द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
** निकालपत्र **
दिनांक 17/मे/2012
1. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे दिनांक 17/12/2010 रोजी लॅपटॉप किंमत रुपये 38,500/- बुक केला होता. बुकिंगच्या दिवशी तक्रारदारांनी रुपये 25,000/- रोखीने दिले व उर्वरित रुपये 13,500/- लॅपटॉप प्रत्यक्ष घेतांना दयावयाचे होते. जाबदेणारांचे मालक श्री. यश गुप्ता यांनी बुकिंगच्या दिवशी तक्रारदारांनी लॅपटॉप सोबत सात अॅसेसरिज – लॅपटॉप बॅग, यु एस बी ऑप्टीकल माऊस, 4 जी बी पेन ड्राईव्ह, हेडसेट, यु एस बी कार्ड रिडर, लॅपटॉप क्लिनिंग किट, यु एस बी एल ई डी लाईट देतील असे सांगितले होते. लॅपटॉप दिनांक 12/1/2011 रोजी मिळणार होता परंतु तक्रारदारांना दिनांक 20/1/2011 रोजी लॅपटॉप मिळाला. तक्रारदारांनी काळया रंगाच्या लॅपटॉप ची ऑर्डर दिलेली असतांनाही तक्रारदारांना ताबंडया रंगाचा लॅपटॉप देण्यात आला होता. सात अॅसेसरिज ऐवजी तक्रारदारांना सहा अॅसेसरीजच मिळाल्या. यु एस बी एल ई डी लाईट तक्रारदारांना मिळाला नाही. याबद्यल तक्रारदारांनी विचारणा केली असता एका आठवडयात देऊ असे तक्रारदारांना आश्वासन देण्यात आले. तसेच तक्रारदारांना बॅकअप सी डी व सी डी ड्रायव्हर देखील मिळाला नाही. यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांना अनेक वेळा फोन केले परंतु जाबदेणार यांनी या ना त्या कारणांमुळे तक्रारदारांना अॅसेसरिज दिल्या नाहीत. जाबदेणार यांनी एकदा कुरिअर द्वारा अॅसेसरिज पाठवून देऊ असे सांगितले परंतु प्रत्यक्षात पाठविल्या नाहीत. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जाबदेणार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे यु एस बी एल ई डी लाईट, बॅकअप सी डी व सी डी ड्रायव्हर मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 5000/- व माफीपत्र दयावे अशी मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्या विरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या लॅपटॉप नोंदणी पत्र दिनांक 17/12/2010 चे मंचाने अवलोकन केले असता त्यात Dell Inspiron 14 R laptop रुपये 38,500/- नमूद केले आहेत. तसेच सात अॅसेसरिज -लॅपटॉप बॅग, यु एस बी ऑप्टीकल माऊस, 4 जी बी पेन ड्राईव्ह, हेडसेट, यु एस बी कार्ड रिडर, लॅपटॉप क्लिनिंग किट, यु एस बी एल ई डी लाईट नमूद करण्यात आलेल्या आहेत. जाबदेणार यांना संपुर्ण रक्कम मिळाल्याच्या पावत्या दिनांक 17/12/2010 व 21/1/2011 दाखल करण्यात आलेल्या आहेत. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी काळया रंगाच्या लॅपटॉप ची ऑर्डर दिलेली असतांनाही तक्रारदारांना ताबंडया रंगाचा लॅपटॉप देण्यात आला होता. परंतु लॅपटॉप नोंदणी पत्र दिनांक 17/12/2010 मध्ये Dell Inspiron 14 R laptop नमूद करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ तक्रारदारांनी तांबडया रंगाचा लॅपटॉप बुक केलेला होता. तसेच तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी बॅकअप सी डी व सी डी ड्रायव्हर देण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु बुकिंग पत्रामध्ये अॅसेसरिज मध्ये बॅकअप सी डी व सी डी ड्रायव्हर चा समावेश नाही. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच अमान्य करीत आहे. लॅपटॉप नोंदणीपत्रात यु एस बी एल ई डी लाईट चा समावेश असतांना देखील जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदरहू अॅसेसरी दिलेली नाही ही जाबदेणार यांनी अवलंबिलेली अनुचित व्यापारी पध्दत आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून यु एस बी एल ई डी लाईट मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांनी सदरहू अॅसेसरी देण्याचे आश्वासन देऊनही, तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही प्रत्याक्षात दिली नाही, त्यामुळे तक्रारदारांना निश्वितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार. म्हणून नुकसान भरपाई पोटी तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1000/- मिळण्यास व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
** आदेश **
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना यु एस बी एल ई डी लाईट आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून चार आठवडयांच्या आत दयावा.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 1000/- तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून चार आठवडयांच्या आत दयावा.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क देण्यात यावी.