जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 170/2013.
तक्रार दाखल दिनांक : 14/08/2013.
तक्रार आदेश दिनांक : 22/07/2014. निकाल कालावधी: 00 वर्षे 11 महिने 08 दिवस
श्री. श्रीनिवास दिगंबर मालखरे, वय सज्ञान, व्यवसाय : सेवानिवृत्त,
रा. 6-अ, निर्मला सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर – 413 004. तक्रारदार
विरुध्द
सोलापूर जिल्हा विद्युत कामगार सहकारी सोसायटी लि.,
सोलापूर तर्फे चेअरमन, रा. 71, उत्तर कसबा,
श्रीकृष्ण देवळासमोर, सोलापूर – 413 007. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.व्ही. देशमुख
आदेश
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
1. तक्रारदार जो की महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरीमधून निवृत्त झाला, त्याची विद्युत कामगार सोसायटीमधील बचत रक्कम सामनेवाला सोसायटीने परत न दिल्यामुळे ती मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात कथन असे की, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये सहायक लेखापाल या हुद्यावर नोकरी करीत असताना तो मे 2011 मध्ये सेवानिवृत्त झाला. अर्जदाराच्या पगारातून वेळोवेळी सामनेवाला सोलापूर विद्युत कामगार सहकारी सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेमध्ये रक्कम जमा करण्यात आली होती. सामनेवाला ही अर्जदाराना डिव्हीडंड देत असे. तक्रारदाराने सामनेवालाकडे कधीही कर्ज घेतलेले नाही अगर त्याच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. तक्रारदाराने दोषविरहीत नोकरी केली आहे.
3. तक्रारदाराचे सामनेवालाकडे एकूण रु.29,000/- जमा आहेत. तक्रारदारास निवृत्तीनंतर या रकमेची जरुर आहे. त्याची पत्नी आजारी असून तिच्या औषधोपचाराची जबाबदारी त्याच्यावर आहे. सामनेवालाकडून आपली रक्कम मिळावी म्हणून दि.15/6/2012 रोजी तक्रारदाराने अर्ज केला. त्यानंतर दि.11/2/2013 व 18/3/2013 रोजी अर्ज केले. तथापि सामनेवालाने तक्रारदाराची रक्कम परत केली नाही व सेवेत त्रुटी केली आहे. ता.17/10/2012 रोजी तक्रारदाराने सामनेवालास नोटीस दिली. अद्यापि सामनेवालाने तक्रारदारास रक्कम परत दिलेली नाही. ती रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/-, तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्यास सामनेवाला जबाबदार आहे.
4. तक्रारीसोबत तक्रारदाराने निवृत्ती आदेश, ता.15/6/2012 चे सामनेवालास दिलेल्या अर्जाची प्रत, ता.14/8/2012 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत, ता.11/2/2013 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत, तसेच ता.17/10/2012 चे नोटीसची प्रत हजर केलेली आहे.
5. सामनेवालाने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारीतील सर्व मजकूर सामनेवालाने नाकबूल केलेला आहे. तक्रारदाराचे रु.28,300/- सामनेवाला संस्थेमध्ये जमा असल्याचे सामनेवालास मान्य आहे. सामनेवालाचे म्हणणे की, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे काम करणारे इब्राहीम कुद्दूस सय्यद याने सामनेवालाकडून कर्ज घेतले होते. तक्रारदार त्यास जामीनदार राहिलेले आहेत. सय्यद याच्या कर्जाची जबाबदारी तक्रारदाराने स्वीकारलेली आहे. सय्यद याच्या कर्जाची परतफेड झालेली नाही व तो थकबाकीदार झालेला आहे. त्याच्या कर्जाची परतफेड झाल्याशिवाय तक्रारदारास आपली रक्कम मागण्याचा अधिकार नाही. सामनेवालाने तक्रारदार याची सभासद वर्गण म्हणून जमा असलेली शेअर्स रक्कम परत देण्यास कधीही नकार दिलेला नाही. मात्र सय्यद याच्या कर्जाची थकबाकी पूर्णपणे भरल्याशिवाय जमा सभासद वर्गणी कायद्याने अर्जदार याना देता येणार नाही. जर ती रक्कम परत दिली तर ते सभासद राहणार नाहीत व श्री. सय्यद याच्याकडून थकीत रक्कम वसूल करण्यास कायदेशीर अडचण होणार आहे. तक्रारदार हा सामनेवाला सहकारी संस्थेचा कायद्याप्रमाणे मालक आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘ग्राहक’ असे नाते येत नाही. सबब, तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
6. सामनेवालाने आपल्या म्हणण्यासोबत तक्रारदाराची ता.21/2/2012 चे नोटीसची प्रत, सामनेवालाने ता.5/3/2012 रोजी दिलेल्या उत्तराची प्रत, तक्रारदाराचा खाते उतारा, कार्यकारी अभियंता यांना सय्यद याच्याकडून येणे वसूल करुन देण्याबाबत दिलेल्या अर्जाची प्रत, तक्रारदाराची रक्कम जमा असल्याबाबत दाखला, सय्यद याच्या कर्ज मागणी अर्जाची प्रत, तक्रारदाराच्या दि.3/4/2012 रोजीच्या अर्जाची प्रत हजर केलेली आहे.
7. परस्पर विरोधी कथनावरुन आमच्या विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्याचे उत्तर आम्ही खालील दिलेल्या कारणासाठी त्याच्यासमोर लिहिलेली आहेत.
मुद्दे उत्तर
1. सामनेवालाने सेवेत त्रुटी केलेली आहे काय ? होय.
2. तक्रारदार रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3. काय हुकूम ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
8. मुद्दा क्र. 1 व 2 :- सामनेवाला जिल्हा विद्युत कामगार सहकारी संस्था यांनी तक्रारदाराची रक्कम रु.28,300/- त्यांच्याकडे जमा असल्याचे मान्य केले आहे. सदरहू रक्कम ही तक्रारदाराच्या पगारातून वेळोवेळी कापूर त्याच्या खात्यात जमा झाल्याचे दिसून येते. तसा खाते उतारा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार हा निवृत्त झाल्यामुळे साहजिकच ती रक्कम त्याने सामनेवालाकडून मागणी केलेली आहे. रक्कम जमा असल्याचे सामनेवाला यांना मान्य आहे.
9. सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे काम करणारे इब्राहीम कुद्दूस सय्यद याने सामनेवालाकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जास तक्रारदार जामीनदार राहिलेले आहेत व त्याने त्या कर्जाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. सय्यद याच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे तक्रारदारास आपली रक्कम मिळविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार याची सभासद वर्गणी म्हणून जमा असणारी शेअर्स रक्कम परत देण्यास सामनेवालानी कधीही नकार दिलेला नाही.
10. सामनेवाला ही सहकारी संस्था असल्यामुळे त्यांना योग्य त्या अधिका-याकडून तक्रारदाराची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश घेता आला असता. केवळ तक्रारदाराची सभासद वर्गणी संस्थेकडे जमा आहे, या कारणामुळे ती रक्कम अडवण्याचा सामनेवाला यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे ती अडवणूक बेकायदेशीर असून तक्रारदाराची सभासद वर्गणी परत न देऊन सामनेवाला याने सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार ती रक्कम मिळण्यास पात्र आहे आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालीलप्रमाणे हुकूम करतो.
आदेश
1. सामनेवाला याने तक्रारदारास रक्कम रु.28,300/- परत द्यावी.
2. सामनेवाला याने तक्रारदारास वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र.170/2013 आदेश पुढे चालू...
3. सामनेवालाने तक्रारदारास या अर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावेत.
4. सामनेवाला याने वरील रक्कम तक्रारदारास 45 दिवसामध्ये द्यावी व तसा अहवाल त्वरीत या मंचाला दाखल करावा.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/श्रु/22714)