(मा.सदस्या, अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाला यांचकडे ठेवलेले रक्कम रु.50,000/- चे मुदतठेवीचे व व्याजाचे रकमेतून कर्जाऊ घेतलेली रक्कम व्याजासह वजावट करुन बाकी रक्कम रु.35,863/- सामनेवाला कडून मिळावेत, रक्कम रु.35,863/- या रकमेवर दि.16/08/2008 पासून 12 टक्के दराने व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.15 लेखी म्हणणे व पान क्र.16 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर
करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.34 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. तसेच अर्जदार यांचे वतीने अँड.ए.जे.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने अँड.वाय.व्ही.ठेंगे यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.25/08/2007 रोजी ठेवपावती क्र.44401 ने रक्कम रु.50,000/- ठेव म्हणून ठेवलेली होती ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 3 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.26 लगत ठेवपावती क्र.4401 या ठेवपावतीची मुळ अस्सल प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.26 ची ठेवपावती याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी ठेवपावतीच्या बाबतीत दि.4/12/2006 रोजी रु.20,000/- कर्ज घेतलेले आहे. यानंतर ठेवपावती क्र.4401 या रकमेवर अर्जदार यांनी दि.30/10/2007 रोजी ठेवपावती तारण ठेवून रु.25,000/- कर्ज घेतलेले आहे. त्याचा व्याजदर 13 टक्के आहे. या कर्जापोटी अर्जदार यांनी काहीएक रक्कम जमा केलेली नाही. उलट पुन्हा दि.30/10/2010 रोजी रु.34,756/- येणे दिसत आहे. यानंतर पुन्हा एफ.डी. तारण ठेवून दि.25/03/2008 रोजी रु.14,000/- कर्ज घेतलेले आहे. या कर्जापोटीही अर्जदार यांनी रक्कम भरलेली नाही. ठेवपावतीवरील रकमा वजा करुन अद्यापही अर्जदार यांचेकडून रु.7223/- इतकी रक्कम अर्जदार यांचेकडे येणे आहे. तक्रार अर्ज बनावट व खोटा आहे तो रद्द करावा.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.7 लगत कर्ज खातेपोटी जमा केलेल्या रकमांच्या पावत्या हजर केलेल्या आहेत. अर्जदार यांनी पान क्र.8 व पान क्र.9 लगत स्मरणपत्र दिलेले आहे. त्यानुसार रु.6832/- इतकी रक्कम त्यांनी परतफेड केलेली आहे हे स्पष्ट होत आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.18 लगत पैसे मिळाल्याच्या नावे पावत्या एकूण 3 दाखल केलेल्या आहेत. या पावत्यांचा विचार होता अर्जदार यांनी ठेवपावत्या तारण ठेवून रु.20,000/-, रु.25,000/- व रु.14,000/- असे कर्ज घेतलेले आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. पान क्र.26 चे मुळ ठेवपावतीवरतीही दि.25/3/2008 रोजीचे रक्कम रु.14,000/- चे कर्जाची व दि.20/11/2007 रोजीचे कर्जाची रक्कम रु.25,000/-चे कर्जाची नोंद आहे. सामनेवाला यांनी पान क्र.19, पान क्र.20, पान क्र.21 लगत मुदतठेव कर्ज खतावणी दाखल केलेली आहे. या पान क्र.19, पान क्र.20, पान क्र.21 चे कागदपत्रांचा विचार होता अद्यापही कर्जाऊ रकमेतून मुदतठेवीची रक्कम वजा करता सामनेवाला यांनाच अर्जदार यांचेकडून रक्कम येणे निघत आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचे कागदपत्राबाबत पान क्र.22 लगत प्रतिज्ञापत्र, पान क्र.23 लगत स्टेटमेंट, पान क्र.28 लगत प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांचे प्रतिज्ञापत्र, पान क्र.29 लगत अर्जदार यांचे ठेवपावतीबाबत प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांनी तयार केलेले स्टेटमेंट दाखल केलेले आहे. यानंतर पुन्हा अर्जदार यांनी पान क्र.31 लगत प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.32 लगत प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांनी तयार केलेला कर्ज खात्याचा खाते उतारा दाखल केलेला आहे.
पंरतु पान क्र.32 चे कर्ज खात्याचे खाते उता-यामध्ये खाते क्र.760, खाते क्र.882 व खाते क्र.934 या खात्यावर एकूण व्याज किती आकारले याचा कोणताही उल्लेख प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांनी केलेला नाही. यामुळे प्रमाणीत लेखा परीक्षक संजय हरीभाऊ बागुल यांनी तयार केलेले पान क्र.32 चे कर्ज खात्याचे स्टेटमेंट या कामी पुराव्यात वाचता येत नाही.
याउलट सामनेवाला यांनी दाखल केलेली पान क्र.19, पान क्र.20, पान क्र.21 च्या पावत्या, ग्राहक खतावणी मुदतठेव कर्ज ही कागदपत्रे कोणकोणत्या आधारावर चुकीची व अयोग्य आहेत हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो पुरावा व कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. पान क्र.18 ते 21 चे कागदपत्रांचा विचार होता अर्जदार यांनीच सामनेवाला यांचेकडे ठेवलेल्या ठेवपावत्यावरती कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे व या कर्जाऊ रकमेपोटी अद्यापही अर्जदार हेच सामनेवाला यांना रक्कम देणे लागत आहेत हे स्पष्ट झालेले आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) मा.राज्य आयोग मुंबई यांचेसमोरील प्रथम अपील क्र.880/10 निकाल
ता.3/9/2010 सुखदेव पवार नाशिक विरुध्द गुरुदत्त कामगार पतसंस्था
नाशिक.
2) 4(2010) सि पी जे राष्ट्रीय आयोग पान 138 श्रीमती निर्मललिगा विरुध्द
नेशनवाईड इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.
3) 4(2006) सि पी जे राष्ट्रीय आयोग पान 1 एम मल्लिका विरुध्द स्टेट बँक ऑफ
इंडिया
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व मंचाचे वतीने आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.