श्री.नरेश बनसोड, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/09/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, श्रीमती पद्मा रंगनाथराव व देशपांडे व सतीश रंगनाथराव देशपांडे यांचे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे संयुक्त खाते क्र. 36600210000156 होते. या खात्यातून त्यांनी तीन धनादेश क्र. 294971 रु.1,50,000/-, धनादेश क्र. 291470 रु.2,00,000/- आणि धनादेश क्र. 294968 रु.1,50,000/- काढले व सदर तिनही धनादेश गैरअर्जदार क्र. 2 यांनी वटविल्याचे कळविले आणि रु.5,00,000/- वळते केले. मात्र सदर तिनही धनादेशाची रक्कम मिळूनही गैरअर्जदार क्र. 1 यांनी फक्त दोन बॉंड (एकूण 35 बॉंड्स) श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे दिले. ज्याचे दर्शनी मुल्य एकूण रु.3,50,000/- होते. उर्वरित रु.1,50,000/- चे स्पष्टीकरण मात्र त्यांनी दिले नाही. या दरम्यान श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांचा मृत्यु झाला व नामनिर्देशीत म्हणून तक्रारकर्ता क्र. 1 आहे. याबाबत दोन्ही गैरअर्जदारांना विचारणा व चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी टाळली. म्हणून गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविली व व्याजासह सर्व रक्कम परत मागितली. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने सांगितल्याप्रमाणे 35 बॉंड्स हे देय झालेले असल्याने त्याची रक्कम परत केली. मात्र रु.1,50,000/- बाबत दोन्ही गैरअर्जदारांनी परत करण्याबाबत काहीही कारवाई केली नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल केली असून, ती द्वारे मागणी केली की, रु.1,50,000/- ही रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ एकूण 10 दस्तऐवज दाखल केले असून त्यात कायदेशीर नोटीस, पोच पावती, गैरअर्जदारांनी दिलेले प्रमाणपत्र, मृतक श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांना दिलेले पत्र, श्री. जयंत देशपांडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, गैरअर्जदारांना दिलेले पत्र व पोचपावती यांचा समावेश आहे.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांनी गैरअर्जदार क्र. 2 च्या नावे एकूण रु.5,00,000/- धनादेश बॉंड काढण्याकरीता दिल्याचे बाब मान्य केली. तसेच या संपूर्ण रकमेचे बॉंड तक्रारकर्त्यांना दिल्याचेही नमूद केले आहे. सदर बॉंड हे गैरअर्जदार क्र. 1 मार्फत श्री जयंत रंगनाथराव देशपांडे यांना फोलिओ क्र. एसआयडीसी 0001008 द्वारे व रु.1,50,000/- चे अर्जात नमूद पत्त्यावर पाठविण्यात आले व रु.3,50,000/- किंमतीचे इतर बॉंड फोलिओ क्र. एसआयडीसी 0001001 व फोलिओ क्र एसआयडीसी 0001002 श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांनी अर्जात नमूद केल्यावर पत्यावर सन 2004 मध्ये पाठविण्यात आले होते. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या नोटीसमध्ये बॉंड सर्टिफिकेट व अर्ज क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने त्याबाबत ते उत्तर देऊ शकले नाही. तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या त्यांनी नाकारल्या आहेत.
आपल्या विशेष उत्तरात गैरअर्जदार क्र. 1 ने फोलिओ क्र. एसआयडीसी 0001008 द्वारे गुंतविलेली रक्कम रु.1,50,000/- ही मुदती अंती रु.1,53,123/- श्री. जयंत रंगनाथ देशपांडे यांच्या नावावर दि.25.10.2007 रोजी स्पीड पोस्टाद्वारे पाठविले असता सदर व्यक्ती वारले असल्याने ते परत आले. तक्रारीमध्ये श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे या वारल्याचा उल्लेख आहे. परंतू श्री. जयंत रंगनाथ देशपांडे यांच्या मृत्युनंतर त्यांचे कायदेशीर वारसांनी रक्कम मिळण्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे सदर बॉंडची रक्कम अद्यापही गैरअर्जदार क्र. 1 चे खात्यात पडून आहे. न्यायालयामर्फत कायदेशीर वारस श्री. जयंत रंगनाथ देशपांडे व श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांचे आल्यास त्यांना सदर रकमेचा परतावा करता येईल.
4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी सदर रक्कम ही गैरअर्जदार क्र. 1 च्या खात्यामध्ये वळती केल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारीत बॉंडबाबत नमूद बाबींशी त्यांचा काहीही संबंध नसल्याने त्याबाबत ते उत्तर देण्यास असमर्थ असल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्त्याचे धनादेश वळते केल्याचा उल्लेख तक्रारकर्त्यांच्या पासबुकमध्ये असल्याने तक्रारकर्त्याचे त्याबाबतचे आरोप अमान्य केले आहे. तब्बल पाच वर्षानंतर तक्रारकर्ता सदर वाद घेऊन मंचासमोर आलेला आहे. सन 2004 मध्ये वाद घडलेला असतांना आता तक्रार करीत आहे, म्हणजे सदर वाद कालबाह्य आहे व तो खर्चासह खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
5. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद आधीच ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. गैरअर्जदार क्र. 1 यांनी श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांचेकडून रु.5,00,000/- रकमेचे तीन वेगवेगळे अर्ज मिळाल्याचे मान्य केले. गैरअर्जदारांनी हे सुध्दा मान्य केले की, तक्रारकर्त्यास त्यापोटी पाठविण्यात आलेले बॉंड्सचे विस्तृत विवरण तक्रारकर्त्याप्रमाणेच गैरअर्जदारांनी दिलेले आहे. वादातील मुद्दा हा रु.5,00,000/- पैकी उर्वरित रु.1,50,000/- चे बॉंड/रक्कम न मिळाल्याबाबत आहे. गैरअर्जदाराने म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार केला नाही व तसा पत्रव्यवहार मंचासमोर नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत हे मान्य केले आहे की, त्यांनी बॉंड फोलिओ क्र. एसआयडीसी 0001001 व फोलिओ क्र एसआयडीसी 0001002 या 35 बॉंड्सची किंमत त्यांना मिळालेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने तिस-या बॉंडबाबतचे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारले व म्हटले की, गैरअर्जदारांनी फोलिओ क्र. एसआयडीसी 0001008 या बॉंडमध्ये गुंतविलेली रक्कम रु.1,50,000/- मुदती अंती रु.1,53,123/- दि.25.10.2007 ला त्याच्या पत्यावर पाठविण्यात आले होते. परंतू श्री जयंत रंगनाथराव देशपांडे वारल्यामुळे ते अशा आशयाच्या शे-यानीशी परत आले. गैरअर्जदार क्र. 1 ने म्हटले की, बाँडकरीता फोलिओ क्र. एसआयडीसी 0001008 ची रक्कम रु.1,53,123/- ही गैरअर्जदार क्र. 1 चे खात्यात पडून आहे आणि श्री जयंत रंगनाथराव देशपांडे व श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे वारले असल्याने कायदेशीर वारस हक्क प्रमाणपत्र पाठविण्याबाबत मागणी केली. तक्रारकर्त्याचेनुसार व बॉंडमधील नोंदीनुसार अरुण रंगनाथराव देशपांडे व रविंद्र रंगनाथराव देशपांडे हे दोघे श्रीमती पद्मावती रंगनाथराव देशपांडे यांचे नामनिर्देशित व्यक्ती असल्याचे दिसते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ने मान्य केल्याप्रमाणे त्यांचे खात्यात पडून असलेले रु.1,53,123/- ही रक्कम दि.25.10.2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने तक्रारकर्त्यांना परत करणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. तक्रारकर्त्यांची मागणी स्पष्ट स्वरुपात असतांना व गैरअर्जदार क्र. 1 चा शुध्द हेतू असता तर गैरअर्जदार तक्रार प्रलंबित असतांना सुध्दा त्या रकमेचे धनादेश मंचात जमा करुन मंचाद्वारे विल्हेवाट लावण्याकरीता दाखल करु शकला असता. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने त्याबाबत कुठलीही तत्परता दाखविली नाही. हे गैरअर्जदार क्र. 1 ची कृती सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार क्र. 2 च्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्यामुळे त्यांचेविरुध्दचे सदर प्रकरण खारीज करण्यात येते.
8. तक्रारकर्त्यांचे मागणीनुसार शारिरीक व मानसिक नुकसान भरपाईचा मोबदला देणे पत्रव्यवहारा अभावी मंजूर करणे संयुक्तीक वाटत नाही. तक्रारीचा खर्च म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यांना रु.1,000/- द्यावे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 2 विरुध्दची सदर तक्रार खारीज करण्यात येते.
3) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी फोलिओ क्र. एसआयडीसी 0001008 ची त्यांचे खात्यात पडून असलेली रु.1,53,123/- ही रक्कम दि.25.10.2007 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने तक्रारकर्त्यांना परत करावी.
4) तक्रारीचा खर्च म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यांना रु.1,000/- द्यावे.
5) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.