रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 52/2011
तक्रार दाखल दि. 07/07/2011
न्यायनिर्णय दि.- 30/01/2015
श्री. सुधिर शंकर घरत,
रा. गोठेघर, (कार्लेखिंड), पो. कामार्ले,
ता. अलिबाग, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
सिमरन मोटार प्रा. लि. पनवेल,
(ऑथोराईज्ड डिलर मारुती सुझुकी),
तर्फे श्री. गगनदीप सिंग चड्डा,
प्लॉट नं. 2-8, सेक्टर 15, मुंबई पुणे हायवे,
नवीन पनवेल (पश्चिम), 410206. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. मयेकर
सामनेवालेतर्फे अॅड. एस.बी. जोशी
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या वाहनाची दुरुस्ती उचित पध्दतीने न करुन देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी दि. 01/02/10 रोजी मारुती अँब्युलन्स हे वाहन विकत घेतले होते. सदर वाहनास एम.एच.- 06 / जे – 8605 असा नोंदणी क्रमांक मिळाला. सदर वाहनाचा दि. 15/05/10 रोजी कर्नाळा अभयारण्याजवळ अपघात झाला. सदर अपघातात वाहनाचे बरेचसे नुकसान झाल्याने दि. 18/05/10 रोजी सदर वाहन दुरुस्तीसाठी सामनेवालेकडे ठेवण्यात आले. त्यावेळी सामनेवाले यांनी 15 दिवसांत संपूर्ण दुरुस्ती होईल असे तक्रारदारांस सांगितले. त्यामुळे 15 दिवसांनंतर तक्रारदारांनी सामनेवालेकडे वाहनाच्या दुरुस्तीबाबत चौकशी केली असता, वाहनाच्या दुरुस्तीचे काहीही काम झालेले नव्हते. त्यामुळे सामनेवाले यांनी पुन्हा तक्रारदारांस 15 दिवसांनी या असे सांगितल्याने पुन्हा 15 दिवसांनंतर वाहनाच्या दुरुस्तीबाबत चौकशी केली असता, सामनेवाले यांनी गाडी घेऊन जा असे तक्रारदारांस सांगितल्याने तक्रारदारांनी गाडीची पहाणी केली असता, गाडीचे अनेक प्रकारचे दुरुस्तीचे काम अपूर्ण होते. त्यामुळे सामनेवाले यांना तक्रारदारांनी गाडीच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याची बाब सांगितली असता, तक्रारदाराने अलिबाग येथे त्याबाबत दुरुस्ती करावी असे सामनेवाले यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सदरील वाहन अलिबाग येथे आहे त्या स्थितीत आणले असता, अलिबाग येथे सदर वाहनाची दुरुस्ती केवळ पनवेल येथेच होऊ शकते असे तक्रारदारांस सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांस मानसिक धक्का बसला व वाहनाच्या वापराशिवाय रहावे लागेल या भीतीपोटी तक्रारदाराने सदर वाहन पुन्हा पनवेल येथे दुरुस्तीसाठी नेले असता, व काही दिवसांनंतर चौकशी केली असता, वाहनाची दुरुस्ती झालेली नव्हती व ती केव्हा होईल याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिले नाही व तक्रारदार वाहन घेऊन न गेल्यास पार्कींगचे अतिरिक्त शुल्क तक्रारदाराकडून वसूल करण्यात येईल असे सांगितले. शेवटी नाईलाजास्तव तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करण्या अगोदर नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तडजोडीची भाषा केली, परंतु प्रत्यक्षात नुकसानभरपाई अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन ते मंचासमक्ष हजर झाले परंतु त्यांना वारंवार मुदत देऊनही त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द दि. 21/02/12 रोजी कैफियतीशिवाय प्रकरण चालविण्यात यावे असे (No W.S.) आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व त्यांची वादकथने, यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदाराची वाहन दुरुस्ती विहीत मुदतीत
न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीसाठी पनवेल येथे नोंदणी करुन घेतल्यानंतर न्यायोचित दुरुस्ती विहित मुदतीत करुन वाहनाचा ताबा तक्रारदारास देणे आवश्यक होते. तक्रारदारांनी अनेकवेळा सामनेवाले यांचेकडे दुरुस्तीबाबत चौकशी करुनदेखील सामनेवाले यांनी संपूर्णपणे वाहन दुरुस्त न करता अर्धवट दुरुस्त करुन उर्वरित दुरुस्तीसाठी तक्रारदारास अन्य ठिकाणी पाठविले. तसेच अन्य ठिकाणी देखील वाहनाची दुरुस्ती झाली नसल्याने पुन्हा तक्रारदारास प्रथम ठिकाणी वाहन दुरुस्तीस न्यावे लागले. तरीदेखील सामनेवाले यांनी सदर वाहनाची न्यायोचित दुरुस्ती करुन वाहन वापरण्यायोग्य स्थितीत करुन तक्रारदारास न दिल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तक्रारदार यांचे वाहन विहीत कालावधीत सुस्थितीत वापरण्यायोग्य करुन न देऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांस वाहन दुरुस्तीबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीसाठी आले असता, तात्काळ दुरुस्ती करुन वाहन वापरण्यायोग्य करुन देण्यासाठी कोणतीही निश्चित उपाययोजना न करुन देऊन तक्रारदारास वाहनाच्या वापराशिवाय रहावे लागले ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तक्रारदाराचे वाहन हे रुग्णवाहिका या प्रकारात असून सामनेवाले यांनी सदर वाहन अनेक दिवस नादुरूस्त अवस्थेत ठेवून सदर वाहनाचा वापरापासून अनेक रुग्णांना व तक्रारदारांस त्यातून मिळणा-या उत्पन्नापासून प्रतिबंधित करुन तक्रारादाराचे आर्थिक नुकसान केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 52/2011 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहन नादुरुस्त अवस्थेत ठेवून सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आर्थिक नुकसान, मानसिक त्रासाच्या नुकसानभरपाई पोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 1,50,000/- (रु. एक लाख पन्नास हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत परत करावे.
4. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 30/01/2015
(उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.