नि.15 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 248/2010 नोंदणी तारीख – 26/10/2010 निकाल तारीख – 10/2/2011 निकाल कालावधी – 104 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री गजानन भास्कर येळगावकर मु.पो. परब्रम्ह निवास, पंतनगर पोस्ट ऑफिसशेजारी, वडूज, ता.खटाव जि. सातारा ----- अर्जदार विरुध्द 1. स्नेहप्रभा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जिंती ता.फलटण तर्फे चेअरमन श्री प्रदिप गांधी स्नेहप्रभा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जिंती ता.फलटण जि.सातारा 2. सचिव, सौ अपर्णा सुधीर फडके स्नेहप्रभा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जिंती ता.फलटण जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता सौ एफ.एन.पठाण) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये रक्कम रु.50,000/- दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी ठेवीची रक्कम अर्जदार यांचे खात्यावर वर्ग केली व सदरचे खात्यातून अर्जदार यांना रक्कम रु.25,000/- व रु.10,000/- अशी दोन वेळा रक्कम दिली. उर्वरीत रक्कम रु.73,594/- अद्याप अदा केलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.73,594/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.9 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.2 या पूर्वी संस्थेत सचिव पदी होत्या परंतुत्यांनी पूर्वीच राजीनामा दिलेला आहे त्यामुळे त्यांचा या तक्रारअर्जाशी संबंध नाही. सध्याचे दिवसांमध्ये पतसंस्थाबाबत नागरिकांचे मन कलुषित झालेले असलेने ते ठेवी परत मागत आहेत परंतु कर्जदार कर्जाची रक्कम परतफेड करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेस ठेवीचे पैसे परत देणे अवघड जात आहे. जाबदार यांचे सेवेत त्रुटी नाही अगर पैसे देण्याचे नाकारलेले नाही. संस्था पैसे परत देण्यास कटिबध्द आहे. अर्जदार यांनी ठेवींच्या रकमेचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये केला आहे का हेही तपासून पाहिले पाहिजे. तसा उल्लेख नसेल तर तो ब्लॅक मनी असू शकतो व अशा पैशाची वसूली ग्राहक मंचाने करुन द्यावी की कसे हा मुद्दाही विचारात घेणे आवश्यक आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी याकामी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द म्हणणे दाखल नाही असा आदेश करण्यात आला. 4. अर्जदार व जाबदारतर्फे दाखल पुरसिस पाहिली तसे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये असे कथन केले आहे की, जाबदार अर्जदारची रक्कम परत देण्यास कटिबध्द आहे. परंतु कर्जदार कर्जरक्कम परतफेड करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संस्थेची ओढाताणीची स्थिती झाली आहे. परंतु अर्जदारची ठेव रक्कम परत न करण्यास सदरची कारणे ही कायदेशीर कारणे ठरु शकत नाही. ठेवीची मुदत संपलेनंतर ठेवीची पूर्ण देय रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली पूर्ण रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, ठेवीदांरांनी ठेवलेल्या रकमांचा तपशील त्यांनी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दिला आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे. तसेच ब्लॅक मनी वसुलीचा आदेश ग्राहक न्यायालय देवू शकते का हाही मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. परंतु सदरच्या बाबी पाहणे या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. जाबदार हे याबाबत त्या यंत्रणांकडे दाद मागू शकतात. 7. जाबदार यांनी पुढे असे कथन केले आहे की, जाबदार क्र.2 यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांचा या तक्रारअर्जाशी संबंध नाही. परंतु जाबदार क्र.1 यांनी याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब जाबदार क्र.1 यांचे सदरचे कथन ग्राहय मानता येणार नाही. 8. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. बचत खाते क्र.545 वरील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 10/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |