जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 141/2010. तक्रार दाखल दिनांक :29/03/2010. तक्रार आदेश दिनांक :15/03/2011. अंबादास शंकर सोनवणे, वय 60 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. घर नं.79, पावन गणपती, दमाणी नगर, द्वारा : साठे यांचे घर, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, परिवहन उपक्रम व वाहन व्यवहार, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. 2. आयुक्त, सोलापूर महानगर पालिका, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : शशिकांत एस. मचाले विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे प्रतिनिधी : ए.एम. गोरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते विरुध्द पक्ष यांच्याकडे ‘चालक’ पदावर नोकरीत होते आणि दि.31/5/2007 रोजी सेवानिवृत्त झाले. ते भविष्य निर्वाह निधीचे सभासद होते आणि निवृत्तीच्या वेळी दि.6/1/2010 पर्यंत रु.1,10,013/- विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा आहे. सदर रकमेची वारंवार मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.1,10,013/- व त्यावरील व्याज रु.24,753/- मिळण्यासह मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यामध्ये नोकर व मालक संबंध होते. तक्रारदार यांना वेळोवेळी प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम रु.95,940/- व रु.14,073/- दिलेली आहे. त्यांची आर्थिक परिस्थितीत बिकट व हालाखीची असल्यामुळे एकरकमी रक्कम देत येत नाही. तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र नाही आणि शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या आस्थापनेवर ‘चालक’ पदावर नोकरीत करीत होते आणि ते भविष्य निर्वाह निधीचे सभासद असल्याविषयी विवाद नाही. तसेच त्यांच्या वेतनातून विरुध्द पक्ष क्र.1 यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करुन घेतल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या निवृत्तीच्या वेळी रु.1,10,013/- विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा असल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची जमा असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.1,10,013/- देण्यात आलेली नाही, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम रु.95,940/- व रु.14,073/- दिलेली आहे. तसेच त्यांनी पुरसीस दाखल करुन तक्रारदार यांना प्रॉव्हीडंट फंडाची कोणतीही रक्कम देणे बाकी नसल्याचे नमूद केले आहे. 6. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर शपथपत्र दाखल करुन विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला तक्ता चुकीचा असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांनी दि.15/10/2008 ते 28/6/2010 कालावधीमध्ये रु.62,140/- व सेवानिवृत्तीच्या दिवशी रु.11,000/- प्राप्त झाले असून उर्वरीत रु.36,873/- येणे असल्याचे म्हटले आहे. 7. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची प्रस्तुत तक्रार दाखल होण्यापूर्वी वेळोवेळी टप्प्या-टप्प्याने धनादेशाद्वारे रक्कम अदा केल्याचे व रक्कम निरंक असल्याचे विवरणपत्र दर्शविले आहे. उलटपक्षी, तक्रारदार यांनी दि.15/10/2008 ते 28/6/2010 कालावधीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी रु.62,140/- जमा केल्याचे व सेवानिवृत्तीच्या दिवशी रु.11,000/- प्राप्त झाल्याचे शपथपत्राद्वारे नमूद केले आहे. त्यापृष्ठयर्थ त्यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेचा त्यांच्या बचत खात्याचा उतारा दाखल केला असून त्यावर तशा नोंदी आहेत. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर दिलेल्या विवरणपत्रामध्ये धनादेशाद्वारे रक्कम दिल्याचे नमूद केले असले तरी त्यापृष्ठयर्थ त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांनुसार तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांच्याकडून अद्यापि रु.36,873/- येणे असल्याचे निदर्शनास येते. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार उर्वरीत रु.36,873/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना भविष्य निर्वाह निधीचे उर्वरीत रु.36,873/- दि.29/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी मुदतीत न केल्यास संपूर्ण देय रक्कम विरुध्द पक्ष यांनी तेथून पुढे द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/9311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |