(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 31.10.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गै.अ.चे विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडून एल.जी.कंपनीचा 185 लि. अनुक्रमांक 904 एनएलटीडी 002323 मॉडेल नं.195 एसएजीएस फ्रिज रुपये 11,400/- ला दि.15.5.09 ला चालान नं.339 व्दारे नगदी विकत घेतला. अर्जदाराने, एल.जी.कंपनीचा फ्रिज विकत घेतल्यानंतर, त्यात बिघाड आल्यामुळे फोनव्दारे तक्रार केली, त्यावर कस्टमर केअरला कळविण्यास सांगितले. अर्जदाराने, कस्टमर केअर सर्व्हीस नं.1800-180-9999 वर एसएमएस. व्दारे सी.सी.नं.1042120496 दि.24.4.2010, सी.सी.नं. 1042800392 दि.28.4.2010, 1052603054 दि.26.5.2010 आणि 1060427727 दि.4.6.2010 ला तक्रार केली. अर्जदाराने, दि.11.6.2010 रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविला, तो मिळून सुध्दा कोणतीही कार्यवाही गै.अ.यांनी केली नाही. दि.25.7.2010 ला मु.आष्टी, जि.गडचिरोली येथील एक मेकॅनिक पाठवून थातुरमातूर दुरुस्त केले व अल्पावधीत पुन्हा नादुरुस्त व निरुपयोगी करुन चालला गेला. दि.19.1.2011 ला चंद्रपूर वरुन रफिक शेख नावाचा मेकॅनिक पाठवून रेफ्रिजरेटरला संध्याकाळी 4-00 वाजता पासून राञी 9-00 वाजता पर्यंत दुरुस्त करुन सुध्दा तो दुरुस्त झाला नाही. गै.अ.क्र.1 ने दिलेली वस्तु ही पूर्णपणे खराब असून, वारंवार मनस्तापाला कारणीभूत आहे, म्हणून सदर तक्रार दाखल करुन अर्जदाराने खरेदी किंमत रुपये 11,400/- आणि 18 टक्के व्याजाप्रमाणे आजतागायत अंदाजे रुपये 5000/-, वकील नोटीस फी रुपये 1000/-, मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/-, आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/-, जाण्यायेण्याचा व सुट्यांचा खर्च रुपये 10,000/- आणि पोस्टल व मोबाईल बिल करीता रुपये 500/- असे एकूण रुपये 47,900/- गै.अ.यांनी द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, सदर मामल्याचा खर्च गै.अ.वर लावण्यात यावा, अशी प्रार्थना केली आहे. 2. अर्जदाराने, तक्रारीसोबत नि.3 नुसार 5 झेरॉक्स दस्ताऐवज, ज्यामध्ये गै.अ.क्र.1 ला दिलेल्या लेखी तक्रारीची प्रत, वकीला मार्फत पाठविलेला नोटीसाची प्रत, जॉबशीट, वॉरंटी कार्ड आणि रेफ्रिजरेटर बिलाची प्रत दाखल केली आहे. तक्रार नोंदणी करुन गै.अ.यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.2 ला शेवटची नोटीस 9 जुलै 2011 ला नि.14 नुसार तामील झाल्याची पोहचपावती दि.26.8.2011 ला प्राप्त झाली. गै.अ.क्र.1 ने नि.11 नुसार लेखी उत्तर सादर केले. गै.अ.क्र.2 ला नोटीस तामील होऊन हजर झाला नाही, त्यामुळे त्याचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.3.9.2011 ला पारीत करण्यांत आला. 3. गै.अ.क्र.1 ने नि.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात हे म्हणणे माहिती अभावी नाकबूल केले आहे की, अर्जदार हे भंडारा जिल्ह्यातील मौजा – सिल्ली, तह.जि. भंडारा, येथील रहिवासी असून, सन 2001 पासून बँक ऑफ महाराष्ट्र देवलमरी, पो.देवलमरी, तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे लिपिक या पदावर कार्यरत आहे. बाकी मजकुराबाबत वाद नाही. याबाबत वाद नाही की, अर्जदार यांनी गै.अ.क्र.1 यांना दि.11.6.2010 रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविला होता. परंतु, अर्जदार यांनी फोनवर गै.अ.क्र.1 ला समाधान झाले आहे असे सांगितले होते, त्यामुळे गै.अ.क्र.1 ला सदर नोटीसाचे उत्तर देण्याची गरज भासली नाही. हे म्हणणे नाकबूल की, अर्जदार हे गै.अ.क्र.1 चे ग्राहक आहे. याबाबत वाद नाही की, गै.अ.क्र.1 यास वकीलामार्फत दि.22.6.2010 ला रजिस्टर पोष्टामार्फत नोटीस पाठविला होता. परंतु, अर्जदार यांनी, गै.अ.क्र.1 यांना फोनवर समाधान झालेले आहे. त्यामुळे नोटीसाचे उत्तर देण्याची गरज भासली नव्हती. याबाबत वाद नाही की, दि.25.7.2010 रोजी एक मेकॅनिक पाठवून अर्जदाराचा फ्रिज दुरुस्त करुन दिला होता. हे म्हणणे नाकबूल की, अर्जदाराचा फ्रिज थातुरमातूर दुरुस्त करुन दिला व तो अल्पावधीत नादुरुस्त करुन चालला गेला.
4. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरात पुढे असे ही कथन केले आहे की, गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराचा फ्रिज दुरुस्तीकरीता दि.19.1.2011 ला चंद्रपूर वरुन रफीक शेख नावाचा मेकॅनिक पाठवून, रेफ्रिजरेटर ला सायंकाळी 4-00 वाजतापासून 9-00 वाजेपर्यंत काम करुन फ्रिज दुरुस्त करुन दिला. अर्जदाराने, परिच्छेद 9 मध्ये केलेली मागणी नाकबूल केली आहे. अर्जदाराने केलेली प्रार्थना खोटी, बोगस व बनावटी असून नाकबूल आहे.
5. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात असे कथन केले आहे की, तक्रार प्राथमिक दृष्ट्या खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने दि.15.5.2009 रोजी फ्रिज विकत घेतला आहे. दि.15.5.2009 ते 15.5.2010 पर्यंत एक वर्षाची वॉरंटी पिरेड आहे आणि 4 वर्षाचा कॉम्प्रेसरचा वॉरंटी पिरेड आहे. अर्जदाराने फ्रिज मधील कोणता भाग बिघाड झाला याबाबत तक्रार मध्ये वर्णन केले नाही. तसेच, गै.अ.क्र.1 कडे दि.11.6.2010 रोजी तक्रार केली आहे. सदर लेखी तक्रार मध्ये कोणता भाग बिघाड झाला याबाबत वर्णन नाही. तसेच, दि.11.6.2010 रोजीची तक्रार ही वॉरंटी पिरेड नंतरची तक्रार आहे. अर्जदार यांनी, गै.अ.क्र.1 कडे केलेली तक्रार वॉरंटी पिरेडनंतरची असल्यामुळे, ती सर्व्हीस घेण्यास पाञ नाही.
6. गै.अ.क्र.2 कडे एसएमएस केले आहे, अशी तक्रार मध्ये म्हटले आहे. परंतु, एसएमएस. बाबत गै.अ.क्र.1 ला काहीही माहिती नाही. गै.अ.क्र.2 चे स्वतःचे सर्व्हीस केअर असल्याने आणि वॉरंटीपिरेड मध्ये वस्तू असल्याने, गै.अ.क्र.2 सर्व्हीस देण्यास पाञ असतो. गै.अ.क्र.1 चा ग्राहकांना वॉरंटी पिरेड नंतर सर्व्हीस देण्याचा कोणताही अधिकार व संबंध नाही. अर्जदाराने, दस्त क्र.3 जॉबशीट लेटर दाखल केला. त्यामध्ये, कबूल केले आहे की, गै.अ.क्र.1 यांनी दिलेली सर्व्हीस समाधानकारक आहे, त्यावर दिनांक 25.7.2010 ही नमूद करुन सही केली आहे. 7. गै.अ.क्र.2 चे स्वतःचे ग्राहक सर्व्हीस केअर असून, ग्राहकांना सर्व्हीस देण्याचे कार्य गै.अ.क्र.2 चे आहे. गै.अ.क्र.1 डिलर असून सर्व्हीस सोबत काहीही संबंध नाही. अर्जदाराने फ्रिज मध्ये बिघाड आल्यास त्यांना डायरेक्ट तक्रार गै.अ.क्र.2 यांना करणे आवश्यक होते. परंतु, तक्रारीमध्ये विनाकारण पार्टी केले आहे. अर्जदाराने प्रत्यक्ष गै.अ.क्र.2 यांना भेट देवून तक्रार सोडविणे आवश्यक आहे. तक्रारीशी गै.अ.चा काहीही संबंध नाही. तक्रारीचे अर्जदाराने फोनवर समाधान झाले असे सांगितले आहे, त्यामुळे कोणतेही कारण घडले नाही. अर्जदाराची तक्रार बनावटी व खोटी असल्यामुळे गै.अ.क्र.1 ला अमान्य आहे. मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास देण्याचा एकमेव हेतुने सदर तक्रार दाखल केली आहे. करीता, अर्जदार रुपये 25,000/- नुकसान भरपाई देण्यास पाञ आहे. अशापारिस्थितीत, तक्रार अर्ज खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. 8. अर्जदाराने, तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ पुरावा शपथपञ म्हणून तक्रारीतील मजकूर शपथपञाचा भाग समजण्यात यावा, अशी पुरसीस नि.15 नुसार दाखल केली. गै.अ.क्र.1 ने नि.18 नुसार शपथपञ सादर केले आहे.
9. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि गै.अ. यांनी सादर केलेले शपथपञ, तसेच नि.19 सादर केलेल्या लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर
1) गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता केली : होय. आहे काय ? 2) तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? : होय. 3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 व 2 : 10. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडून, गै.अ.क्र.2 निर्मीत एल.जी.कंपनीचा फ्रिज दि.15.5.2009 रोजी विकत घेतला. सदर विकत घेतलेल्या फ्रिजमध्ये बिघाड आल्यामुळे, अर्जदाराने गै.अ.क्र.1 ला तक्रार केली. गै.अ.क्र.1 ने अर्जदाराकडील फ्रिज दुरुस्त करण्याकरीता दि..25.7.2010 ला मेकॅनिक पाठविला होता. तसेच, चंद्रपूर येथून रफीक शेख नावाचा मेकॅनिक दि.19.1.2011 ला पाठविला होता, याबाबत वाद नाही. गै.अ.क्र.1 ने मान्य केले आहे की, अर्जदाराकडील फ्रिज दुरुस्त करण्याकरीता वेळोवेळी मेकॅनिक पाठविला होता.
11. गै.अ.क्र.2 ला नोटीस तामील होऊनही हजर झाला नाही आणि आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे, गै.अ.क्र.2 चे विरुध्द अर्जदाराचे म्हणणे विना आव्हान (Unchallenged) असल्याने स्विकारण्यास पाञ आहे. गै.अ.क्र.1 यांनी लेखी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदाराने दि.15.5.2009 ला फ्रिज विकत घेतला, त्याची गॅरंटी 1 वर्षाची होती व आहे. त्यानुसार दि.15.5.2010 पर्यंत वॉरंटी कालावधी होता, त्याचेनंतर म्हणजे दि.11.6.2010 ला लेखी तक्रार प्राप्त झाली, त्यामुळे वॉरंटीनंतर अर्जदाराकडून तक्रार प्राप्त झाली असल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. गै.अ.क्र.1 यांचे वरील म्हणण्यात काहीही तथ्य नाही. उलट, आपली जबाबदारी टाळण्याकरीता असा मोघम बेजबाबदारपणाचे कथन केले असल्याची बाब त्याचे लेखी युक्तीवादावरुन सिध्द होते. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 ला एसएमएस व्दारे फ्रिज मधील बिघाडाबाबत तक्रार दि.24.4.2010 ला तक्रार क्र.1042120496, आणि दि.28.4.2010 ला केली आहे. म्हणजेच, अर्जदाराने फ्रिज विकत घेतल्याचे तारखेपासून 1 वर्षाचे आंत बिघाड आला व त्याबाबत, गै.अ.क्र.1 व 2 ला तक्रार केली, ही बाब सिध्द होते.
12. गै.अ.क्र.1 ने लेखी युक्तीवादातील पॅरा 4 मध्ये हे मान्य केले आहे की, ‘‘दि.24.4.2010 ला दिलीप नावाचा मेकॅनिक पाठवून फ्रिज मधील कुलींग प्रॉब्लेम दुरुस्त करुन दिला. त्यानंतर, पुन्हा फ्रिज दुरुस्त न झाल्यामुळे दि.28.4.2010 ला रफीक शेख नावाचा मेकॅनिक पाठवून कुलींग प्रॉब्लेम दुरुस्त करुन दिला.’’ या गै.अ.क्र.1 च्या लेखी युक्तीवादातील कथनावरुन हे सिध्द होते की, गै.अ.क्र.2 निर्मीत खरेदी केलेला फ्रिजमध्ये 1 वर्षाची वॉरंटी कालावधी दि.15.5.2010 चे पूर्वी बिघाड आलेला होता, परंतु गै.अ.क्र.1 स्वतःची जबाबदारी टाळण्याकरीताच वॉरंटी कालावधीनंतर तक्रार प्राप्त झाली, असे खोटे कथन करीत आहे.
13. गै.अ.क्र.1 यांनी लेखी युक्तीवादात हे सुध्दा मान्य केले आहे की, दि.26.5.2010 ला फ्रिज नादुरुस्त झालेला होता, तेंव्हा स्वतः दुरुस्त करुन दिला. त्यानंतर, पुन्हा दि.25.7.2010 ला फ्रिज दुरुस्त करुन दिला. त्यानंतर, पुन्हा गै.अ.क्र.1 ने नादुरुस्त फ्रिज दुरुस्तीकरीता दि.19.1.2011 ला रफीक शेख नावाचा मेकॅनिक पाठविला, या विधानावरुन फ्रिजमध्ये वारंवार बिघाड येत असून, वारंवार ते दुरुस्त करुन देण्यात आले आहे. सदर फ्रिज हा वॉरंटी कालावधीमध्ये म्हणजे दि.24.4.2010 पासून सतत बिघाड येवून दुरुस्त करण्यात येवून आजही नादुरुस्त आहे. यावरुन, हे स्पष्ट होते की, गै.अ.क्र.2 निर्मीत एल.जी.कंपनीचा मॉडेल क्र.195 मध्ये उत्पादनात दोष असल्याचा निष्कर्ष निघतो. अर्जदाराने विकत घेतलेला फ्रिज हा गै.अ.क्र.1 मार्फत घेतला, त्यामुळे तो विक्रेता आहे आणि म्हणून आपली जबाबदारी टाळू शकत नाही. वास्तविक, गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरात असे हास्यास्पद कथन केले आहे की, ‘’अर्जदार यांनी फ्रिजमध्ये बिघाड आल्यास त्यांनी डायरेक्ट तक्रार गैरअर्जदार क्र.2 यांना करणे आवश्यक होते.’’ ‘’अर्जदार यांनी प्रत्यक्ष गै.अ.क्र.2 यांना भेट देवून तक्रार सोडविणे आवश्यक आहे.’’ या कथनावरुन अर्जदाराने डायरेक्ट कंपनीकडून फ्रिज विकत घ्यावयास पाहिजे होता, गै.अ.क्र.1 कडून नाही. वास्तविक, गै.अ.क्र.1 हा एल.जी.कंपनीचा अधिकृत विक्रेता असल्यामुळे आपली जबाबदारी टाळू शकत नाही. परंतु, हेतुपुरस्परपणे आपली जबाबदारी टाळण्याकरीता उपरोक्त हास्यास्पद कथन करुन आपली जबाबदारी गै.अ.क्र.2 वर टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. गै.अ.क्र.2 शी करारात्मक संबंध (Privities of Contract) गै.अ.क्र.1 मार्फत अस्तित्वात आला असल्याने दोन्ही गै.अ. सेवा देण्यास जबाबदार आहे, आणि गै.अ.क्र.1 च्या लेखी युक्तीवादावरुन फ्रिजमध्ये वारंवार बिघाड येत असल्यामुळे उत्पादनात दोष असल्याने, गै.अ. त्याच कंपनीचा दुसरा फ्रिज बदलवून देण्यास जबाबदार आहेत, किंवा खरेदी केलेली किंमत रुपये 11,400/- दि.15.4.2009 पासून द.सा.द.शे.9 % व्याजासह देण्यास जबाबदार आहेत, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. मा.केरला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी एका प्रकरणात मत दिले आहे. त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे.
Defect – Genset – Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f) – Genset became defective within the warranty period itself – Repaired many times – Defects continued to persist – District Forum accepted the complaint – Both the dealer and the manufacturer directed to replace the defective machine with a new unit or alternatively to repay the price of Rs.23,950 with compensation and cost – Appeal by the dealer – Impugned order confirmed – Appeal dismissed. Dealer – Manufacturer – Consumer Protection Act, 1986 – Both the manufacturer and its dealer are the necessary parties to the sale of a product -- In case of any manufacturing defect alleged to be in that product, the dealer cannot evade its responsibility – It is as much liable to the purchaser as the manufacturer. Pioneer Motors (Kannur) Pvt. Ltd. -Vs.- N.Chandran, Winspot Tailors and another 2010 CTJ 344 (CP)(SCDRC) 14. गै.अ.क्र.1 यांनी लेखी युक्तीवादात असा मुद्दा घेतला आहे की, गै.अ.क्र.2 चे स्वतःचे ग्राहक सर्व्हीस केअर असून, सर्व्हीस देण्याचे कार्य गै.अ.क्र.2 चे आहे. गै.अ.क्र.1 हा डिलर असून, ग्राहकाच्या सर्व्हीस सोबत त्याचा काहीही संबंध नाही. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तुमध्ये वॉरंटी पिरेड मध्ये दोष असल्यास सर्व्हीस देण्याचे कार्य गै.अ.क्र.2 चे आहे. या गै.अ.क्र.1 च्या कथनात काहीही तथ्य नाही. जरी फ्रिज हे गै.अ.क्र.2 निर्मीत असली तरी सेवा देण्याचे काम गै.अ.क्र.1 चे सुध्दा आहे. गै.अ.क्र.1 यांनी दि.24.4.2010 ला कुलींग प्रॉब्लेम दुरुस्त करुन दिल्याचे मान्य केले आहे. गै.अ.क्र.2 ला एसएमएस. व्दारे दि.24.4.2010 ला तक्रार दिल्याचे मान्य केले आहे. यावरुन, गै.अ.क्र.2 ला तक्रार प्राप्त झाल्यानंतर गै.अ.क्र.1 ला दिलेल्या निर्देशानुसारच फ्रिज दुरुस्त करुन दिला, असाच निष्कर्ष निघतो. गै.अ.क्र.2 चे जरी सर्व्हीस सेंटर असले तरी सेवा देण्याची जबाबदारी ही दोन्ही गै.अ.वर आहे. गै.अ.क्र.1 आपली जबाबदारी गै.अ.क्र.2 वर टाकू शकत नाही. मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे. सदर न्यायनिवाड्यातील पॅरा 7 मध्ये मत दिले आहे, त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे. 7. It is tried to be argued on behalf of the appellant that the Split AC unit is manufactured by Onida Company and Appellant/Org. O.P.No.2 Onida Service Centre is wrongly prosecuted in this Consumer complaint. We are not much impressed by the argument in question in the background of fact of this particular case. The complaints were attended by the appellant/Org. O.P.No.2 Onida Service Centre and it is they who promised to replace the faulty unit. Further they effectively represent manufacturing company Onida. Hence, the argument on the point is devoid of any substance. Adonis Electronics Pvt. Ltd.-Vs.-Nikhil Gangan 2010 (1) CPR 65 15. एकंदरीत, वरील निष्कर्षावरुन गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता केली असल्याची बाब सिध्द होते. अर्जदाराने तक्रारीमध्ये फ्रिजची किंमत रुपये 11,400/- आणि 18 टक्के व्याजाने रक्कमेची मागणी केली आहे. अर्जदार हा अहेरी येथील रहिवासी असून, त्यांनी गै.अ.क्र.1 कडून फ्रिज विकत घेतला. सदर फ्रिज मध्ये वारंवार बिघाड होऊनही फ्रिज दुरुस्त झाला नाही, त्यामुळे रकमेची मागणी केली आहे. परंतु, निर्मीती दोष असल्यामुळे फ्रिजमध्ये वारंवार बिघाड येत असल्याने, गैरअर्जदार क्र.1 व 2 त्याच मॉडेलचा नवीन फ्रिज वॉरंटीसह देवून, जुना फ्रिज परत घेण्यास पाञ आहेत, किंवा नवीन फ्रिज देणे शक्य नसल्यास, नादुरुस्त फ्रिज गै.अ.यांनी परत घेवून रुपये 11,400/- दि.15.5.2009 पासून 9 % व्याजासह परत करण्यास पाञ आहेत. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक ञासापोटी आणि वेळोवेळी झालेल्या गैरसोयीपोटी नुकसान भरपाई गै.अ.क्र.1 व 2 देण्यास जबाबदार आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. मुद्दा क्र.3 : 16. वरील मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचने वरुन, तक्रार अंशतः मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या नवीन एल.जी. कंपनीचा मॉडेल क्र.195 फ्रिज 185 लिटर अर्जदारास आदेशाचे तारखेपासून 30 दिवसाचे आंत नवीन वॉरंटीसह द्यावे.
अथवा
गैरअर्जदार यांना नवीन फ्रिज देणे शक्य नसल्यास, अर्जदारास फ्रिजची किंमत रुपये 11,400/- द.सा.द.शे. 9 % व्याजाने दिनांक 15/5/2009 पासून आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी, वैयक्तीकरित्या किंवा संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसीक, शारीरीक ञासापोटी रुपये 5000/- आणि तक्रार खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. |