निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 ही विमान सेवा पुरविणारी कंपनी असून सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चे एजंट आहेत. यापुढे सा.वाले क्र.1 व 2 यांना केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल. 2. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मुंबई-सिंगापूर-बल्लीपापन व परत अशी दोन तिकिटे विकत घेतली होती. त्याप्रमाणे तक्रारदार हे दिनांक 29 ऑगस्ट 2003 रोजी सहार विमानतळावर आले असताना त्यांना जाण्याचे व परतीचे दोन बोर्डीग पासेस देण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी मुंबई-सिंगापूर-बल्लीपापन असा प्रवास केला. व दिनांक 5.9.2003 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता बल्लीपापन विमान तळावर पोहोचले असताना त्यांना असे सांगण्यात आले की, मुंबई येथे जाणारे विमानात बसणेपूर्वी त्यांनी विमानतळावर संबंधीत कक्षामध्ये जावे. त्याप्रमाणे तक्रारदार संबंधीत कक्षात पोहोचले असता त्यांना असे सांगण्यात आले की, मुंबई येथे जाणा-या विमानात त्यांच्या बॅगा ठेवण्यात आल्या नसल्याने तक्रारदारांना एकतर विनाबॅग प्रवास करावा लागेल अथवा मुक्काम करावा लागेल व दुसरे दिवसीचे विमानाने मुंबई येथे पाठविण्यात येईल. तक्रारदारांनी दुसरा पर्याय स्विकारला व मुक्काम करण्याचे ठरविले. 3. दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 6.9.2003 रोजी तक्रारदार सा.वाले यांचे विमानाने मुंबई येथे परतले. मुंबई विमानतळावर तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, तक्रारदारांच्या बॅगा विमानाने अद्याप पाठविण्यात आल्या नाहीत व त्या बँगा नंतरच्या विमानाने पोहचत्या होतील. तक्रारदारांना बॅगामध्ये आवश्यक ते कपडे नसल्याने हॉटेलमध्ये थांबावे लागले. त्यानंतर तक्रारदारांना त्यांचे बॅगा आणणेकामी दिनांक 7.9.2003 रोजी विमानतळावर जावे लागले. व बॅगा हस्तगत कराव्या लागल्या. दरम्यान तक्रारदारांना सा.वाले यांच्या वर्तणुकीने बरीच गैरसोय झाली. व तक्रारदारांची कुचंबणा झाली. सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.4,587/- म्हणजे 100 डॉलरची किंमत धनादेशाने अदा केली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 10.10.2003 रोजी सा.वाले यांना नोटीस दिली व रु.1,50,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दि.21.2.2004 रोजी दाखल केली व सा.वाले यांचेकडून रु.1,50,000/-नुकसान भरपाईची मागणी केली. 4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यात असे कथन केले की, तक्रारदार हे दिनांक 5 सप्टेंबर, 2003 रोजी सिंगापूर विमानतळावर उशिराने आले व बोर्डींग गेटकडे गेले. वास्तविक तक्रारदारांनी चेकईन कक्षाकडे येणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार उशिराने आल्यामुळे विमानामध्ये तक्रारदारांच्या बॅगा पाठविणे शक्य झाले नाही. साहाजिकच तक्रारदारांना 5 सप्टेंबर रोजी थांबावे लागले. 5. सा.वाले यांनी असे कथन केले की, दि.6.9.2003 रोजी तक्रारदारांनी ज्या विमानाने प्रवास केला त्या विमानामध्ये बॅगा नजरचुकीने पाठविण्यात आल्या नव्हत्या व ही बाब नजरेस आल्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे दि.7.9.2003 रोजी बॅगा मुंबईला पाठविण्यात आल्या व तक्रारदारांनी दिनांक 8 सप्टेंबर, 2003 रोजी त्या प्राप्त करुन घेतल्या. सा.वाले यांनी त्या टॅक्सीच्या खर्चाबद्दल रु.500/- तक्रारदारांना अदा केले. तसेच झालेल्या चुकीबद्दल रु.100/- यु.एस. डॉलरची किंमत. रु.4,587/- तक्रारदारांना अदा केले. या प्रमाणे सा.वाले यांनी त्यांचे कर्मचा-यांकडून निष्काळजीपणा झाला किंवा तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास नकार दिला. 6. प्रस्तुतचे प्रकरणातील दिनांक 26.9.06 च्या रोजनाम्यावरुन असे दिसून येते की, तत्कालीन मंचाने अंतीम आदेश पारीत केला होता व प्रकरण निकाली काढण्यात आले. तथापी मुळचा न्यायनिर्णय प्रकरणात आढळून आला नाही. त्या बद्दलचा अहवाल मा.राज्य आयोगाकडे पाठविण्यात आला. चौकशी करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन मागण्यात आले व अंतीमतः प्रकरण फेर सुनावणीकामी घेण्यात आले. या पार्श्वभुमीवर प्रकरण निकाली होण्यास उशिर झाला आहे. 7. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व तक्रारीमधील कथनांचा पुर्नउच्चार केला. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीच्या निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे विमान प्रवासा दरम्यान तक्रारदारांच्या बॅगा मुंबई येथे उशिराने पाठविले व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | सा.वाले यांनी तक्रारीत मागीतल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु.1,50,000/- तक्रारदारांना अदा करावी असा आदेश करणे योग्य व न्याय राहील काय ? | नाही, अधिकचे रुपये4,587/-त्यावर दिनांक 6.9.2003 पासून 9टक्के व्याजसह. | 3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही तक्रारदारांची तक्रार दोन घटनांवर आधारीत आहे. त्यातील पहीली घटना दिनांक 05/09/2003 रोजी सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे विमानाने मुंबई येथे प्रवास करणेकामी असमर्थता व्यक्त केली. किंबहुना सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बॅगा विमानामध्ये न ठेवल्यामुळे सा.वाले यांनी तक्रारदारांना विना बॅग प्रवास करणे अथवा मुक्काम करणे हा पर्याय दिला. दुसरी घटणा म्हणजे दि.6.9.2003 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांचे विमानाने सिंगापूर ते मुंबई असा प्रवास केला असता सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बॅगा त्या विमानाने पाठविल्या नाहीत तर दुसरे दिवशी पाठविल्या. 9. पहिल्या घटनेच्या संदर्भात सा.वाले यांचे अधिकारी श्री.राजीव टंडन यांनी आपल्या कैफीयतीच्या शपथपत्राच्या परिच्छेद क्र.4 मध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदार हे दिनांक 5.9.2003 रोजी सिंगापूर विमानतळावर आल्यानंतर चेकइन कक्षात येण्या ऐवजी सरळ बोर्डीग कक्षाकडे गेले व त्यामुळे तक्रारदारांच्या बॅगा त्या विमानात ठेवण्यात आल्या नव्हत्या. तक्रारदार हे चेकइन कक्षाकडे उशिरा आल्यानंतर दरम्यान विमान सुटण्याची वेळ झाली होती. सबब तक्रारदारांच्या बॅगा त्या विमानात पाठविणे शक्य झाले नाही. व सा.वाले यांनी तक्रारदारांना वर नमुद केलेला प्रस्ताव दिला. 10. सा.वाले यांच्या कैफीयतीतील वरील कथन यास सा.वाले यांनी तक्रारदाराचे नोटीसीला जे उत्तर दिनांक 10 नोव्हेंबर, 2003 रोजी दिले होते. त्यातील कथनाने पुष्टी मिळते. सा.वाले यांनी आपल्या कैफीयत सोबत निशाणी अ वर त्या पत्राची सत्यप्रत हजर केली आहे. त्यामध्ये देखील सा.वाले यांनी त्यांचे कैफीयतीमध्ये जे कथन केले आहे. त्यात सुसंगत असलेले कथन त्या नोटीसीचे उत्तरामध्ये केलेले आहे. तक्रारदारांकडे सिंगापूर ऐअरपोर्टवर आवश्यक असलेला बोर्डींग पास हा पुर्वीपासूनच म्हणजे इंडोनेशीयाच्या प्रवासापासुनच असल्याने कदाचित तक्रारदारांनी चेकइन कक्षाकडे येण्याचे टाळले असावे व ते सरळच बोर्डींग कक्षाकडे गेले असावेत. तथापी दरम्यान तक्रारदारांच्या बॅगा नियोजित विमानामध्ये पाठविल्या गेल्या नाहीत व सा.वाले यांच्या अधिका-यांनी ही बाब तक्रारदारांना स्पष्ट केली. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, त्यांनी दिनांक 5.9.2003 ची रात्र ही विमानतळावर घालविली. तक्रारदारांना या प्रकारे गैरसोय व कुचंबणा झाली असेल. तथापी वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बॅगा विमानात न ठेवल्याने त्यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही. 11. तक्रारदारांचा तक्रारीतील दुसरा मुद्दा असा आहे की, दिनांक 6.9.2003 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांचे विमानाने सिंगापुर ते मुंबई असा प्रवास केला. तथापी तक्रारदारांच्या बॅगा सा.वाले यांनी त्या विमानाने पाठविल्या नाहीत. व ही बॅग सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदार यांना मुंबई विमानतळावर सांगीतली. या संदर्भात सा.वाले यांनी आपले कैफीयतीचे शपथपत्र कलम 5 यामध्ये असे मान्य केले आहे की, नजर चुकीने ( Inadvertently) तक्रादारांच्या बॅगा त्या विमानाने पाठविण्यात आल्या नाहीत. सा.वाले यांनी त्या बॅगा दिनांक 7.9.2003 रोजी मुंबई येथे पाठविल्या व तक्रारदारांनी दिनांक 8.9.2003 रोजी मुंबई विमानतळावरुन त्या बॅगा ताब्यात घेतल्या. सा.वाले यांनी या प्रकारे आपली चुक कबुल केलेली आहे. सा.वाले यांनी असेही कथन केले की, तक्रारदारांना टॅक्सीच्या प्रवास खर्चाबद्दल रु.500/- देण्यात आले होते. ही बाब तक्रारदारांनी नाकारली नाही. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तसेच लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी तक्रारदारांना झालेल्या गैरसोईबद्दल 100 यु.एस.डॉलर = रु.4,587/- धनादेशाने अदा केले. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना देवू केलेली नुकसान भरपाईची रक्कम योग्य होती काय व योग्य नसेल तर ती किती असावी हा वादाचा मुद्दा सिल्लक राहातो. 12. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी दि.6.9.2003 रोजी तक्रारदारांच्या बॅगा विमानाने पाठविल्या नसल्याने तक्रारदारांची गैरसोय,कुचंबणा व मानसिक त्रास झाला. तक्रारदारांना दि.6.9.2003 रोजी त्यांच्या दोन बॅगा परत न मिळाल्याने निश्चितच कुचंबणा व गैरसोय झाली असेल. तथापी सा.वाले यांचेकडून झालेली चुक जाणीवपूर्वक व गंभीर स्वरुपाचा निष्काळजीपणा या स्वरुपाची होती काय हा मुद्दा देखील या संदर्भात तपासावा लागेल. 13. या मुद्याचे संदर्भात कॅरेज बाय ऐअर अक्ट या मधील तरतुदीचा विचार करावा लागतो. त्या कायद्याव्दारे कायदे मंडळाने वॉरसा कन्व्हेन्शन 1929 व हेग प्रोटोकॉल 1955 यांना मान्यता दिली. व त्यातील तरतुदी कॅरेज बाय ऐअर अक्ट मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. कॅरेज बाय ऐअर अक्ट च्या अंतर्गत नियम बनविण्यात आले. व नियम 22 व 25 यांचे क्रमांक वॉरसा कन्व्हेन्शन 1929 व हेग प्रोटोकॉल 1955 यातील नियम क्रमांक सारखेच आहेत. नियम 22 प्रमाणे प्रवाशाचे बॅगा जर उशिराने पाठविल्या असतील किंवा गहाळ झाले असतील तर प्रवासी कंपनीची जबाबदारी 250 फ्रॅक्स इतपर्यत असे शकते. परंतु नियम 25 प्रमाणे जर विमान कंपनीने कर्मचा-यांनी जाणीवपूर्वक (Wilful) चुक केली असेल तर नुकसान भरपाई वर नमुद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू शकते. सबब विमान प्रवासी कंपनीचे कर्मचा-यांने केलेली चुक ही जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या स्वरुपाची असेल तर नुकसान भरपाईची मर्यादा लागत नाही. व त्या परिस्थितीत ग्राहक तक्रार निवारण मंचास योग्य ती नुकसान भरपाई मंजूर करता येते. 14. जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या शब्दाची व्याप्ती व अवाका मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅनेजर एअर इंडीया लि. विरुध्द इंडिया एव्हर ब्राईट शिपींग अन्ड ट्रेडींग कंपनी पहीले अपील क्रमांक 451/1994 निकाल दिनांक 20 एप्रिल, 2001 या प्रकरणात ठरविला आहे. व त्या प्रकरणामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या प्रकारची चुक कुठल्या परिस्थितीत असु शकते हे नमुद केलेले आहे. त्या संदर्भात मा.राष्ट्रीय आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या पुर्विच्या एका निर्णयाचा संदर्भ दिला. तसेच इंग्रजी शब्दकोषातील वरील दोन इंग्रजी शब्दांचे अर्थ नमुद केले. व चर्चेअंती असा निष्कर्ष नोंदविला की, जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या स्वरुपाची चुक विमानसेवा कर्मचा-यांनी केली आहे ही सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारांची असते. प्रस्तुतचे प्रकरणात त्या स्वरुपाचे कथन किंवा आरोप तक्रारदारांनी तक्रारीमध्ये केलेले नाहीत. सा.वाले यांचे कर्मचा-यांनी केलेली चुक ही जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या स्वरुपाची चुक असल्याबद्दल तक्रारदारांचे तक्रारीत कथन नाही. तसेच त्याबद्दल पुरावाही नाही. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये केवळ असे कथन केले आहे की, सा.वाले यांचे कर्मचा-यांचे निष्काळजीपणाने तक्रारदारांना मानसिक त्रास व कुचंबणा झाली. तक्रारीचे पृष्ट क्र.5 वर शेवटच्या दोन ओळीमध्ये तक्रारदारांनी असे म्हटले आहे की, "तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सा.वाले यांनी सेवेमध्ये मोठया प्रमाणावर दोष व त्रृटी दाखविल्या." या स्वरुपाचे तक्रारदारांचे कथन सा.वाले यांची जाणीव पूर्वक व गंभीर चुक (Wilful& Reckless) या स्वरुपाची चुक होती हे सिध्द करण्यास पुरेसे नाही. सबब तक्रारदारांचे प्रस्तुतचे प्रकरणात नियम 25 लागू होणार नाही तर नियम 22 लागू होईल. 15. नियम 22 प्रमाणे नुकसान भरपाईची मर्यादा प्रतिकिलो 20 यु.एस.डॉलर अशी आहे. या स्वरुपाचा अभिप्राय वर नमुद केलेल्या मा.राष्ट्रीय आयोगाचे निकालपत्रात नमुद आहे. त्या प्रकारचे अभिप्राय त्या निकालपत्राचे पृष्ट क्र.18 वर दिसून येतात. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करावयाची नुकसान भरपाई प्रति किलो 20 यु.एस.डॉलर अशी राहील. 16. प्रस्तुतचे प्रकरणात सा.वाले यांनी तक्रारदाराचे नोटीसीला जे उत्तर दिले होते. त्यामध्ये तक्रारदारांच्या दोन बॅगा होत्या ही बाब मान्य केलेली आहे. तथापी बॅगांचे वजन तक्रारीमध्ये किंवा नोटीसमध्ये नमुद नाही. सर्वसाधारण पणे विमान प्रवासात वापरल्या जाणा-या बॅगांचे वजन 5 किलो पर्यत असते. तक्रारदारांनी दोन बॅगा प्रवासा दरम्यान वापरल्या असल्याने त्या दोन्ही बॅगा फार मोठया असणे शक्य नाही. त्या बॅगा मध्यम आकाराच्या ट्रॉली असू शकतील. सर्वसामान्य अनुभव व तक्रारदारांनी एकटयांनी केलेला प्रवास या बाबी गृहीत धरुन दोन्ही बॅगांचे वजन प्रत्येकी 5 किलो म्हणजे एकूण 10 किलो असे गृहीत धरण्यात येते. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना 10 किलोX 20 यु.एस.डॉलर असे रु.200/-यु.एस.डॉलर अदा करणे आवश्यक होते. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना 100 डॉलर = 4,587/- असे अदा केले, तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांचे पत्र दिनांक 18.9.2003 ची प्रत तसेच धनादेशाची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी त्या पत्राला जे उत्तर दिले त्यामध्ये धनादेश परत केल्याबद्दल कुठेही कथन नाही. तक्रारीमध्ये देखील सा.वाले यांनी पाठविलेला रु.4,587/- चा धनादेश परत करण्यात आला असे कथन नाही. या उलट सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 10.9.2003 रोजी पाठविलेल्या पत्रात तक्रारदारांनी विना आक्षेप धनादेश स्विकारला असा उल्लेख आहे. त्याच प्रकारचे कथन सा.वाले यांचे कैफीयतमध्ये आहे. या प्रमाणे रु.4587X2= 9,174/- येवढी रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करणे आवश्यक होते. व त्यापैकी सा.वाले यांनी तक्रारदाराला रु.4,587/- पुर्विच अदा केल्याने शिल्लक रक्कम रु.4,587/- व्याजासह अदा करावी असे निर्देश देणे आवश्यक आहे. प्रस्तुतचे प्रकरणात ती योग्य ती नुकसान भरपाई राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. 17. तक्रारदारांनी किंवा सा.वाले यांनी प्रस्तुतचे प्रकरणात कॅरेज अक्ट किंवा नियम 22 व 25 याचा उल्लेख केलेला नसला तरीही त्या कायदेशीर बाबी असल्याने त्या तरतुदींची चर्चा व अनुषंगीक निवाडे याचा उल्लेख करणे किंवा चर्चा करणे आवश्यक आहे असे मंचाचे मत झाल्याने त्या बद्दलची चर्चा न्याय निर्णयात करण्यात आलेली आहे. 18. वरील निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 60/2004 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमान प्रवासा दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते. 3.. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल शिल्लक रक्कम रुपये 4,587/-त्यावर दिनांक 6.9.2003 पासून 9 टक्के व्याज न्याय निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यापासून आठ आठवडयाचे आत अरा करावी. 4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीचे खर्चाबद्दल रु.5000/- अदा करावेत. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |