ग्राहक तक्रार क्र. 19/2013
अर्ज दाखल तारीख : 05/02/2013
अर्ज निकाल तारीख: 04/03/2015
कालावधी: 02 वर्षे 01 महिने 0 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्री. बालाजी राम कोरे,
वय -38 वर्ष, धंदा – शेती,
रा. आळणी, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) मा. व्यवस्थापक सेंच्यूरी सिडस प्रा.लि.,
सुशांत /अरोरा, वय – सज्ञान,
बि.ए.22 फेज –II मंगलपुरी इंडस्ट्रीयल
यरिया नवी दिल्ली – 110034(भारत).
2) मे. जय भारत नर्सरी,
विठठल माधवराव तळेकर, गुळ मार्केट,
कव्हा रोड, लातूर. 413512 ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.पी.घोगरे.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.मुंढे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) 1) विरुध्द पक्षकार (विप) यांचेकडून फुलकोबीचे घेतलेले बी पेरल्यानंतर फुलकोबीचे उत्पन्न न आल्यामुळे झालेले नुकसान भरुन मिळावे म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे. तक याला आळणी ता.जि. उस्मानाबाद येथे गट क्र.129 मधील 1 हेक्टर 89 आर पैकी एक एकर मालकीची जमीन आहे व तो ती स्वत: कसतो. विप क्र.1 बियाणे उत्पादन करणारी कंपनी असून विप क्र. 2 हे त्यांचे विक्रेते आहेत. तक ने दिनांक 01/08/2012 रोजी विप क्र.2 कडून हिमप्रिया - 60 या वाणाच्या फुलकोबी बियाणाच्या प्रत्येकी 10 ग्रॅमच्या 4 पिशव्या प्रत्येकी रु.180/- किंमतीप्रमाणे रु.720/- किंमतीच्या खरेदी केल्या. 20 आर. क्षेत्राची योग्य ती मशागत करुन व शेणखत टाकून बियाणांची लागवड केली व उगवण झाल्यावर खताच्या मात्रा दिल्या, पाणी दिले, खुरपणी केली, कीटकनाशक फवारणी केली. विप ने सांगितलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे संपूर्ण कामे केली.
3) पिक फळधारणेस आल्यानंतर त्यातुन फुलकोबीचे गडडे ऐवजी तुरे निघाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. तक ने विप क्र.2 यांना त्याबददल फोनवर तसेच प्रत्यक्ष भेटून सांगितले. विप ने तुमचा आमचा संबध संपला अशी बेजबाबदार वागणूक दिली. विप ने दिलेले बियाणे सदोष व भेसळयुक्त होते तक ने जिल्हा कृषी अधिकारी ता. कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दिली व पंचनामा करण्याबाबात विनंती केली. त्याप्रमाणे संबंधीतांना नोटीसा काढून दि.23/11/2012 रोजी पिकाचा पंचनामा केला. त्याप्रमाणे 75 टक्के क्षेत्रावर पिकास गडडे येण्याऐवजी तुरे दिसून आले. तक चे अपेक्षित उत्पन्न 20 क्विंटल होते. नोव्हेंबर 2012 मध्ये बाजाभाव रु.3500/- प्रती क्विंटल होता. अशाप्रकारे तक चे उत्पन्नामध्ये रु.70,000/- चे नुकसान झाले. बियाणे खरेदी मेहनत, मशागत, खत व किटकनाशके यांसाठी रु.40,000/- खर्च झाला असे एकूण रु.1,10,000/- चे नुकसान झाले ते देण्यास विप क्र. 1 व 2 जबाबदार आहेत. तक ने त्यांना दि.31/12/2012 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. विप यांनी नुकसान भरपाई दिली नाही अगर उत्तरही दिले नाही म्हणून ही तक्रार दि.01/02/2013 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
4) तक ने तक्रारीसोबत सातबारा उतारा, नमूना आठ बचा उतारा, बियाणे खरेदीची पावती, फुलकोबी पिकाचे फोटो, जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेले अर्जाची प्रत, तक्रार निवारण समीतीचा पंचनामा, दि.21/12/2012 चे नोटीसची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) 1) विप क्र. 1 व 2 यांनी हजर होऊन ता.04/12/013 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप यांचे व्यवसायाचे ठिकाण या मंचाचे कार्यक्षेत्रात नसल्यामुळे ही तक्रार या मंचात चालणार नाही असे म्हंटलेले आहे. विप यांनी तक याला सदोष बियाणे विकले हे अमान्य केले आहे. तक यांनी विप कडे कधीही विचारणा केली नाही. उलट परस्पर संगनमत करुन पंचनामा करुन घेतला असे म्हंटलेले आहे. तालूका कृषी अधिकारी यांना बियाणे सदोष ठरवण्याचा अधिकार नसल्याने अहवाल गृहीत धरु नये असे म्हंटले आहे. बियाणांबाबत कुठलीही टेस्ट न केलेलेी असल्यामुळे अहवाल चुकीचा आहे असे म्हंटले आहे. विप क्र. 1 यांची उत्पादने दिल्ली येथे तयार होतात. विप क्र.1 यांना मराठी भाषा अवगत नसल्यामुळे इंग्रजी भाषेत नोटीस पाठविणे जरुर असतांना तशी पाठविली नाही. विप क्र.2 यांच्याकडे विप क्र.1 चे बियाणे विक्रीसाठी आले तेवहा सदर लॉटमधील बियाणे हणमंत जनगावे, सत्तार शेख, सादीक समद, वैजनाथ मोरे, जमीर पटेल, केशव गोरे, सर्व राहणार वडवळ ता. चाकूर, जि. लातूर यांना विक्री केलेचे व त्यांनी त्यातुन भरघोस उत्पादन घेतले. सदर बियाणांची उशीरा लागवड केली तर उगवण्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच पिक तयार करण्याच्या अवस्थेत बोरॉन व कॅल्शीअमचा स्प्रे जरुर असतो. याबाबत व्यावस्थापन चुकल्यास अगर नैसर्गीक वातावणात बदल झाल्यास रोपावर दुष्परीणाम होतो. तक ची तक्रार पुर्णपणे काल्पनिक असल्यामुळे रद्द होणे जरुर आहे.
2) विप यांनी दि.01/01/2013 चे पत्राची प्रत, हणमंत शरणाप्पा जनगावे यांचे प्रतिज्ञापत्र सलाम अब्बास शेख याचे प्रतिज्ञापत्र, सलीम उस्ताद याचे प्रतिज्ञापत्र, वैजनाथ गोरे याचे प्रतिज्ञापत्र, जमीर पटेल याचे प्रतिज्ञापत्र, केशव गोरे याचे प्रतिज्ञापत्र, सदर शेतक-यांचे सातबारा उतारे व बियाणे खरेदीच्या पावत्या, पटेल कृषी सेवा केंद्राच्या हजर केल्या आहेत.
क) ही तक्रार अॅडमिशनसाठी दि.05/02/013 रोजी मंचासमोर आली असता मंचामध्ये अधिकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्याची प्राथमिक मुद्दा महणून दखल घेण्यात येईल असा आदेश करुन तक्रार दाखल करुन घेण्यात आली. विप यांनी आपल्या म्हणण्यामध्ये या मंचाच्या अधिकार क्षेत्राबाबत वाद उपस्थित केलेला आहे. त्यामुळे अधिकार क्षेत्राचा मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून प्रथम चर्चेस घेण्यात येत आहे. तसेच पुढील मुद्दे निष्कर्षासाठी निघत असून त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) ही तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास आहे काय ? होय.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
ड) 1) मुद्दा क्र.1 :
1) ग्राहक संरक्षण कायदा कलम 11 (2) प्रमाणे जेथे विरुध्द पक्षकार राहतो किंवा एकापेक्षा जास्त विरुध्द पक्षकारापैकी एकजण राहतो अगर आपला व्यवसाय करतो अगर त्याची शाखा आहे अगर नोकरी धंदा करतो ते कार्यक्षेत्र असलेल्या मंचाला ती तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. शेवटी तक्रारीस कारण पुर्णत: अगर अंशत: जेथे घडले तेथे कार्यक्षेत्र असणा-या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. प्रस्तुत कामी विप क्र.1 दिल्लीचा राहणारा आहे. विप क्र.1 बियाणे तयार करतो असे तक चे म्हणणे आहे. विप क्र.2 हा विप क्र.1 चा एजंट असून त्याचे मार्फत विप क्र.1 बियाणांची विक्री करतो असे तक चे म्हणणे आहे. विप क्र.2 हा लातूरचा राहणारा आहे. तक चे म्हणण्याप्रमाणे त्याने विप क्र.2 कडून बियाणे खरेदी घेतले. म्हणजेच बियाणे खरेदीची प्रक्रिया लातूर येथे घडली. म्हणजेच विप क्र.1 यांनी तक याला लातूर येथे बियाणे विकले जे भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे विप या मंचाचे कार्यक्षेत्रात राहत नाहीत अगर बियाणांची खरेदी विक्री या मंचाचे कार्यक्षेत्रात झाली नाही परंतू बियाणाची लागवण आळणी जि.उस्मानाबाद येथे केली. बियाणांची उगवण झाल्यावरच त्यातील दोष आढळून येणार म्हणून तक्रारीचे कारण अंशत: येथे घडल्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
2) मुद्दा क्र.2 व 3 : तक ने हजर केलेल्या पावतीप्रमाणे विप क्र.2 कडून दि.01/08/2012 रोजी हिमप्रिया फुलकोबी लॉट क्र.730 चे बि खरेदी करण्यात आले होते. दहा गॅमच्या 1 पिशवीची किंमत रु.180/- या प्रमाणे चार पिशव्यांची किंमत 720/- रुपये विप क्र.2 यांना देण्यात आली होती. तक चे म्हणण्याप्रमाणे त्यानंतर त्याने लागवड केली. मात्र लागवडीची तारीख दिलेली नाही. विप चे म्हणण्याप्रमाणे बियाणांची ऊशीरा लागवड केली तर उगवण्यावर परीणाम होऊ शकतो तसेच वेळेवर स्प्रे मारले नाही अगर वातावरणात बदल झाल्यास रोपावर दुष्परीणाम होऊ शकतो. दि.05/11/2012 चे अर्जाप्रमाणे लागण दि.02/08/2012 रोजी केली होती मात्र तयार पिकातून गडडे ऐवजी तुरे आलेले होते. जे फोटो हजर केलेले आहेत त्यामध्ये फुलांच्या गडडया ऐवजी तुरेच जास्त प्रमाणत दिसून येतात. एक गोष्ट स्पष्ट आहे की ही परीस्थिती लागण झाल्यानंतर सुमारे तीन महीन्यांनी दिसून आली होती.
3) विप चे म्हणणे आहे की रोपे तयार झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर लागवड करावी लागते. पिक तयार होण्याच्या अवस्थेत असतांना बोरॉन व कॅल्शीअम स्प्रे आवश्यक असतो. ज्या लॉटमधील बियाणे तक ला विकले त्याच लॉटमधील बियाणे इतर शेतक-यांना विकले होते त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. हणमंत जगदाळे याने चौधरी फट्रीलायझर वडवळ नागनाथ ता.चाकूर यांचेकडून लॉट क्र.730 मधील बियाणे दि.29/07/2012 रोजी घेतल्याची पावती हजर केली असून त्याच्या अॅफीडेव्हीटप्रमाणे त्याला चांगले उत्पादन मिळाले. सत्तार शेख याने पटेल कृषी सेवा केंद्रातून लॉट क्र.730 मधील बियाणे दि.17/07/2012 रोजी घेतले आहे त्यालाही चांगले उत्पन्न मिळाले असे म्हणणे आहे. सलीम उस्ताद यानेपण दि.20/07/2012 रोजी लॉट क्र.730 मधील बियाणे घेतले त्याचे अॅफीडेव्हीट मध्येही त्याला चांगले उत्पन्न मिळाले. वैजनाथ गोरे यानेपण लॉट क्र.730 मधील बियाणे दि.17/08/2012 रोजी घेतले त्याचे अॅफिडेव्हीटप्रमाणे त्याला चांगले उत्पादन मिळाले. जमीर पटेल यांनी लॉट क्र.730 मधील बियाणे दि.23/07/2012 व 26/07/2012 रोजी घेतले त्यांच्या अॅफिडेव्हीटप्रमाणे त्याला चांगले उत्पन्न मिळाले. केशव गोरे याने लॉट क्र.730 मधील बियाणे दि.11/08/2012 रोजी घेतले त्याचे अॅफिडेव्हीट प्रमाणे त्याला चांगले उत्पन्न मिळाले.
4) विप तर्फे साक्षिदारांचे अॅफिडेव्हीट व तसेच बियाणे खरेदीच्या पावत्या हजर केल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनीपण त्याच सुमारास त्याच लॉटमधील हेमप्रीया फुलकोबीचे बियाणे खरेदी केले व लागवण केली, योग्य ती काळजी घेतल्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळाले अशी प्रतिज्ञापत्रे त्यांनी दाखल केली आहेत. याउलट तक्रार कर्त्याप्रमाणे संपूर्ण काळजी घेऊन सुध्दा चांगले उत्पन्न मिळाले नाही असे म्हणणारे एकाही साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र तकतर्फे दाखल करण्यात आलेले नाही. हे खरे आहे की तालूका कृषी अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे 75 टक्के क्षेत्रावर फळधारणा झाली नाही. विप चे म्हणणे आहे की सदरचा पंचनामा तक ने परस्पर व संगनमत करुन करुन घेतलेला आहे. तक ने या मंचामध्ये सदर लॉट मधील बियाणांची प्रयोगशाळेत तपासणी व्हावी असा अर्ज देणे जरुर होते मात्र तसा अर्ज दिलेला नाही. त्यामुळे विप चे म्हणणे की तक ने पिकाची योग्य ती काळजी घेतली नाही या मध्ये तथ्य वाटते. विप चे म्हणण्याला साक्षीदांरानी प्रतिज्ञापत्राव्दारे पुष्टी दिली आहे. या उलट तक चे म्हणण्याला काहीही पुष्टी मिळाली नाही त्यामुळे विप ने भेसळयुक्त बियाणे विकून सेवेत त्रुटी केली असे आमचे मत नाही. त्यामुळे तक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही म्हणून मुद्दा क्र.2 व 3 यांचे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार रदद करण्यात येते.
2) खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क् देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.