तक्रारदार - स्वतः
सामनेवाले क्रमांक 1 – एकतर्फा
सामनेवाले क्रमांक 2 तर्फे वकील – गैरहजर
आदेश - मा. श्री. ए. झेड. तेलगोटे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 24/03/2015 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
सामनेवाले क्रमांक 1 ही टयुरिझम कंपनी आहे, दिनांक 31/01/2011 ते 04/02/2011 अशा एकूण 5 दिवसांसाठी समुद्रम पॅकेज टूरमध्ये तक्रारदारांनी स्वतःच्या कुटूंबासाठी 3 व श्री. प्रकाश सरदेसाई यांच्या कुटूंबासाठी 3 अशी एकूण 6 तिकिटे दिनांक 16/12/2010 रोजी सामनेवाले क्रमांक 2 मार्फत प्रत्येकी किंमत रुपये 20,000/- प्रमाणे एकूण रक्कम रुपये 1,23,620/- (सर्व्हीस टॅक्ससह) एवढी रक्कम देवून बूक केली. सदर टूरमध्ये कोची पोर्ट ते लक्षव्दीप बेट असा 4 दिवस बोटीने प्रवास आयोजित केला होता. तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय सहलीला जाण्यासाठी दिनांक 21/01/2011 रोजी पोहचले. तथापि श्री. प्रकाश सरदेसाई यांच्या वडिलांना अचानकपणे दवाखान्यात भरती करावे लागल्यामुळे सरदेसाई कुटूंबिय टूरमध्ये सामिल होऊ शकले नाही, व त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 यांना दिनांक 27/01/2011 रोजी कळवून 3 तिकिटे रद्द करण्यास सांगितले. दिनांक 29/01/2011 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांना तसे इमेलद्वारे सुध्दा कळविले होते. तक्रारदारांनी पुढे असे कथन केले आहे की, ते व त्यांचे कुटूंबिय दिनांक 31/01/2011 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांनी आयोजित केलेल्या टूरमध्ये सामील झाल्यानंतर ते जहाजाने प्रवास करण्यास निघाले. त्यावेळी त्यांनी सरदेसार्इ यांच्या कुटूंबासाठी बूक केलेली तिकिटे रद्द करण्यात आल्यामुळे सदर तिकिटाची रक्कम सामनेवाले क्रमांक 1 कडून परत मागितली. सामनेवाले क्रमांक 2 यांनी सुध्दा तक्रारदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सामनेवाले क्रमांक 1 यांना रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे तक्रारदाराला परत करण्याबाबत विनंती केली, तथापि सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडून त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तक्रारदारांनी मुंबई ग्राहक पंचायतीमार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठविली व रद्द झालेल्या तिकिटाची रक्कम परत मागितली, परंतु त्यालाही सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने पुढे असे कथन केले की, श्री. सरदेसाई यांच्या कुटूंबासाठी बूक केलेल्या 3 जागा सामनेवाले क्रमांक 1 ने इतर प्रवाश्यांना दिल्या, त्यामुळे सामनेवाले यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. असे असतांनाही सामनेवाले यांनी रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम नाकारुन तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारदाराला प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली असे कथन करुन सामनेवाले यांचेकडून रद्द झालेल्या 3 तिकिटांची रक्कम रुपये 60,000/- दर साल दर शेकडा 12 टक्के व्याजाने सामनेवाले यांचेकडून मिळावी अथवा त्याच तिकिटाच्या रकमेमध्ये सरदेसाई कुटूंबाला नंतरच्या टूरमध्ये सामनेवाले यांनी अॅडजेस्ट करावे वगैरे मागणी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीत केली आहे.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. सामनेवाले क्रमांक 1 यांना नोटीसची बजावणी झाल्याबाबत पोस्टाची पावती अभिलेखावर उपलब्ध आहे. नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले क्रमांक 1 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपली कैफियत दाखल केली नाही. सबब त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4. सामनेवाले क्रमांक 2 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्रमांक 2 तर्फे श्री. वर्गीस फिलीप (रिजनल मॅनेजर) मुंबई यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला, तक्रारदारांनी तक्रारीत केलेले कथन सामनेवाले क्रमांक 2 यांनी मान्य केले. तथापि सामनेवाले क्रमांक 2 यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले क्रमांक 2 ही केवळ बुकींग एजंसी असून त्यांनी फक्त बुकिंग एजंट म्हणून काम केले आहे. त्यांनी कोणतीही टूर आयोजित केली नव्हती. सामनेवाले क्रमांक 1 यांनी टूर आयोजित केली होती. सरदेसाई यांच्या कुटूंबासाठी तक्रारदारांनी बूक केलेली तीन तिकिटे रद्द केल्यानंतर सामनेवाले क्रमांक 2 यांनी सामनेवाले क्रमांक 1 यांना पत्र पाठवून रद्द झालेल्या तिकिटांची रक्कम नियमाप्रमाणे तक्रारदारांना परत करण्यास सूचविले होते. रद्द झालेल्या तिकिटाची रक्कम परत करण्याची जबाबदारी सामनेवाले क्रमांक 1 ची आहे व त्यांच्याशी सामनेवाले क्रमांक 2 यांचा काहीही संबंध नाही. सामनेवाले क्रमांक 2 विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही, व यासर्व कारणास्तव तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्रमांक 2 यांनी केली.
5. तक्रारदारांनी आपली तक्रार सिध्द करण्यासाठी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्रे अभिलेखावर दाखल केली आहेत. तसेच आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले क्रमांक 1 यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्रमांक 2 तर्फे रिजनल मॅनेजर, श्री. वर्गीस फिलीप यांनी देखील आपले पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्रे दाखल केले. तसेच आपला लेखी युक्तीवाद देखील दाखल केला आहे. या सर्वांचे मंचाकडून अवलोकन करण्यात आले. या व्यतिरिक्त तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्रं. 2 ची कैफियत/लेखी जबाब, उभय पक्षांनी सादर केलेले पुरावे व लेखी युक्तीवाद, तसेच तक्रारदाराच्या वतीने करण्यात आलेला तोंडी युक्तीवाद यासर्व बाबी विचारात घेता प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात. मंचाने त्यावर आपला निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 1 – सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द
केले आहे काय?
उत्तर सामनेवाले क्रमांक 1 विरुध्द होकारार्थी
मुद्दा क्रमांक 2 – मागितलेली दाद मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय?
उत्तर सामनेवाले क्रमांक 1 विरुध्द होकारार्थी
मुद्दा क्रमांक 3 – काय आदेश?
उत्तर अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 1 व 2
7. मंचाने अभिलेखावर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन हे निर्विवादपणे सिध्द होते की, त्यांनी त्यांच्या कुटूंबाकरीता व सरदेसाई कुटूंबाकरीता सामनेवाले क्रमांक 1 टयुरिझम कंपनी यांनी अयोजित केलेल्या समुद्रम पॅकेज टूरसाठी सामनेवाले क्रमांक 2 मार्फत दिनांक 16/12/2010 रोजी एकूण 6 तिकिटे बूक केली होती. ज्यासाठी त्यांनी सामनेवाले क्रमांक 1 यांना एकूण रक्कम रुपये 1,23,620/- अदा केली. तक्रारदारांनी आपल्या पुराव्यात केलेल्या कथनाला उपलब्ध कागदपत्रांवरुन पुष्टी मिळते.
8. तक्रारदाराच्या पुराव्यावरुन असे दिसून येते की, सामनेवाले क्रमांक 1 यांनी दिनांक 31/01/2011 ते 04/02/2011 अशी एकूण 5 दिवसांसाठी समुद्रम पॅकेज टूर आयोजित केली होती व त्यामध्ये तक्रारदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे स्वतःच्या कुटूंबासाठी 3 व श्री. प्रकाश सरदेसाई यांच्या कुटूंबासाठी 3 अशी एकूण 6 तिकिटे बूक केली होती. सदर टूरमध्ये कोची बेट ते लक्षव्दीप बेट व परत असा बोटीने प्रवास करण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराचे कुटूंबिय सदर टूरमध्ये दिनांक 31/01/2011 रोजी सहभागी झाले तथापि श्री. प्रकाश सरदेसाई यांचे कुटंबिय सदर टूरमध्ये सामिल होऊ शकले नाही. तक्रारदारांनी पुराव्यात असे कथन केले आहे की, श्री. प्रकाश सरदेसाई यांच्या वडिलांना अचानकपणे दवाखान्यात दाखल करावे लागल्यामुळे ते टूरमध्ये सामिल होऊ शकले नाही. त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना दिनांक 27/01/2011 व दिनांक 29/01/2011 रोजी कळविले होते, व 3 तिकिटे रद्द करुन त्याची रक्कम परत करण्याची विनंती केली. ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने अभिलेखावर काही कागदपत्रे दाखल केली आहेत ज्यामध्ये त्यांनी वरील बाबतीत सामनेवाले यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा समावेश आहे वरील बाब सामनेवाले क्रमांक 2 यांनी देखील आपल्या जबाबात व पुराव्यात मान्य केली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी दिनांक 27/01/2011 रोजी म्हणजेच टूर सुरु होण्या आधीच सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना 3 तिकिट रद्द करण्याबाबत कळविले होते. तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, त्यांच्या सूचनेवरुन 3 तिकिट रद्द केल्यानंतर सामनेवाले क्रमांक 1 यांनी बोटीमध्ये सरदेसाई कुटूंबासाठी राखून ठेवलेल्या 3 जागा इतर प्रवाश्यांना दिल्या, व त्यामुळे सामनेवाले क्रमांक 1 यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही, तक्रारदारांचे हे कथन खोडून काढण्यासाठी सामनेवाले क्रमांक 1 मंचासमक्ष हजर झाले नाहीत त्यामुळे तक्रारदारांनी सादर केलेला पुरावा अबाधित राहीला आहे. अशा परिस्थितीत तो नाकारण्यास कोणतेही कारण नाही.
9. तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 यांना टूर सुरु होण्याच्या 4 ते 5 दिवस आधीच 3 तिकिटे रद्द करण्याबाबत कळविले होते, व टूर संपल्यानंतर सदर तिकिटांची रक्कम परत मागितली होती. सामनेवाले क्रमांक 2 यांनी देखील तक्रारदाराच्या मागणीचा पाठपुरावा सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडे केल्याचे दिसते. तथापि सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराच्या मागणीचा कोणताही विचार केलेला दिसून येत नाही. तक्रारदाराने 3 तिकिटे रद्द केल्यानंतर देखील सामनेवाले क्रमांक 1 यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. कारण त्यांनी श्री. सरदेसाई यांच्या कुटूंबियांसाठी बोटीमध्ये राखून ठेवलेल्या 3 जागा इतर प्रवाश्यांना दिल्या, हया मुद्दयावरील तक्रारदारांचा पुरावा अबाधित राहीला आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना त्यांनी रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी ती परत केली नाही. सामनेवाले क्रमांक 1 यांची ही कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी तसेच त्यांच्या सेवेतील त्रृटी असल्याचे स्पष्ट आहे. सबब मागितलेली दाद सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
10. सामनेवाले क्रमांक 2 यांनी केवळ बुकींग एजंट म्हणून भूमिका पार पाडली आहे. तक्रारदारांनी त्यांच्यामार्फत सामनेवाले क्रमांक 1 यांनी आयोजित केलेल्या टूरसाठी तिकिटे बूक केली होती. या व्यतिरिक्त प्रस्तुत प्रकरणाशी सामनेवाले क्रमांक 1 यांचा कोणताही संबंध येत नाही. उलट तक्रारदारांनी 3 तिकिटे रद्द केल्यानंतर सामनेवाले क्रमांक 2 यांनी रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम तक्रारदाराला परत करण्याबाबत सामनेवाले क्रमांक 1 यांना पत्राद्वारे कळविले होते. अशा परिस्थितीत सामनेवाले क्रमांक 2 यांच्या सेवेत काही त्रृटी होत्या असे म्हणता येणार नाही. रद्द झालेल्या तिकिटांची रक्कम परत देण्याची जबाबदारी सामनेवाले क्रमांक 2 वर नाही. सबब सामनेवाले क्रमांक 1 यांच्या कृतीबद्दल सामनेवाले क्रमांक 2 यांना दोषी धरता येणार नाही. म्हणून सामनेवाले क्रमांक 2 कडून दाद मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे.
11. वरील सर्व परिस्थिती व पुरावा विचारात घेतल्यानंतर मंचाने मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष सामनेवाले क्रमांक 1 विरुध्द होकारार्थी नोंदविला असून मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 131/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असे मंच जाहिर करीत आहे.
3. सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम रुपये 60,000/- दिनांक 31/01/2011 पासून ते प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत दर साल दर शेकडा 9 टक्के व्याजासह परत करावी असे निर्देश सामनेवाले क्रमांक 1 यांना देण्यात येतात.
4. सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार मात्र मात्र) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजारमात्र) द्यावेत.
5. वरील आदेशाचे पालन सामनेवाले क्रमांक 1 यांनी आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसाच्या आत करावे.
6. सामनेवाले क्रमांक 2 यांच्याविरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात येते.
7. उभयपक्षकारांनी मा. राज्य आयोग मुंबई यांचे परिपत्रक दिनांक 05/07/2014 प्रमाणे सदर न्यायनिर्णयाची पूर्तता/ना पूर्तता झाल्याबाबतचे शपथपत्र उभयपक्षांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत मंचात दाखल करावे.
8. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात यावी.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 24/03/2015.