ग्राहक तक्रार क्र. : 89/2015
दाखल तारीख : 04/02/2015
निकाल तारीख : 07/10/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. कल्याण धोंडीबा राऊत,
वय – 45 वर्षे, धंदा – शेती,
रा.काजळा, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मे. सिध्दनाथ कृषी सेवा केंद्र,
एस.टी. स्टँड जवळ, सांजा रोड,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
2. व्यवस्थापकीय संचालक,
ग्रीन गोल्ड सिडस प्रा.लि.,
गट नं.65, नारायणनगर शिवार,
वालूज, ता. गंगापुर,
जि. औरंगाबाद -431133. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.एल.पाटील.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.एम.व्ही. मैंदाड.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) अर्जदार क्र.1 यांचे वहीवाटीतील मालकीचे गट क्र.103 क्षेत्र 40 आर. मध्ये पेरणी केली असता उगवण न होऊन नुकसान झाल्याने ही तक्रार दाखल केली आहे. सदर क्षेत्रात पेरणी करीता पावतीव्दारे 2 पिशव्या बियाणे खरेदी केले आहे.
तक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार विप क्र.2 ने उत्पादीत केलेले सोयाबीन चे बियाणे हे दोषयुक्त असल्याचे व त्यासाठी विप क्र.1 व विप क्र. 2 जबाबदार असल्याचे म्हणणे आहे. विप क्र.2 ही कंपनी असून हया कंपनी दिलेले बियाणे हे विप क्र.1 मार्फत तक्रारदाराने खरेदी केलेले आहे. पेरणीकरीता आवश्यक ती मशागत व इतर गोष्टीचे पुर्व तयारी करुन 2014 च्या जुलै महिन्यात खरीप हंगामा करीता पेरणी झाल्यानंतर योग्य कालावधीत उगवण होत नसल्याची शंका आल्याने विप यांना कळवून पंचनामा तज्ञांमार्फत करुन घेतला. पंचनाम्यात उगवणीची टक्केवारी 11 टक्के आढळून आली. सदरबाबत विप यांनी नुकसान भरपाईची मागणी मान्य केली नाही. म्हणून तक यांना नुकसान भरपाई मानसिक शारीरिक त्रास व तक्रारीचा खर्च असा एकूण रु.75,000/- विप कडून अर्जदारास देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
विप क्र.1 यांना सदर तक्रारी संदर्भात नोटीस पाठवली असता त्यांनी दि.11/05/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
विप क्र.1 हे बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात व त्यांनी विप क्र. 2 कडून सिलबंद बियाणे अर्जदारास विक्री केलेली आहेत. उगवण शक्तीची संपूर्ण जबाबदारी ही विप क्र. 2 ची आहे म्हणून सदरचा अर्ज विप क्र. 2 विरुध्द करावा असे नमूद केले आहे;
विप क्र.2 यांना सदर तक्रारी संदर्भात नोटीस पाठवली असता त्यांनी दि.09/06/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
विप चा से वितृतपणे दाखल झालेला असून त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेला तपासणी अहवाला संदर्भात आक्षेप दाखल घेतलेला असून त्यामध्ये पाहणी समीतीने पाहणी दिवशी किंवा पाहणीपुर्वी हजर राहण्यास सुचना दिलेली नाही. पेरणी पुर्वी आवश्यक ओलावा जमीनी मध्ये होता का याबाबत तक ने काही पुरावा वा नोंदी दिलेल्या नाहीत. मा. सर्वाच्च न्यायालयाच्या निष्कर्षानुसार शेतकरी हा बियाणांची किंमत मिळण्यास पात्र आहे तक्रारदाराचे बियाणांच्या संदर्भातील आक्षेप विप ने अमान्य केले आहेत. मशागत व त्यासाठी झालेला खर्च व त्याचे उत्पादन निघणे हे अनुकूल नैसर्गीक परीस्थितीवर अवलंबून आहे. मात्र उस्मानाबाद परिक्षेत्रात कमी पाऊस होऊन प्रतीकुल परीस्थितीत निर्माण झालेली असल्यामुळे न झालेल्या उत्पादनाची जबाबदारी विप वर येत नाही. क्षेत्राबाबत केलेली पाहणी ही विप क्र.1 यांच्या अनूपस्थितीत केली असल्यामुळे सदर पाहणी अहवाल विप ने अमान्य केला आहे. तक यांनी उत्पन्नाची दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीस धरुन नाही. शेतक-यांना दिलेल्या सुचनेत कलम 5 मध्ये बियाणे हळूवार हाताळावे, ओल कशी पहावी, कलम 10 मध्ये शक्यतोवर 15 जुलै पर्यंत पेरणी संपवावी अशा प्रकारच्या दिल्या आहेत. सदर माहितीचे परिपत्रक सोबत बियाणांची दिलेली माहिती पुरावा म्हणून वाचावी असे म्हणणे दिलेले आहे. सबब प्रतिकुल हवामान, पेरणी योग्य ओलावा नसतांना पेरणी केल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले असून त्यामध्ये बियाणांचा दोष नाही असे म्हणणे दिलेले आहे.
तक्रारदाराची तक्रार निष्कर्षासाठी बियाणांचे व त्या अनुषंगाने झालेले आर्थिक नुकसानीचे आहे. या संदर्भात तक्रारदाराची तक्रार यांनी दाखल केलेले म्हणणे विप यांनी दाखल केलेले म्हणणे तसेच उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार केला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर दिली आहेत.
मुद्दा उत्तरे
1) तक हे विप चे ग्राहक आहेत काय ? होय.
2) विप हे तक्रारदार यांचे सेवा पुरवठादार आहे काय ? होय.
3) बियाणे दोषयुक्त आहे काय ? होय.
4) विप ने दोषयुक्त बियाणांचा पुरवठा केला आहे काय ? होय.
5) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय होय? होय.
6) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा.
मुद्दा क्र.1 व 2 :
तक्रारदाराची तक्रार ही मुख्यत: दोषयुक्त बियाणांचा पुरवठा विप यांनी केलेला असल्याने झालेल्या नुकसानीबाबत आहे. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या पावत्यांच्या अनुषंगाने विप क्र. 1 कडून त्याने बियाणे खरेदी केलेले दिसुन येते. तसेच सदरचे बियाणे हे विप क्र. 2 ने उत्पादीत केलेले असून ते त्यांनी ही अमान्य केलेले नाही; त्यामुळे तक्रादाराचे विप क्र.1 व 2 शी ग्राहक व सेवा पुरवठादार हे नाते प्रस्थापित होण्यास काही अडचण नाही. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होय असे देतो.
मुद्दा क्र.3 ते 5: तक्रारदाराची तक्रार या न्याय मंचात दाखल झाल्यानंतर कलम 13 सी अन्वये दोषयुक्त बियाणांचे नमूने घेऊन या न्यायमंचाकडे तक्रारदाराने दाखल करणे आवश्यक होते. मंचाने तशी विचारणा केल्यावर तक्रारदाराचे विधीज्ञाने तक कडे तसे काही उपलब्ध नसल्याबाबत तोंडी सांगितले त्यामुळे उपलब्ध कागदपत्र व उपलब्ध अहवालाव्दारे न्यायनिर्णय करणे या न्याय मंचास भाग आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये वर उपविभागीय अधिकारी भुम यांचा अहवाल दाखल केलेला आहे. त्याचे परिक्षण केले असता अहवालमध्ये मुद्दा क्र.13 मधील माहिती ज्यामध्ये बियाणे नमुनेबाबत व वाणाबाबत उल्लेख आहे तो अर्धवट अवस्थेत भरलेला दिसुन येतो. सदरचा अहवाल हा तालूका तक्रार निवारण समीतीचा क्षेत्रीय भेटीचा शेतीला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीचा व प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहणीचा अहवाल असल्याने तो अत्यंत महत्वाचा व या प्रकरणाच्या न्यायनिर्णयात महत्वाचा पुरावा आहे. परंतु विभागीय कृषी अधिकारी यांनी अत्यंत बेजबाबदारी व निष्काळजीपणे सदरचा अहवाल दिलेला आहे. सदर अहवाल हा बियाणे निर्दोष असल्याबाबत किंवा दोषयुक्त असल्याबाबत स्पष्ट अहवालातला मुद्दा क्र.2 करु शकत नाही. फक्त अनुक्रमांक 10 वर तक्रार शक्तीबाबत असल्यास कमी उगवणीचे कारण बियाणे दोष यावर टिक मार्क केलेली आहे. परंतू निर्णय व निष्कर्ष अथवा तांत्रिक अनुक्रमांकाचा मुद्दा अजिबात नमूद केलेला नाही. त्यापुढेच विप म्हणतात त्याप्रमाणे कार्यकारी तालूका स्तरीय निवारण समीती हीने जागेवर जाऊन पंचनामा केला किंवा नाही याबाबत शंका निर्माण होण्यास जागा निर्माण झाली आहे. तालूका कृषी विकास समीती यांची फेररचना झालेली असून उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष तर कृषी अधिकारी पंचायत समीतीचे (संबंधीत तालूका) हे सदस्य सचीव असल्याबाबत दि.02/02/2015 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. सदरचा शासकीय निर्णय हा 2013 चा आहे. त्यामध्ये उपविभागीय हे अधिकारी अध्यक्ष असल्याचे दिसुन येते तसेच परीपत्रकातील मुद्दा क्र.3 मध्ये (शेतक-यांकडे खरेदीची पावती) उपलब्ध आहेत यांची खात्री करावी, विहीत पत्रामध्येच पंचनामा करण्यात यावा व तत्काळ पंचनामा प्रत शेतकरी तसेच कंपनी प्रतिनीधी यांना देण्यात यावा. तक्रारदारास तक्रार असलेल्या बियाणांच्या लॉटचा क्रमांक घेऊन अधिसुचीत असलेल्या प्रयोगशाळेतून त्यांची तपासणी करुन घ्यावी असेही स्पष्ट निर्देश आहेत. असे मार्गदर्शक सुचना असतांनाही विप ने याबाबत योग्य ती प्रक्रिया पार पाडलेली दिसुन येत नाही. तक्रारदाराच्या क्षेत्रात बियाणांची सदोष असल्याचेबाबत स्पष्ट निर्वाळा तालूका कृषी अधिकारी कळंब यांनी दिलेला दिसुन येतो. त्यानंतर तारीख 13/07/2014 चे म्हणणे तालूका कृषी अधिकारी यांनी दाखल केलेले आहे त्यामध्ये बियाणे कमी उगवून झालेल्या शेतक-यांचे नुकसानीबाबत शेताचे पंचनाम्यां बाबत वरीष्ठांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात करण्यात आले. पंचनामा केला असता बियाणे दोषामुळे उगवण झालेली नाही असे निदर्शनास आलेले आहे. अर्थात कृषी विभागातील विभागीय कृषी अधिकारी किंवा तक्रार निवारण समीती यांनी ही सदरची तक्रार एकदम निष्काळजीपणे हाताळली असून सदोष बियाणामुळे उत्पादन न येणे यामुळे झालेले आर्थीक नुकसान तसेच या शासकीय यंत्रणांनी अहवाल दाखल करण्यास लावलेली दिरंगाई, तक्रारदाराच्या शेताच्या पीकपाहणी अहवालामधील अस्पष्टता यामुळेसुध्दा शेतक-यांचे आर्थिक व मानसिक नुकसान केलेले आहे याबाबत आमचे दुमत नाही. म्हणून आम्ही मुद्दा क्र.3, 4 व 5 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
3) अध्यक्ष ता. स्तरीय तक्रार निवारणसमिती तथा उपविभागीय अधिकारी भुम यांनी वेळेवर व उचित स्वरुपात व विहित नमून्यात अहवाल त्वरीत करुन दिला असता तर तक्रारदारास दूबार पेरणी करता आली असती पंरतू तक्रारदाराच्या शेतातील पंचनामा हा कोणत्या तारखेस केला हे स्पष्ट न झाल्यामुळे अहवालास उशिरच केला असे म्हणण्यास वाव आहे त्यामुळे त्यांच्या या बेजबाबदार निष्काळजीपणाची योग्य ती दखल घेऊन वरीष्ठ कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करावी.
नुकसान भरपाईचे विष्लेशन :
सोयाबीन उतारा हा भारी जमीनीमध्ये एकरी 10 पोती तर हलक्या जमीनीमध्ये 06 पोती असा येतो याचा अर्थ सरासरी कमीत कमी एकरी उत्पन्न 8 पोती अपेक्षित धरली व शासनाची किमान हमी मुल्य रु.2,500/- व बाजारभावातील सरासरी भाव रु.3,500/- मान्य केला असता प्रती क्विंटल रु.3,000/- हा भाव नुकसानीचे मुल्यांकन करतांना योग्य वाटतो. त्यामुळे एकरी उत्पन्न रु.24,000/- येते. यातून काढणीचा खर्च रु.3,000/- एकरी वजा केले तर निव्वळ उत्पन्न रु.21,000/- हा निश्चीतपणे शेतक-याला निव्वळ उत्पन्न अखेर मिळाले असते म्हणजेच तक यांना 40 आर मध्ये जमीनीतील उत्पन्न रु.21,000/- मिळणे आवश्यक होते. तथापि 11 टक्के उत्पन्न त्याला या पुर्वीच मिळालेले आहे ती रक्कम रु.2,310/- होते म्हणून रु.21,000/- मधून रु.2,310/- वजा जाता एकूण रक्कम रु.18,690/- एवढी रक्कम तक्रारदार मिळण्यास पात्र आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) विप क्र.1 व 2 यांनी रु.18,690/- (रुपये अठरा हजार सहाशे नव्वद फक्त) एकटयाने किंवा संयुक्तरित्या तक्रारदारास द्यावे.
वरील हिशोबातील रकमेव्यतरिक्त जर काही रक्कम विप ने तक ला यापुर्वी दिली असेल तर ती रक्कम या अंतीम देय रकमेतून वजा करुन उर्वरीत रक्कम तक स देय राहील.
3) विप क्र.1 व 2 यांनी एकट्याने किंवा संयुक्तिकरित्या रु.3,000/- (रुपये हजार फक्त) तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी तक्रारदारास देण्यात यावी.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद