निकालपत्र :- (दि.17.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) तक्रारदार तसेच त्यांचे वकिल आजरोजी तसेच मागील 3 तारखांपासून गैरहजर आहेत. सामनेवाला क्र.3 यांचे अॅड.जी.व्ही.पाटील यांनी त्यांचे वकिलपत्र मागील तारखेस दाखल केले आहे. सदर सामनेवाला हे स्वत: हजर आहेत. आजरोजी त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. आजरोजी तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर असल्याने सामनेवाला क्र.3 यांचे वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी तहसिल करवीर येथील रि.स.नं.634/41, प्लॉट नं.41, क्षेत्र 0.07.74 आर ही मिळकत सामनेवाला यांच्या मालकीची आहे. रोहित मोहन पाटगांवकर यांस सदर मिळकतीसही अन्य मिळकती विकसित करुन विक्री करणेचे अधिकार दिले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांन सदर वटमुखत्यापत्राच्या अनुषंगाने सदरची मिळकत रक्कम रुपये 11,36,000/- किंमतीस खरेदी देण्याबाबत लेखी संचकारपत्र दि.09.04.2008 रोजी करुन दिले आहे. तसेच, सदर करारपत्रानुसार वेळोवेळी रुपये 1 लाख इतकी रक्कम स्विकारुन उर्वरित रक्कम खरेदीपत्रावेही देणेचे मान्य केले आहे. परंतु, करारपत्रानुसार सामनेवाला यांनी सदर मिळकतीचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. सबब, सदर मिळकतीचे खरेदीपत्र करुन देणेबाबत आदेश व्हावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.09.04.2008 रोजीचे संचकारपत्राची छायाप्रत व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) सामनेवाला क्र.3 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला क्र.2 व 3 यांचे वाड-वडिलार्जित मालकी कब्जेवहिवाटीची व प्रत्यक्ष ताब्यात असलेली मिळकत आहे. मात्र ‘सामनेवाला, वटमुखत्यारपत्र रोहित मोहन पाटगांवकर यांस सदरच्या मिळकतीसह अन्य मिळकती विकसित करुन अथवा या स्थितीमध्ये विक्री करणेबाबत वटमुखत्यार नियुक्त केले आहे’ हा मजकूर धादांत खोटा, लबाडीचा आहे. तक्रारीतील कलम 3 मधील मजकूर खोटा व लबाडीचा असून संगनमताने कटकारस्थान करुन प्रॉपर्टी हडप करणेच्या उद्देशाने कागदपत्रे अस्तित्त्वात आणली असलेने सामनेवाला तो स्पष्टपणे नाकारीत आहे. सदर व्यवहाराशी सामनेवाला क्र.2 व 3 यांचा कसलाही संबंध व मान्यता नसलेने तो सामनेवालांवर बंधनकारक नाही. तसेच, प्रस्तुत प्रकरणाचा न्यायनिवाडा करणेचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही. सबब, तक्रारदारांची खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) सामनेवाला क्र.3 यांच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तरपणे व विस्तृतपणे ऐकणेत आले. त्यांनी त्यांच्या युक्तिवादाचेवेळेस सामनेवाला क्र.1 श्रीमती जन्नतबी युसुफ राऊत हया दि.05.12.2006 रोजी मयत झालेल्या आहेत. तसेच, सामनेवाला क्र.2 हे भोळसट आहेत असे प्रतिपादन केले आहे. तसेच, मोहित रोहन पाटगांवकर यांना वटमुखत्यापत्र दिले नसल्याचे प्रतिपादन केले आहे. (6) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी वटमुखत्यापत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.4-रोहित मोहन पाटगांवकर यांना प्रस्तुत प्रकरणाची नोटीस लागू होवूनही ते प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत अगर म्हणणे दाखल केलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 (1) (ओ) मधील तरतुद विचारात घेता तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही स्थावर मिळकत आहे. प्रस्तुत सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे बांधकाम अथवा प्लॉट विषयक व्यवसाय नाही. प्रस्तुत तक्रारीत उपस्थित केलेला वाद चालविणेचा अधिकार या मंचास येत नसल्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत. 3 सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |