१. विरुध्द पक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. २. विरूध्द पक्ष क्र. 1 हि मोबाईल उत्पादक कंपनी असून विरुद्ध पक्ष क्र. 3 रिलायंस रिटेल लि. हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत मोबाईल विक्रेता व विरूध्द पक्ष क्र. 2 हे वि.प.क्र.1 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे. तक्रारकर्त्याने दि. 08.03.2016 रोजी वि.प. क्र. 1 चा निर्मित, सोनी कंपनीचा सोनी एक्स्पेरिया एम-4 एक्वा डयुएल हा मोबाईल वि.प.क्र.३ कडून रु.18,496.16 ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 352198071913061 हा आहे. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर जवळपास तीन महिन्यांपर्यंत सदर मोबाईल चांगले काम करीत होता. मात्र त्यानंतर मोबाईल आपोआप बंद पडणे, त्याचा हेडफोन काम न करणे इत्यादी दोष निर्माण झाले. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प. क्र. 1 यांचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असलेल्या वि.प. क्र. २ यांचेकडे अनुक्रमे दि. 6.5.2016, दि. 16.2.2017 व दिनांक 5.7.2017 रोजी दुरुस्तीला दिला. सदर मोबाईल 4 वेळा दुरुस्तीकरिता दिला परंतु दुरूस्तीनंतरही मोबाईल आपोआप बंद पडणे, त्याचा हेडफोन काम न करणे या समस्या वारंवार निर्माण झाल्या. दुस-यांदा दुरूस्तीनंतर जुन्या दोषांबरोबरच मोबाईल हॅंग होणे यासारखे नवीन दोष निर्माण झाले. तिस-या दुरूस्तीनंतर पुन्हा हे दोष निर्माण झाले. वि.प.ने तक्रारकर्त्याला पहिल्या वेळेस दुरूस्तीला दिलेला मोबाईल 38 दिवसांनंतर परत केला, तर दुस-या वेळी 20 दिवसांनंतर परत केला. पहिल्यावेळी सदर मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये आहे असे सांगितले. वि.प.क्र.2 यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरूस्तीकरीता दिल्यानंतर बराच कालावधी लावत असल्याने तक्रारकर्त्याने दि.14.6.2017 रोजी सदर बाब वि.प.क्र.1 यांना इमेलद्वारे कळविली. त्यावेळी वि.प.क्र.1 यांनी दि.15.6.2017 रोजी इमेलद्वारे उत्तर पाठवून मोबाईलची समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु सदर बाबीचे निराकरण केले नाही.दिनांक 5/7/2017 रोजी तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये चौथ्यांदा दोष निर्माण झाला तेंव्हा तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे तक्रार केली तेंव्हा वि.प.क्र.1 यांनी सदर मोबाईलच्या दोषाबाबत सोनी टिमला कळविले तसेच सोनी टोल फ्री नं. 18001037799 वर फोन करून मदत घेऊ शकता असे सांगितले. परंतु सदर क्रमांकावर संपर्क केला असता काहीही उपयोग झाला नाही. दिनांक 5/7/2017 रोजी तक्रारकर्त्याचा मोबाईल चौथ्यांदा दोष निर्माण झाला तेंव्हा वि.प.क्र.2 कडे दुरूस्तीला दिला असता त्यांनी दुरूस्तीला नकार दिला व सांगितले की वॉरंटी कालावधीमध्ये नसल्याने दुरूस्तीला पैसे लागणार. वि.प.ने दुरूस्तीचा कालावधी वॉरंटीमध्ये पकडून वॉरंटीचा कालावधी संपल्याचे सांगितले. वि.प.क्र.2 यांनी मोबाईल दुरूस्तीसाठी घेतलेल्या कालावधीमुळे तक्रारकर्ता दिलेल्या वॉरंटीचा लाभ घेऊ शकला नाही. तक्रारकर्त्याने उपरोक्त मोबाईल विकत घेतल्यापासून त्यामध्ये बिघाड सुरू झाल्याने तक्रारकर्ता त्याचा उपयोग करू शकला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे व्यवसायात नुकसान झाले तसेच मानसीक, शारिरीक त्रास व आर्थीक नुकसान झाले. वि.प.नी सदर मोबाईल दुरूस्त करून न दिल्याने तक्रारकर्त्याने दि. 27.7.2017 रोजी वि.प. यांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठविली परंतु वि.पक्षांनी त्याची पुर्तता केली नाही. वि.प.नी तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिली. सबब तक्रारकर्त्याने वि.प.यांच्याविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, वि.पक्षांनी तक्रारकर्त्याला त्याचा मोबाईल बदलून द्यावा किंवा त्याची किंमत रक्कम रु. 18,496.16/- परत करावी तसेच वि. पक्षांमुळे तक्रारकर्त्याचे व्यवसायात प्रतिमाह रू.25,000/- प्रमाणे 3 महिन्याचे एकुण रू.75,000/- नुकसान झाल्याने ती रक्कम वि. पक्षांनी तक्रारकर्त्यास द्यावी, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 1,00,000/- तसेच नोटीस व तक्रार खर्चापोटी एकुण रक्कम रु. 11,500/- वि. पक्षांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. क्र. 1 ते 3 यांनी संयुक्त लेखी उत्तर दाखल केले असून त्यात वि.प. क्र. 1 कंपनीचे वि.प. क्र. 3 हे अधिकृत विक्रेता आणी वि.प. क्र. 2 हे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे तसेच तक्रारकर्त्याने दि.8/3/2016 रोजी वि.प.क्र.1 चा निर्मित सोनी कंपनीचा सोनी एक्स्पेरिया एम-4 एक्वा डयुएल हा मोबाईल वि.प.क्र.3 कडून रु.18,496.16/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 352198071913061 हा आहे या बाबी मान्य केल्या आहेत व तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबुल करून पुढे नमूद केले की सदर मोबाईलची,मोबाईल खरेदी केल्यापासून 1 वर्षाची वॉरंटी होती. तक्रारकर्त्याने 1 वर्ष 4 महिने सदर मोबाईलचा वापर उपयोग केला व त्यानंतर दि.13.7.2017 रोजी वि.प. क्र.1 कडे सदर मोबाईलमध्ये ‘’No Audio” याबाबत तक्रार केली. वि.प.क्र.1 ने सदर बाब वि.प.क्र.2 सर्व्हिस सेंटर ला कळविली परंतु त्यांनी सदर मोबाईल वॉरंटी कालावधी संपुष्टात आल्याचे सांगितले व त्यांनी सदर मोबाईलच्या दुरूस्तीकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तक्रारकर्त्यास सांगितले. वॉरंटीच्या शर्तींमध्ये स्पष्ट नमूद आहे की कालावधी संपूष्टात आल्यास त्यानंतर दुरूस्तीचा खर्च लागणार. तक्रारकर्तीचा मोबाईल वॉरंटी कालावधी संपूष्टात आल्यानंतर दुरूस्तीकरीता आणल्याने त्यास दुरूस्तीचा खर्च लागणार आहे. वि. प. क्र. 2 यांनी सदर मोबाईल वॉरंटी कालावधीत दुरुस्त करून दिला. वि.प.यांनी तक्रारकर्त्यास योग्य ती सेवा दिली असुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. सबब, तक्रारकर्त्यार्ची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र व तक्रारकर्त्याचे शपथपत्रच लेखी युक्तीवाद समजण्यांत यावा अशी दिनांक 12.07.2018 ला पुरसीस व वि.प. क्र.1 ते 3 यांचे संयुक्त लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र आणी लेखी व तोंडी युक्तीवादाची दि.12.7.2018 रोजी पुरसीस दाखल तसेच तक्रारकर्ती व वि. पक्षांचे परस्परविरोधी कथनावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत. मुद्दे निष्कर्ष 1. वि.प. क्र. 1 ते 3 यांनी मोबाईल विक्री व दुरुस्ती कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 2. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 5. विरूध्द पक्ष क्र. 1 हि मोबाईल उत्पादक कंपनी असून विरुद्ध पक्ष क्र. 3 रिलायंस रिटेल लि. हे अधिकृत मोबाईल विक्रेता व विरूध्द पक्ष क्र. 2 हे वि.प.क्र.1 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे. तक्रारकर्त्याने दि. 08.03.2016 रोजी वि.प. क्र. 1 चा निर्मित सोनी कंपनीचा सोनी एक्स्पेरिया एम-4 एक्वा डयुएल हा मोबाईल वि.प.क्र.3 कडून रु.18,496.16 ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 352198071913061 हा आहे याबाबत वाद नाही. 6. तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि , सदर मोबाईलमध्ये मोबाईल आपोआप बंद पडणे, त्याचा हेडफोन काम न करणे इत्यादि समस्या निर्माण झाल्या मुळे तक्रारकर्त्याने वि.प. क्र. 1 यांचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असलेल्या वि.प. क्र. 2 यांचेकडे अनुक्रमे दि. 6.5.2016, दि. 16.2.2017 रोजी दुरुस्तीला दिला व वि.प.ने दिलेल्या जॉबशिटमधील कस्टमर कंप्लेंटमध्ये उपरोक्त दोष नमूद आहेत. तक्रारकर्त्याने उपरोक्त मोबाईल पहिल्यांदा दि.6/5/2016 ला दुरूस्तीला दिला असता वि.प.ने तो दिनांक 30/5/2016 ला परत केला व दिनांक 16/2/2017ला दिला असता दिनांक 27.2.2017 ला दुरूस्त करून परत दिला असे जॉबशीटमधील डिलीव्हरी कॉलममध्ये नमूद आहे. यानंतरही दिनांक 5.7.2017 व दि. 13/7/2017 रोजी वि.प.ने दिलेल्या जॉबशिटमध्येसुध्दा वरील जॉबकॉर्डमधील नमूद दोषच नमूद आहेत. सदर जॉबशिटस दस्त क्र.2,4,6 व 7 वर तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या आहेत. यावरून वारंवार दुरूस्तीनंतरही मोबाईल आपोआप बंद पडणे, त्याचा हेडफोन काम न करणे, तसेच हॅंग होणे या समस्या वारंवार उद्भवल्या व त्याकरीता तक्रारकर्त्याने मोबाईल वि.प.कडे दुरूस्तीला दिला हे सिध्द होते. यानंतर दिनांक 13/7/2017 रोजीदेखील तक्रारकर्त्याने मोबाईल दुरूस्तीसाठी आणला असता वॉरंटी कालावधी संपुष्टात आल्यामुळे सदर मोबाईलच्या दुरूस्तीकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तक्रारकर्त्यास सांगितले, हे वि.पक्षांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केलेले आहे. यावरून सदर मोबाईलमधील उपरोक्त दोषांचे पुर्णपणे निराकरण न झाल्याने सदर दोष सातत्याने उद्भवत असल्याने सदर मोबाईल हा सदोष आहे हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे . मात्र तक्रारकर्त्याने मोबाईलसेवेअभावी त्याचे व्यापाराचे किती नुकसान झाले याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केला नाही असे असले तरी मोबाईल वारंवार नादुरूस्त झाल्यामुळे व या दोषांच्या दुरूस्तीकरीता सदर मोबाईल बराच कालावधीपर्यंत वि.प.कडे पडून राहिल्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रास झाला व त्यामुळे तक्रारकर्त्याला उचीत नुकसानभरपाई देण्यास वि.पक्ष जबाबदार आहेत. विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यास आवश्यक सेवा दिली नाही हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 7. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 165/2017 अंशतः मान्य करण्यात येते. 2. विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे, सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. 3. तक्रारकर्त्याने त्याचेकडील विवादीत सोनी कंपनीचा सोनी एक्स्पेरिया एम-4 एक्वा डयुएल हा मोबाईल वि.प.क्र.3 कडे जमा करावा व त्यानंतर वि. प. क्र. 1 व 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास त्याचा सदोष मोबाईल बदलून त्याच मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा. 4. वि. प. क्र. 1 व 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्यास मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.2,000/- व तक्रार खर्च रू.1,000/- अदा करावा . 5. वि.प. क. 2 यांचेविरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. 6. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 07/08/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |