Exh.No.24
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 10/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि.18/05/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.10/01/2014
सहयाद्री इमू फार्म
करीता प्रोप्रा.श्री प्रकाश शशिकांत सावंत
वय सु.51, धंदा- शेती,
रा.आंबडोस, ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
सिमरन इमू फार्म, निवळी,
ता.चिपळूण करीता श्री शेखर विचारे
वय सू.45, धंदा- व्यापार,
ता.चिपळूण, जि. रत्नागिरी
कार्यालय/सध्या रा.403- C/7,
साकेत कॉम्प्लेक्स, किसान कोळी मार्ग,
ठाणे(प), मुंबई- 400 601 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारतर्फेः- विधिज्ञ श्री अमोल सुरेश सामंत
विरुद्ध पक्षातर्फे- एकतर्फा
निकालपत्र
(दि.10/01/2014 )
श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या/- 1) तक्रारदार यांच्या ताब्यातील इमू पक्षी परत घेऊन तक्रारदारास झालेला खर्च, मोबदला व नुकसान इत्यादी विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळण्याकरीता तक्रार अर्ज दाखल करणे आला आहे.
2) तक्रारदार हे सिंधुदुर्ग जिल्हयातील गाव मौजे आंबडोस, ता.मालवण येथे राहत असून तेथेच सहयाद्री इमू फार्म नावाने इमू पालनाचा व्यवसाय करत असून सदर व्यवसाय ते स्वतःचे व कुटूंबाचे चरितार्थ चालवणेसाठी करतात. विरुध्द पक्ष यांचा निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे सिमरन इमू फार्म या नावाने इमू फार्म आहे व ते त्याचे मालक आहेत. त्याचे सिमरन इमू फार्ममध्ये विरुध्द पक्ष हे इमू पक्षांचे पालन, विक्री तसेच विक्री नंतर खरेदीदारास आवश्यक सेवा-सुविधा पुरवणे व तयार झालेले पक्षी व अंडी यांची सदर खरेदीदारांकडून खरेदी करणेचा व्यवसाय करतात.
3) विरुध्द पक्ष यांनी त्यांचे सिमरन इमू फार्म मधील इमू पक्षांची पिल्ले Buy Back Agreement या तत्वावर तक्रारदार यांना विकत देण्याचा प्रस्ताव दिला होता व त्याप्रमाणे दि.07/03/2011 रोजी Buy Back Agreement झाले. त्यामध्ये 1 ते 16 बाबींसंबंधाने करार झाला होता. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून इमू पक्षांच्या 50 जोडया (प्रत्येकी 1 नर व 1 मादी) खरेदी केल्या. त्यापैकी 10 जोडया मोठया असून त्या सन 2011-12 च्या अंडयाच्या हंगामात (ऑक्टोबर 2011 ते मार्च 2012) अंडी देतील असे विरुध्द पक्षाने सांगितले होते. परंतु सदर पक्षांनी त्या हंगामात अंडी दिली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे बरेच आर्थिक नुकसान झाले, असे तक्रारदाराचे कथन आहे.
4) तसेच विरुध्द पक्ष व तक्रारदार यांचेत झालेल्या कराराप्रमाणे विरुध्द पक्ष तक्रारदाराच्या इमू फार्म मधील अंडी खरेदी करणार होते, परंतु तसेही त्यांनी केले नाही. मात्र तयार झालेली अंडी श्री सुभाष घाग, सोनगाव/ श्री प्रकाश दळवी, चिपळूण यांचे इमू फार्मवर पोहोच करण्यास विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस सांगितले. त्याप्रमाणे दि.20/11/2012 ते 18/01/2013 या कालावधीत तक्रारदाराने सदर ठिकाणी एकूण 82 अंडी पोच केली पण त्यांचा मोबदला अद्याप विरुध्द पक्षाकडून तक्रारदारास पोच झाला नाही. सद्या तक्रारदार यांच्या इमू फार्ममधील पक्षी अंडी घालत आहेत मात्र आता विरुध्द पक्ष यांनी सांगितलेल्या वर नमूद ठिकाणाहून अंडयांची मागणी बंद झाली असल्याने ती अंडी तशीच पडून राहिली आहेत. तक्रारदाराने विरुध्द पक्षास लेखी व तोंडी कळवूनही तक्रारदारास विरुध्द पक्षाकडून काहीच तोंडी वा लेखी प्रतिसाद मिळत नसल्याने तक्रादाराचे व्यवसायातील उत्पन्न अडकून पडल्याने तक्रारदार आर्थिक संकटात सापडला आहे, असे तक्रारदाराचे कथन आहे.
5) तक्रारदाराने सदरचा इमू पालनाचा व्यवसाय त्याच्या व कुटूंबाच्या चरितार्थासाठी चालू केला होता व आहे. त्यासाठी त्यांने त्यांची आजवरची आयुष्यभराची कमाईतली रक्कम खर्च केली आणि तसेच त्याचे नावे असलेली गाव मौजे आंबडोस येथील जमीन मिळकत गहाण ठेऊन भारतीय स्टेट बँक, शाखा मालवण यांचेकडून कर्ज घेतलेले असून त्यानुसार रु.16,28,700/- (रुपये सोळा लाख अठ्ठावीस हजार सातशे मात्र) एवढया रक्कमेचा कर्जबोजा झाला असे तक्रारदाराचे कथन आहे.
6) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून इमू पक्षी खरेदी केल्यानंतर विरुध्द पक्ष हे तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत झालेल्या कराराप्रमाणे वागलेले नाहीत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस ठरल्याप्रमाणे सेवासुविधा दिली नाही. ग्राहकांस सेवा देण्याची जबाबदारी विरुध्द पक्षाने पुर्णपणे झटकलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल केली असून पुढीलप्रमाणे मागण्या तक्रार अर्जात केल्या आहेत.
7) i) तक्रारदार यांनी दिलेल्या खर्चाचे तपशीलानुसार खर्च रु.11,15,000/- आणि दि.01/05/2012 पासून तक्रार दाखल तारखेपर्यंत 372 दिवसांचा प्रतिदिन खर्च रु.1500/- प्रमाणे रु.5,58,000/- मिळून आर्थिक नुकसानी रु.16,73,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.80,000/-, नोटीस फी व तक्रारीचा खर्च रु.20,000/-, एकूण 82 अंडयाची प्रतीनग रु.2500/- प्रमाणे येणे रक्कम रु.2,05,000/- मिळून एकूण रक्कम रु.19,96,000/- (रुपये एकोनवीस लाख शहाण्णव हजार मात्र) व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून सदर रक्कम पूर्णतः वसूल होऊन मिळेपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 15% दराने व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
ii) तसेच तक्रारदाराचे वर नमूद व्यवसायाच्या ठिकाणी असलेले सर्व इमू पक्षी घेऊन जाणेबाबत विरुध्द पक्ष यांना आदेश देण्यात यावा अशी विनंती केली आहे.
8) तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांस नोटीस पाठवणेत आली. विरुध्द पक्ष यांना पाठविलेला नोटीसचा लखोटा ‘Not claimed’ असा पोष्टाचा शेरा मारुन परत आला तो नि.क्र.8 वर आहे. त्यासंबंधाने तक्रारदाराने केलेले शपथपत्र नि.क्र.9 वर आहे. तक्रारदार यांस नोटीस पाठवून ती न स्वीकारता परत आल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीबाबतचे आदेश दि.22/07/2013 रोजी पारीत करणेत आले.
9) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.5 या कागदाचे यादीसोबत 1 ते 55 कागद हजर केले आहेत. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस दिलेले इमू पक्षासंबंधाने कोटेशन, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस दिलेले ऍश्युरंस लेटर, भारतीय स्टेट बँक, शाखा मालवण यांनी दिलेले ऍरेजमेंट लेटर व ऍनेक्श्चर II, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत झालेले बाय बॅक ऍग्रीमेंट, तक्रारदार यांने विरुध्द पक्षास पाठविलेले पत्र, नोटीस, त्यासंबंधाने इतर कागद, इमू वाहतूक संबंधाने बिल, इमूसाठी लागणारे खाद्य व औषध यांची बिले, इमूची अंडी स्वीकारल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच नि.क्र.13 वर श्री सुभाष घाग यांचेकडे 66 अंडी पोच केल्यासंबंधाने शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांचेतर्फे साक्षीदार विनायक अशोक सापळे यांचे शपथपत्र नि.क्र.20 वर दाखल केले आहे. तक्रारदारतर्फे वकीलांनी केलेला तोंडी युक्तीवाद ऐकला.
10) सदर प्रकरणामध्ये मा.सदस्या श्रीमती उल्का अंकुश पावसकर यांनी तक्रारीचे कामातील त्यांचा सहभाग वगळणेत यावा अशी पुरसीस दि.08/01/2014 रोजी दाखल केल्याने सदर प्रकरणातील निकालपत्र मा. अध्यक्ष व एक सदस्य यांनी देण्याचे ठरविले.
11) तक्रारदार यांची तक्रार अर्जातील कथने, त्यांची मागणी, तक्रारदारने दाखल केलेली पुराव्याची सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद यांचे वाचन व अवलोकन करता; तसेच तक्रारदारतर्फे वकीलांनी केलेला तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत काय ? आणि सिंधुदुर्ग ग्राहक मंचाला सदर प्रकरण चालविणेचे अधिकार आहेत काय ? | होय |
2 | तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेमध्ये विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
12) मुद्दा क्रमांक 1- i) तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांचेमध्ये दि.07/03/2011 रोजी Buy Back Agreement झालेले असून तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचे सिमरन इमु फार्म मधून इमू पक्षांच्या 50 जोडया (प्रत्येकी 1 नर व 1 मादी) खरेदी केल्या असून सदर इमू पक्षांची किंमत रक्कम रु.9,00,000/- (रुपये नऊ लाख मात्र) विरुध्द पक्षास पोहोच आहेत. त्यासंबंधीची पावती तक्रारदाराने नि.22/1 वर दाखल केली आहे. सदर इमू पालनाचा व्यवसाय त्याच्या स्वतःच्या व त्याच्या कुटूंबाच्या चरितार्थासाठी चालू केला होता. त्यासाठी त्याने भारतीय स्टेट बँक, शाखा मालवण यांचेकडून कर्ज घेतले होते. सदर व्यवसाय तक्रारदारने स्वयंरोजगारासाठी केला असल्याने व त्यासाठी त्याने विरुध्द पक्ष यांची सेवा कराराद्वारे घेतली असत्याने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा क.2(1)(डी) प्रमाणे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडतात.
ii) तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांचेत दि.07/03/2011 रोजी झालेल्या कराराचे ठिकाण व विरुध्द पक्ष राहत असलेले ठिकाण जरी दुस-या जिल्हयात असले तरी तक्रारदाराचा इमू पालनाचा व्यवसाय हा सिंधुदुर्ग जिल्हयातील गाव मौजे आंबडोस येथे असल्यामुळे आणि विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे सेवा पुरविली नाही. त्यामुळे वादास कारण येथेच घडले असल्याने सिंधुदुर्ग मंचास सदर तक्रार प्रकरण चालविण्याचे अधिकार क्षेत्र आहे.
13) मुद्दा क्रमांक 2 – i) तक्रार प्रकरणातील तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी दि.23/06/2010 रोजी 3 महिने वाढ झालेली इमू पक्षी त्यांच्या 50 जोडया त्यांची किंमत रु.9,00,000/- चे कोटेशन दिले. त्यानंतर ऑगस्ट 2010 मध्ये इमू पालन व्यवसायाकरीता तक्रारदाराने भारतीय स्टेट बँक, शाखा मालवणचे कर्ज प्रकरण केले. बँकेने त्यांचे ऍरेंजमेंट लेटर दि.06/11/2010 रोजी तक्रारदारास पाठवले. त्यामध्ये भारतीय स्टेट बँकेने रु.7,23,900/- (रुपये सात लाख तेवीस हजार नऊशे) इतक्या मर्यादीत रक्कमेला मंजूरी कळविली. त्यामध्ये रु.9,04,875/- (नऊ लाख चार हजार आठशे पंचाहत्तर मात्र) इतकी अधिक रक्कम नाबार्ड संस्थेकडून वितरीत होणारी होती. कर्ज मंजूर झाल्यानंतर तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस तसे कळविले की, जर तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून इमू पक्षी खरेदी केले तर त्यांनी विकलेल्या पक्षांपासून मिळणारी अंडी रुलींग मार्केट रेटप्रमाणे विरुध्द पक्ष खरेदी घेतील. ते पत्र नि.क्र.5/2 वर आहे.
ii) त्यानंतर दि.07/03/2011 रोजी तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेत Buy Back Agreement झाले ते नि.क्र.5/4 वर आहे. त्यामध्ये 1 ते 16 बाबींचा समावेश केला आहे. त्यातील बाबींचा विचार करता क्र.1 मध्ये इमू पक्षांची अंडी घालणेच्या पहिल्या वर्षातील अंडी विरुध्द पक्ष खरेदी करतील व त्यापुढील व्यवहार आपासातील समजुतीनुसार होईल असे नमूद आहे. तसेच क्र.2 मध्ये प्रती अंडयाची किंमत ही बाजारातील स्थितीनुसार निश्चित करणेत येईल असे नमूद आहे. त्यापुढील बाबी हया अंडयांच्या स्थितीसंबंधाने आणि त्यांची निगा यासंबंधाने आहेत. सदर करारातील अट क्र. 13 प्रमाणे अंडयाच्या पहिल्या हंगामातील अंडी पार्टी क्र.2 (म्हणजेच आताचे तक्रारदार) यांना पार्टी क्र.1 (म्हणजेच आताचे विरुध्द पक्ष) शिवाय इतर कोणास विकता येणार नाहीत असे नमूद आहे. तसेच अट क्र.15 मध्ये अंडयाची अफरातफर झाल्यास अशा परिस्थितीत उपलब्ध इमू पक्षांची पुनर्विक्री करण्याचा हक्क देखील विरुध्द पक्ष यांनीच राखून ठेवीला आहे, असे नमूद आहे..
iii) अशा परिस्थितीत देखील तक्रारदार यांनी स्वयंरोजगाराकरिता विरुध्द पक्ष यांचेकडून इमू पक्षांच्या 50 जोडया विरुध्द पक्षाकडून खरेदी केल्या त्याची पोहोच नि.क्र.22/1 वर आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी आश्वासन दिले होते की 50 जोडयापैकी 10 जोडया मोठया असून त्या ऑक्टोबर 2011 ते मार्च 2012 या अंडयाच्या हंगामात अंडी देतील; परंतू त्या हंगामात त्यांनी अंडी दिली नाहीत, त्यामुळे त्या हंगामात त्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि ही बाब तक्रारदार वेळोवेळी फोनद्वारे विरुध्द पक्षास कळविली होती, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या वर नमूद फार्म मधील अंडी खरेदी करणार असल्याचे कबूल केले होते. परंतू विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारच्या इमू फार्मकडून अंडी खरेदी केलेली नाही तसेच करीतही नाहीत. तयार झालेली अंडी श्री सुभाष घाग, सोनगाव/ श्री प्रकाश दळवी, चिपळूण यांचे इमू फार्मवर पोहोच करणेस सांगितले त्याप्रमाणे तक्रारदाराने अंडी पोहोच केली परंतू त्याचा मोबदला तक्रारदार यांस विरुध्द पक्षाकडून मिळालेला नाही. सद्यस्थितीत विरुध्द पक्ष यांनी सांगितलेल्या नमूद ठिकाणाहून अंडयाची मागणी बंद झाली असल्याने अंडी तशीच पडून राहिल्याने तक्रारदाराने विरुध्द पक्षास वेळोवेळी कळविले व दि.11/02/2013 रोजी नोटीस पाठविली; तिची स्थळप्रत नि.क्र.5/7 वर आहे आणि नोटीस पोहोचल्याची पोष्टाची पावती नि.क्र.5/8 वर आहे. त्यास विरुध्द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही अथवा कराराप्रमाणे सुविधा दिली नाही; त्यामुळे तक्रारदाराला कराराप्रमाणे सेवा देण्यास विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली असल्याचे तक्रारदारचे म्हणणे आहे. विरुध्द पक्ष यांनी मंचाने तक्रार प्रकरणासंबंधाने पाठविलेली नोटीस देखील स्वीकारली नाही किंवा त्यांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारदाराचे तक्रारी संबंधाने कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा मंचासमोर सादर केला नाही. विरुध्द पक्षाचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व त्यासंबंधाने दाखल केलेला पुरावा व युक्तीवादातील मुद्दे विचारात घेता विरुध्द पक्षाने तक्रारदाराला सेवा देण्यात त्रुटी ठेवली असल्याचे स्पष्ट होत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
14) मुद्दा क्रमांक 3 – i) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या आश्वासनानुसार व करारपत्रातील बाबींना विचारात घेऊन विरुध्द पक्ष यांचेकडून इम पक्षांची खरेदी करुन स्वयंरोजगारासाठी इमू पालनाचा व्ययवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी बँकांकडून तसेच नाबार्डकडून कर्ज घेतलेले होते. इमू पालनाचा व्यवसाय म्हणजे सर्वसाधारणपणे जसा कोबडी पालनाचा व्यवसाय करतात तसे नाही. त्यासाठी मोठया प्रमाणात जागा, इमू पक्षांची निगा, त्यासाठी औषधोपचार, त्यांना रोज लागणारे अन्न, विमा इ. विविध प्रकारे खर्च करावा लागत असतो. विरुध्द पक्ष श्री शेखर विचारे (सिईओ सिमरन इमु फार्म) यांना 2009 मध्ये ‘उद्योग भारती अवार्ड’ देऊन इंडियन ऍचिव्हर्स फोरम, नवी दिल्ली यांचेकडून सन्मानित करणेत आले होते व इमू पक्षांच्या विविध भागांपासून विविध वस्तुंची निर्मिती करणेत येते अशा आशयाचे व्यावसायीक माहितीपत्रक विरुध्द पक्षाने नेट वर प्रसारीत केले आहे. ते माहितीपत्रक नि.क्र.12/2 वर आहे. तक्रारदाराचे तोंडी युक्तीवादाचे दरम्यान हेच म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष यांचे माहितीपत्रक, त्यांनी दिलेले ऍश्युरंस, दि.07/03/2011 चा करार व विरुध्द पक्ष यांनी वेळोवेळी दिलेली तोंडी आश्वासने यावर विसंबून त्यांनी इमू पालनाचा व्यवसाय सुरु केला.
ii) तक्रारदार यांनी विरुध्द पक्षासोबत झालेल्या कराराप्रमाणे इमु पालन व्यवसाय सुरु केल्यानंतर तक्रारदारकडून इमू पक्षांनी घातलेली अंडी खरेदी करणे कराराप्रमाणे आवश्यक होते; परंतु तसे त्यांनी केले नाही. विरुध्द पक्ष यांचे सुचनेनुसार तक्रारदार यांनी श्री सुभाष घाग, सोनगाव यांचेकडे 66 अंडी दिलेली आहेत. परंतु त्यांचीही त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे प्रती अंडे रु.2500/- याप्रमाणे मोबदला विरुध्द पक्षाने तक्रारदारास दिलेला नाही. तक्रारदार यांनी सुभाष घाग यांचेकडे 66 अंडी सुपूर्द केल्याची पोहोच नि.क्र.12/1 अ ते 12/1 क वर दाखल केली असून त्यासंबंधाने शपथपत्र नि.क्र.13 वर दाखल केले आहे. तसेच सन 2010-2011 व 2011-2012 या कालावधीत इमू पक्षी प्रती अंडयाची बाजारभावाप्रमाणे किंमत रु.2500/- (रुपये दोन हजार पाचशे मात्र) होती अशा आशयाचे शपथपत्र तक्रारदारतर्फे साक्षीदार विनायक अशोक सापळे यांनी सादर केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेकडून 66 अंडयाची प्रती अंडे रु.2500/- प्रमाणे रक्कम रु.1,65,000/- (रुपये एक लाख पासष्ट हजार मात्र) मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष आणि त्यांच्यात झालेल्या समजुतीवरुन, आश्वासनाप्रमाणे व कराराप्रमाणे व्यवसायात उतरले असल्याने व इमू पालनाच्या व्यवसायामध्ये अंडी हेच उत्पन्नाचे साधन असल्याने व विरुध्द पक्ष हे कोणतेही कारण न दाखविता बेजबाबदारपणे वागून अंडी स्वीकारत नसल्याने तक्रारदार यांस झालेल्या नुकसानीस जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
iii) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केल्याचे स्पष्ट झालेलेच आहे. त्यामुळे तक्रारदार हे अतिशय आर्थिक नुकसानीत आलेले आहेत. इमु पक्षांच्या अंडयाची विक्री होत नसल्याने सद्या पक्षी अंडी घालत असतानाही ती तशीच पडून आहेत; अंडी नाशवंत असल्याने काही कालावधीने ती खराब होत आहेत. इमू पक्षी पालन करीत असतांना त्यांचे अन्न, औषध, विमा बँकेचे सुरु होणारे हप्ते हा खर्चही विनाकारण करावा लागत आहे. विरुध्द पक्ष यांने माहितीपत्रकामध्य नि.क्र.12/2 मध्ये इमू पक्षांचा विविध उपयोग कसा केला जातो याची माहिती दिली आहे. विरुध्द पक्ष यांचा सिमरन इमू फार्म हा मोठा व्यवसाय असल्याने व त्यांना त्यासंबंधाने अवार्डही देण्यात आले आहे. विरुध्द पक्षाने नि.5/4 प्रमाणे केलेल्या Buy Back Agreement मध्ये देखील अट क्र.15 मध्ये इमु पक्षांचे पुनर्विक्रीचा हक्कही स्वतःकडे राखून ठेवला असल्याने सदर इमू पक्षी विरुध्द पक्षाचे ताब्यात देणे व विरुध्द पक्षाने जितके इमू पक्षी तक्रारदाराचे ताब्यामध्ये असतील त्यांची प्रती जोडी किंमत रु.18,000/- या दराने सर्व पक्षी ताब्यात घेणे व ती रक्कम तक्रारदारास प्रत्यक्ष इमू पक्षी ताब्यात घेतांना वितरीत करणे असे मंचाचे मत आहे.
iv) तक्रारदाराने नि.01/05/2012 पासून तक्रार दाखल करेपर्यंत प्रतीदिन खर्च रु.1500/- मिळावा अशी मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांना दि.07/12/2012 पर्यंतच्या अंडयाची रक्कम या आदेशान्वये मिळत असल्यामुळे दि.01/05/2012 ते 07/12/2012 पर्यंतचा प्रतीदिन खर्च मिळणार नाही. परंतू त्यानंतर विरुध्द पक्षाने अंडी स्वीकारली नसल्याने दि.08/12/2012 पासून विरुध्द पक्ष प्रत्यक्षात इमू पक्षी तक्रारदाराकडून या आदेशान्वये स्वीकारुन त्या पक्षांची किंमत तक्रारदारास अदा करेपर्यंत प्रतिदिन रु.1500/- प्रमाणे रक्कम मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
v) तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली असल्याने तक्रारदारने सुरु केलेला इमू पालनाचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याने तक्रारदारास अतिशय मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे तसेच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्तन न केल्यामुळे तक्रारदार यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती बिघडली असल्याचे तक्रारदार मंचापुढे तोंडी व लेखी शपथपत्राद्वारे कथन करत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदारास त्याच्या नोटीसलाही उत्तर दिले नाही. तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल केली, त्यालाही विरुध्द हजर राहिले नाहीत अथवा तक्रारदाराचे मुद्दे अमान्य केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार विरुध्द पक्ष यांस मान्य आहे ही बाब मंचासमोर स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेकडून सेवात्रुटीमुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.80,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
15) मुद्दा क्रमांक 4 - तक्रारदार यांच्या उपरोक्त मागण्या मान्य केल्यामुळे त्यांच्या अन्य मागण्या मान्य करणे संयुक्तीक होणारे नाही असे मंचाचे मत आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
1) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणेत येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांजकडून स्वीकारलेली 66 अंडी त्यांची प्रति अंडे किंमत रु.2500/- प्रमाणे रक्कम रु.1,65,000/- (रुपये एक लाख पासष्ट हजार मात्र) तक्रारदारास दयावेत.
3) तक्रारदार यांच्या सहयाद्री इमू फार्म मधील इमू पक्षांचा प्रत्यक्ष ताबा घेताना उपलब्ध असलेले इमू पक्षी विरुध्द पक्ष यांनी ताब्यात घेऊन त्याची प्रतीजोडी रक्कम रु.18,000/- या प्रमाणात सर्व रक्कम तक्रारदारास त्याचवेळी अदा करावी.
4) विरुध्द पक्ष यांनी दि.08/12/2012 पासून तक्रारदार यांचे ताब्यातील इमू पक्षी प्रत्यक्ष ताब्यात घेईपर्यंत प्रतिदिन रु.1500/- याप्रमाणे रक्कम तक्रारदारास अदा करावी.
5) ग्राहकाला दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रादारास झालेल्या त्रासापोटी रक्कम रु.80,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास अदा करावे.
6) वरील आदेशाची पूर्तता विरुध्द पक्ष यांनी आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत करावयाची आहे; तसे न केल्यास तक्रारदार उपरोक्त आदेश क्र.2 ते 5 मधील सर्व रक्कमा आदेशाची दिनांकापासून सदर रक्कमांची पूर्ण फेड होईपर्यंत द.सा.द.शे.15% व्याजासह विरुध्द पक्षाकडून मिळवण्यास पात्र राहतील.
7) तक्रारदाराच्या अन्य मागण्या फेटाळण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 10/01/2014
Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.