तक्रारदाराकरिता : श्री.अमर कांत झा, वकील
सामनेवालेकरिता : श्री.आर.सी. धुरु, वकील
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्र
तक्रारीचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले ही गरजुंना कर्मचारी भरतीकरीता मदत करणारी कंपनी आहे, तर तक्रारदार हे इस्पितळ आहे. तक्रारदार इस्पितळास आपले इस्पितळात काम करण्यासाठी शिपाई, वॉर्डबॉय, लेखापाल, नर्स, स्वागतिका, तांत्रिक कर्मचारी, सहायक कर्मचारी, इत्यादी आवश्यक होते. तक्रारदारांनी सामनेवाले-कंपनीकडे आपले नाव नोंदविले व सभासद शुल्क रक्कम रु.3,100/- जमा केले. सामनेवाले –संस्थेने तक्रारदाराला प्रत्येक पदाला विहीत अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांची नांवे तक्रारदार-इस्पितळास कळविणे आवश्यक होते. तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदार- इस्पितळास एकाही इच्छुक उमेदवारांची नांवे कळविली नाहीत व तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून नांव नोंदवून काहीच उपयोग झाला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वेळोवेळी दुरध्वनी स्मरण केले परंतु सामनेवाले यांनी काही कार्यवाही केली नाही. याप्रमाणे, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सामनेवाले यांचेकडून सभासद शुल्क रु.3,100/- नुकसान भरपाई रक्कम रु.75,000/- वसुल होणे कामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2 सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल केली व तक्रारदारांनी सभासद होऊन रक्कम रु.3,100/- जमा केले होते ही बाब मान्य केली. तथापि, तक्रारदार हे मोठे – वैद्यकीय इस्पितळ असून नफा कमविणे कामी त्यांच्या इस्पितळामध्ये इलाज केला जातो. तक्रारदार – इस्पितळास इच्छुक उमेदवारांची आवश्यकता आपले इस्पितळास काम करणे कामी म्हणजे वाणिज्य व्यवसायाकामी होते. याप्रमाणे, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून वाणिज्य व्यवसायाकामी सेवा स्विकारण्याचा करार केलेला असल्याकारणाने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम-2(1)(डी) चे परंतुका प्रमाणे ग्राहक होत नाहीत व ग्राहक तक्रार निवारण मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे सामनेवाले यांनी कथन केले.
3 सामनेवाले यांनी आपली कैफियतीत असेही कथन केले आहे की, त्यांची जबाबदारी फक्त अर्हता प्राप्त, इच्छुक उमेदवारांची नांवे त्याप्रमाणे तक्रारदारांना कळविणे एवढीच होती व त्यापेक्षा जादा जाबाबदारी सामनेवाले यांची असून शकत नाही. सुचविलेल्या उमेदवारातून योग्य तो उमेदवार निवडण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. सामनेवाले असे म्हणतात की, त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना इच्छूक उमेदवारांची नांवे कळविले होते, त्याप्रमाणे तक्रारदारांना सोयीसुविधा पुरविण्यास कसुर झाला या आरोपास सामनेवाले यांनी नकार दिला.
4 तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले तर सामनेवाले यांनी त्यांचे अधिकारी-श्री.नायर यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्हीं बाजूंने लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, शपथपत्रं, कागदपत्रं व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकाला कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम-2(1)(डी) प्रमाणे ग्राहक होतात काय ? | नाही |
2 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | प्रश्न निर्माण होत नाही. |
3 | अंतिम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारणमिमांसाः-
5 सामनेवाले यांनी आपल्या कैफियतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदार-इस्पितळ हे विस्तृत प्रमाणावर रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणारे इस्पितळ असून तिथे मोठया प्रमाणावर वैद्यकीय सेवा पुरविली जाते. तक्रारदार- इस्पितळ हे रुग्णांकडून वैद्यकीय सेवांची आकारणी करुन व्यवसाय करतात व नफा कमवितात. याप्रमाणे, तक्रारदारांना त्यांच्या वाणिज्य व्यवसायाकामी उमेदवारांना गरज होते असे कथन सामनेवाले यांनी केले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मध्ये त्यांच्या वेगळयां विविध पदांवर काम करणे कामी मनुष्यबळाची आवश्यकता होती असे कथन केले आहे. लेखी युक्तीवादांतही सामनेवाले असे म्हणतात की, ते विस्तृत प्रमाणावर वैद्यकीय सेवा देण्याचे प्रयत्न करतात. तक्रारदारांचे असे कुठेही कथन नाही की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून एखाद्या विशिष्ठ व्यक्तीचे उपजीवेकेकरिता किंवा विशिष्ठ व्यक्तीचे स्वयंरोजगार कामी इस्पितळात भरती करणे आवश्यकता होती. तक्रारदारांनी तक्रारीचे परिच्छेद क्र.2 मध्ये पदांची संख्या नोंदविलेली आहे की, ती असे दर्शविते की, तक्रारदार- इस्पितळ ही मोठया प्रमाणावर वैद्यकीय सेवा पुरविणारे इस्पीतळ असून त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती. तक्रारदारांनी आपल्या युक्तीवादामध्ये असे कथन केलेले नाही की, तक्रारदार- इस्पितळ हे रुग्णाकडून शुल्क आकारत नाहीत व तसेच मोफत सेवा देतात. तक्रारदारांचे वैद्यकीय व्यवसायाचे स्वरुप लक्षात घेता, निश्चितच तक्रारदारांना आपल्या वाणिज्य व्यवसायाकामी मनुष्यबळाची आवश्यकता होती व त्याबद्दल सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांनी नांव नोंदविले ही बाब स्पष्ट होते.
6 ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1)(डी)(ii)चे परंतुकाप्रमाणे वाणिज्य व्यवसायाकामी सेवा स्विकारणारी व्यक्ती ग्राहक संज्ञेत बसत नाही. या संदर्भात मा.सर्वोच्य न्यायालयाचे बिर्ला टेक्नॉलॉजी लि. विरुध्द न्युट्रल ग्लास अन्ड इंडस्ट्रिअल लि. (2011 CTJ 121 Supreme Court CP) या प्रकरणाचा आधार घेतला जातो. वरील प्रकरणामध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडूनत्यांच्या कार्यालयात कामाकरिता संगणक प्रणाली विकत घेतली होती परंतु ती सदोष निघाली. तक्रारदारांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. मा.सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदविला की, तक्रारदारांनी सामनेवाले यांची सेवा आपल्या कंपनीच्या कामाकरिता म्हणजे वाणिज्य व्यवसायाकामी स्विकारली असल्याने तक्रारदार-कंपनी ही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-2(1)(डी)(ii) प्रमाणे ग्राहक होत नाहीत.
7 वर नमुद केलेल्या तक्रारदार-कंपनीने सामनेवाले यांचेकडून स्वयंरोजगाराकरिता अथवा व्यक्तीच्या उदरनिर्वाहाकरिता स्विकारली होती असे कथन केले नाही व तसा पुरावाही नाही. यावरुन तक्रारदार-इस्पितळास प्रस्तुतची तक्रार कलम-2(1)(डी)(ii) चे परंतुकास बाधा येते व तक्रारदार- इस्पितळास हे ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे कलम-2(1)(डी) प्रमाणे ग्राहक होत नाहीत.
8 मुद्दा क्रमांक-1 च्या निष्कर्षावरुन मुद्दा क्रमांक-2 चे उत्तर शिल्लक राहत नाही.
वरील विवेचन व निष्कर्षावरुन, या प्रकरणी पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1 तक्रार रद्द करण्यात येते, खर्चाबद्दल आदेश नाहीत.
2 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.