अॅड उमेश पोकळे तक्रारदारांतर्फे
अॅड व्ही. जी. कुलकर्णी जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 08/एप्रिल/2013
1. प्रस्तुतची तक्रार शेतक-याने बीज उत्पादक कंपनी आणि रोपे विक्री करणारी कंपनी यांचे विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार यांचा व्यवसाय शेती असा असून धायरी, ता. हवेली येथे सर्व्हे नं 134/1/2/1 या ठिकाणी 10 आर क्षेत्रा मध्ये त्यांच्या मालकीचे पॉली हाऊस आहे. दिनांक 7/5/2007 रोजी तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांच्याकडे असणा-या बियाणापासून तयार झालेली झेंडूची रोपे जाबदेणार यांच्याकडून बुकींग करुन दिनांक 11/6/2007 रोजी विकत घेतली. सुमारे 2000 रोपांची किंमत रुपये 2800/- अशी ठरवून रुपये 1000/- त्याचदिवशी तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 2 यांना दिले होते. दिनांक 11/6/2007 रोजी उरलेली रक्कम रुपये 1800/- जाबदेणार क्र 2 यांना देवून त्यांच्याकडून रोपे विकत घेतली व ती तक्रारदार यांनी स्वत:च्या पॉली हाऊस मध्ये लावली. सदरच्या पॉली हाऊस मध्ये रोपे लावतांना त्यांनी रोपे वाहतूक खर्च रुपये 750/-, रोपे लागवड खर्च रुपये 1000/-, मशागत खर्च रुपये 1000/-, मजूरी रुपये 1750/-, शेणखत पसरविण्याची मजूरी रुपये 1000/-, रासायनिक खते परसविण्याची मजूरी रुपये 1600/-, देखभाल खर्च रुपये 10,000/-, खुरपणी मजूरी खर्च रुपये 1000/-, लाल माती रुपये 80,000/-, शेणखत व गांडूळखत रुपये 11,500/-, ठिबक सिंचन पाईप लाईन खर्च रुपये 24,950/-, किटकनाशके रुपये 10,004/-, वीज बील रुपये 1000/- व सदोष रोपे उपटणे खर्च रुपये 500/-, रोपांचे फोटो घेतल्याचा खर्च रुपये 350/- असा एकूण खर्च रुपये 1,49,204/- केला. सदर रोपांसाठी त्यांनी एवढा मोठा खर्च करुन देखील झेंडूच्या रोपांना अजिबात फुले लागली नाहीत. म्हणून कृषि अधिका-यांकडे तक्रार केली व जाबदेणार यांच्याकडेही तक्रार केली. कृषि विकास अधिका-यांतर्फे तक्रारदार यांच्या प्लॉटला भेट देवून त्यासंबंधीचा अहवाल कृषि विकास अधिका-यांनी दिलेला आहे. त्या अहवालानुसार तक्रारदार यांनी लागवड केलेल्या झेडूला फुले लागली नसल्याचे दिसून आले. तसा अहवाल कृषि अधिका-यांनी दिनांक 17/8/2007 रोजी दिलेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार यांना वकीलांमार्फत दिनांक 16/8/2007 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू जाबदेणार यांनी त्या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेविरुध्द दाखल केली आहे. त्यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे वापरुन निकृष्ट दर्जाची रोपे त्यांना पुरविली आहेत. सदरची जाबदेणार यांची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेमध्ये मोडत असल्यामुळे व जाबदेणार यांनी दिलेल्या सेवेत कमतरता असल्यामुळे जाबदेणार हे नुकसान भरपाई देण्यात पात्र आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून रुपये 2,01,000/- नुकसान भरपाई व त्यावर 18 टक्के व्याज मागितलेले आहे.
2. या प्रकरणात जाबदेणार यांनी हजर राहून दिनांक 29/4/2010 रोजी लेखी म्हणणे दिलेले आहे. त्यामध्ये जाबदेणार यांनी तक्रारीतील सर्व कथने नाकालेली आहेत. जाबदेणार यांनी स्पष्टपणे तक्रारदार यांनी जो खर्चाचा तपशिल दिलेले आहे तो नाकारलेला आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार सदरचा तपशिल वाढवून गैररितीने नमूद केलेला आहे. जाबदेणार यांच्यातर्फे असे कथन करण्यात आले की ज्यावेळी त्यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांच्या शेताला भेट दिली त्यावेळी त्यांनी झेंडूची फुले बाजारात विकली होती असे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या नुकसानी बाबतचा मजकूर जाबदेणार यांनी नाकारलेला आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदारांनी फुलांचे उत्पन्न घेतले परंतू ते कमी प्रमाणात आले व केवळ वृत्तपत्रामध्ये झेंडूच्या बियाणाबाबत बातमी प्रसिध्द झाली म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. जाबदेणार यांनी सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
3. दोन्ही पक्षकारांची लेखी कथने, दाखल केलेली कागदपत्रे, युक्तीवाद व कायदेविषयक तरतुदींचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, निष्कर्ष व त्यावरील कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | तक्रारदार असे सिध्द करतात काय की त्यांनी जाबदेणार यांच्याकडून विकत घेतलेली रोपे ही निकृष्ट दर्जाची होती ? | होय |
2 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कमतरता ठेवली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मान्य करण्यात येते |
कारणे-
मुद्ये क्र 1 ते 4-
या प्रकरणातील तक्रार यांच्या वतीने एकूण 17 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांच्या नावाचा आठ अ खाते उतारा, 7/12 उतारा, जाबदेणारांकडून विकत घेतलेल्या रोपांच्या पावत्या, वेळोवेळी मशागतीसाठी व खत पसरविण्यासाठी त्याचप्रमाणे किटकनाशके यावरील खर्चाच्या रकमेच्या पावत्या, ठिबक सिंचन उपकरण घेतल्याबाबतचा लेखी पुरावा, खत विकत घेतल्याबाबतचा पुरावा, पावत्या अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्याचप्रमाणे या पिकाला पाणी पुरवठा करण्यासाठी जो विद्युत पुरवठा केला होता त्या संबंधीचा पुरावाही दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी कृषि विकास अधिकारी, पंचायत समिती, हवेली, पुणे व जिल्हा परिषद, पुणे यांना पाठविलेला तक्रार अर्ज व कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिलेला दिनांक 17/8/2007 रोजीचा अहवाल दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी संचालक, कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठविलेल्या अहवालाची प्रतही दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पॉली हाऊस मध्ये लावलेल्या झेंडूची रोपांचे छायाचित्रही दाखल केले आहे.
जाबदेणार यांच्या वतीने श्री. गौतम भगवान सांगळे यांचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
या प्रकरणात तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून रोपांची खरेदी केली होती ही बाब जाबदेणार यांनी नाकारलेली नाही. त्यामुळे सदरची रोपे ही उत्कृष्ट दर्जाची होती हे शाबित करण्याची जबाबदारी जाबदेणार यांच्यावर आहे. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्या वरुन असे स्पष्ट होते की तक्रारदार यांनी झेंडूची मशागत करण्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशिल दाखल केलेला आहे. त्यावरुन झेंडूची रोपे पॉली हाऊस मध्ये लावली होती हे सिध्द होते. रोपांचे छायाचित्र व कृषि अधिका-यांचा अहवाल यांचा विचार करता हे स्पष्ट होते की तक्रारदार यांनी लावलेल्या झेंडूच्या रोपांना फुले लागली नव्हती. जाबदेणार यांच्याकडून युक्तीवादाच्या वेळी असे प्रतिपादन करण्यात आले की तक्रारदार यांनी सदरची रोपे पृथ:करण करुन ती निकृष्ट दर्जाची होती हे सिध्द केले नाही. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून रोपे विकत घेतली होती व त्यांच्याकडे असणा-या बियाणापासून रोपे तयार झाली होती ही बाब निर्विवाद आहे. जाबदेणार यांनी कोणत्या बियाणापासून ही रोपे तयार केली होती याचा नमूना तक्रारदार यांना पृथ:करणासाठी पाठविण्यासाठी दिलेला नाही. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदार यांच्याकडून तज्ञाचा अहवाल मागू शकत नाहीत. या प्रकरणात रोपांची वाढ झाली नाही किंवा बियाणे निकृष्ट दर्जाचे होते असा वाद नाही. जाबदेणार यांच्यातर्फे मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग व मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग यांनी जाहीर केलेल्या निकालपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सदरची निकालपत्रे बियाणे दोषा संबंधीची आहेत व सदरची बियाणे दोषपूर्ण होती हे तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत असे त्यामध्ये निरीक्षण केलेले आहे. परंतू प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी जाबदेणार यांनी स्वत: तयार केलेली रोपे विकत घेतलेली आहेत. परंतू त्या रोपांना फुले लागली नाहीत असा कृषि अधिकारी, पुणे यांनी अहवाल दिलेला आहे व त्या पुष्टर्थ्य तक्रारदार यांनी छायाचित्र दाखल केलेले आहे. या प्रकरणातील अहवाल विचारात घेतला असता असे स्पष्ट होते की केवळ तक्रारदार यांच्या शेतातच नव्हे तर अन्य शेतक-यांच्या शेतात लावलेली झेंडूची रोपे ही निकृष्ट दर्जाची आढळून आली व तसा अहवालही संबंधित अधिका-यांनी दिलेला आहे. जाबदेणार यांचे लेखी निवेदन विचारात घेतले असता असे दिसून येते की जाबदेणार म्हणतात की तक्रारदार यांनी केवळ वृत्तपत्रातील बातमीवरुन ही तक्रार दाखल केलेली आहे. परंतू या जाबदेणार यांच्या लेखी कथनामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीस पुष्टी मिळते. संबंधित बियाणांचा अहवाल, संबंधित कृषि अधिका-यांचा अहवाल विचारात घेतला असता असे दिसून येते की जाबदेणार यांनी विक्री केलेल्या बियाणामध्ये व रोपांमध्ये दोष आढळून आलेला आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांचे नुकसान झालेले आहे. या अहवालाला निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांच्यातर्फे कोणतही प्रती अहवाल किंवा पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे दिसून येते. तक्रारदार यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी केलेल्या खर्चाचे सविस्तर व तपशिलवार विवरण, पुरावा दिलेला आहे. तक्रारदार यांना त्यांना अपेक्षित उत्पन्न म्हणून रुपये 51,796/- ची मागणी केलेली आहे. परंतू तो प्रत्यक्षातील खर्च नसल्यामुळे सदरची रक्कम मंजूर करणे योग्य होणार नाही. जाबदेणार यांचे प्रतिपादनानुसार शेती ही निसर्गावर असलंबून असते व शेतीतील उत्पन्न हे निसर्गाने दिलेल्या साथीप्रमाणे कमी जास्त असू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुन असे जाहीर करण्यात येते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची रोपे पुरवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे ते तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. निकृष्ट दर्जाची रोपे देऊन जाबदेणार यांनी व्यापार विषयक अनुचित कृत्य केले आहे. या कारणामुळे ते नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीचा विचार करुन व वर उल्लेख केलेले मुद्ये, निष्कर्ष व कारणांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. असे जाहिर करण्यात येते की जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाची
रोपे तक्रारदार यांना विकून सेवेत कमतरता ठेवलेली आहे.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
तक्रारदार यांना रुपये 1,00,000/- तक्रारदारांनी केलेल्या खर्च व रोपांच्या किंमतीसाठी दयावेत.
4. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाई पोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- दयावा.
5. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्या यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 8 एप्रिल 2013