जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :30/03/2010 आदेश पारित दिनांक :02/02/2011 तक्रार क्रमांक :- 224/2010 तक्रारकर्ता :– श्रीमती पुनम विजय शिवानी, वय अंदाजेः 36 वर्षे, व्यवसायः टयुशन, राह. फ्लॅट नं.101, अष्टविनायक अपार्टमेंट, डब्लू.सी.एल. रेस्कयु, कपीलनगर, जरीपटका, नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. सिंधी हिंदी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, (केयर ऑफ) सिंधी हिंदी हायस्कुल, पांचपावली, नागपूर तर्फे संस्थापक 2. सिंधी हिंदी एज्युकेशन सोसायटी, पांचपावली, नागपूर तर्फे संस्थापक तक्रारकर्त्याचे वकील :– अपर्णा जांभुळकर.. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. डि.एच. विधानी.(गैरअर्जदार क्र.2 तर्फे). गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 02/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 30.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्तीची तक्रार गैरअर्जदार संस्थेबद्दल अशी आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही पत संस्था गैरअर्जदार क्र.2 च्या कर्मचा-यांशी संबंधीत आहे. तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.2 ची माजी कर्मचारी होती, गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 कडे रक्कम जमा करण्यांस कर्मचा-यांना प्रवृत्त करीत होते. तक्रारकर्तीने दि.08.12.2008 रोजी बचत खाते उघडून त्यात रु.40,000/- जमा केले होते व त्या रकमेवर रु.1,600/- व्याज जमा झाले, तसेच तिचे दुसरे खाते मे-2009 मध्ये परिपक्व झाल्यामुळे त्यातील रु.45,000/- तिने गैरअर्जदाराकडे असलेल्या बचत खात्यात वळते केल्यानंतर तिच्या बचत खात्यातील शिल्लक रु.86,600/- एवढी दर्शवित आहे. तक्रारकर्तीने तिला व्यक्तिगत गरज पडली तेव्हा तिने गैरअर्जदार क्र.1 कडे रकमेची मागणी केली, मात्र तिला रक्कम देण्यांत आली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने त्या दरम्यान 1% अतिरिक्त व्याजाची घोषणा करुन खातेदारांना लालूच दाखवून प्रत्यक्षात रकमा जमा करण्यांस उद्युक्त केले. तक्रारकर्तीनी तिची रक्कम परत मिळाली नाही म्हणून तिने गैरअर्जदारांना नोटीस दिली, परंतु त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. म्हणून प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे रु.86,600/- एवढया जमा रकमेची मागणी दि.15.07.2009 पासुन 18% व्याजासह मिळावी, आर्थीक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.15000/- मिळावे अशी मंचासमक्ष मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यांत आली असता, गैरअर्जदार क्र.1 त्यांना नोटीस मिळाल्यानंतर मंचात हजर झाले मात्र उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने त्यांचे विरुध्दची तक्रार विना लेखी जबाब चालविण्याचा आदेश दि.20.10.2010 रोजी पारित केला. गैरअर्जदार क्र.2 ने मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला असुन त्यांनी सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. गैरअर्जदार क्र.2 ने असा उजर केला की, गैरअर्जदार क्र.1 ही स्वतंत्र संस्था आहे व गैरअर्जदार क्र.2 यांचे त्यावर नियंत्रण नसुन त्यांची कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे सदर तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत पासबुकची छायांकीत प्रत, गैरअर्जदारांना वकीला मार्फत पाठविलेली नोटीस व नोटीस मिळाल्याची पोच पावती जोडलेली आहे. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.20.01.2011 रोजी आली असता तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.2 यांचे तर्फे वकील हजर, गैरअर्जदार क्र.1 गैरहजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्तीचा व गैरअर्जदार क्र.2 यांचा युक्तिवाद ऐकला. सदर प्रकरणात तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पासबुकची प्रत, प्रतिज्ञालेख व इतर दस्तावेज यावरुन तक्रारकर्तीचे खात्यात रु.86,600/- एवढी रक्कम गैरअर्जदार क्र.1 कडे जमा आहेत, ही बाब सिध्द केलेली आहे. तिने गैरअर्जदारांना नोटीस दिली असता गैरअर्जदारांनी उत्तर दिले नाही व गैरअर्जदार क्र.1 ने उत्तर दिले नाही व रक्कमही दिली नाही, हीच त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचा सदर प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. 7. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीस तिची जमा रक्कम रु.86,600/- त्यावर गैरअर्जदारांना नोटीस मिळाल्याचे दि.06.10.2009 पासुन द.सा.द.शे. 9% व्याजासह रक्कम मिळे पावेतो अदा करावे. 3. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीला आर्थीक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदार क्र.2 यांचा सदर प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे त्यांना वगळण्यांत येते. 5. वरील आदेशाची पालन गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा देय रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी द.सा.द.शे. 12% दंडनीय व्याज देय राहील. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |