Exh.No.9
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 09/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 29/01/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 30/03/2015
श्री पांडूरंग कृष्णा चौघुले
वय – 60 वर्षे, व्यवसाय- चहा, वडापाव स्टॉल,
रा.मु.पो. खारेपाटण,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) सौ. शैलजा मंगेश कुबल
अध्यक्ष,
सन्मती महिला वि.का.स. औद्योगिक
संस्था मर्यादित
रा. मु.पो. खारेपाटण,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
2) श्री सचिन दीपक मांजरेकर
सचिव,
सन्मती महिला वि.का.स. औद्योगिक
संस्था मर्यादित,
रा.मु.पो. वारगाव, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
3) सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक
संस्था मर्यादित, खारेपाटण,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष 1 ते 3 – एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि.30/03/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
- तक्रारदाराच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की,
तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष यांच्या सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक संस्था मर्यादित, खारेपाटण या संस्थेत पिग्मी खाते असून त्यांना रक्कमेची आवश्यकता असल्याने विरुध्द पक्षाकडे मागणी करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष यांच्या सन्मती महिला वि.का.स.औद्योगिक संस्था मर्यादित, खारेपाटण या संस्थेत पिग्मी खाते असून त्याचा खाते क्र.1564 असा आहे. तक्रारदार हे सदर पिग्मी खात्यात दि.01/03/2013 पासून दि.30/11/2013 पर्यंत रक्कम भरणा करीत होते. तक्रारदार यांची सदर पिग्मी खात्यात रु.55,200/- जमा आहेत. त्यानंतर दि.1 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत रु.1200/- जमा केले, असे एकूण रु.56,400/- विरुध्द पक्ष संस्थेकडे जमा आहेत. तक्रारदार यांनी सदर पिग्मी खाते बंद केले व जमा असलेल्या रक्कमेची व्याजासह मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी वेळोवेळी कारणे सांगून रक्क्म देणेस टाळाटाळ केली. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी वेळीच रक्कम परत न दिल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी भरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या संस्थेत जमा असलेली रक्कम रु.56,400/- व्याजासह मिळावी तसेच तक्रारदारास झालेल्या तक्रार खर्चापोटी रु.5,000/-, तसेच झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे.
3) सदर तक्रार दाखल झाल्यावर विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना अनुक्रमे नि.5, 6 व 7 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या. तथापि विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 हे नोटीस बजावणी होऊनही गैरहजर राहिल्याने व म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश दि.19/03/2015 रोजी पारीत करण्यात आले. तक्रारदार यांनी नि.8 वर आणखी तोंडी व लेखी पुरावा दयावयाचा नसलेबाबत पुरसीस दाखल केली. तक्रारदारतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आल्याने सदर प्रकरण निकालावर घेण्यात आले.
4) तक्रारदाराची तक्रार, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे यांचा विचार केला असता मंचासमोर खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे ? | होय |
2 | तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द दाद मागणेस पात्र आहे काय ? | होय |
4 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
5) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या सन्मती महिला वि.का.स. औद्योगिक संस्था मर्यादित खारेपाटण, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांचेकडे पिग्मी ठेव खाते क्र.1564 असे असून सदर खात्यात तक्रारदार यांची मूळ रक्कम रु.56,400/- जमा असलेचे तक्रारदार यांनी नि.3/1 वर हजर केलेल्या ठेव खाते पुस्तिकेवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा ‘ग्राहक’ आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
6) मुद्दा क्रमांक 2- i) तक्रारदार यांनी आपले पिग्मी खाते विरुध्द पक्ष यांचे संस्थेत उघडलेले असून त्यामध्ये रु.56,400/- जमा आहेत. विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या खाते पुस्तिकेवरुन सदरची बाब निदर्शनास येते. तक्रारदार यांना रक्कमेची आवश्यकता असल्याने तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे रक्कमेची वारंवार तोंडी मागणी केली. तथापि विरुध्द पक्ष यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदार यांनी ता.15/01/2015 रोजी विरुध्द पक्ष यांना रक्कम देणेबाबत रजिस्टर्ड नोटीसही पाठविली.(नि.3/2) परंतु विरुध्द पक्ष यांनी सदरची नोटीस स्वीकारली नसल्याने ती परत आली. (नि.3/3). शेवटी नाईलाजास्तव तक्रारदारास सदरची तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली.
ii) तक्रारदार हे एक वयोवृध्द व्यक्ती असून ते वडापावची हातगाडी चालवतात. तक्रारदार यांनी आपल्या भविष्यकालीन तरतुदीसाठी म्हणून विरुध्द पक्ष यांच्याकडे पिग्मी खाते उतरवले आहे. तक्रारदार यांना रक्कमेची आवश्यकता असल्याने त्यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे त्यांच्या पिग्मी खात्यात जमा असलेल्या रक्कमेची वारंवार मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते. सदरची विरुध्द पक्ष यांची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असल्याचे व तक्रारदारास सदोष सेवा दिल्याचे मंचासमोर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 बाबत हे मंच होकारार्थी निष्कर्षाप्रत येत आहे.
7) मुद्दा क्रमांक 3 व 4 - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या संस्थेत जमा असलेली रक्कम रु.56,400/- व्याजासह मिळावी तसेच तक्रारदारास झालेल्या तक्रार खर्चापोटी रु.5,000/-, तसेच झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळणेबाबत विनंती केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा, कागदपत्रांचा अभ्यास करुन तक्रारदार हे रु.56,400/- व्याजासह मिळणेस पात्र ठरतात. तसेच विरुध्द पक्ष यांच्या कृतीमुळे ही तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदार मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळणेस पात्र ठरतात. त्यामुळे हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे तक्रारदाराची पिग्मी खात्यात जमा असलेली रक्कम रु.56,400/-(रुपये छप्पन हजार चारशे मात्र) तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि.29/01/2015 पासून 5% व्याजदराने तक्रारदारास परत करावी.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे तक्रारदारास झालेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- दयावेत.
- वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे 45 दिवसांत न केल्यास तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 अन्वये दंडात्मक कारवाई करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि. 16/05/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः30/03/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.