::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/03/2018 )
माननिय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ते यांची तक्रार, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा संयुक्त लेखी जबाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तिवाद, व विरुध्द पक्षाची युक्तिवादाबद्दलची पुरसिस, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.
उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 कडून, विरुध्द पक्ष क्र. 3 निर्मीत वाहन मोटर सायकल रक्कम रुपये 57,090/- (बिलात नमुद रक्कम ) देवून दिनांक 08/09/2015 रोजी खरेदी केले आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 हे हिरो कंपनीचे वर्कशॉप आहे व तिथे तक्रारकर्त्याचे वाहन सर्व्हीसिंग साठी आणल्या गेले होते, ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 यांना मान्य दिसते. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
3) तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, सदर वाहन खरेदी केल्यानंतर दोन ते तिन दिवसातच तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, वाहनास पेट्रोल जास्त लागुन ती कमी अॅव्हरेज देत आहे. सदर वाहन 1 लिटर पेट्रोल मध्ये 20 किलोमिटरचाच अॅव्हरेज देत होती, त्यामुळे तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे सदर वाहन दुरुस्तीकरिता घेवून गेले असता, त्यांनी 4 ते 5 दिवस वाहन ठेवून घेतले परंतु येथे दुरुस्त होत नाही, असे सांगितले. ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 ला सांगितली असता, त्यांनी सदर वाहनास दुरुस्तीसाठी 15 दिवस वेळ लागेल असे सांगितले व वाहन ठेवून घेतले, परंतु त्यांनीही वाहन दुरुस्त केले नाही. तक्रारकर्त्याने फ्री सर्व्हिसींग करुन घेतली परंतु अॅव्हरेज मध्ये फरक पडला नाही. तक्रारकर्ते यांनी रजिष्टर्ड नोटीसव्दारे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना कळविले की, त्यांनी वाहनाच्या अॅव्हरेज विषयी दुरुस्ती करावी व नुकसान भरपाई द्यावी, परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी चुकीचे ऊत्तर दिले म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे असे म्हणणे आहे की, वाहनाचा अॅव्हरेज हा इंधन शुध्दता, ऑईल, गाडीची नियमीत सर्व्हिसींग, टायर एअर प्रेशर, गाडीचा लोड, रोड कंडीशन, चालकाची ड्रायव्हींग इ. गोष्टींवर निर्भर असतो व माईलेज हा शासकीय प्रमाणीत संस्थेव्दारे काढल्या जातो. तक्रारकर्त्याने त्याचे वाहन बरेचदा बाहेरुन सर्व्हिसींग करुन घेतले होते व विरुध्द पक्षाकडे जेंव्हा सर्व्हिसींग साठी आणले, त्यावेळेस तक्रारकर्ते हे केरोसिन इंधनावर सदर वाहन चालवत असल्याचे दिसून आले, कारण त्यातून निळे केरोसिन निघाले होते, परिणामी वाहनाच्या अॅव्हरेजवर याचा परिणाम होतो, असे तक्रारकर्त्यास सांगितल्यावर, त्याने गावात पेट्रोल पंप नाही असे सांगून, या बाबीकडे दूर्लक्षीत केले. तक्रारकर्ते यांचा वापर खुप आहे. विरुध्द पक्ष यांनी बरेचवेळा अॅथोराईज सर्व्हीस सेंटरवरुन त्याच्या मोटर सायकलची योग्य तपासणी करुन, मायलेज सुध्दा काढून दाखविला आहे. तक्रारकर्ते यांनी त्यानंतर अशी तक्रार कधी विरुध्द पक्षाकडे केली नाही. तक्रारकर्ते यांनी विनाकारण वॉरंण्टी कालावधीत सदर वाहनाचे स्पेअर पार्ट विरुध्द पक्षाकडून बदलून घेतले आहेत. गाडीत उत्पादकीय दोष नाही. त्यामुळे तक्रार खारिज करावी.
5) अशाप्रकारे उभय पक्षांचे कथन व म्हणणे आहे, परंतु उभय पक्षाने त्यांच्या कथनानुसारचे एकही दस्त मंचासमोर दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची वाहनाविषयीची तक्रार व विरुध्द पक्षाचा बचाव दोन्हीही बाबी सिध्द होत नाही. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाच्या कथनाला प्रतिऊत्तरात, योग्य तो कागदोपत्री पुरावा देवून खोडले नाही. तसेच सदर वाहनाचा अॅव्हरेज विरुध्द पक्ष कंपनीने किती दाखवला होता, हे दाखविणारे सदर गाडीचे माहितीपत्रक हे दस्त, तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केले नाही. शिवाय आता त्याचे वाहन कितीचे अॅव्हरेज देते हे दाखविणारा, कोणत्याही तज्ञाचा पुरावा, तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार मंजूर करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार सबळ पुराव्याअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri