द्वारा- मा. श्री. श्रीकांत एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 19/जुलै/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत जाबदेणार यांचे विरुध्द सेवेतील त्रुटीसाठी दाखल केली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या वर्धमान टाऊनशिप डी 3/602 बी विंग, ससाणे नगर, हडपसर, पुणे 411 028 या 775 चौ. फुट सदनिकेमध्ये त्यांनी जुन्या टाईल्स काढून नवीन टाईल्स बसविण्याचा निर्णय घेतला. प्रस्तुत तक्रारीतील जाबदेणार क्र 1 टाईल्स फरशा उत्पादन कराणारी कपंनी असून जाबदेणार क्र 2 हे जाबदेणार क्र 1 यांच्या उत्पादित मालाचा डिस्ट्रीब्युटर आहे. जाबदेणार क्र 3 हे वरील उत्पादित मालाचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदारांनी जाबदेणार क्र 3 यांनी सुचविलेल्या, जाबदेणार क्र 1 उत्पादित – सिंपोलो फरशा ज्यांचे जाबदेणार क्र 2 डिस्ट्रीब्युटर आहेत त्या बसविण्याचे ठरविले. सदर फरशा चांगल्या प्रतीच्या व दीर्घकाळ चालणा-या आहेत असेही जाबदेणार क्र 3 यांनी आश्वासन दिले. जाबदेणार क्र 3 यांच्या आश्वासनानुसार व जाबदेणार यांच्या आकर्षक जाहिराती नुसार तक्रारदारांनी दिनांक 27/4/2010 रोजी सिंपोलो फरशांची 42 बॉक्सची ऑर्डर जाबदेणार क्र 3 यांचेकडे दिली. दिनांक 28/4/2010 रोजी जाबदेणार क्र 3 यांनी पहिल्यांदा 35 बॉक्स चा पुरवठा केला व तक्रारदार यांनी त्याच दिवशी सदरील बॉक्स उघडून पाहिले असता त्यांना धक्का बसला कारण त्यांना पुरवठा झालेल्या टाईल्स या वेडयावाकडया, निकृष्ट दर्जाच्या, बेंड असलेल्या आढळून आल्या. तक्रारदार यांनी लगेचच सदरील वस्तुस्थिती जाबदेणार क्र 3 यांच्या मार्बल सेंटर गोडाऊन इनचार्ज श्री. भरत यांना दिली. त्यांनी ती कबूल करुन मुळ बिलातून रुपये 1000/- वजा करतो असे सांगितले. परंतू टाईल्स बदलून देण्यास व पैसे परत देण्यास नकार दिला. नाईलाजाने तक्रारदार यांनी आहे त्या स्थितीत टाईल्स बसवून घेतल्या. त्यानंतर 4 मे 2010 रोजी जाबदेणार क्र 3 यांनी उरलेले 7 टाईल्सचे बॉक्स आणून दिले. सदरील बॉक्स तक्रारदार यांनी उघडून पाहिले असता त्या पुन्हा निकृष्ट दर्जाच्या, बेंड असलेल्या, वेडया वाकडया असल्याचे दिसून आले. त्यामुळे लगेच तक्रारदार यांनी सदर 7 टाईल्स बॉक्स बदलून चांगल्या दर्जाच्य देण्यास जाबदेणार यांना कळविले. त्यानंतर जाबदेणार यांचे ऑफिसमधील कामगार आले व त्यांनी पडताळणी करुन टाईल्स बदलून देण्याचे आश्वासन देऊन तक्रारदार यांचेकडून जाबदेणार यांनी संपूर्ण बील भरणा करुन घेतला व यातील तक्रारदार लवकरच जाबदेणार हे त्यांनी पुरवठा केलेल्या टाईल्स बदलून देण्याची वाट पाहत राहिले. त्यामुळे संयम संपल्यावर तक्रारदारांनी जाबदेणार यांचेकडे वारंवार खराब माल बदलून देण्याबाबत किंवा सदोष मालाची किंमत परत करण्याबाबत फोनवर, फॅक्सद्वारे, पत्राने सर्व जाबदेणार यांचेकडे मागणी करीत राहिले. परंतू तक्रारदार यांच्या मागणीचा कोणताही विचार जाबदेणार यांनी केला नाही व खराब सदोष माल बदलून दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने तक्रारदार यांना खराब निकृष्ट टाईल्स आहे त्या स्थितीत बसवून घ्याव्या लागल्या व त्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना खराब, निकृष्ट दर्जाच्या टाईल्सचा त्या चांगल्या व दर्जात्मक आहेत असे भासवून पुरवठा केला व त्याबाबत जाबदेणार यांना कळवूनही त्यांनी त्या खराब असल्याचे मान्य करुनही त्या बदलून दिल्या नाहीत किंवा त्याबाबत कोणताही प्रतिसाद तक्रारदार यांना दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याविरुध्द अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणे व विक्री पश्चात निर्माण झालेल्या दोषांचे परिमार्जन न करुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली व तक्रारदार यांचे आर्थिक, मानसिक, शारिरीक त्रास व नुकसानीस कारणीभूत ठरल्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांचे विरुध्द या मंचात दाद मागितली आहे. तसेच तक्रारदारांची तक्रार मंजूर करावी जाबदेणार यांनी संपूर्ण सदोष टाईल्स बदलून त्याबाबत झालेला खर्च दयावा किंवा रुपये 35700/- टाईल्सचे अधिक 18000/- लेबर चार्जेस, रुपये 12000/- वाळू, सिमेंट इत्यादिचे असे एकूण रुपये 65,700/- मिळावेत अशी विनंती केलेली आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई पोटी रुपये 2,00,000/- दयावेत व अर्जाचा खर्च दयावा अशीही मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
2. जाबदेणार क्र 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आल्या. जाबदेणार क्र 1 ते 3 वकीलांमार्फत मंचासमोर हजर राहून त्यांनी त्यांची कैफियत, शपथपत्र व बोर्ड रिझॉल्युशनची प्रत दिनांक 30/12/2010 रोजी दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार यांचे आक्षेप खोडून काढले असून तक्रारदारांच्या मागण्या अमान्य केल्या आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाच्या टाईल्स पुरविल्या नव्हत्या. त्या निकृष्ट दर्जाच्या असत्या तर तक्रारदार यांनी बसविल्याच नसत्या. यामध्ये जाबदेणार यांचा कोणताही दोष नाही. तक्रारदार यांनी द्वेषबुध्दीने सदरची तक्रार जाबदेणार यांचे विरुध्द दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेत त्रुटी नाहीत वा अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. तक्रारदार यांनी त्यांचे कथनाचे पुष्टयर्थ शपथपत्र, सदोष टाईल्सचे फोटो प्रिंट, दिनांक 28/4/2010 व 4/5/2010 रोजीच्या टाईल्सचे अनुक्रमे 35 व 7 बॉक्सचे इनव्हाईस च्या मुळ पावत्या, दिनांक 13/5/2010 रोजी जाबदेणार क्र 1 यांना पाठविलेली पत्र वजा नोटीस, सदोष टाईल्स बदलून देण्याबाबत एकूण एस.एम.एस, तीस ते पस्तीस वेळा केलेले ई मेल्स, जाबदेणार क्र 1 यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या टाईल्स बाबतचा दर्जा, गुणवत्ता यांची तपासणी केल्याबाबतचे पत्र दिनांक 18/5/2010 व त्यासोबतचा विरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयुट कडील दिनांक 16/4/2009 चा अहवाल, तक्रारदारांनी व्ही.जे.टी.आय या संस्थेने माहिती अधिकारात जाबदेणार यांच्या दिनांक 18/5/2010 रोजीच्या पत्रासोबत दिनांक 16/4/2009 च्या अहवालाबाबत मागितलेला खुलासापत्र व त्यास व्ही.जे.टी.आय संस्थेने दिनांक 3/12/2010 रोजी तक्रारदार यांना केलेला संपूर्ण खुलासा, दिनांक 9/6/2010 रोजी तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत जाबदेणार यांना दिलेली नोटीस, सदर नोटीस जाबदेणार यांना रजिस्टर्ड पोस्टाने मिळाल्याबाबतच्या पोस्टाच्या पावत्या व पोहोच पावत्या त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी खराब टाईल्स चांगल्या टाईल्स असल्याचे भासवून केलेल्या फसवणूकीबाबत पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस स्टेशन, आंबेगाव, पुणे ग्रामीणकडे दिलेली फिर्याद अर्ज इ. त्यांचे लेखी युक्तीवाद व शपथपत्र इ. कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, फोटोग्राफ व आय.एस.ओ प्रमाणपत्र, माहिती अहवाल, शपथपत्रासह कैफियत व इतर पुराव्याचे कागद यांचा विचार करुन मंचाच्या विचारार्थ खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना खराब टाईल्सची विक्री करुन त्या निर्दोष करुन वा बदलून न देऊन सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
2 | जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब व सेवेत त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मालाची व त्याअनुषंगिक झालेल्या नुकसानीची भरपाई व शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 4-
तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार ही प्रामुख्याने जाबदेणार क्र 1 यांनी उत्पादित केलेल्या व जाबदेणार क्र 2 यांनी डिस्ट्रीब्युटर या नात्याने त्यांच्या एजन्सीला पुरविलेल्या व जाबदेणार क्र 3 यांनी प्रत्यक्ष विक्री केलेल्या खराब, सदोष, दर्जाहीन व गुणवत्तेचा अभाव असलेल्या टाईल्स बाबत तक्रार दाखल केली असतून सदरच्या टाईल्स या तक्रारदार यांनी अनुक्रमे दिनांक 28/4/2010 रोजी 35 बॉक्स रक्कम रुपये 33075/- व दिनांक 4/5/2010 रोजी 7 बॉक्स रुपये 6615/- खरेदी केले आहेत. या टाईल्सची मागणी तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे त्यांच्या आकर्षक जाहिराती मधील माहितीवर विश्वास ठेवून दिनांक 27/4/2010 रोजी सदर टाईल्सची ऑर्डर जाबदेणार यांनी नोंदविली होती. सदर टाईल्सचा वापर तक्रारदार हे त्यांच्या वर्धमान टाऊनशिप डी 3/602 बी विंग, ससाणे नगर, हडपसर, पुणे 411 028 या 775 चौ. फुट सदनिकेमधील मुळ टाईल्स काढून त्या ठिकाणी नवीन उत्कृष्ट टाईल्स बसविण्याचा त्यांचा मानस होता. त्यास अनुसरुन वरीलप्रमाणे जाबदेणार क्र 3 यांचेकडून तक्रारदारांनी टाईल्स खरेदी केल्या व त्या टाईल्सची प्रत्यक्ष डिलीव्हरी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिनांक 28/4/2010 रोजी 35 बॉक्स व दिनांक 4/5/2010 रोजी 7 बॉक्स याप्रमाणे दिली व व्हाऊचर प्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून टाईल्स खरेदीपोटी रुपये 35700/- रोख घेतले. तक्रारदार यांनी टाईल्स बसविण्यासाठी लागणारे गवंडी, मजूर त्यासाठी लागणारे सिमेंट, वाळू खडी असे सर्व मटेरिअल जमा केले होते व दिनांक 28/4/2010 रोजी त्याप्रमाणे बसविण्यासाठी टाईल्स बॉक्स उघडले असतो ते जाबदेणार यांच्या जाहिरातीमध्ण्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक त्या दर्जाचे, गुणवत्तेचे टिकाऊ असल्याचे दिसून आले नाही. सदर टाईल्स या दर्जाहीन, वेडयावाकडया, बेंड झालेल्या, सुमार दर्जाच्या असलेल्या तक्रारदारांचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला व जाबदेणार यांनी गुणवत्तापुर्वक व दर्जेदार टाईल्स असल्याचे भासवून दर्जाहीन व खराब टाईल्स तक्रारदारांना पुरविल्याचे दिसून आले. त्यामुळे जाबदेणार यांनी या ठिकाणी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट दिसून येते. विरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयुट यांच्या दिनांक 16/4/2009 रोजीच्या “Technical Test Report on Test Samples Claimed “SIMPOLO” Brand Vitrified Tiles” मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे. परंतू त्या अहवालामध्ये टाईल्स उत्पादित झाल्याचा दिनांक, बॅच नंबर, उत्पादित टाईल्सचे डिटेल्स यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच तक्रारदारांना ज्या टाईल्सचा पुरवठा करण्यात आलेला होता त्यांचा फेब्रुवारी 2010 मध्ये उत्पादीत झालेल्या असल्यामुळे व वर नमूद विरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयुट यांचा अहवाल दिनांक 16/4/2009 रोजीचा असल्यामुळे, टाईल्स उत्पादनाच्या आधीच्या दिनांकाचा असल्यामुळे तो प्रस्तुत प्रकरणी लागू होणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
याबाबत यातील तक्रारदार यांनी जाबदेणार यांना वारंवार खराब टाईल्स बाबत कळविले, त्या बदलून देण्याची मागणी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जाबदेणार यांचेकडे केली. परंतू जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे मागणीकडे दुर्लक्ष केले व वारंवार ईमेल्स, एस.एम.एम, नोटीसा दिल्यानंतर जाबदेणारांतर्फे काही कामगार आले व त्यांनी पडताळणी करुन टाईल्स बदलून देतो असे सांगून आश्वासन देऊन ते निघून गेले. त्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदार यांना अनेक वेळा एस.एम.एस, ईमेल्स, पत्रव्यवहार करुनही टाईल्स बदलून दिल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने तक्रारदारांना आहे त्या टाईल्स बसवून घ्याव्या लागल्या व झालेल्या फसवणूकीबाबत पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस स्टेशन यांच्याकडे जाबदेणार यांच्याविरुध्द तक्रार दाखल करावी लागली. एकूणच या कामी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना खराब, दर्जाहीन व गुणवत्तेचा अभाव असलेल्या टाईल्सचा पुरवठा करुन त्या बदलून न देता किंवा त्याची किंमत परत न करुन, झालेला खर्च न देऊन सेवेत कमतरता निर्माण केलेली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांनी जरी लेखी जबाबामध्ये निरर्थक कारणे देऊन, तक्रारदारांचा अर्ज फेटाळून लावण्यात यावा असा खुलासा केला आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना पुरविलेल्या टाईल्स या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होत्या याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे जाबदेणार यांचा खुलासा योग्य व कायदेशिर नसल्याचे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून टाईल्सची रक्कम रुपये 35,700/- व मजूरी रुपये 18,000/-मिळून एकूण रक्कम रुपये 53,700/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 10,000/- मिळण्यास पात्र आहेत.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना निकृष्ट दर्जाच्या टाईल्सचा पुरवठा
करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे व सेवेत त्रुटी निर्माण केल्याचे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना एकूण रक्कम रुपये 53,700/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. उभय पक्षकारांनी मा. मंचाच्या सदस्यांसाठी दिलेले संच
आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 19 जुलै 2013