(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले विकासक व बिल्डर्स यांचे विरुध्द सदनिका खरेदी पोटी एकुण किमतीच्या 50% पेक्षा जास्त रक्कम भरणा करुनही नोंदणीकृत सदनिका खरेदी खत करार करुन ताबा दिलेला नसल्याचे कारणास्तव प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ता. 06/07/2013 रोजी सदनिकेचे बुकींग केले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये नोटरी समक्ष साक्षांकित करारानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मौ. बांपगाव ग्रामपंचायत, ता. कल्याण, जि. ठाणे येथील रक्कम रु. 6,70,000/- किमतीची सदनिका विकत घेण्याचे निश्चित केले.
3. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वेळोवेळी सदनिकेचे नोंदणीकृत करण्यासाठी व सदनिकेचा ताबा प्राप्त होण्यासाठी तोंडी विनंती केली, या संदर्भात सामनेवाले यांना तक्रारदार यांनी वकीलामार्फत दोन वेळा कायदेशीर नोटीस पाठवली सामनेवाले यांनी सदर नोटीस प्राप्त होवुनही तक्रारदार यांच्या नोटीशीला उत्तर दिले नाही. सबब तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रारदारांनी सदनिका खरेदीपोटी रक्कम रु. 3,75,000/- सामनेवाले यांचेकडे जमा करुनही सामनेवाले यांनी इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन सदनिकेचा ताबा दिला नाही अथवा तक्रारदारांना सदर रक्कम परत दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
5. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिले तसेच त्यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही. त्यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबत मंचाने आदेश पारीत केला.
6. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदारांनी त्यांचे लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशर पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढीत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी तक्रारदारांकडून रक्कम स्विकारुनही सदनिकेचा ताबा न देऊन अथवा सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम परत न देऊन तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2. | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
7. कारणमिमांसा
अ. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ता. 06/07/2013 रोजी झालेले कायम स्वरुपी विक्रीचे साठेखत नोटरी समक्ष साक्षांकित केले आहे. सदर कराराची प्रत मंचात दाखल आहे.
ब. वरील ता. 06/07/2013 रोजीच्या करारनाम्यामध्ये नमुद केल्यानुसार मौ. देवरुंग ग्राम पंचायत बापगाव भुमापन क्र. 71, भुमापन क्र. 6, क्षेत्र 0-20-0 हे आर ता. भिवंडी, जि. ठाणे येथील मिळकतीतील सिधदी विनायक होम्स खोली क्र. 1, क्षेत्रफळ 5 चौ.फुट व रक्कम रु. 6,70,000/- किमतीची खोली विकत देण्याचे सामनेवाले यांनी मान्य व कबुल केले आहे.
क. तक्रारदार यांनी सदर खोली खरेदी पोटी सामनेवाले यांना रक्कम रु. 3,35,000/- अदा केल्याचे सदर करारामध्ये नमुद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर खोली खरेदीपोटी रकमा अदा केल्याबाबतच्या सामनेवाले यांनी दिलेल्या पावत्या खालील प्रमाणे मंचात दाखल आहे.
अनु.क्र | पावती क्र. | तारीख | रक्कम | तपशील |
1 | 1294 | 06/07/2013 | 20,000/- | चेकद्वारे |
2 | - | 10/03/2013 | 25,000/- | रोख |
3 | 1211 | 18/05/2013 | 90,000/- | चेक/डीडी |
4 | - | 11/04/2013 | 1,00,000/- | चेक |
5 | 69 | 27/02/2015 | 40,000/- | चेक |
6 | 126 | 23/06/2013 | 1,00,000/- | चेक/डीडी |
| | एकुण | 3,75,000/- | |
वर नमुद पावत्या नुसार तक्रारदार यांनी सदर खोली खरेदी पोटी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु. 3,75,000/- जमा केल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
उ. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे ता. 25/11/2014 रोजीचे पत्राची प्रत मंचात दाखल केली आहे. सदर पत्रानुसार सामनेवाले यांचे दोन्ही डायरेक्टर यांनी ता. 25/11/2014 पासून 3 महिन्यात म्हणजेच ता. 25/02/2015 पर्यंत खोलीचा ताबा देण्याचे मान्य व कबुल केले आहे.
इ. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी खोलीच्या एकुण रकमेपैकी 50% पेक्षा जास्त रक्कम स्विकारुनही खोलीचे खरेदीखत नोंदणीकृत करुन ताबा दिला नाही. सामनेवाले यांनी ता. 25/11/2014 रोजीच्या पत्राप्रमाणे खोलीचा ताबा ता. 25/02/2015 पर्यंत न दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता. 01/12/2016 वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवुन ठरल्याप्रमाणे सामनेवाले यांनी कार्यवाही न केल्याने खोली खरेदीपोटी जमा असलेल्या रकमेची 12% व्याजदराने मागणी केली. सदर नोटीसीची प्रत मंचात दाखल आहे.
ई. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले यांनी खोली खरेदीपोटी मोठयाप्रमाणावर रकमा स्विकारुनही खोलीचा ताबा नोंदणीकृत खरेदीखतासह देवुन त्रृटीची सेवा दिल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
उ. सामनेवाले यांनी खोली खरीदी पोटी तक्रारदार यांच्याकडुन मोठ्या प्रमाणावर रकमा स्विकारुनही खोलीचा ताबा न देवुन अथवा तक्रारदार यांचा (Hard earned money) कष्टाचा पैसा परत न देवुन त्रृटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. सन 2013 नंतरच्या कालावधीत नवीन मिळकतीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन तक्रारदार यांचा 06/07/2013 पासून सामनेवाले यांचेकडे जमा असलेला पैसा परत न दिल्याने त्यांना नविन खोली घेणेही शक्य नाही. अशा प्रकारे सामनेवाले यांनी दिलेल्या त्रृटीच्या सेवेमुळे तक्रारदार यांचे कधीही भरुन न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे.
ऊ. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन खोली खरेदी पोटी रक्कम रु. 3,75,000/- स्विकारुन ता. 06/07/2013 रोजीच्या विक्री करारानाम्यानुसार खोलीचा ताबा दिलेला नसल्याचे तक्रारीतील पुराव्यावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडुन खोली खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम व्याजासहित परत मिळण्यासाठी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे खोली पोटी जमा केलेली रक्कम रु. 3,75,000/- त्यांना सामनेवाले यांनी ता. 06/07/2013 पासून आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे व्याजदरासह परत देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
ए. वरील परिस्थिती नुसार तक्रारदार यांचा पुरावा मान्य करण्यास कोणताही कायदेशीर अडचण दिसुन येत नाही असे मंचाचे मत आहे.
8. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
1. तक्रार क्र. 53/2017 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना कायम स्वरुपी विक्रीचे साठेखतानुसार खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांनी खोली खरेदीपोटी सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु. 3,75,000/- (तीन लाख पंच्चाहत्तर हजार फक्त) ता. 06/07/2013 पासून द.सा.द.शे 12% व्याजदराने दि. 01/08/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 02/08/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 15% व्याजदराने दयावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाकरीता रक्कम रु.20,000/- (अक्षरी रु. वीस हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) दि. 01/08/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत रक्कम अदा न केल्यास दि. 02/08/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजदराने दयावी.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.