घोषित द्वारा – ज्योती ह.पत्की, सदस्य. या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडून दिनांक 23/3/2008 रोजी सोनी इरेक्सन के-5301 पी एम एम या कंपनीचा हॅण्डसेट रु 7,695/- मध्ये विकत घेतला त्याचवेळेस सदरील हॅण्डसेट चांगल्या कंपनीचा असून त्याला 1 वर्षाची वॉरंटी आहे व सदर हॅण्डसेटला काहीही झाल्यास तो आम्ही दुरुस्त करुन देऊ व त्याची बॅटरी देखील चांगली आहे अशी हमी गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दिली. दिनांक 28/7/2008 रोजी तक्रारदाराने सदरील मोबाईल चार्जला लावला असता त्यातुन अचानक मोठा आवाज झाला व स्फोट होऊन मोबाईल बंद पडला. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे मोबाईल टेस्टींगसाठी दिला असता त्यांनी सदरील मोबाईल मुळातच खराब असून तो दुरुस्त होऊ शकत नाही असे सांगितले. तक्रारदाराने सदरील बिघाड हा वॉरंटी कालावधीत झालेला असून तो दुरुस्त करुन अथवा बदलून द्यावा अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारदारास अपमानास्पद वागणूक दिली. गैरअर्जदारांनी तक्रारदारास सदोष हॅण्डसेट दिला व त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून मोबाईलची किंमत रु 7,695/- दिनांक 28/7/2008 पासून 18 टक्के व्याजदराने मानसिक , शारीरिक त्रास व आर्थिक त्रास तसेच तक्रारीच्या खर्चासह द्यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना अनेक वेळा संधी देऊनाही त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश दिनांक 1/9/2009 रोजी पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे कडून दिनांक 23/3/2008 रोजी सोनी इरेक्सन के-5301 पीएमएम कंपनीचा मोबाईल रक्कम रु 7,695/- मध्ये खरेदी केला ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या कॅश मेमोवरुन दिसून येते. परंतू तक्रारदाराने सदरील हॅण्डसेटला एक वर्षाची वॉरंटी असल्याचे व मोबाईलची बॅटरी चांगली असून मोबाईल बिघडल्यास दुरुस्त करुन देऊ अशी हमी गैरअर्जदार क्रमांक 3 ने दिली याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेला मोबाईल खरदीचा कॅश मेमोचे अवलोकन केले असता त्यावर कोठेही मोबाईलच्या वॉरंटी संबंधीचा उल्लेख केलेला नाही तसेच तक्रारदाराने मोबाईलचे स्वतंत्र वॉरंटी कार्ड देखील दाखल केलेले नाही. तक्रारदाराने दिनांक 28/7/2008 रोजी मोबाईल चार्जला लावला असता त्यातुन मोठा आवाज झाला व स्फोट होऊन मोबाइल बंद पडला याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अथवा तक्रारदाराने यासंबंधी कोठेही तक्रार नोंदवल्याचा पुरावा सादर केलेला नाही. सदरील मोबाईल बंद पडल्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांचेकडे मोबाईल दुरुस्त करुन द्यावा अथवा बदलन द्यावा यासाठी पाठपुरावा केल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. म्हणून मंचाचे मते तक्रारदार आपली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. (श्रीमती ज्योती ह.पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख ) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |