::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 10/07/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे. . .
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी दि. 31/12/2010 रोजी महाराष्ट्र अपाटर्मेंट ओनरशिप ॲक्ट 1970 कलम 2 प्रमाणे डिड ऑफ डिक्लेरेशन, रजि. नं. 5420/2010 अन्वये प्लॉट क्र. 15 व 16 यावर आठ डयूप्लेक्स / रो-हाऊसेस व बारा दुकानांचे बांधकाम करुन दिले. विरुध्दपक्ष यांनी नमुद केलेल्या डिड ऑफ डिक्लेरेशन प्रमाणे ज्या अटी व शर्ती नमुद केलेल्या आहेत, त्या प्रमाणे बांधकामाचा दर्जा ठेवलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ते हे सदर ड्यूप्लेक्समध्ये वास्तव्यास गेल्यानंतर त्यांचे विविध परिणाम तक्रारकर्ते यांना भोगावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्यांना मानसिक त्रास व नुकसान सोसावे लागत आहे. म्हणून तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांना दि. 14/01/2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली आहे. सदर डयूप्लेक्समध्ये खालील प्रमाणे दोष आहेत.
- तक्रारकर्ते हे सदर घरात राहण्यास गेले असता, पहील्याच पावसाळयात सदर बांधकाम किती निकृष्ट आहे, याची जाणीव झाल्यामुळे विरुध्दपक्ष यांनी करारनाम्याप्रमाणे मेंटेनन्स अथवा दुरुस्ती करुन दिली नाही.
- बांधकामामध्ये मातीमिश्रीत रेतीचा वापर केल्यामुळे बांधकाम ठिसूळ झाले आहे व भिंती पोकळ असल्यासारख्या वाजतात व भिंतीमध्ये चिरा पडल्या आहेत.
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून चार बोअरींग करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे पुर्ण खोलीवर करुन दिल्या नाही. तक्रारकर्ते क्र. 7 यांच्या डयूप्लेक्स समोर केलेल्या बोअरींग मधून 15 दिवस सुध्दा पिण्यासाठी पाणी मिळालेले नाही. बोरींगवर बसवलेली मशीन ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहे.
- डयूप्लेक्समध्ये लावलेल्या टाईल्स निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच पाण्याचे नळ हे सुध्दा निकृष्ट दर्जाचे आहेत.
- स्लॅबवर जाण्यासाठी जिना काढलेला नाही.
- स्लॅबवरील सांडपाण्याची व्यवस्था नाही, स्लॅब मधून पुर्ण डयूप्लेक्स मध्ये पाणी गळती सुरु राहते.
- स्लॅबवर जाण्यासाठी जिना नसल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये घाण साचलेली आहे व त्यामुळे दुषित पाण्यामुळे जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
- डयूप्लेक्स समोरील भागामध्ये सिमेंट विटांचे फ्लोअरींग करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे फिटींग केलेली नाही, करारातील मुद्दा क्र. 39 व 43 प्रमाणे कोणत्याही सुविधा पुरविलेल्या नाहीत.
- शौचालयाचे दारे निकृष्ट लावल्यामुळे शौचालये निकामी ठरत आहेत. त्यामध्ये व्यवस्थीत बांधकाम नसल्यामुळे नेहमी चोकअप होवून सर्व घरांमध्ये दुर्गंधी पसरते. प्लास्टर, फ्लोरींग व मोझॅक टाईल्सचे व्यवस्थीत फिटींग न केल्यामुळे सर्व भिंतीमध्ये पावसाळयाचे पाणी पाझरलेले आहे.
- बाथरुमच्या सांडपाण्याची व्सवस्था व त्याची विल्हेवाट योग्य लावलेली नाही. निकृष्ट दर्जाची नळ फिटींग केलेली आहे.
तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर करावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना सदर डयूप्लेक्स अभियंता यांचे स्थळनिरीक्षण अहवालाप्रमाणे अपुर्ण राहीलेले काम दर्जेदार करुन देण्याबाबत विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना आदेशित करण्यात यावे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून झालेल्या सेवेतील न्युनतेमुळे तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रु. 1,00,000/- व्याजासह मंजूर करावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 10 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मान्य केले आहे की, विरुध्दपक्षांनी तक्रारीत नमुद डयुप्लेक्स व दुकानांचे बांधकाम करुन दिले आहे. तसेच आज रोजी तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 हे त्यांचे खरेदी हक्काप्रमाणे सदर सदनिका / डयुप्लेक्स ताब्यात घेवून वास्तव्य करीत आहेत. विरुध्दपक्षाने तक्रारीतील इतर मजकुर अमान्य करुन असे नमुद केले की, विरुध्दपक्ष यांनी डी.ओ.डी. मध्ये केलेल्या घोषणेनूसार बांधकाम केलेले आहे. सदर बांधकामाचा दर्जा पाहून, त्या बाबत समाधान झाल्यानंतर सर्व तक्रारकर्त्यांनी सदर डयुप्लेक्सची खरेदी केली. खरेदी करतेवेळी, कोणत्याही प्रकारच्या दर्जाबाबत शंका तक्रारकर्ते यांनी व्यक्त केली नाही. दोन वर्ष सदर डयुप्लेक्समध्ये राहील्यानंतर साधारणता दोन वर्षानंतर तक्रारकर्ते हे संगनमताने खोडसाळपणे तक्रार करीत आहेत. सदर बोअर ह्या 100 फुट खोल खोदलेल्या आहेत. सदर डयुप्लेक्स धारक बोअरींगचा मेंटेनन्स निट ठेवत नसल्यामुळे त्यांना प्रश्न उद्भवला आहे. सदर बोअरवर लावलेली मशीन ही आय.एस.आय. मार्कची व पॉलवीन या नामांकित कंपनीकडून खरेदी केलेली आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ते यांना मेंटेनन्स बाबत कोणत्याही प्रकारचा करार करुन दिलेला नाही. खरेदी केल्यानंतर मेंटेनन्सची जबाबदारी ही डयुप्लेक्स धारकांची आहे. कुठल्याही प्रकारचे ठिसूळ अथवा पोकळ बांधकाम विरुध्दपक्षाने केले नाही तर आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चरचे पक्के मजबुत बांधकाम करण्यात आले आहे व त्यासाठी ओरीएंट गोल्ड 53 या सिमेंटचा वापर करण्यात आला. सदर डयुप्लेक्सकरिता लावण्यात आलेल्या टाईल्स ह्या मॅग्ना ह्या नामांकित कंपनीच्या आहेत. तसेच नळ देखील चांगल्या कंपनीचेच आहेत, मात्र बोअरवेलच्या पाण्याच्या वापरामुळे सदर नळांवर क्षार जमा होऊन ते जाम होऊ शकतात. जिना हा नकाशातच मंजूर नसल्याकारणाने त्याचे बांधकाम केल्या गेले नाही व याची जाणीव डयुप्लेक्स खरेदी करतेवेळी तक्रारकर्ते यांना करुन देण्यात आली होती, त्यावेळी आम्ही लोखंडी जिना लावून घेवू असे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाला सांगितले होते. डयुप्लेक्सच्या समोरील भागामध्ये सिमेंट विटांची फ्लोअरींग करण्याबाबत कुठल्याही प्रकारचा उल्लेख करारामध्ये नाही. मात्र 12 फुट काँक्रीट रोड मान्य करुन तो विरुध्दपक्ष यांनी डयुप्लेक्स समोर करुन दिलेला आहे. विरुध्दपक्ष यांनी चांगल्या दर्जाचे ब्रासचे व स्टिलचे कडीकोंडे घराच्या दरवाजांना लावलेले आहेत. शौचालयांना ओरीसा पॅन सिट लावलेल्या आहेत. मात्र मुबलक पाण्याचा वापर न केल्या कारणाने ते चोक-अप होवू शकतात. सदर डयुप्लेक्स हे ओलीच्या जमीनीवर बांधलेले आहेत. त्या परिसरातील सर्व घरांना ओल येते व जमिन लवकर कोरडी होत नाही. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना डी.ओ.डी. मधील मुद्दा क्र. 39 ते 43 प्रमाणे सर्व सुविधा पुरवल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे निकृष्ट बांधकाम विरुध्दपक्ष यांनी केलेले नाही. तक्रारकर्ते यांनीच सदर डयुप्लेक्सचा वापर व मेंटेनन्स योग्यरित्या ठेवला नाही. सदर आरोप हे सामुहीकरित्या करण्यात आलेले आहेत. तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना नेमका कोणाला काय त्रास होतो हे पध्दतशिरपणे सदर तक्रारीत नमुद केलेले नाही. वरील कारणामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी लेखी युक्तीवाद,प्रतिज्ञालेख व फोटोग्राफ्स, दाखल केले तसेच, विरुध्दपक्ष यांनी शपथेवर पुरावा दाखल केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
3. सदर प्रकरणात विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद ऐकून व तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद, उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन व सखोल अभ्यास करुन काढलेल्या मुद्दयांचा अंतीम आदेशाचेवेळी विचार करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांनी विरुध्दपक्षाकडून ड्युप्लेक्स / रो हाऊसेस खरेदी केल्याचे दिसून येते. सदरची बाब विरुध्दपक्षानेही नाकारलेली नसल्याने तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे “ ग्राहक” आहेत, हे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्यांच्या तक्रारीतील मुळ मुद्दा असा आहे की, विरुध्दपक्षाने त्यांच्यातील करारनाम्याप्रमाणे दर्जेदार बांधकाम असलेली घरे न देता निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेली घरे ताब्यात दिली आहेत. सदर घरे नवीन असतांना वरवर चांगली दिसत होती, परंतु त्या घरामध्ये राहण्यास गेल्यानंतर एक वर्षातच या सर्व तक्रारकर्त्यांना विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या निकृष्ट बांधकामामुळे निरनिराळया अडचणींना सामोरे जावे लागले. या विषयी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना भेटूनही त्यांनी सदर अडचणी दूर केल्या नाहीत. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्रुटीपुर्ण सेवा दिल्याने सर्व तक्रारकर्त्यांना मंचात तक्रार दाखल करावी लागली.
यावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यांनी उभय पक्षांमध्ये झालेल्या करारनाम्यानुसार सर्व सोयी पुरवल्या आहेत, तसेच बांधकामासाठी उत्कृष्ट साधन-सामुग्री वापरुन दर्जेदार बांधकाम करुन दिले असल्याने विरुध्दपक्षांनी कुठलीही त्रुटी केलेली नाही. सदर रो-हाऊसेस ताब्यात घेतल्यावर त्याचा योग्य रितीने रखरखाव (Maintenance) न ठेवल्याने तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना सदर अडचणी उद्भवल्या आहेत. सदर घरे ताब्यात घेतल्यावर त्यांची दुरुस्ती व काळजी घेणे, ही तक्रारकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने दिलेली सेवा ही योग्य आहे.
- उभय पक्षांचे हे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्यांनी तक्रारीत नमुद केलेला अभियंत्याचा प्रत्यक्षदर्शनी स्थळ निरीक्षण व मोजमाप केलेला अहवाल जोडलेला दिसून आला नाही. परंतु तक्रारकर्त्यांनी सदर प्रकरणात दि. 16/8/2014 रोजी वादातील घरांच्या बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी कमीश्नरची नेमणुक करण्यासंबंधी अर्ज केला. त्यावेळी मंचाने तक्रारीत नमुद केलेला अहवाल प्रथम दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तक्रारकर्त्यांनी दि. 13/11/2014 रोजी इंजीनिअर दिपक नेरकर यांनी दि. 15/7/2013 रोजी दिलेला अहवाल व छायाचित्रे दाखल केली. ( दस्त क्र. 93 ते 101) त्यानंतर तक्रारकर्त्यांच्या दि. 16/8/2014 च्या कमीश्नर नियुक्तीच्या अर्जावर दि. 5/12/2014 रोजी आदेश झाला. त्यात न्यायाच्या दृष्टीने सदर बांधकामाबाबत शासकीय अभियंता, यांचा अहवाल आला तर तो योग्य राहील, असे नमुद करुन सदरचा अर्ज मंजुर करण्यात आला. दरम्यानच्या काळात विरुध्दपक्षाने पुरावा म्हणून वादातील बांधकामासाठी खरेदी केलेल्या मालाच्या पावत्या दि.8/8/2014 रोजी मंचात दाखल केल्यात ( दस्त क्र. 83 ते 88). सदर प्रकरण दि. 7/2/2014 पासून युक्तीवादासाठी ठेवण्यात आले होते. परंतु तक्रारकर्त्यांनी वेळोवेळी अर्ज करुन युक्तीवादासाठी वेळ मागीतला. दि. 22/7/2014 रोजी विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला. तक्रारकर्त्यांची भिस्त तज्ञाच्या अहवालावर असल्याने त्यांनी वेळोवेळी अर्ज करुन युक्तीवादासाठी वेळ मागीतला. दि. 20/3/2015 व दि. 26/3/2015 रोजी अनुक्रमे रु. 300/- व रु. 600/- इतका दंड आकारुन तक्रारकर्त्यांचा युक्तीवादासाठी वेळ मिळण्याचा अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु मंचाच्या निर्देशानंतर दि. 9/6/2015 रोजी तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व सदर प्रकरण तोंडी युक्तीवादासाठी दि. 18/6/2015 रोजी ठेवण्यात आले. दि. 18/6/2015 रोजी तज्ञाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल मंचाला पोष्टाने प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्यांना पुन्हा युक्तीवादाची संधी देऊन प्रकरण दि. 7/7/2015 रोजी ठेवण्यात आले. परंतु या दिवशी तक्रारकर्त्यांनी तोंडी युक्तीवाद न केल्याने दाखल दस्त, तक्रारकर्त्यांचा लेखी युक्तीवाद व विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण आज रोजी आदेशासाठी ठेवण्यात आले.
- सदर प्रकरणात दाखल असलेले दोन तज्ञांचे अहवाल तसेच दाखल असलेली छायाचित्रे, तज्ञांनी स्वत: पाहणीच्यावेळी घेतली असल्याने पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यातील प्रथम अहवाल व छायाचित्रे इंजीनिअर श्री दिपक नेरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन दि. 15/7/2013 रोजी दिलेले आहेत ( दस्त क्र. 93 ते 101). त्या अहवालावरुन सदर तज्ञाला विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेल्या बांधकामात आढळलेल्या त्रुटी येणे प्रमाणे.
- प्रत्येक भिंतीत भेगा.
- कॉलम व बांधकामामध्ये भेगा.
- भिंतींना पाणी व्यवस्थीत मारलेले नाही अथवा सिमेंट, रेती, विटा यांचा जोड कॉलम सोबत व्यवस्थीत जोडलेले नसल्याने दोघांचा जोड एकमेकांना सोडत आहे.
- कॉलम, बीम, लेंटल व त्यावर केलेले बांधकाम येथे भेगा पडलेल्या असून त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.
- संडास, बांधरुम मध्ये वापरलेल्या टाईल्स निकृष्ट दर्जाच्या आहेत.
- योग्य प्रकारे धुम्मस ( दबाई ) न केल्याने तळ दबत आहे. त्यामुळे बाथरुमची तळाची टाईल्स जागोजागी फुटलेली आहे.
- संडास बाधरुमच्या भिंतीच्या आतील ( कन्सील्ड) पाईप लाईन ही निकृष्ट दर्जाची असल्याने किंवा फुटलेली असल्याने लिकेज आहे.
- सदर लिकेजमुळे घरांचा रंग खराब झालेला दिसतो व सदर लिकेजमुळे भिंतीचे आयुष्य कमी होत आहे.
- पहील्या माळयावरुन गच्चीवर जाण्यासाठी जिन्याची व्यवस्था नाही. त्यामुळे गच्चीवर पावसाळयात साचलेले पाणी काढता येत नाही व पाण्याची टाकी साफ करता येत नाही.
- गच्चीच्या स्लॅबचा उतार व्यवस्थीत काढला नाही व गच्चीच्या स्लॅबचे वॉटर प्रुफींग सुध्दा केलेले नाही व गच्चीवरील पाणी जाण्यासाठी कुठलीही पाईपलाईन नसल्याने ते पाणी घराच्या भिंतीत मुरत जाऊन घरातल्या भिंतींना शेवाळ चढलेले आहे.
- बोअरची खोली मोजली असता ती अत्यंत कमी म्हणजे फक्त 25 ते 30 फुटच आढळली. त्यामुळे उन्हाळयात बोअरला पाणी राहत नाही.
निष्कर्ष :- वरील मुद्द्यांवरुन तज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, बिल्डरने ( प्रकरणातील विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ) केलेल्या गायत्री विहाराचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये ज्या गोष्टी बिल्डरने ठरविल्याप्रमाणे पुरवायच्या होत्या, त्या पुरवण्यात आलेल्या नाही.
- प्रकरणातील व्दितीय अहवाल उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन दि. 17/6/2015 रोजी मंचाला पाठवला. सदर अहवाल दि. 18/6/2015 रोजी मंचाला पोष्टाने प्राप्त झाला. सदर अहवालासोबत घटनास्थळाचे 17 छायाचित्रे सुध्दा दाखल केलेली आहेत. (सदर दस्तांना दस्त क्रमांक पडले नाहीत ) सदर अहवालामध्ये श्री राजु देवीसिंग राठोड व मिननाथ उत्तमनाथ इंगळे या दोन तक्रारकर्त्यांच्या घरांची पाहणी केल्याचे नमुद नाही. सदर तज्ञांनी दि. 22/4/2015 रोजी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळी विरुध्दपक्ष सुध्दा तेथे उपस्थित असल्याचे तक्रारकर्त्याच्या दि. 24/4/2015 च्या अर्जावरुन ज्ञात होते ( दस्त क्र. 109) तरीही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी या अहवालाविरुध्द कुठलाही आक्षेप नोंदविला नसल्याने उर्वरित दोन तक्रारकर्ते श्री राजु देवीसिंग राठोड व श्री मीननाथ उत्तमनाथ इंगळे यांच्याही घराची अवस्था ही इतर तक्रारकर्त्यांच्या घरासारखीच असल्याचे मंच ग्राह्य धरत आहे. सदर अहवालानुसार पाहणी केलेल्या सर्व तक्रारकर्त्याच्या घरांमध्ये समान तक्रारी आढळल्या, त्या येणे प्रमाणे.
- भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले.
- Consild Pipe Line व्यवस्थीत न केल्यामुळे लिकेज आढळून आले.
- संडास बाथरुमच्या टाईल्स व्यवस्थीत न बसवल्याने उखडलेल्या आढळल्या.
- Water proofing व्यवस्थीत न केल्याने लिकेज आढळले व भिंतीवर पाणी गळाल्याच्या खुणा आढळल्या.
- दरवाजे व खिडकीचे कडी व कोंडे तुटलेले आढळले.
- भिंत व कॉलम यांच्या Longitudinal Crack आढळून आले.
- भिंतीत पाणी मुरत असल्याचे आढळून आले.
यावरुन तज्ञाने काढलेला निष्कर्ष…
- प्रत्येक गाळेधारकाच्या गाळयामध्ये एकत्रितरित्या भिंत व कॉलम या दरम्यान भिंतीला उभ्या व आडव्या तडा गेल्या आहेत व दिवसेंदिवस वाढत जाऊ शकतात व त्यामुळे पुर्ण इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो.
- Terrace Slab व Water proofing न केल्याने प्रत्येक गाळयात पाणी मुरत असून त्यामुळे Leakage Problem झाले आहेत.
- संडास व बाथरुमची Tile Fitting व्यवस्थीतरित्या न केल्यामुळे व त्याचा दर्जा तकलादु असल्यामुळे फुटलेल्या आहेत.
वरील विवरणावरुन मी ( तज्ञाने) ज्या बाबींची पडताळणी केली, त्याचा दर्जा तकलादु असून काम करुन घेतेवेळेस योग्य काळजी न घेतल्यामुळे झाल्याचे आढळून आले आहे.
- प्रकरणात अहवाल सादर केलेल्या दोन्ही तज्ञांनी अहवालासोबत फोटोग्राफ्सही दाखल केले आहेत, ते तज्ञांनी त्यांच्या पाहणी दरम्यान घेतले असल्याने या फोटोग्राफ्सचाही विचार करण्यात आला.
सदर फोटोग्राफवरुन तज्ञांच्या अहवालात नमुद केलेली तक्रारकर्त्यांच्या घरांची अवस्था मंचाच्या नजरेस आली आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 जरी म्हणत असले की, घरे ताब्यात दिल्यावर त्यांची योग्य निगा न राखल्याने तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांच्या घरांमध्ये सदर अडचणी उद्भवल्या आहेत, तरी दोन्ही तज्ञांनी, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे अहवालात म्हटले आहे. कुठल्याही तज्ञाने सदर घरांची निगा तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांनी योग्यरित्या न राखल्याने तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना त्रास होत असल्याचे म्हटलेले नाही. तसेच बांधकामासाठी दर्जेदार माल वापरल्याचे दाखवण्यासाठी विरुध्दपक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेल्या काही खरेदी पावत्या ह्या विरुध्दपक्षाची बाजु सिध्द करण्यासाठी पुरेश्या नाहीत. ( दस्त क्र. 83 ते 88 ) सबब तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांची तक्रार व तज्ञांचा अहवाल तसेच फोटोग्राफ्स यांचा आधार घेऊन विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र आहेत.
- तक्रारकर्त्यानी त्यांच्या तक्रारीत लोखंडी जिना बसवून न दिल्याचे वारंवार नमुद केले आहे. परंतु Dead of Declaration (दस्त क्र. 1 ते 35 ) चे वाचन केले असता, विरुध्दपक्षाने लोखंडी जिना देण्याचे कबुल केल्याबद्दलचा कुठलाही मजकुर आढळून आला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची लोखंडी जिन्याची मागणी मंजूर करता येणार नाही.
- तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना त्यांच्या प्रार्थना क्र. 1 मध्ये अपूर्ण राहीलेले काम दर्जेदार करुन देण्याचे आदेश विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना देण्याची विनंती मंचाला केली आहे. परंतु Dead of Declaration नुसार कामाच्या दर्जाबद्दल नसली तरी इतर कबुल केलेल्या सुविधांची [(Facilities )दस्त क्र. 20 व 21 ] पुर्तता विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने केल्याचे दिसून येते. तरीही दोन्ही तज्ञांच्या अहवालानुसार सर्व तक्रारकर्त्यांच्या घरात उद्भवणारा Leakage व भिंतीला ओल येण्याचा त्रास, गच्चीला/ स्लॅबला वॉटर प्रुफींग न केल्याने व पाण्याचा उतार व्यवस्थीत न केल्याने येत असल्याचे दिसून येते. सबब विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कुठलाही मोबदला न आकारता तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांच्या गच्चीवरील स्लॅबचे वॉटर प्रुफींग करुन, पाण्याचा उतार व्यवस्थीत काढून देण्याचे आदेश सदर मंच देत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीरित्या व संयुक्तीकपणे तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांच्या गायत्री विहार, अकोला येथील ड्यूप्लेक्स घराच्या गच्चीच्या स्लॅबचे वॉटर प्रुफींगचे व पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उतार काढून देण्याचे काम कुठलेही शुल्क न आकारता करुन द्यावे.
3) विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे प्रत्येक तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- ( रुपये पन्नास हजार ) व प्रकरणाचा खर्च म्हणून रु. 1000/- ( रुपये एक हजार ) द्यावेत.
4) सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे, अन्यथा तक्रारकर्ते क्र. 1 ते 7 यांना वर मंजुर केलेल्या संपुर्ण रकमेवर दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.
5) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.