नि.27 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
तक्रार क्र. 38/2011 नोंदणी तारीख – 1/3/2011 निकाल तारीख – 19/07/2011 निकाल कालावधी – 80 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री अनंत बळवंत आडकर 2. सौ ललीता अनंत आडकर 3. सौ ज्योति प्रशांत आडकर 4. श्री प्रशांत अनंत आडकर सर्व. रा.कसबा पेठ, फलटण ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.रामचंद्र घोरपडे) विरुध्द 1. स्नेहप्रभा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जिंती करिता श्री प्रदीप माणिकलाल गांधी, रा.रविवार पेठ, शिवाजी चौक, फलटण ता.फलटण जि.सातारा
2. श्री प्रदीप माणिकलाल गांधी चेअरमन, रा.रविवार पेठ, शिवाजी चौक, फलटण ता.फलटण जि.सातारा
3. श्री राजकुमार हिरालाल गांधी, व्हाईस चेअरमन रा.लक्ष्मीनगर, गुणणी बिल्डींग नजीक, फलटण ता.फलटण जि. सातारा
4. सौ अपर्णा सुधीर फडके, संचालक व्यवस्थापक, लक्ष्मीनाथ कॉम्प्लेक्स उमाजी नाईक चौक, फलटण ----- जाबदार (अभियोक्ता श्री एस.एस.निंबाळकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे – 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. तसेच अर्जदार क्र. 1 ते 4 यांचे जाबदार संस्थेमध्ये बचत खाते असून त्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. मुदत ठेव पावतींची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.20/12/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांची रक्कम परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी ठेवींची व्याजासह होणारी एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र. 4 ते 14 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामातून नि.25 वरील आदेशानुसार वगळण्यात आले आहे.
3. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.19 ला दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदारचे मुदत ठेवींची मुदतवाढ अर्जदारचे इच्छेप्रमाणेच करण्यात आली आहे. जाबदार यांनी अर्जदार यांना जे नोटीस उत्तर पाठविले आहे त्यामध्ये त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचे पैसे देण्याचे नाकारलेले नाही. मे. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचेसमोर दाखल असलेल्या रिट पिटीशनमधील निवाडयानुसार संचालक मंडळास जबाबदार धरण्यात येवू नये तसे पक्षकार म्हणून सामीलही करण्यात येवू नये असे कथन केलेले आहे. त्यामुळे जाबदार यांची नावे काढून टाकण्यात यावीत. जाबदार क्र.14 यांनी राजीनामा दिलेला असूनही त्यांना पक्षकार केलेले आहे तरी त्यांना या तक्रारीतून वगळणेत यावे. 4. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.23 पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली.
5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये मे. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचेसमोर दाखल असलेल्या रिट पिटीशनमधील निवाडयानुसार संचालक मंडळास वैयक्तिक स्वरुपात जबाबदार धरण्यात येवू नये तसे पक्षकार म्हणून सामीलही करण्यात येवू नये असे कथन करुन सदरचे निवाडयाची प्रत याकामी दाखल केली आहे. सदरच्या निवाडयाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, मा.उच्च न्यायालय यांनी संस्थेच्या संचालकांना वैयक्तिक स्वरुपात ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरण्यात येवू नये व ठेव रक्कम परतीची जबाबदारी ही संबंधीत पतसंस्थेची राहील असे मतप्रदर्शन केले आहे. सदरच्या मताशी प्रस्तुतचा मंच पूर्णतया सहमत आहे. सदरचा निवाडा विचारात घेता प्रस्तुत कामी जाबदार संस्थेच्या संचालकांना वैयक्तिक स्वरुपात अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरता येणार नाही ही बाब स्पष्ट होते. परंतु सदरचे निवाडयानुसार अर्जदार यांची ठेव रक्कम परत करण्यास संस्थेस जबाबदार धरण्यात यावे असे मतप्रदर्शन केले असल्यामुळे जाबदार संस्थेस याकामी ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरण्यात येत आहे व जाबदार संस्थेच्या एकूण कारभारास संचालक मंडळ जबाबदार असल्याने अर्जदारच्या ठेव रकमा परत करण्यास जाबदार क्र.1 संस्था व जाबदार संस्थेकरिता जाबदार क्र.2 व 3 हे संयुक्तरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
6. जाबदार क्र. 4 हे जाबदार क्र. 1 संस्थेचे मॅनेजर असलेने यांना या कामात संस्थेचे नोकर असलेने जबाबदार धरता येणार नाही असे मे. मंचाचे मत आहे. 7. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. तसेच बचत खात्यातील रक्कमही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 8. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 संस्था व जाबदार संस्थेकरिता जाबदार क्र. 2 व 3 यांनी संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.203, 215, 216, 202, 201, वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. बचत खाते क्र. 4/125/2 वरील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. क. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. ड. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा दि.19/07/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |