(घोषित दि. 09.10.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे जालना येथील रहिवाशी असून त्यांचा चरितार्थ शेतीवर चालतो. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे मळणी यंत्राचे उत्पादक व विक्रेते आहेत. तक्रारदारांनी दिनांक 18.01.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तयार केलेले मळणी यंत्र घेतले. त्याची किंमत 75,001/- ऐवढी होती. ही रक्कम तक्रारदारांनी रोख स्वरुपात गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिली व त्यांनी बिल क्रमांक 336 दिले. सदरचे यंत्र काही दिवस चांगले चालले. त्यानंतर शेतमाल तयार होण्यास उशीर असल्यामुळे यंत्र वापरात नव्हते. नोव्हेंबर 2010 ला यंत्र वापरण्यासाठी काढले असता ते योग्य त-हेने चालत नसल्याचे आढळून आले. मळणी यंत्रासाठी वापरण्यात आलेल्या बेअरिंग्ज जुन्या आहेत असे तक्रारदारांना आढळले व दिनांक 27.11.2010 रोजी मळणी यंत्राचे एक चाकच बेअरिंग योग्य नसल्याने वेडे वाकडे हलून निखळून पडले. तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे दुरुस्तीसाठी गेले असता त्यांनी दुरुस्तीस मदत केली नाही व उर्मट भाषा वापरली. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तेंव्हा त्यांनी आठ दिवसात प्रतिनिधी पाठवून दोष दुरुस्त करुन देतो असे सांगितले. परंतु तक्रार दाखल करे पर्यंत त्यांचेकडून कोणीही दुरुस्तीसाठी आले नाही.
तक्रारदारांना नाईलाजाने मळणी यंत्र स्वखर्चाने दुरुस्त करुन घ्यावे लागले त्यासाठी त्यांना रुपये 9,500/- इतका खर्च आला. त्यांना मळणी यंत्र हंगामासाठी वापरता न आल्याने त्यांचे नुकसान झाले म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार केली आहे. त्या अंतर्गत ते मळणी यंत्र दुरुस्तीचा खर्च, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रस्तुत तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत मळणी यंत्राचे बिल (गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे), मळणी यंत्र दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाच्या पावत्या, 7/12 चा उतारा, मळणी यंत्र खराब झाले आहे हे दर्शविणारी छायाचित्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार 1 व 2 मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या जबाबाप्रमाणे त्यांना तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तयार केलेले मळणी यंत्र रुपये 75,000/- ला घेतले हे मान्य आहे. ते म्हणतात की प्रस्तुतचे यंत्र हे संपूर्ण लोखंडी असल्यामुळे त्याचे ऑईलिंग व ग्रिसिंग नीट करणे तसेच ते चालवण्याचा अनुभव असणा-या व्यक्तीनेच चालवणे आवश्यक होते ते तक्रारदारांनी केलेले नाही. यंत्रातील बेअरिंग जुन्या आहेत तसेच दिनांक 27.01.2010 ला यंत्राचे एक चाक निखळून पडले या गोष्टी गैरअर्जदार अमान्य करतात. मळणी यंत्राच्या बेअरिंग्जचा त्याच्या उत्पादकतेशी संबंध नाही. शेतकरी यंत्र ट्रॅक्टरला लावून फिरवतात, शेतात पक्के रस्ते नाहीत त्यामुळे मशीनची बेअरिंग खराब होतात असेही गैरअर्जदार म्हणतात.
गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 यांनी मशीनची कोणतीही गॅरंटी अथवा वॉरंटी दिलेली नाही. तरी देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी 3 वेळा कोणतीही रक्कम न घेता मशीन दुरुस्त करुन दिले. अजुनही आवश्यक फी घेऊन ते मळणी यंत्र दुरुस्त करुन देण्यास तयार आहेत. मळणी यंत्रात दोष नाही तसे तक्रारदारांचे म्हणणे असल्यास त्यांनी तज्ञांचा अहवाल मागवावा.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी व त्यांना खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल दंड करावा अशी प्रार्थना गैरअर्जदार करतात.
प्रस्तुतची तक्रार उत्पादकीय दोषा बद्दल असल्याने त्याची तज्ञ व्यक्तींकडून तपासणी करावी असा आदेश या मंचाने पारित केला होता. परंतु औद्यागिक प्रशिक्षण संस्था, जालना व शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल, औरंगाबाद या दोनही संस्थांतून बेअरिंग व हब यातील दोष तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले आहे.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना
द्यावयाच्या सेवेत काही कमतरता केली आहे ही
गोष्ट तक्रारदारांनी सिध्द केली आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी –तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तयार केलेले मळणी यंत्र रुपये 75,001/- रुपयांना खरेदी केले ही गोष्ट तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावतीवरुन सिध्द होते व ती उभय पक्षी मान्य आहे. प्रस्तुत मळणी यंत्र जानेवारी महिन्यात खरेदी केलेले आहे. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे ते घेतल्यानंतर काही दिवसच चांगले चालले त्यानंतर हंगाम नव्हता म्हणून ते वापरले गेले नाही परंतू ऑईलींग व ग्रिसिंग करुन तक्रारदारांनी त्याची योग्य निगा राखली होती. नोव्हेंबर 2010 ला जेव्हा ते वापरण्यासाठी काढले तेव्हा त्याचे बेअरिंग नीट चालत नाहीत व त्यामुळे चाके वेडी वाकडी हालतात असे तक्रारदारांच्या लक्षात आहे व दिनांक 27.11.2010 ला एक चाक निखळून पडले.
गैरअर्जदार म्हणतात की तक्रारदारांनी मशीन योग्य त-हेने वापरले नाही ते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ट्रॅक्टरने ओढून नेले असेल म्हणून खराब रस्त्यावर चालल्यामुळे देखील यंत्राचे व बेअरिंगचे नुकसान होवू शकते. परंतू यापैकी कोणत्याही गोष्टीच्या पृष्ठयार्थ गैरअर्जदारांनी काहीही पुरावा मंचा समोर आणलेला नाही.
गैरअर्जदार म्हणतात की, मळणी यंत्रात Manufacturing defect असेल तर तसे तज्ञाचे मत तक्रारदारांनी मागवावयास हवे होते. परंतू नि.17, नि.21 व नि.22 वरील पत्रांवरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी वादग्रस्त बेअरिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवायची तयारी दर्शवली होती. परंतू उपरोक्त दोनही ठीकाणी तशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रमाणिक प्रयत्न करुनही तक्रारदारांना तज्ञांचा अहवाल मिळवता आलेला नाही. त्यात तक्रारदारांचा काहीही दोष नाही असे मंचाला वाटते.
गैरअर्जदार म्हणतात की, त्यांनी तीन वेळा मळणी यंत्र पैसे न घेता दुरुस्त करुन दिले हे दर्शविणारा गैरअर्जदारांच्या शपथपत्रा शिवाय काहीच पुरावा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. परंतु गैरअर्जदार यांचे म्हणणे ग्राहय धरले तर 10 महिन्यांच्या काळात तीन वेळा यंत्र दुरुस्त करावे लागले म्हणजे मळणी यंत्रात काही तरी Manufacturing defect होता असेच म्हणावे लागेल. गैरअर्जदार म्हणतात की त्यांनी हे मळणी यंत्र केवळ लोखंडाने बनवलेले असते ते Electrical अथवा Electronics उपकरण नाही. त्याची गॅरंटी अथवा वॉरंटी दिलेली नाही. मळणी यंत्राची कंपनीने गॅरंटी अथवा वॉरंटी दिलेली नसली तरी घेतल्यानंतर 10-11 महिन्यातच मळणी यंत्र खराब झाले हा त्यातील Manufacturing defect च आहे व असे सदोष मळणी यंत्र तक्रारदारांना दिले व विक्री नंतर ते दुरुस्तही करुन दिले नाही ही गैरअर्जदारांनी केलेली सेवेतील कमतरता आहे असे मंचाला वाटते.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी बेअरिंग दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारदारांना ती दुस-या दुकानातून दुरुस्त करुन घ्यावी लागली त्या संदर्भातील दोन पावत्या एक नाथ अटोमोबाईल ची रुपये 748/- ची पावती दिनांक 29.11.2010 व एक रेणुका फॅब्रीकेशन ची रुपये 4,000/- ची पावती दिनांक 29.11.2010 अशा तक्रारदारांनी दाखल केल्या आहेत तसेच मळणी यंत्राची छायाचित्रेही दाखल केली आहेत. त्यावरुन मळणी यंत्र नीट चालत नव्हते व त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रारदारांना वरील प्रमाणे खर्च करावा लागला व प्रस्तुतची तक्रार ही दाखल करावी लागली असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना संयुक्त रित्या आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्राप्ती पासून तीस दिवसांचे आत तक्रारदारांना मळणी यंत्र दुरुस्तीचा खर्च रक्कम रुपये 4,748/- (अक्षरी चार हजार सातशे अठ्ठेचाळीस फक्त) द्यावा.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना संयुक्त रित्या आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (अक्षरी दोन हजार पाचशे फक्त) द्यावा.