निकालपत्र :- (दि.05/05/2011) (व्दारा- सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.2 हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.3 हेसुध्दा मे.मंचापुढे उपस्थित राहीले परंतु त्यांनीदेखील आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. अंतिम युक्तीवादाचे वेळेस सामनेवाला गैरहजर. सदरची तक्रार सामनेवालांनी मोबाईल खरेदी नंतर विक्रीपश्चात सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे वर नमुद पत्तयावर राहतात. सामनेवाला क्र.1 ही मोबाईल उत्पादन करुन वितरकाकडून विक्री करणारी मोठी कंपनी आहे. सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेले मोबाईल विकाणारे मोबाईल शॉपी आहे. सामनेवाला क्र.3 हे सामनेवाला क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेकडून दि.18/11/2008 रोजी सोनी इरिक्सन कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट खरेदी केला. त्याचा IMEI NO 356535021401695 असा आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 ही आंतरराष्ट्रीय कंपनी असलेने ते चांगली सर्व्हीस देतील या हेतूने त्यांचे कंपनीचा मोबाईल खरेदी केला. काही दिवसानंतर सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये प्रॉब्लेम येऊ लागले. सदर मोबाईल हॅन्डसेटवर तक्रारदारास फोन आले की सदर फोनला प्रत्तयूतर देतेवेळी मोबाईल हॅन्डसेट बंद पडू लागला. सामनेवाला क्र.3 या सर्व्हीस स्टेशनला मोबाईल दुरुस्तीसाठी दिला असता त्यांनी बरेच दिवस सदर मोबाईल ठेवून घेतला व शेवटी त्यांनी मान्य केले की सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष आहे. मग त्यांनी सदर मोबाईल हॅन्डसेट बदलून IMEI No.354895030110287 असलेला मोबाईल हॅन्डसेट तक्रारदारास दिला. परंतु सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये सुध्दा उत्पादित दोष असलेने तक्रारदाराने सदर मोबाईल हॅन्डसेट परत सामनेवाला क्र.1 यांचे सर्व्हीस स्टेशनला म्हणजे सामनेवाला क्र.3 यांचेकडे दिला. मोबाईल हॅन्डसेड खरेदी केल्यापासून ते सप्टेंबर-2009 अखेरपर्यंत वॉरंटी कालावधीत ब-याच वेळेला दुरुस्त करुनही सदर दोन्ही हॅन्डसेट उत्पादित दोष असलेने दुरुस्त झाले नाहीत ही बाब सामनेवाला क्र.3 यांचे माणसांचे निदर्शनास आणून दिली. त्यामुळे कोणतेही चार्जेस न देता सदर हॅन्डसेट बदलून नवीन हॅन्डसेट मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदरचा नादुरुस्त हॅन्डसेट अदयापही सामनेवाला क्र.1 यांचे सर्व्हीस स्टेशन म्हणजे सामनेवाला क्र.3 यांचेकडेच आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 चे ऑफिसर यांना विनंती केली की नवीन हॅन्डसेट वॉरंटीसह दयावा. परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही. जेव्हा तक्रारदाराने तक्रारीसह मोबाईल हॅन्डसेट सामनेवाला क्र.3 यांचेकडे दिला त्यावेळी त्यांनी प्रॉब्लेम रिपोर्ट कॉलमध्ये चुकीची एंट्री केली व तक्रारदारास चुकीचे मार्गदर्शन केले. हॅन्डसेट दुरुस्त झाला आहे असे सांगितले परंतु तो दुरुस्त झाला नव्हता व त्याचे दोष पुर्णत: गेले नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला क्र.1 यांना नोटीस पाठवली. सदरची नोटीस सामनेवाला क्र.1 यांना मिळूनसुध्दा त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही. सामनेवाला क्र.1 ही आंतरराष्ट्रीय कंपनी असलेने तक्रारदारास चांगला मोबाईल हॅन्डसेट व चांगली सर्व्हीस मिळेल या हेतुने तक्रारदाराने सदर मोबाईल हॅन्डसेट खरेदी केला. परंतु तक्रारदारास दोषपूर्ण हॅन्डसेट दिलेने तक्रारदारास नाहक त्रास व नुकसान सोसावे लागले. सामनेवाला हे तक्रारदारास सेवा देणेस असमर्थ ठरले. त्यांनी तक्रारदाराचे विरुध्द अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत यावी व तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी नवीन हॅन्डसेट नवीन वॉरंटीसहीत बदलून दयावा किंवा हॅन्डसेटची किंमत रु.7,300/- परत दयावी. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, सामनेवाला क्र.3 यांचेकडे वारंवार जाणेसाठी झालेला प्रवास खर्च रु.1,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ मोबाईल खरेदीचे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दिलेले बील, वकीलामार्फत सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत व शपथपत्र दाखल केले.तसेच दि.25/04/2011 रोजी सामनेवाला कंपनीचे सर्व्हीसिंग सेंटरला मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेनंतर त्यांनी दिलेले वर्कजॉब कार्डस, मोबाईल हॅन्डसेट व्यवस्थित दुरुस्त करुन न दिलेने पाठविलेला र्इ्र मेल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, सामनेवालांच्या प्रतिनिधीचा युक्तीवाद विचारात घेता खालील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -----होय. 2) काय आदेश ? -----शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र. 1 :- तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेकडून सामनेवाला क्र.1 कंपनीचा उत्पादित सोनी इरेक्सन W302(S White) IMEI NO.35653502140169 Battary No.SIN 576698 Charger No.SIN 8508 असलेला रक्कम रु.7,300/- ला दि.18/11/2008 रोजी खरेदी केला हे दाखल रोख पावती क्र.1716 वरुन निर्विवाद आहे. 12 महिने हॅन्डसेट वॉरंटीला चार्जर वॉरंटी दिलेली आहे. सदर हॅन्डसेटमध्ये दोष उदभवू लागल्याने तक्रारदाराने सामनेवाला कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे संपर्क साधला. मोबाईल चालू स्थितीतही स्विचऑफ दाखवत असे. त्यामुळे संभाषण होत नव्हते. सदर मोबाईल बरेच दिवस सामनेवाला क्र.3 सर्व्हीस सेंटरमध्ये होता. शेवटी तो उत्पादित दोषामुळे दुरुस्त होत नसल्याने त्यांनी दुसरा हॅन्डसेट IMEI NO.354895030110287 दिला. मात्र सदर मोबाईल हॅन्डसेटमध्ये पुन्हा तोच दोष उदभवला. याबाबत तक्रारदारने ई मेल व्दारे दि.14/12/2009 रोजी सकाळी 10.29 वाजता तसेच तत्पुर्वीही rejesh. ला तक्रारी दिलेल्या आहेत. तसेच दाखल कार्डवरुन सदर मोबाईलमध्ये- 15/09/2009-reported mobile-No calls in without outgoing call in the morning 02/10/2009- Say switch off before not use 8 hours. 30/11/2009- Say switch off before not use 8 hours. अशा नोंदी दिसून येतात. वास्तविक फोन चालू स्थितीत असतानाही संभाषण करणा-यास स्विचऑफ मेसेज येत असे. त्यामुळे संभाषण करणे अवघड झाले. सदर मोबाईल बदलून दुसरा मोबाईल दिला.त्यामध्येही तोच दोष दिसून आला आहे. सबब सदर हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच दि.15/01/2011 रोजी सोनी इरेक्सन तर्फे कोल्हापूर येथील फ्रान्चाईज केएमपी सर्व्हीसेस राजाराम रोड टाकाळा कोल्हापूर तर्फे प्रकाश बळवंत पोवार यांनी रक्कम रु.11,000/- ची दि.18/2/2011 पर्यंत मंजूर करुन चेकने पाठवणेची व्यवस्था करत असलेचे अर्जात नमुद केले आहे. प्रस्तुत प्रकरण लोक अदालतसमोर ठेवले होते. मात्र सामनेवाला गैरहजर राहिल्याने तडजोड झाली नाही. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदारास नमुद हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष होता व सदर उत्पादित दोष सामनेवाला कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला दुर करता आलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास नवीन हॅन्डसेट दिलेला नाही अथवा रक्कम अदा केलेली नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे व यास सामनेवाला क्र. 1 ते 3 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:-सामनेवाला यांनी केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराने रु.7,300/- इतकी मोठी रक्कम हॅन्डसेटला अदा करुनही त्याला सदर हॅन्डसेटचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. सामनेवालांनी 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीत नमुद केलेल्या मॉडेलचा नवीन दोषरहीत हॅन्डसेट दयावा अथवा सदर हॅन्डसेटची रक्कम रु.7,300/- त्वरीत अदा करावी. 3. तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |