त.क. तर्फे अधिवक्ता अड. श्री. खंडेलवाल
वि.प.1 तर्फे अधिवक्ता अड. एम.के.गुप्ता
समक्ष -- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा
सौ.अलका उमेश पटेल, सदस्या
-- आदेश --
(पारित दि. 24-11-2009)
द्वारा-सौ. अलका उमेश पटेल, सदस्या–
तक्रारकर्ता दिनेश एफ. पारधी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा
की,.....
1 तक्रारकर्ता हे मेडीकल स्टोर्स चालवितात यांनी दि. 1.9.2008 ला वि.प.क्रं. 1 गुरुनानक इलेक्ट्रॉनिक्स यांच्या दुकानातून ‘सोनी इरिक्सन’ मोबाईल रु.7650/- चा खरेदी केला. त्याचा आयएमईआय नं. 35461002161483 असे आहे व बॅटरी नं. 163096एचएनसीडीबीएन असे आहे व त्याची एक वर्षाची वॉरन्टी देखील दिली आहे. तक्रारकर्त्याच्या मोबाईल मध्ये बिघाड आल्याने वि.प. यांनी मोबाईल दुरुस्त किंवा बदलवून देण्याबद्दल तक्रार आहे.
2 त.क. यांनी मागणी केली आहे की वि.प.यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असून मोबाईल दुरुस्त होत नाही म्हणून त.क. यांना नविन मोबाईल किंवा खरेदी किंमत रु.7650/- परत द्यावे. मोबाईल बंद असल्यामुळे त.क. यांचे रु.10,000/- चे नुकसान झाले ते व दंड म्हणून रु.3000/- देण्यात यावे.
3 वि.प. क्रं. 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केलेला आहे. त्यांच्या मते आम्ही कंपनीचे वस्तु विक्रेता आहोत. कंपनी मालाची निर्मिती करतात व मालाची गॅरन्टी वॉरन्टी स्वतः निर्धारित करीत असतात. त्यांच्या निर्देशानुसार विक्रेता ग्राहकांना देतात. बाकी जबाबदारी त्यांच्यावर असते. वि.प.क्रं. 1 यांनी एक वेळा त.क.यांचा मोबाईल वि.प.क्रं. 2 सोनी इरिक्सनचे सर्व्हिस सेंटर कडून दुरुस्त करुन घेतले आहे.
4 वि.प.क्रं. 2 व 3 यांना मंचाचे नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर प्रत्यक्ष हजर झाले नाही किंवा त्यांनी आपला लेखी जबाब ही दाखल केलेला नाही. अशा स्थितीत दि. 9.10.2009 रोजी प्रकरण वि.प.क्रं. 2व 3 यांच्या विरोधात एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
कारणे व निष्कर्ष
5 त.क. व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले कागदपत्रे, दस्ताऐवज व इतर पुरावा तसेच त्यांनी केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याच्या मोबाईल मध्ये बिघाड आला व त्यांनी वि.प.क्रं. 1 यांच्याकडे दुरुस्त करण्यासाठी दिला. मोबाईल एकदा दुरुस्त करुन देण्यात आला परंतु काही दिवसांनी त्यामध्ये परत बिघाड आला. वि.प.क्रं 1 यांनी वि.प.क्रं. 2 सोनी इरिक्सन सर्व्हिस सेंटर नागपूर यांच्याकडे पाठविले. त्यांनी त.क. यांच्याकडून सर्व्हिस चार्ज म्हणून रु.170/- घेतले आहे. परंतु मोबाईल दुरुस्त होत नाही म्हणून परत पाठविले. तक्रारकर्त्याचा मोबाईल वि.प. यांनी पहिल्या वेळी दुरुस्त करुन दिले नंतर त्यामध्ये परत बिघाड आला तेव्हा त्यांना कोणत्या प्रकारचा बिघाड आला आहे त्याबद्दल सांगण्यात आले नव्हते . परंतु त.क. यांनी दि. 29.8.09 ला मंचात तक्रार दाखल केल्यानंतर दि. 4.9.09 ला वि.प. यांनी मोबाईलला दुरुस्तीचे कारण पत्राद्वारे कळविले आहे. या पत्रात Dear Sir असा उल्लेख आहे. पत्र कोणाला पाठविले यात नांवाचा उल्लेख केलेला नाही यावरुन पत्र तक्रारकर्त्याला पाठविले असे दिसून येत नाही. म्हणून त्यावर विचार करण्यात आला नाही. त.क. यांचा मोबाईल वॉरन्टी कालावधीत असतांना त्यात बिघाड आल्याने वि.प.यांनी मोबाईल दुरुस्त करुन देणे आवश्यक होते किंवा नविन मोबाईल द्यावयास पाहिजे होते. त.क. यांचे रु.10,000/- नुकसान कसे व कोणत्या प्रकारचे झाले याचा त.क. यांनी पुरावा दिलेला नाही म्हणून त.क. यांची नुकसान भरपाईची मागणी अमान्य करण्यात येत आहे असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 वि.प.क्रं. 2 व 3 यांनी त.क.यांना नविन मोबाईल किंवा मोबाईलची खरेदी किंमत रु.7650/- द्यावे.
2 वि.प.क्रं. 2 व 3 यांनी त.क.यांना ग्राहक तक्रारीचा खर्च रुपये 1000/- व शारीरिक मानसिक त्रासासाठी रु.1000/- द्यावे.
2 वरील आदेशाचे पालन वि.प.क्रं. 2 यांनी आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे.
(सौ.अलका उमेश पटेल) (श्रीमती प्रतिभा पोटदुखे)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया