मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 110/2011 (व्दारा – मंचाचे अध्यक्ष श्री. एम.एम. गोस्वामी) नि.क्र.1 कडील आदेश निकाल तारीख- 06/09/2011 विशाल बॅटरी प्रोप्रा. विशाल संपत फाळके,प्लॉट नं.16, आझाद कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा. ............ तक्रारदार विरुध्द मे. सिध्दीविनायक फ्रेट प्रा. लि.,1 ला माळा, श्रीराम कॉम्प्लेक्स, लोकमत ऑफीस चेअरवर, सरकारी रोड,धुळे 424 001. ............. जाबदार 1. तक्रारदार संस्थेने खरेदी केलेला इन्व्हर्टर विरुध्दपक्षाच्या मार्फत पार्सलव्दारे वाहतुक करण्यासाठी देवूनदेखील तो इन्व्हर्टर अद्यापपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे इन्व्हर्टरच्या किंमतीसह नुकसानभरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे विशाल बॅटरीज नावाने एक्साईट बॅटरीज व इन्व्हर्टर विक्रीचा व्यवसाय करीत असून त्याचे प्रोप्रायटर विशाल संपत फाळके हे आहेत. तर विरुध्द पक्षकार सिध्दिविनायक फ्रेट प्रा. लि. हे एस.टी. पार्सलच्याव्दारे वाहतूक व्यवसाय करतात. तक्रारदाराने पी.ए.ई लि., शिरोली, कोल्हापूर येथून बिल क्र. सी.एम.00096 दि. 11/06/2010 व्दारे एक नग युपीसी इन्व्हर्टर रु.4,650/- किंमतीचा मागविला होता व त्याची रक्कम अगोदरच दिली होती व त्यांनी विरुध्दपक्षाच्या शिरोली शाखेतून रिसिट नं.550-3866449 व्दारे दि. 11/06/2010 ला सातारासाठी पाठविण्यास दिला होता. परंतु अद्याप पर्यंत या इन्व्हरचे पार्सल आपणास मिळाले नाही. वारंवार चौकशी केली असता उत्तर मिळाले नाही. आजपर्यंत कोल्हापूरला माणूस पाठवून चौकशी केली तरीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दि. 01/07/2011 रोजी कायदेशिर नोटीस पाठविण्यात आली. परंतु विरुध्दपक्षाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे आपणास इन्वहर्टरची किंमत व नुकसानभरपाई असे एकूण रक्कम रु. 12,900/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने त्याचे तक्रारीत केलेली आहे. 3. तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत स्वतंत्र शपथपत्र दाखल केले असून दस्तऐवजाच्या यादीनुसार विरुध्द पक्षास पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोस्टल रिसिट, पावत्या व त्याच्या पोहोचपावत्या व पार्सल दिल्याची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहे. मंचाचे रजिस्टर विभागाने तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेवून मंचासमोर अॅडमशिनचे सुनावणीसाठी आज ठेवली. 4. आज मंचासमोर तक्रारदार स्वतः विशाल संपत फाळके हजर असून तक्रारीचे अॅडमशिन कामी त्याचे तोंडी म्हणणे ऐकून घेतले. तक्रार प्रकरणाचे अवलोकन केले असता तक्रारदार हे विशाल बॅटरीज या दुकानाचे प्रोप्रायटर असल्याचे दिसून येत असून तक्रारदार हे एक्साईट बॅटरीज व इन्व्हर्टर विक्रीचा व्यवसाय करतात असेदेखिल निदर्शनास आले. त्यामुळे मंचाने तक्रारदाराकडे प्रत्यक्ष चौकशी केली असता त्यांनी खरेदी केलेला इन्व्हर्टर हा व्यावसायिक हेतुने पुनःश्च विक्री करण्यासाठी खरेदी केला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक ठरतो काय ? व वाणिज्य कारणासाठी इन्व्हर्टरची खरेदी केली असल्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत किंवा कसे याबाबत प्रथमदर्शनी विचार करणे आवश्यक आहे. 5. तक्रारीचे स्वरुप बघता तक्रारदाराने खरेदी केलेली वस्तु अर्थात इन्व्हर्टर हा वाणिज्य हेतूने पुनःश्च विक्री करण्यासाठी खरेदी केला असल्यामुळे तो ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)d नुसार“ग्राहक” ठरत नाही व वाणिज्य हेतूने रिसेल करण्यासाठी इन्व्हर्टरची खरेदी केली असल्यामुळे व तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील “ग्राहक” या व्याखेत बसत नसल्यामुळे ही तक्रार चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला नाहीत त्यामुळे तक्रारदाराने सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक आहे असे आमचे स्पष्ट मत असून त्या दृष्टीकोनातून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराने वाणिज्य हेतूने रिसेल करण्यासाठी इन्व्हर्टरची खरेदी केली असल्यामुळे व तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक होत नसल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. तक्रादाराने नव्याने सक्षम दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्याची सूचना करण्यात येते. त्यासाठी मुदतीच्या कायद्याच्या कलम 14 ची मुभा तक्रारदारांस देण्यात येते. 3. खर्चाबाबत काही हुकूम नाही. 4. तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 06/09/2011 (सुनिल कापसे ) (एम.एम.गोस्वामी) सदस्य अध्यक्ष
| Mr. Sunil K Kapse, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |