तक्रारदारांतर्फे अॅड उन्मेष गो. दिंडोरे
जाबदेणार क्र 1, 3 व 4 तर्फे
अॅड विजय पवार
जाबदेणार क्र 2 तर्फे अड अनघा नाकवा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 29/मे/2013
तक्रारदार क्र 1 हे जाबदेणार क्र 4 चे प्रमोटर सदस्य आहेत. जाबदेणार क्र 1 हे सोसायटीचे प्रमोटर बिल्डर आहेत. जाबदेणार क्र 2 व 3 हे जाबदेणार क्र 1 चे सदस्य आहेत. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी फायनल कन्व्हेअन्स जाबदेणार क्र 4 सोसायटीच्या नावाने करुन देण्यासाठी जाबदेणार क्र 4 यांना आवश्यक पक्षकार करण्यात आलेले आहे. सर्व्हे नं 211/2, सी टी एस नं 201 ते 210, मौजे लोहगांव, ता. हवेली येथे जाबदेणार क्र 1 यांनी सिध्दीविनायक प्राईड बी 6 ही इमारत बांधली व त्याची सोसायटी जाबदेणार यांनी दिनांक 30/5/2005 रोजी नोंदणीकृत करुन दिली. परंतू मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन कन्व्हेअन्स डीड करुन दिले नाही. डेप्युटी रजिस्ट्रार को.ऑप सोसायटीज, पुणे 2 यांच्या दिनांक 30/5/2005 रोजीच्या पत्रानुसार चिफ प्रमोटर श्री. विजयकुमार जगदिशचंद्र अग्रवाल यांनी कार्यवाही केली नाही, बायलॉज स्विकारले नाहीत, चिफ प्रमोटरच्या नावे असलेले खाते सोसायटीच्या नावे वर्ग केले नाही, सोसायटीच्या नावे नवीन खाते बँकेत उघडले नाही. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी जाबदेणार क्र 4 व तक्रारदार यांच्या संमतीशिवाय इमारतीच्या वर मोबाईल टॉवर बांधला असून सन 2006 पासून दरमहा रुपये 15000/- मोबदला मिळवित आहेत. सोसायटीच्या देखभाली साठी या मोबदल्याची रक्कम खर्च करण्यात आलेली नाही. तसेच बिल्डर यांनी सोसायटीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा देखील केलेली नाही. जाबदेणार यांनी करारानुसार असलेल्या स्विमींग पूल, गार्डन, क्लब हाऊस या सुविधा देणे तसेच त्या सोसायटीच्या नावे कन्व्हे करुन दिलेल्या नाहीत, पुरेसा पाणी पुरवठा नाही. सदनिका विकायची असल्यास वा भाडयाने दयावयाची असल्यास जाबदेणार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. कन्व्हेअन्स पुर्वीच्या सोसायटीचा सर्व खर्च बिल्डर/प्रमोटर यांनी करावयास हवा. परंतू जाबदेणार यांनी खर्च केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक तक्रारदारास सुमारे रुपये 50,000/- खर्च करावा लागलेला आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे 7 सदस्यांचे प्रत्येकी रुपये 50,000/- व नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी रुपये 25,000/- एकूण रुपये 5,25,000/- तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून मागतात. तसेच जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी जाबदेणार क्र 4 यांचे नावे कन्व्हेअन्स डीड करुन दयावे, करारानुसार सर्व सोई सुविधा दयाव्यात व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी तक्रारदार करतात.
2. जाबदेणार क्र 1, 3 व 4 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र 2 यांनी जाबदेणार क्र 1, 3 व 4 यांचा लेखी जबाब स्विकारला. जाबदेणार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी दिनांक 2/3/2006 रोजीच्या नोटीस द्वारे पहिली जनरल बॉडी मिटींग दिनांक 9/3/2006 रोजी सायं. 7.30 वा घेण्यात येणार असल्याचे तक्रारदारांना कळविले होते. परंतू पुरेशा गणपूर्ती अभावी मिटींग पुढे ढकलण्यात आली. तशी इतिवृत्तांत नोंदही घेण्यात आली होती. दिनांक 14/10/2006 रोजीच्या पत्रान्वये जाबदेणार यांनी सोसायटी हॅन्ड ओव्हर करण्याबाबतही तक्रारदारांना कळविले होते. परंतू तक्रारदारांनी त्याची दखल घेतलेली नसल्यामुळे तक्रारदार पैसे मागू शकत नाहीत. जाबदेणार यांना मोबाईल ऑपरेटर कडून भाडयापोटी रक्कम मिळालेली नाही. तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही सबब तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहे. मुद्ये, निष्कर्ष व त्यावरील कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार क्र 1 ते 3 हे जाबदेणार क्र 4 यांचे नावे कन्व्हेअन्स डीड करुन देण्यास तसेच चिफ प्रमोटर यांचे नावे असलेले बँकेतील खाते सोसायटीच्या नावे वर्ग करुन देण्यास जबाबदार आहेत काय | होय |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई व इतर मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही |
3 | आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे
मुद्या क्र 1 ते 3-
महाराष्ट्र ओनरशिप ऑफ प्लॅट्स अॅक्ट 1963 कलम 11, रुल 9 नुसार जाबदेणार क्र 1 ते 3- प्रमोटर यांनी जाबदेणार क्र 4 सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स डीड आवश्यक सर्व कागदपत्रांसक करुन देणे बंधनकारक आहे. जाबदेणार क्र 4 – सिध्दी विनायक प्राईड सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या सोसायटीची नोंदणी दिनांक 30/5/2005 रोजी झाल्याचे दाखल नोंदणीच्या प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते. सोसायटी दिनांक 30/5/2005 रोजी नोंदणीकृत होऊनही जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी कायदयानुसार बंधनकारक असलेले कन्व्हेअन्स डीड आवश्यक कागदपत्रांसह सोसायटीच्या नावे अद्यापही करुन दिलेले नाही ही जाबदेणार क्र 1 ते 3 यांच्या सेवेतील त्रुटी आहे. सबब जाबदेणार क्र 1 ते 3 सोसायटीच्या – जाबदेणार क्र 4 यांच्या नावे कन्व्हेअन्स डीड करुन देण्यास जबाबदार ठरतात. तसेच चिफ प्रमोटर यांच्या नावे असलेले खाते सोसायटीच्या नावे वर्ग करुन देण्यास जाबदेणार क्र 1 ते 3 जबाबदार ठरतात.
जाबदेणार यांनी करारानुसार सोई सुविधा दिलेल्या नाहीत, पुरेसा पाणी पुरवठा नाही अशीही तक्रारदारांची तक्रार आहे. परंतू सदर तक्रारी या ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24 ए नुसार मुदतबाहय आहेत सबब तक्रारदारांच्या या मागण्या मंच नामंजूर करीत आहे. तसेच सोसायटीचे नवीन सदस्य करुन घेणे, बॉडी तयार करणे वगैरे सर्व कामे जाबदेणार क्र 4 – सोसायटीची आहेत.
तसेच तक्रारदारांना प्रत्येकी रुपये 50,000/- खर्च करावा लागला, प्रत्येकी रुपये 25,000/- नुकसान भरपाई पोटी या मागण्यांसंदर्भात तक्रारदारांनी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांच्या या मागण्या मंच नामंजूर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. असे जाहिर करण्यात येते की जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी
वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जाबदेणार क्र 4 – सिध्दीविनायक प्राईड सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या नावे कन्व्हेअन्स डीड करुन न दिल्यामुळे सेवेत त्रुटी निर्माण केलेली आहे.
3. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जाबदेणार क्र 4 – सिध्दीविनायक प्राईड सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या नावे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत कन्व्हेअन्स डीड करुन दयावे.जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी सहा आठवडयांच्या आत कन्व्हेअन्स डीड करुन न दिल्यास तक्रारदारांनी मानीव कन्व्हेअन्स डीड साठी अर्ज करावा.
4. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या चिफ प्रमोटर यांच्या नावे असलेले खाते सोसायटीच्या नावे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत वर्ग करुन दयावे.
5. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.