करून दिलेला नाही. यावरून सामनेवाले क्र.१ व ३ यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिल्याचे दिसुन येत, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. तक्रारदाराने केलेल्या विनंती कलमातील मागणीचा विचार करता त्या काही प्रमाणात विचार करणे संयुक्तिक होईल. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ ने उत्पादीत केलेला सामनेवाले क्र.२ कडुन सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर याचा आयएमईआय नं. ३५९०५७०६३८२०६९७ चा चार्जर क्रमांक ४०१५डब्ल्यु४९२००१७८ हा मोबाईल रक्कम रूपये २४,२००/- एवढ्या किंमतीमध्ये विकत घेतल्यानंतर त्यामध्ये अल्पावधीत दिनांक १०-१०-२०१६ रोजी वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झाल्यावर त्याऐवजी नवीन मोबाईल न दिल्यामुळे तक्रारदाराला ब-याच कालावधीकरीता मोबाईल वापरापासून वंचीत राहावे लागलेचे दिसुन येते. त्यामुळे सामनेवाले क्र.१ व ३ यांनी तक्रारदारास सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर या वर्णनाचा नविन मोबाईल; वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला द्यावा, सदरचा मोबाईल तक्रारदारास परत देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ व ३ यांच्यावर निश्चीत करणे योग्य राहील. तसेच तक्रारदारास दिलेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रक्कम रूपये ५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रूपये ३,०००/- ही देणेस सामनेवाले क्र.१ व ३ हे जबाबदार आहे, असे मंचाचे मत आहे.
८. सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारास मोबाईल विकलेला आहे. सदर मोबाईलमध्ये उत्पादीत दोष असल्यामुळे त्यांना त्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही. तसेच सामनेवाले क्र.४ यांच्याविरूध्द कुठलाही पुरेसा व सबळ पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.२ व ४ यांच्याविरूध्द कुठलाही आदेश करणे योग्य होणार नाही, असे मंचाचे मत आहे.
९. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्र.१ व ३ यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला तक्रारीत नमुद सोनी एक्सपेरीया झेड ३ प्लस कॉपर या वर्णनाचा मोबाईल परत घेवून त्याच वर्णनाचा नवीन मोबाईल द्यावा. ३. सामनेवाले क्र.१ व ३ यांनी यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा. ४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. ५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. ६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |