(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 28/06/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 13.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सॅमसंग कंपनीचे 19’’ एलसीडी मॉनिटर एकूण रु.9,100/- एवढया किंमतीला खरेदी केले होते. दि.28.04.2010 रोजी सदर मॉनिटरमध्ये बिघाड होऊन त्यातुन प्रसारण (Display) होणे बंद झाले, म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2, सॅमसंग कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्राकडे मॉनिटर दुरुस्तीकरीता दिले. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर मॉनिटरची तपासनी करुन त्यावर प्रसारण होत नसल्याबाबतची पावती तक्रारकर्त्यास दिली. सदरचे मॉनिटर हे गॅरंटी कालावधीत आहे व दोन-चार दिवसात सदर मॉनिटर दुरुस्त करुन देण्याचे अभिवचन देऊनही गैरअर्जदार क्र.2 यांनी अद्यापही मॉनिटरमधील दोष दुरुस्त करुन तक्रारकर्त्यास परत दिलेला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांना संबंधीत बाबींची सुचना देऊन त्याबाबतचे कारण विचारले असता गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर मॉनिटरमध्ये उत्पादित दोष नमुद केले व त्या अनुषंगाने सॅमसंग कंपनीशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी अद्यापही सदर मॉनिटर दुरुस्त करुन दिला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला मागिल 2 महिन्यांपासुन प्रतिदिवस रु.500/- याप्रमाणे खर्च करुन दुस-यांकडून आपले काम करुन घ्यावे लागत असुन आर्थीक नुकसान सोसावे लागत असल्याचे नमुद केले आहे. तसेच गैरअर्जदारांनी मॉनिटरची योग्य कालावधीत दुरुस्ती करुन न देणे ही त्यांचे सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे, म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी घोषीत करावी. तसेच गैरअर्जदारांनी मॉनिटरचे खरेदीपोटी दिलेले रु.9,100/- द.सा.द.शे. 18% व्याजासह परत करावे, आर्थीक नुकसानीकरीता रु.500/- प्रमाणे दि.28.04.2010 पासुन प्रत्यक्षात रक्कम प्राप्त होईपर्यंत द्यावे व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.5,000/- मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पुष्टयर्थ मॉनिटर खरेदी बाबतचे टॅक्स इन्व्हाईस, दुरुस्तीची पावती, व वारंटीची प्रत दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता त्यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.31.03.2011 रोजी पारित केला. 4. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.15.06.2011 रोजी आल्यानंतर मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्त्यानी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती, दस्तावेज व पावतीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सॅमसंग कंपनीचे 19’’ एलसीडी मॉनिटर एकूण रु.8,750/- एवढया किंमतीला दि.26.06.2008 रोजी खरेदी केलेले होते. दस्तावेज क्र.3, पान क्र.10 वरील पावती पाहता सदर मॉनिटरवर 3 वर्षांची वारंटी दिली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने शपथपत्र तसेच दस्तावेज क्र.2 जॉबशिट वरील नोंद पाहता सदर मॉनिटरमध्ये दि.28.04.2010 रोजी बिघाड होऊन त्यावर प्रसारण बंद झाले होते, असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सदर मॉनिटर दुरुस्ती करीता दिले होते, ही बाब स्पष्ट होते. तसेच सदर बिघाड हा वारंटी कालावधीतील असुन तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही सदर मॉनिटरमधील दोष गैरअर्जदारांनी अद्यापही दुर करुन दिला नाही, ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे, त्यामुळे ते तक्रारकर्त्याचे नुकसान भरपाईस जबाबदार आहेत. तक्रारकर्त्याने मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम पुराव्या अभावी मंचास मान्य करता येत नाही, परंतु सदरचा बिघाड अद्यापही दुरुस्त करुन न दिल्यामुळे निश्चितच तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. सादर पुराव्यावरुन सदरचा दोष अद्यापही दुरुस्त झालेला दिसुन येत नाही, म्हणजेच तो दुरुस्तीच्या पलीकडे असल्याचे निदर्शनास येते. त्यासाठी सदरच्या मॉनिटरमधील नादुरुस्त पार्ट गैरअर्जदारांनी बदलुन देणे न्यायोचित ठरेल या निष्कर्षांप्रत हे न्यायमंच येते. त्याचप्रमाणे सदरचा दोष 1 वर्ष 10 महिन्यांनंतर उद्भवलेला दिसुन येतो. तसेच वारंटीच्या अटी व शर्तीं पाहता तक्रारकर्त्याची मॉनिटरची किंमत परत देण्याची मागणी या मंचास मान्य करता येणार नाही. सबब आदेश. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मॉनिटरमधील सदर नादुरुस्त पार्ट नव्याने कुठलेही शुल्क न घेता बदलवुन द्यावा. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मानसिक त्रासाकरीता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |