(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 15 डिसेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा वर्धा येथील रहिवासी असून डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याला शैक्षणिक कामाकरीता नेहमीच लॅपटॉपची गरज भासत असे, त्या कारणास्तव त्यांनी विरुध्दपक्ष क्र.1 सिल्व्हर सिस्टीम, नागपूर यांचेकडून दिनांक 25.4.2011 रोजी लॅपटॉप रुपये 35,900/- रोख रकमेने विकत घेतला. सदर लॅपटॉपचे वर्गीकरण हे एच.पी.प्रोबुल 4520 S या वर्णनाचा ज्यामध्ये I-3, 4.GB, 320 with W/7 अशा कॉन्फीगरेशनचा होता. सदर लॅपटॉपचा सिरियल नं. 2.CE-112058-J and product-X T-988UT # ABA असा आहे.
3. तक्रारकर्त्याने लॅपटॉप विकत घेतल्यानंतर त्याला नगदी बिल प्राप्त झाले ज्याचा बिलाचा क्रमांक डि.एम.ओ. नंबर 3590 असा होता. तक्रारकर्ता लॅपटॉपचा वापर शैक्षणिक कामाकरीता करावयास लागला, परंतु एक महिन्याचे आत तक्रारकर्त्याला लक्षात आले की, सदरचा लॅपटॉप व्यवस्थितरित्या काम करीत नसून मध्येच बंद पडायचा व त्याची बॅटरी सुध्दा योग्यरित्या काम करीत नव्हती, त्यामुळे तक्रारकर्त्याला काम करतांना अतिशय ञास व्हायला लागला. त्यामुळे, दिनांक 25.5.2011 रोजी सदरचा लॅपटॉप विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे दाखविला. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदरच्या लॅपटॉपची पाहणीकरुन लॅपटॉपमध्ये कोणताही दोष नाही असे सांगितले व त्यावर विश्वास ठेवून तक्रारकर्ता लॅपटॉप पुन्हा परत घेवून गेला. त्यानंतर, जुन 2011 मध्ये दोनदा तक्रारकर्त्याने लॅपटॉप पूर्वीच्याच तक्रारीनुसार किंवा पूर्वीच्याच ञासामुळे विरुध्दपक्ष क्र.1 यांच्या दुकानात घेवून गेले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास सांगितले की, लॅपटॉपमधून संपूर्ण दोष काढून घेतले आहे व आता पुन्हा लॅपटॉप बंद पडणार नाही किंवा ञास देणार नाही, त्यामुळे पुन्हा तक्रारकर्त्याने सदरचा लॅपटॉप घेवून घरी परत आला. परंतु, ऑक्टोंबर 2011 मध्ये यासर्व ञासाला कंटाळून तक्रारकर्त्याचा मोठा भावासोबत दुरुस्तीकरीता नागपूर येथे विरुध्दपक्ष क्र.1 कडे आला व त्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांना विनंती केली की, सदरचा लॅपटॉप पूर्ण एक दिवस तुमच्याकडे ठेवा दुस-या दिवशी त्यातील संपूर्ण दोष दुरुस्तकरुन आम्हांला उद्या द्या, कारण सदरचा लॅपटॉप हा वॉरंटी पिरेडमध्ये होता. दुस-या दिवशी लॅपटॉप घ्यायला गेले असता, लॅपटॉपचा कोपरा तुटलेला दिसला व त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 ला त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, दुरुस्ती करतेवेळी लॅपटॉपचा कोपरा तुटला त्याला काहीही होत नाही. त्यावर विश्वास ठेवून पुन्हा तक्रारकर्ता यांनी लॅपटॉप घरी परत घेवून गेला. त्यानंतर, पुन्हा लॅपटॉपने ञास दिल्यामुळे दिनांक 26.12.2011 रोजी तक्रारकर्ता व त्याचा भाऊ नेहमीप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे लॅपटॉप घेवून गेले असता, पहिल्यांदा विरुध्दपक्ष क्र.1 यांनी त्यांचेकडे दुर्लक्ष केले व त्यानंतर सांगितले की, सदरचा लॅपटॉप दुरुस्त होऊ शकत नाही, आम्हीं तुम्हांला कुठलिही सेवा देणार नाही या पुढे तुम्हीं आमच्या दुकानात यायचे नाही, अशी ताकीद दिली. विरुध्दपक्ष क्र.1 च्या या बोलण्याने तक्रारकर्त्याला आश्चर्याचा धक्का बसला व त्यामुळे तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्र.1 वर कोणताही विश्वास राहीला नाही.
4. त्यानंतर, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 एच.पी. कार्पोरेट ऑफीस, बंगलोर यांचे अधिकृत सेवा केंद्र, नागपूर यांच्या मार्फत विचारणा केली असता, त्यांनी कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास नकार दिला व सांगितले की, “Laptop is shipped to out of country” त्यामुळे, सरते शेवटी तक्रारकर्ता हतबल झाला, त्यांनी दिनांक 13.2.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना कायदेशिर नोटीस पाठविली व त्यात नमूद केले की, सदोष नादुरुस्त असलेला लॅपटॉप दुरुस्त करावा, अन्यथा लॅपटॉपच्या किंमती ऐवढी रक्कम व्याजासह परत करावे. त्यात विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदरची नोटीस मिळूनही जाणीव-पूर्वक दुर्लक्ष केले. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नोटीसचे उत्तर पाठवून आश्वासन दिले की, सदारच्या नोटीचे अनुषंगाने तुमच्याशी संपर्क साधून तुमचे समाधान करण्यात येईल. परंतु, विरुध्दपक्षाने आजपर्यंत कुठलेही तक्रारकर्त्याचे समाधान केले नाही. या सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानसिक व शैक्षणिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1) तक्रारकर्त्यास दोन्ही विरुध्दपक्षाने सदोष सेवा दिल्यामुळे किंवा सेवेत ञुटी दिल्याने झालेल्या नुकसान भरपाईला कारणीभूत असून नुकसान भरपाई रुपये 1,10,900/- तक्रारकर्त्यास देण्याचे आदेश व्हावे.
2) तसेच, लॅपटॉपची किंमत रुपये 35,900/- तक्रारकर्त्याला नागपूर ते वर्धा येणे-जाण्यास लागणारा खर्च रुपये 5,000/- व शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 10,000/- असे एकूण रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा.
5. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन सुध्दा मंचात हजर झाले नाही व तक्रारीला लेखीउत्तर सादर केले नाही, करीता दिनांक 3 नोव्हेंबर 2014 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर पारीत करण्यात आला.
6. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीला लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.2 हे अॅथोराईज सर्वीस सेंटर असून उत्पादकात होणारे दोष मुक्त करतात व ते उत्पादन कंपनीने पाठविलेल्या वस्तुचे योग्य पध्दतीने दुरुस्तीकरुन त्याला दोष मुक्त करतात. तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपले प्राथमिक आक्षेपात नमूद करुन त्यांनी सांगितले की, विरुध्दपक्ष क्र.1 सिल्व्हर सिस्टीम हे उत्पादक कंपनीचे अॅथोरॉईज डिलर नाही, तसेच तक्रारकर्त्याने विकत घेतलेला लॅपटॉप ज्या क्रमांकाचे आहे ते विरुध्दपक्ष क्र.1 उत्पादकाने कधीही विक्रीसाठी पाठविले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 यांचा तक्रारकर्ता यांचेशी ग्राहक असल्याबाबतचा कोणताही संबंध उपस्थित होत नाही. पुढे सर्व तक्रारकर्त्याचे आरोप प्रत्यारोप विरुध्दपक्ष क्र.2 ने आपल्या उत्तरात खोडून काढले. तसेच, तक्रारकर्त्याने लॅपटॉप योग्य त्या डिलरकडून न घेतल्यामुळे त्याची वॉरंटी किंवा गॅरंटीचा प्रश्न उद्भवत नाही व विरुध्दपक्ष क्र.1 हा कंपनीचा अॅथॉराईज डिलर नाही, तसेच उत्पादक कंपनीने त्या क्रमांकाचे लॅपटॉप बाहेर देशात विकण्यास पाठविले होते. त्यामुळे, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.2 याचा ग्राहक बाबतचा दुवा जुडून येत नाही. त्यामुळे, सदरची तक्रार खोटी असून ती खारीज होण्यास पाञ आहे.
7. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 7 दस्ताऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने लॅपटॉप चे बिल टॅक्स इनवाईस कॉपी, नोटीस, पोष्टाची पावती व पोष्टाची पोहचपावती. तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नोटीसला दिलेल्या उत्तराची प्रत इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहे.
8. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा दोन्ही विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारकर्त्यास सेवेत ञुटी : होय
किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झालेला दिसून येतो
काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
9. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून तक्रारकर्त्याला शैक्षणिक कामाकरीता व तक्रारकर्ता इंजिनियरींगच्या अंतिम वर्षाला असल्या कारणास्तव त्याला लॅपटॉपची आवश्यकता होती. त्यामुळे, तक्रारकर्ता हे मुळचे वर्धाचे असून विरुध्दपक्ष क्र.1 हे प्रख्यात दुकान सिल्व्हर सिस्टीम, नागपूर येथून लॅपटॉप दिनांक 25.4.2011 रोजी रोख रक्कम रुपये 35,900/- मध्ये विकत घेतला. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र.1 चा ग्राहक होता. त्यानंतर, लगेच एक महिन्याचे आतमध्ये लॅपटॉप वारंवार बंद पडणे, तसेच लॅपटॉपची बॅटरी लवकर संपणे व मधेच लॅपटॉप बंद पडणे अशाप्रकारचा ञास लॅपटॉप पासून तक्रारकर्त्याला होऊ लागला. या कारणास्तव तक्रारकर्ता वर्धे वरुन नागपूरला येऊन विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे दुरुस्तीकरीता येऊ लागला. परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी कोणतेही पूर्णपणे समाधान न करुन लॅपटॉप व्यवस्थीत आहे, पुढे लॅपटॉप व्यवस्थीत चालेल व सदरच्या दुरुस्तीकरीता दिल्यानंतर लॅपटॉपचा कोपरा सुध्दा तोडला. त्यानंतर, दिनांक 26.12.2011 रोजी तक्रारकर्ता व त्याचा भाऊ हे विरुध्दपक्ष क्र.1 यांचे दुकानात किंवा दुरुस्तीसाठी गेले असता, विरुध्दपक्षाने सुरुवातीला त्यांचेकडे दुर्लक्ष केले व त्यानंतर सांगितले की, तुमचा लॅपटॉप येथे दुरुस्त होऊ शकत नाही तसेच आम्हीं तुम्हांला कोणतीही सेवा देऊ शकत नाही व यापुढे तुम्ही आमच्या दुकानात यायचे सुध्दा नाही.
10. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याने पाठविलेला नोटीसचे उत्तरात त्यांनी असे नमूद केले की, “Laptop is shipped to out of country” तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 हे कंपनीचे अॅथॉराईज डिलर नाही व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या लेखी युक्तीवादात असे नमूद केले की, सदरच्या लॅपटॉपची बॅच ही उत्पादक कंपनीने बाहेर देशात विकण्यास पाठविलेली होती.
11. यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदरचे लॅपटॉप हे गैरमार्गाने आपल्या दुकानाव्दारे तक्रारकर्त्यास विकलेला आहे. तसेच त्याबाबतचा पुरावा म्हणून तक्रारकर्त्याने लॅपटॉप विकत घेतल्याबाबतचे दिनांक 25.4.2011 चे टॅक्स इनवॉईस कॉपी व विरुध्दपक्ष क्र.1 यांनी दिलेले बिल अभिलेखावर दाखल केलेले आहे व यावरुन ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास सेवेत ञुटी तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट दिसून येते, करीता विरुध्दपक्ष क्र.1 हे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक ञास, तसेच शैक्षणिक ञासाबाबत नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे असे मंचाला वाटते. करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसान भरपाईपोटी रुपये 20,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याकडे असलेला तक्रारीत वर्गीकरण केलेला लॅपटॉप विरुध्दपक्ष क्र.1 यांनी ज्या स्थितीत असेल त्यास्थितीत परत घ्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, लॅपटॉपपोटी घेतलेली रक्कम रुपये 35,900/- लॅपटॉप विकत घेतल्याचा दिनांक 25.4.2011 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
(5) विरुध्दपक्ष क्र.2 यांना सदरच्या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(6) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 7,000/- द्यावे.
(7) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(8) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 15/12/2016