निकालपत्र :- (दि.12.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कंपनीचा F305 या मॉडेलचा IMEI No.35216203032726-8 असलेला मोबाईल दि.05.03.2009 रोजी रुपये 8,500/- इतक्या किंमतीस सामनेवाला क्र.2 यांचेकडून विकत घेतला. सदर मोबाईल खरेदी केल्यापासून वारंवार हँग होणे, नेटवर्क नसणे, व्हाईट डिस्प्ले इत्यादी दोष येत होते. त्या कारणाने सदर मोबाईल सामनेवाला क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकरिता द्यावा लागत असे व सामनेवाला क्र;3 हे सदर मोबाईलमधील महत्त्वाचे पार्ट बदलून देत असत. शेवटी पुन्हा एकदा सदर मोबाईलमध्ये उपरोक्त नमूद दोष चालू झालेने दुरुस्तीस दिला असता सामनेवाला क्र.3 सदरचा मोबाईल सुमारे तीन महिने ठेवून घेतला. परंतु, त्यानंतरदेखील सदरचा मोबाईल दोषमुक्त झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणे सदरचा मोबाईल तक्रारदार यांनी सामनेवाला कडे परत केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.10.03.2010 रोजी दुसरा त्याच मॉडेलचा मोबाईल देवू केला, परंतु त्यासाठी त्यांनी वॉरंटी फक्त 2 महिन्याची मिळेल अशी चुकीची अट घातली. अशाप्रकारे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, सामनेवाला यांनी मोबाईलची किंमत रुपये 8,500/-, मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मोबाईल खरेदी बिल, सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेली पत्र, जॉबशीटस्, मोबाईल सर्व्हीस सेंटरवर जमा केलेबाबत सामनेवाला यांना केलेला ई-मेल, सामनेवाला यांचे सदर ई-मेलला आलेले उत्तर, सामनेवाला यांचेकडे दुरुस्तीकरिता दिलेची रिसीट, मोबाईल सामनेवालाकडे असलेबाबत सामनेवाला यांनी केलेला ई-मेल, सामनेवाला यांना पाठविलेले तक्रार पत्र, तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेला ई-मेल इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) तक्रारदारांच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकणेत आले. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कंपनीचा F305 या मॉडेलचा IMEI No.35216203032726-8 असलेला मोबाईल दि.05.03.2009 रोजी रुपये 8,500/- इतक्या किंमतीस सामनेवाला क्र.2 यांचेकडून खरेदी केलेबाबतची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर मोबाईल हॅण्डसेटमध्ये वारंवार हँग होणे, स्लो फंक्शन, नेटवर्क नसणे, व्हाईट डिस्प्ले इत्यादी दोष असल्याने सामनेवाला कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरकडे दुरुस्तीकरीता दिलेबाबत उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. त्या अनुषंगाने सामनेवाला यांनी दि.28.01.2010 रोजी जॉबशीट दिलेले आहे. तसेच, तत्पूर्वी दि.29.01.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेल्या ई-मेलची प्रत, सदर ई-मेलला सामनेवाला यांचा ऑटो-रिप्लाय, दि.10.02.2010 रोजी सामनेवाला यांचेकडे मोबाईल दुरुस्तीकरिता दिलेची रिसीट, इत्यादी कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता तक्रारदारांचा ‘सोनी एरिक्सनF305 या मॉडेलच्या मोबाईलमध्ये वारंवार हँग होणे, स्लो फंक्शन, नेटवर्क नसणे, व्हाईट डिस्प्ले इत्यादी दोष असल्याचे दर्शविले आहे. सदरचा मोबाईल सामनेवाला यांनी दरुसत करुन तक्रारदारांच्या ताब्यात दिल्याचे दिसून येत नाही. तसेच, दि.04.02.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना ई-मेल पाठविलेला आहे. तसेच, सामनेवाला यांच्या सर्व्हिस सेंटरने तक्रारदारांना नोंद पोच पत्रही पाठविले आहे, त्याची प्रती प्रस्तुत कामी दाखल आहे. तसेच, दि.12.03.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेल्या ई-मेलचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी सोनी एरिक्सनF305 या मॉडेलचा काळया रंगाचा हॅण्डसेट दिला आणि सदर हॅण्डसेटची 2 महिने वॉरंटी असलेबाबत सांगितले. परंतु, तक्रारदारांनी सदरचा हॅण्डसेट नाकारला व पांढ-या रंगाच्या हॅण्डसेट 1 वर्षाच्या वॉरंटीसहित मागणी केला किंवा सदर हॅण्डसेटच्या रक्कम परत देणेबाबत मागणी केलेचे दिसून येते. इत्यादी कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेला सामनेवाला कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट खरेदी केला आहे. सदरचा हॅण्डसेट वारंवार नादुरुस्त झालेला आहे. सदरचा हॅण्डसेट सामनेवाला यांचेकडे दुरुस्तीकरिता दिला असता सामनेवाला यांनी नविन हॅण्डसेट देवू केला आहे, परंतु त्याची वॉरंटी 2 महिने असलेचे कबूल केले असल्याचे दिसून येते. एखादी वस्तुमध्ये वारंवार दोष निर्माण होत असतील ते दुरुस्त होत नसतील तर सदर वस्तुमध्ये उत्पादित दोष असल्याचा निष्कर्ष काढणेत येतो. तदनुसार तक्रारीत उल्लेख केलेला मोबाईल हा वारंवार नादुरुस्त झालेला आहे. सदरचा हॅण्डसेट हा सामनेवाला यांचे ताब्यात आहे, तो त्यांनी तक्रारदारांना दुरुस्त करुन परत केलेला नाही. इत्यादी विवेचन विचारात घेता सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, सामनेवाला यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीत उल्लेख केलेला मोबाई हॅण्डसेटची रक्कम परत करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेव, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेसही पात्र असतील. सबब आदेश. आदेश 1. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सोनी एरिक्सन सोनी एरिक्सनF305 या मॉडेलच्या मोबाईल हॅण्डसेटची किंमत रुपये 8,500/- (रुपये आठ हजार पाचशे फक्त) परत करावी. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |