तक्रार दाखल तारीख – 28/1/15 तक्रार निकाली तारीख – 12/3/18 |
न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदाराचे सदर तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. ते त्यांच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शाहूपूरी, 1 ली गल्ली, कोल्हापूर येथे हॉटेल ‘ विश्व लॉजिंग ’ या नावाने हॉटेल चालवतात. ग्राहकांना गरम पाण्याची सोय उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक व गरजेचे असलेने त्यांनी सोलर सिस्टीमचे अधिकृत डिलर वि.प.क्र.1 यांचेकडून सोलर सिस्टीम खरेदी करणेचे ठरवले व प्रस्तुत वि.प. यांचेकडून सविस्तर माहिती घेवून 4 सोलर सिस्टीमची पायोनियर इलेक्ट्रोमेट्रीक प्रा.लि. यांचे नावे परचेस ऑर्डर दि. 02/03/10 रोजी नोंदवली व प्रथम रु.94,400/- अॅडव्हान्स म्हणून दिली व नंतर संपूर्ण रक्कम अदा केली आहे. वि.प. यांना रु.2,36,000/- मिळालेनंतर सोलरचे 2 ते 3 आठवडयात जागेवर जोडणी करण्याचे ठरले. प्रस्तुत सोलर सिस्टमच्या फक्त ग्लास पॅनेल व इलेक्ट्रीकल बॅकअप या वस्तूंवर वॉरंटी दिली नव्हती. मात्र संपूर्ण सोलर सिस्टीमवर 5 वर्षाची वॉरंटी होती व आहे. प्रस्तुत वॉरंटी ही सोलर सिस्टीम जोडणी केल्यापासून (इन्स्टॉलेशनपासून) 5 वर्षांची होती. तक्रारदाराला सोलर सिस्टीम जुलै 2010 मध्ये जोडणी करुन दिले. म्हणजेच वॉरंटी जुलै 2015 पर्यंत होती. सन 2013 पासून दोन सोलर सिस्टीमचे टँकला गळती लागल्याने योग्य त्या रितीने व्यवस्थितपणे लॉजिंगच्या रुम्समध्ये गरम पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे ऐन सिझनमध्ये हॉटेलच्या ग्राहकांना गरम पाणी न मिळाल्याने ग्राहकांची नाराजी झाली व तक्रारदाराचे नुकसान झाले. तक्रारदाराने वि.प. यांचेबरोबर वारंवार संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून टँकची गळती काढून द्या व दुरुस्ती करुन द्या अशी मागणी केली असता वि.प. ने टाळाटाळ केली. सबब, तक्रारदाराने वि.प. ला लेखी नोटीस दिलेनंतरच वि.प. ने लेखी खुलासा पाठवून वि.प. कंपनीच्या जबाबदा-या नाकारल्या आहेत. तसेच वि.प. नं.1 यांनी सोलर सिटीम दुरुस्त करणेस तयार आहोत, परंतु दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल असे कळवून खर्चाची मागणी केली. वि.प.ने प्रत्यक्षात टँक 1 एम.एम.चा न देता कमी क्षमतेचा दिल्याने टँक गळती लागून सिस्टीम बंद पडली आहे. त्याबाबत निर्णय न घेता, फक्त सोलर सिस्टीम दुरुस्तीतून आणखीन पैसे उकळणेचा प्रयत्न वि.प. नं.1 व 2 यांनी केला आहे. पर्चेस ऑर्डरचे अटी व शर्तीनुसार वि.प. ने तक्रारदाराला सेवा दिली नसलेने वि.प.ने सेवात्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वि.प. यांचेकडून 1 एम.एम. क्षमतेचा नवीन टँक मिळावा व सदर बंद असलेली सोलर सिस्टीम वि.प. यांनी स्वखर्चाने सुरु करुन द्यावी, हे शक्य नसलेस तक्रारदाराकडून सोलर सिस्टीमसाठी स्वीकारलेली रक्कम रु.2,36,000/- परत मिळावेत, सन 2013 पासून सोलर सिस्टीम बंद असल्याने झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावी, अर्जाचा खर्च रु. 3,000/-, वकील फी रु.17,000/- असे एकूण रु.20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावेत, वरील सर्व रकमांवर तक्रारअर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे.7 टक्केप्रमाणे व्याज वि.प. कडून मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, नि.3 चे कागदयादीसोबत अ.क्र.1 ते 9अ कडे अनुक्रमे पर्चेस ऑडर, चैतन्य सौर ऊर्जा इक्वीपमेंटची तपशील शीट, टाटा पॉवर सोलर सिस्टीम लि. हे अधिकृत विक्रेते असल्याचा तपशील, तक्रारदाराने वि.प. क्र.1 कडे दाखल केलेल्या तक्रारी, तक्रारींच्या पोहोचपावत्या, तक्रारदाराने वकीलामार्फत वि.प. ला दिलेली नोटीस (पोहोचपावतीसह), वि.प. क्र.1 तर्फे नोटीसला दिलेले उत्तर, पुराव्याचे शपथपत्र, वि.प.क्र.1ब ला वगळणेसाठीचा अर्ज, कागदयादीसोबत वि.प. ने तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या रकमांच्या पावत्या, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसीस, वगैरे कागदपत्रे याकामी दाखल केली आहेत.
4. वि.प. क्र.2 ने प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत दाखल केली आहे. याकामी वि.प. क्र.1अ यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. तसेच वि.प. क्र.1ब यांना तक्रारदाराचे तक्रारअर्जावर मंचाने केले आदेशाप्रमाणे वगळलेले आहे. वि.प. क्र.2 ने प्रस्तुतकामी म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, तक्रारदाराचे हॉटेलची जाहीरात, तक्रारदाराचे व्हीजिटींग कार्ड, टाटा सोलर इंडियाचे युजर मॅन्युअल, वगैरे कागदपत्रे वि.प. यांनी याकामी दाखल केली आहे.
5. वि.प.क्र.2 यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील प्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
ii) तक्रारदाराचा तक्रारअर्ज मंचात चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
iii) तक्रारदार हे हॉटेल विश्व या नावाने ख्यातनाम असलेले लॉजिंग बोर्डींग हॉटेल चालवतात. सदर हॉटेलमधील रुम्स आलिशान आहेत. तसेच तक्रारदाराचा सदर हॉटेलचा व्यवसाय जोरदारपणे चालू असून तक्रारदार कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी सदर हॉटेल चालवत नसून व्यावसायिक कारणासाठी सदर हॉटेलचा व्यवसाय करतात आणि त्यासाठी सदर सोलर सिस्टीम वापरतात. त्यामुळे तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक होत नाहीत. सदर सोलर सिस्टीमबाबत वाद उद्भवलेस दिवाणी कोर्टात दाद मागणे आवश्यक आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज या मंचात चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
iv) तक्रारदाराने तक्रारीसोबत अ.क्र.2 व 3 ला दाखल केले कागदपत्रे (माहितीपत्रक) दि.30/11/13 रोजीचे आहे आणि त्यानुसार सन 2015 मध्ये 5 वर्षे वॉरंटी दिसून येते. परंतु सदरचे माहितीपत्रक चैतन्य सौरऊर्जा इक्वीपमेंट्स यांचेकडून सदर कागदपत्रे नमूद सोलर सिस्टीमधील नाहीत तसेच चैतन्य सौरउर्जा इक्वीपमेंट्स हे याकामी पक्षकार नाहीत, त्यामुळे अ.क्र.2 व 3 कडील कागद पुराव्यात वाचता येणार नाहीत.
v) तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले सोलर सिस्टीम दि.19/5/2010 रोजी जोडण्यात आली होती. सदर सिस्टीमकरिता 1 वर्षाची रिपेअरी/रिप्लेसमेंट फ्रीची अशी वॉरंटी होती. त्यानुसार दि.18/5/11 रोजी रिपेअरी/रिप्लेसमेंट फ्रीची वॉरंटी संपलेली आहे. टाटा सोलर सिस्टीमला 1 वर्षाची वॉरंटी असलेचे वॉरंटीचे पत्र तथा युजर मॅन्युअलची प्रस्तुत वि.प. यांचेकडील प्रत, याकामी वि.प. ने म्हणण्यासोबत दाखल केली आहे. यामध्ये वि.प. क्र.2 चे नावाचा उल्लेख आहे. तीन वर्षाच्या कालावधीनंतर सोलर सिस्टीममध्ये दुरुस्ती करण्याकरिता खर्चाची जबाबदारी केवळ तक्रारदार यांचेवर येते. ही बाब वि.प. कंपनीने वेळोवेळी तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तरीही तक्रारदाराने खोडसाळपणे चुकीचे माहितीपत्रक तक्रारीसोबत दाखल करुन वि.प. कंपनीकडून बेकायदेशीरपणे रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला आहे.
vi) तक्रारदाराचे सोलर सिस्टीमची वॉरंटी कालावाधी जुलै 2010 ते जुलै 2015 असा आहे हे पूर्णपणे खोटे व लबाडीचे आहे. तक्रारदाराची सोलर सिस्टीम 2010 ला जोडणी झालेनंतर 2013 मध्ये त्यांचे टँकला गळती लागली. असे असताना गळती दुरुस्तीसाठी रक्कम तक्रारदाराला भरावी लागेल असे वि.प. ने तक्रारदाराला सांगितलेनंतर तक्रारदाराने मेकॅनिककडून टँक खोलून घेतले. त्यानंतर खोललेले टँक तसेच ठेवले व विनाकारण तक्रार दाखल केली आहे.
vii) वि.प. ने तक्रारदाराला कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही तसेच मानसिक शारिरिक त्रास दिलेला नाही. तसेच तक्रारदाराची तक्रार या मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नसलेने खर्चासह खर्चासह फेटाळणेत यावी, तसेच तक्रारदाराची तक्रार मुदतीत नसलेने फेटाळणेत यावी अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
3 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
4 | तक्रारदार वि.प. यांचेकडून वादातील सोलर सिस्टीम टँक बदलून मिळणेस किंवा त्याची किंमत तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 4 ची उत्तरे आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने शपथेवर कथन केले आहे की, वादातील सोलर सिस्टीम जुलै 2010 मध्ये जोडणी करण्यात आली. त्यावेळेपासून सदर सिस्टीमला पाच वर्षाची वॉरंटी आहे म्हणजेच जुलै 2015 मध्ये वॉरंटी संपुष्टात येते. वि.प. ने टँक 1 एम.एम. क्षमतेचा दिला नाही, त्यामुळे सन 2013 मध्ये गळती लागली, लेखी तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु वि.प. ने टँक दुरुस्ती करुन दिला नाही किंवा बदलून दिला नाही. त्यामुळे सन 2013 मध्ये गळती लागली म्हणजे अर्जास कारण 2013 मध्ये घडले. तेव्हापासून तक्रारदाराने वि.प. कडे वेळोवेळी लेखी-तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु वि.प. ने टँक दुरुस्ती करुन दिला नाही किंवा बदलून दिला नाही. तक्रारदाराने दाखल केले पर्चेस ऑर्डर मध्ये गॅरंटी – Repairy/Replacement free + 4 years warranty असे नमूद आहे. सदर पर्चेस ऑर्डवर अॅडव्हान्स रक्कम रु.94,400/- चेक नं. 025911 मिळाला म्हणून वि.प. क्र.1 यांची सही आहे. यावरुन प्रस्तुत सोलर सिस्टीमला 5 वर्षे वॉरंटी होती हे स्पष्ट होते. सन 2013 मध्ये गळती लागली. तक्रारदाराने वि.प. कडे लेखी तोंडी तक्रारी करुनही वि.प. ने टँक दुरुस्ती करुन अथवा तो बदलून दिलेला नाही. तक्रारदाराने तक्रार दि.22/1/15 रोजी दाखल केली. अर्जास सातत्याने कारण घडत (Continuous cause of action) होते. सबब, तक्रार मुदतीत आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प. ने याकामी सोलर वॉटर हिटींग सिस्टीमध्ये युजर मॅन्युअल दाखल केले आहे व त्यानुसार तक्रारदाराला दिले सोलर सिस्टीमला 1 वर्षे वॉरंटी होती असे वि.प.चे कथन आहे. परंतु सदरचे युजर मॅन्युअल सन 2010 मध्ये तक्रारदाराने घेतलेल्या सोलर सिस्टीमध्ये आहे हे सिध्द होत नाही. याउलट तक्रारदाराने दाखल केले पर्चेस ऑर्डरवर गॅरंटी 5 वर्षे स्पष्टपणे नमूद आहे. तसेच सदर पर्चेस ऑर्डरवर अॅडव्हान्सपोटी चेक मिळाल्याबाबत वि.प. नं.1 यांनी सही केली आहे म्हणजेच वि.प. यांनी 5 वर्षे वॉरंटी दिली होती हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे याकामी वि.प. ने आक्षेप घेतला आहे की, तक्रारदार यांचे हॉटेल विश्व या नावाने ख्यातनाम लॉजिंग बोर्डींग आहे आणि तक्रारदाराने घेतलेली सोलर सिस्टीम ही सदर हॉटेलसाठी खरेदी केली असलेने व्यावसायिक कारणासाठी त्याचा उपयोग होत असलेने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. सदर बाबीचा ऊहापोह केला असता तक्रारदाराने शपथेवर कथन केले आहे की, तक्रारदार स्वतःचा व कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविणेसाठी सदर हॉटेल चालवतात. त्याचप्रमाणे वि.प. ने तक्रारदार हे सदर हॉटेलपासून जास्तीत जास्त नफा मिळवतात किंवा त्यांचे इतर व्यवसाय आहेत यासाठी फक्त हॉटेलची जाहीरात व व्हिजिटींग कार्ड दाखल केले आहे. परंतु सदर जाहीरात किंवा व्हिजिटींग कार्ड यावरुन तक्रारदाराचे वार्षिक उत्पन्न खूप मोठे होते ही बाब सिध्द होत नाही. या बाबी वि.प. ने सिध्द केलेल्या नाहीत. म्हणजेच तक्रारदाराने प्रस्तुत सोलर सिस्टीम व्यावसायिक कारणासाठी खरेदी केलेचा मजकूर शाबीत होत नाही. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येतात हे स्पष्ट होते.
Section 2(1)(d) of Consumer Protection Act –
(d) “consumer” means any person who,—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose];
[Explanation: For the purposes of sub-clause (i), “commercial purpose” does not include use by a consumer of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;]
तक्रारदाराचे सोलर सिस्टीमचे टॅंकला सन 2013 मध्ये गळती लागल्यानंतर तक्रारदाराने अनेक वेळा वि.प.ला प्रत्यक्ष भेटून, मोबाईल व दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तसेच वि.प. ला लेखी नोटीस दिलेनंतर वि.प. ने त्यांचे उत्तरी नोटीसमध्ये त्यांच्या जबाबदा-या नाकारल्या आहेत. तसेच वि.प. नं.2 ने नोटीस स्वीकारली नाही म्हणून ती परत आली आहे. त्याचप्रमाणे वि.प. नं.1 ने सोलर सिस्टीम दुरुस्त करुन देण्यास तयार आहेत. परंतु त्या दुरुस्तीचा खर्च तक्रारदाराने द्यावा अशी मागणी केली आहे. सदरचे पत्र तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे.
8. सदर कामी वि.प. क्र.1 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी गैरहजर राहिलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. तसेच वि.प. क्र.1(ब) यांना तक्रारदाराचे विनंतीवरुन वगळण्यात आले आहे. फक्त वि.प. क्र.2 यांनी याकामी हजर होवून म्हणणे व पुरावे दाखल केले आहेत.
9. वर नमूद तक्रारदार व वि.प. ने दाखल केलेल्या कागदपत्रांचा ऊहापोह करता तक्रारदार यांचे सोलर वॉटर हिटींग सिस्टीमचे दोन टँकला वॉरंटी कालावधीत गळती लागूनही वि.प. ने सदरचे टँक दुरुस्त करुन दिले नाहीत अथवा बदलून दिले नाहीत हे स्पष्ट होते. तक्रारदाराचे सोलर वॉटर हिटींग सिस्टीमला 5 वर्षे वॉरंटी होती ही बाब तक्रारदाराने दाखल केले पर्चेस ऑर्डरवरुन स्पष्ट होते. पर्चेस ऑर्डरवर वि.प. नं.1 यांची अॅडव्हान्सपोटी रक्कम रु.94,400/- चा चेक मिळाला म्हणून सही आहे. तसेच सदर पर्चेस ऑर्डरवर गॅरंटी क्लॉजमध्ये 1 Year Repairy/Replacement free + 4 years warranty असे नमूद केलेले आहे. सदर पर्चेस ऑर्डर जरी तक्रारदाराने पायोनियर इलेक्ट्रोमॅटीक प्रा.लि. या नावाने दिली असली तरीही सदर पर्चेस ऑर्डरवर वि.प. क्र.1 ने अॅडव्हान्स मिळालेबाबत सही केली आहे. म्हणजे सदर पर्चेस ऑर्डर मध्ये नमूद केलेल्या गॅरंटी व वॉरंटी क्लॉजची वि.प. यांना माहिती आहे. तसेच वि.प. ने सोलर वॉटर हिटींग सिस्टीमचे जे यूजर मॅन्युअल दाखल केले आहे, ते सन 2010 मध्ये विक्री केलेल्या टाटा बी.पी. सोलर वॉटर हिटर सिस्टीमला लागू होते हे स्पष्ट होत नाही.
म्हणजेच वि.प. ने तक्रारदाराचे सोलर वॉटर हिटर सिस्टीमला वॉरंटी कालावधीत सन 2013 मध्ये गळती लागून बंद पडले असता तक्रारदाराने वि.प. यांना वारंवार लेखी तोंडी व दुरुस्ती करुन मागणी केली असता वि.प. ने तक्रारदाराची सदर सोलर वॉटर हिटर सिस्टीम दुरुस्त करुन देणेसाठी तक्रारदाराकडे रकमेची मागणी केली व ते दुरुस्त करुन अथवा बदलून दिले नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प. क्र.1, 1अ व 2 यांचेकडून वादातील सोलर वॉटर हिटींग सिस्टीम विनाशुल्क दुरुस्त होवून मिळणेस पात्र आहेत. परंतु वि.प. यांना हे शक्य न झालेस वादातील सोलर वॉटर हिटींग सिस्टीम बदलून दुसरी विनादोष सोलर वॉटर हिटींग सिस्टीम तसेच पर्चेस ऑर्डरमध्ये नमूद केलेप्रमाणे 1 एम.एम. क्षमतेचा टँक वि.प. ने तक्रारदाराला अदा करावा. त्याचप्रमाणे जर वरील बाबींची पूर्तता करणे वि.प. यांना अशक्य व अडचणीचे झालेस वि.प. ने तक्रारदाराला सदर सोलर सिस्टीमची पूर्ण खरेदी रक्कम रु.2,36,000/- (रुपये दोन लाख छत्तीस हजार फक्त) अदा करावेत व प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याज वि.प. ने तक्रारदाराला अदा करावे. तसेच नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रु. 5,000/- तक्रारदाराला वि.प. ने अदा करणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1, 1अ व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदार यांना वादातील सोलर वॉटर हिटींग सिस्टीम विनाशुल्क दुरुस्त करुन द्यावी. जर वि.प. यांना हे शक्य झाले नाही तर वि.प. क्र.1, 1अ व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वादातील सोलर वॉटर हिटींग सिस्टीम बदलून दुसरी विनादोष सोलर वॉटर हिटींग सिस्टीम तसेच पर्चेस ऑर्डरमध्ये नमूद केलेप्रमाणे 1 एम.एम. क्षमतेचा टँक तक्रारदाराला अदा करावा.
3) जर वरील बाबींची पूर्तता करणे वि.प. यांना अशक्य व अडचणीचे झालेस वि.प. क्र.1, 1अ व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराला सदर सोलर सिस्टीमची पूर्ण खरेदी रक्कम रु.2,36,000/- (रुपये दोन लाख छत्तीस हजार फक्त) अदा करावी व प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याज अदा करावे.
4) नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.15,000/- (रक्कम रुपये पंधरा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. क्र.1, 1अ व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराला अदा करावी.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.