::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/02/2015 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता मालेगाव जि. वाशिम येथील रहीवाशी आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 11/04/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडून विरुध्द पक्ष क्र. 2 निर्मीत स्प्लेंडर प्लस मोटार सायकल आरटीओ नोंदणी क्र. एम.एच. 37-एम-4504 हे वाहन रुपये 50,345/- ला विकत घेतले. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याकडून रक्कम स्विकारुन वाहनास सेवा व वॉरंटी पुरविली. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. गाडी विकत घेतल्यापासुन सदर गाडीचे हँन्डल मध्ये आणि समोरिल चाकामध्ये खराबी होती, ज्यामुळे सदर वाहन एकीकडे ओढत असते, वाहन सरळ चालत नाही. सदर दोष तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 आणि त्यांचे तज्ञ कारागीर यांचे लक्षात आणुन दिली आणि सदोष वाहन विकल्याची तक्रार केली. विरुध्द पक्षाने दोष दूर करुन देवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर गाडीच्या कित्येक सर्व्हिसिंग झाल्या परंतु विरुध्द पक्षाकडून दोष निघाला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 13/09/2013 रोजी नोंदणीकृत पोष्टाव्दारे नोटीस दोन्ही विरुध्द पक्षाकडे पाठविली आणि सदर गाडी बदलवुन मागीतली. सदर नोटीसला विरुध्द पक्ष क्र. 1 ने खोटे ऊत्तर पाठविले आणि सदर दोष हा निर्मीती दोष नसल्याचे आणि दोष नाहीसा झाल्याचे खोटे कथन केले. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने प्रतिबंधीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास सदर गाडी बदलवून दोषरहीत गाडी दयावी. गाडी देण्यात कोणतीही तांत्रीक अडचण असल्यास सदर गाडीची किंमत विरुध्द पक्षाकडून, तक्रारकर्त्याला देण्यात यावी. तसेच नुकसान भरपाई रुपये 40,000/- व तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षाकडून मिळावा, अशी विनंती केली.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 10 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी निशाणी-8 प्रमाणे त्यांचे ऊत्तर मंचात दाखल केले. त्यामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीतील बहुतांश मजकूर नाकबूल करुन, अधिकचे कथनामध्ये पुढे नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 11/04/2013 रोजी गाडी खरेदी केल्यानंतर 15 दिवसाचे नंतर विरुध्द पक्ष क्र. 1 कडे सर्व्हिसींग साठी आणली होती, त्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे गाडीबाबत कोणतीही तक्रार केली नाही. विरुध्द पक्षाने वेळोवेळी तक्रारकर्त्यास विनामुल्य सर्व्हिस दिली व प्रत्येक वेळी तक्रारकर्त्याने गाडी चांगल्या स्थितीत, समाधानपूर्वक स्विकारली. आज रोजीसुध्दा तक्रारकर्त्याचे गाडीत कोणताही दोष नाही. गाडीमध्ये कोणताही ऊत्पादन दोष नाही तसेच गाडीचे महत्वाचे भाग इंजीन मध्ये कोणता दोष असल्याबाबत तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही. विरुध्द पक्षाने योग्य त्या सर्व बाबी पडताळल्या व तज्ञ अभियंत्यामार्फत गाडीची तपासणी केली परंतु तक्रारकर्त्याचे सांगणेप्रमाणे कोणताही दोष गाडीमध्ये आढळलेला नाही. परंतु केवळ नविन गाडीचे लोभापाई तक्रारकर्ता हा अब्रु नुकसानीचे शस्त्र विरुध्द पक्षास दाखवित आहे. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी, खोडसाळपणाची व बिनबुडाची तथ्यहिन आहे. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार केल्यामुळे व विरुध्द पक्ष कंपनीचे प्रतिष्ठेला हानी पोहचविल्यामुळे 50 लाख रुपये तक्रारकर्त्यास दंड आकारुन, तक्रार खारीज करावी.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार व सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्तीक लेखी जबाब, तक्रारकर्त्यातर्फे दाखल करण्यात आलेली पुर्सीस, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्यातर्फे सादर केलेले साक्षीदारांचे पुरावे, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा तोंडी युक्तिवाद झाल्यानंतर, तक्रारकर्ते यांना संधी देऊनही त्यांनी तोंडी अथवा लेखी युक्तिवाद मंचासमोर दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सदरचा निर्णय पारित करण्यांत येतो.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 निर्मीत स्प्लेंडर प्लस मोटर सायकल विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दिनांक 11/04/2013 रोजी विकत घेतली आहे. ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना देखील मान्य आहे. सदर वाहनाच्या वॉरंटी कालावधीबद्दल उभय पक्षात दूमत नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, सदरहू वाहनाच्या हँन्डल मध्ये व समोरिल चाकामध्ये खराबी होती. ज्यामुळे सदर वाहन एकीकडे ओढत असते, व हा दोष सुरुवातीपासून वाहनात आहे. या वाहनाच्या कित्येक सर्व्हिसिंग झाल्या परंतू सदर दोष निघाला नाही. म्हणून हे वाहन बदलून दूसरे वाहन विरुध्द पक्ष यांनी दयावे अथवा सदर वाहनाची किंमत सव्याज, इतर नुकसान भरपाईसह विरुध्द पक्षाकडून वसूल करुन द्यावी. यावर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा युक्तिवाद असा आहे की, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड ही कंपनी नामांकीत कंपनी आहे. तक्रारकर्त्याने विनामुल्य सर्व्हिसींग साठी अनेक वेळेला सदर वाहन विरुध्द पक्षाकडे आणले होते. परंतु त्यावेळेस तक्रारकर्त्याची ही तक्रार कधीही नव्हती व प्रत्येकवेळी विनामुल्य सर्व्हिस नंतर तक्रारकर्त्याने गाडी चांगल्या स्थितीत, समाधानपूर्वक स्विकारली. तसेच गाडीचे सुटे भाग चांगले असतांना देखील हमी कालावधीमध्ये ते विरुध्द पक्षाकडून बदलवून घेतले. तक्रारकर्त्याच्या वाहनात कोणताही ऊत्पादन दोष नाही.
विरुध्द पक्षाचा हा बचाव, उभय पक्षाने रेकॉर्डवर दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजांवरुन, मंचाने तपासला असता, मंचाला असे आढळले की, सदर वाहन तक्रारकर्त्याने दिनांक 11/04/2013 रोजी विकत घेतल्यानंतर, त्या वाहनाची विनामुल्य सर्व्हिसींग विरुध्द पक्षाकडे केल्याचे आढळते. दाखल जॉब कार्डवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेली वाहनाबद्दलची ही तक्रार त्यावेळेस त्याने केलेली नव्हती व हया विनामुल्य सर्व्हिस नंतर गाडी चांगल्या स्थितीमध्ये, समाधानपूर्वक विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याने स्विकारली होती, असे सुध्दा आढळते. तक्रारकर्त्याने सदर वाहनात नमूद दोष असल्याचे या कायदयातील तरतूदीनुसार सिध्द केलेले नाही किंवा तक्रारकर्ता सतत गैरहजर असल्यामुळे वाहनातील नमुद दोष सिध्द झाले नाहीत. म्हणून तक्रारकर्त्याची ही तक्रार खारिज होण्यास पात्र आहे, हया निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
गिरी.एस.व्ही.