जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १५८/२०११
तक्रार दाखल दिनांक – १२/०८/२०११
तक्रार निकाली दिनांक – २८/११/२०१३
श्री.सुनिल मधुकर बडगुजर ----- तक्रारदार.
उ.व.३२, धंदा- नोकरी
राहणार-४२/२८, मुक्ताईनगर,
ता.जि.जळगांव - ४२५००१
विरुध्द
(१)सिध्दीविनायक फ्रेट (Freiqnt)प्रा.लि. ----- सामनेवाले.
म.प्रोप्रायटर साो.
मुख्य कार्यालय-पहिला मजला,श्रीराम कॉम्प्लेक्स,
लोकमत कार्यालयाच्या वर,साक्रीरोड,जि.धुळे
(२)महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ,ता.जि.रत्नागिरी
विभागिय अधिकारी साो.
(३)महा.राज्य परिवहन मंडळ.
म.विभागीय अधिकारी साो.ता.जि.जळगांव.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.एस.ए.पंडीत)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – स्वत:)
(सामनेवाले क्र.३ तर्फे – वकील श्री.एस.बी.पाटील)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी सदोष सेवा दिल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मित्राचा रत्नागिरी येथे फळ विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांना लग्न कार्यासाठी आंब्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी रक्कम रु.४,०००/- किमतीचे आंबे हे रत्नागिरीहून जळगांव येथे पाठविण्याकामी तक्रारदार यांच्या मित्राला रु.८००/- अदा केले. तक्रारदार यांच्या मित्राने सदर आंबे हे दि.१३-०५-२०१० रोजी सामनेवाले यांच्यामार्फत रत्नागिरीहून जळगांव येथे पाठविले आहेत. त्यासाठी आवश्यक ती फी सामनेवाले यांना अदा केली आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या सदर आंब्याच्या पेटया या जळगांव येथे आलेल्या नसल्याने, त्याकामी सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांनी तक्रार नोंदविली आहे. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. सामनेवाले यांनी आंबे हे नाशवंत असून त्यांची वाहतूक व डिलेव्हरी तत्परतेने होणे आवश्यक आहे याची जाणीव असून सुध्दा, निष्काळजीपणा दाखवून तक्रारदारांचे नुकसान केलेले आहे. या प्रमाणे सामनेवालेंच्या सेवेत दोष व अपूर्णता आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सदर तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराला आंब्याची किंमत व वाहतुकीसाठी अदा केलेली एकूण रक्कम रु.४,८००/- द्यावेत व पुन्हा आंबे विकत घेण्याकामी आलेल्या खर्चापोटी रु.४,८००/- द्यावेत. तसेच सदर चौकशीकामी आलेला खर्च रु.५,०००/-, मानसिक व शारीरिक त्रासाकामी रु.२५,०००/- व सदर अर्जाचा खर्च रु.५,०००/- हे द.सा.द.शे.१८ टक्के व्याजाने अदा करावेत.
तक्रारदार यांनी या कामी शपथपत्र नि.नं.३ वर तसेच नि.नं.५ वर दस्तऐवज दाखल केले असून, त्यात पार्सल पेड, गाडीत जाणा-या मालाची यादी, कॅश मेमो व पत्रव्यवहार दाखल केले आहेत.
(३) सामनेवाले क्र.१ यांनी लेखी खुलासा दाखल करुन सदरचा तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी सदर आंबे त्यांच्या मित्रामार्फत रत्नागिरीहून जळगांवला पाठविले होते. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्याचा तक्रारदार यांना अधिकार नाही. सबब तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. या अर्जात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पार्सल कुरीअर वाहतूकीकरिता मे.जोशी फ्रंट कॅरीअर्स यांची अधिकृत परवानाधारक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना या कामी आवश्यक पक्षकार म्हणून सामिल केलेले नाही. सामनेवाले ही कंपनी असल्याने प्रोप्रायटर यांचा काही एक संबंध नसून, प्रोप्रायटरला जाणून बुजून सामिल केलेले आहे. या कारणाने सदर तक्रार रद्द करावी. तसेच तक्रारीतील नमूद व्यवहार हा रत्नागिरी येथे झालेला आहे व सदर आंबे धुळे येथे मागविण्यात आलेले नव्हते. या कारणाने या मंचास न्यायनिवाडा देण्याची न्यायकक्षा नाही. तक्रारदारातर्फे त्यांच्या मित्राने सदर आंबे रत्नागिरी ते जळगांव येथ पाठविलेले आहेत हे म्हणणे खोटे असून इतर सर्व मजकूर नाकारला आहे.
सामनेवालेंच्या अर्जातील कलम १० मध्ये असे नमूद आहे की, त्यांच्या मित्राने रक्कम रु.४,०००/- चे आंबे पाठविले नव्हते. ते फक्त रक्कम रु.१,०००/- चे होते व ते खराब होते. त्यामुळे तक्रारदाराने आंबे स्वीकारले नाहीत. त्या बाबत तक्रारदाराच्या मित्रास कळविण्यात आले आहे. या कारणाने सदर तक्रार दाखलपात्र नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(४) सामनेवाले क्र.१ यांनी लेखी खुलासा दाखल करुन सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे या सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी या सामनेवालेंशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. तक्रारदाराने रत्नागिरी येथील मित्राकडून आंबे खरेदी केले व त्याकामी ट्रान्सपोर्टसाठी पैसे अदा केले, यामुळे तक्रारदारांनी या मित्रास आवश्यक पक्षकार सामिल केलेले नाही. तक्रारदार यांनी आंबे हे व्यापारी कारणासाठी मागविलेले असल्याने, सदरची तक्रार टेनेबल नाही. सदर आंबे हे रत्नागिरी येथे खरेदी केले असून ते जळगांव येथे पोहोच करावयाचे होते त्यामुळे या मंचास कार्यक्षेत्र नाही. सबब या महामंडळाचे विरुध्द तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज रद्द करुन खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले क्र.२ यांनी, त्यांचे जावक क्र.५०३१ दि.१४-०९-२०११ चे पत्र पोष्टाद्वारे मंचात दाखल केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, “तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली असून चौकशी अंती खुलासा प्राप्त होताच खुलासा सादर करण्यात येईल”. परंतु त्यानंतर अद्यापही त्यांनी खुलासा दाखल केलेला नाही. सबब सामनेवाले क्र.२ यांचे विरुध्द “नो-से” आदेश करण्यात आला आहे.
(६) तक्रारदार व सामनेवाले क्र.३ यांचा युक्तिवाद ऐकला. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले कागदपत्र पाहता आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले क्र.१ यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय |
(क) तक्रारदार हे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार श्री. सुनिल बडगुजर यांनी आंबा खरेदी केल्याची पावती नि.नं.५/३ वर दाखल केली आहे. या पावतीप्रमाणे तक्रारदार यांनी दि.११-०५-२०१० रोजी हापूस आंबा पेटी ४ डझनाचे ४ नग प्रत्येकी रु.१,०००/- प्रमाणे एकूण रक्कम रु.४,०००/- हे जय जगतगुरु ट्रेडर्स रत्नागिरी यांच्याकडून खरेदी केल्याचे दिसत आहे. सदर आंबे हे रत्नागिरीहून जळगांव येथे पाठविण्याकामी तक्रारदाराने त्यांच्या मित्रास सदर आंबे पोहोच करण्याकामी सामनेवाले क्र.१ यांना ट्रान्सपोर्ट फी अदा केली आहे. सदर ट्रान्सपोर्ट केल्याची पावती नि.नं.५/१ वर दाखल आहे. सदर पावतीवर माल घेणारा या रकान्यात “सुनिल बडगुजर” तक्रारदारांचे नांव आहे व माल पाठविणारा या रकान्यात तक्रारदारांचे मित्र “पुष्कर सुर्वे” यांचे नांव लिहिलेले असून यामध्ये ४ नग आंबा पेटी रु.४,०००/- किमतीचे रत्नागिरीहून जळगांव येथे पोहोच करण्याकामी भाडे रक्कम रु.८,००/- जमा केलेले दिसत आहे. सदर पावतीवर सामनेवाले सिध्दी विनायक फ्रंट प्रा.लि.धुळे असे नांव नमूद आहे. या पावती प्रमाणे असे दिसते की, तक्रारदार यांनी रत्नागिरीहून आंबे खरेदी केलेले असून सामनेवाले क्र.१ यांच्या मार्फत आंबे रत्नागिरी ते जळगांव येथे पोहोच करावयाचे आहेत व त्याकामी आवश्यक ती फी तक्रारदाराने त्यांचे मित्रामार्फत जमा केलेली आहे. त्याकामी दाखल केलेल्या पावतीवर तक्रारदारांचे नांव आहे. या दोन्ही पावत्यांवरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी आंबे खरेदी करुन ते त्यांच्या मित्रा मार्फत जळगांव येथे पोहोच करण्याकामी सामनेवाले क्र.१ यांच्याशी व्यवहार केलेला आहे. यावरुन तक्रारदार हे या सामनेवालेंचे “ग्राहक” झालेले आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी खरेदी केलेले आंबे हे सामनेवाले क्र.१ यांचे मार्फत रत्नागिरीहून जळगांव येथे पाठवावयाचे आहेत. परंतु सदर आंबे हे नमूद पत्त्यावर पोहोच झालेले नाहीत. त्याकामी तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्रव्यवहार नि.न. ५/४ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना सदर आंबे पोहोच न होण्याकामी नुकसान भरपाईची मागणी केलेली दिसत आहे. या पावतीवरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी खरेदी केलेले आंबे हे सामनेवाले क्र.१ यांच्यावर जळगांव येथे पोहोच करण्याची जबाबदारी होती. परंतु सदर आंबे हे सामनेवाले क्र.१ यांनी पोहोच केलेले नाहीत.
या कामी सामनेवाले क्र.१ यांनी असा बचाव घेतला आहे की, सदर आंबे हे सामनेवाले क्र.१ तर्फे रत्नागिरीहून जळगांव येथे पाठविण्यात आले होते. परंतु नमूद व्यवहार हा रत्नागिरी येथे झालेला असल्याने या मंचास अधिकार क्षेत्र नाही. याकामी आमचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.१ यांच्या मार्फत तक्रारदार यांनी आंबे पाठविलेले आहेत. सदर सामनेवाले क्र.१ यांचे दाखल केलेल्या पावतीवरुन धुळे येथे कार्यालय आहे. याचा विचार होता सदर मंचास ही तक्रार दाखल करुन घेण्याचे कार्यक्षेत आहे.
त्यानंतर सामनेवाले क्र.१ यांनी सदर तक्रार अर्ज केवळ नाकारला आहे. परंतु कलम १० मध्ये असे नमूद केले आहे की, “तक्रारदार यांच्या मित्राने रक्कम रु.४,०००/- चे आंबे पाठविले नव्हते ते फक्त रक्कम रु.१,०००/- चे होते व ते खराब होते, त्यामुळे तक्रारदाराने ते आंबे स्वीकारले नाहीत…”. या कलमाप्रमाणे असे दिसते की, सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्ट द्वारे आंबे जळगांव येथे पोहोच करण्याकामी करार केलेला आहे. सदर आंबे हे रु.४,०००/- किमतीचे होते असे पावतीवरुन स्पष्ट झाले आहे. परंतु सदर आंबे खराब होते असे सामनेवालेंचे म्हणणे आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे सदर आंबे हे केवळ नमूद पत्त्यावर पोहोच करुन त्याकामी तक्रारदार यांची पोहोच पावती घेणे आवश्यक होते. सदर आंबे खराब असणे या बाबत सामनेवाले हे जबाबदार असू शकत नाहीत. यावरुन आंबे हे नमूद पत्त्यावर पोहोच करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांनी स्वीकारलेली असून, ते त्यांनी योग्य वेळेत पोहोच केलेले नाहीत हे सिध्द होत आहे. याचा विचार करता तक्रारदार यांना होणा-या नुकसानीस सामनेवाले क्र.१ हे जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. यावरुन सामनेवाले क्र.१ यांच्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदर आंबे तक्रारदार यांना लग्नकार्यासाठी वापरावयास हवे होते व ते वेळेत न मिळाल्याने निश्चिचत तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे सदर आंबे खरेदी करण्याकामी व ट्रान्सपोर्ट करणेकामी आलेल्या खर्चाचे भरपाईस सामनेवाले हे जबाबदार आहेत. सदर नुकसान भरपाई वेळेत न मिळाल्याने तक्रारदारांना या मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. याचा विचार होता सामनेवाले क्र.१ हे, आंबे खरेदी करणेकामी असलेली रक्कम रु.४,०००/- व वाहतूकीचे खर्चाकामी फी रु.८,००/-, मानसिक त्रासाकामी रु.१,०००/- व अर्जाचा खर्च रु.५००/- तक्रारदारास देण्यास जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) सदर दाखल केलेल्या पावतीप्रमाणे आंबे तक्रारदार यांनी रत्नागिरीहून जळगांव येथे पाठविण्याकामी सामनेवाले क्र.१ यांच्याशी करार केलेला आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ व ३ यांच्याबरोबर आंबे पाठविण्याबाबत करार केलेला दिसत नाही. त्यामुळे नमूद पत्त्यावर आंबे पोहोच करण्याची जबाबदारी तक्रारदारातर्फे सामनेवाले क्र.२ व ३ यांनी स्वीकारलेली नाही हे स्पष्ट होते. आंबे पोहोच करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांच्यावर असल्याने, सामनेवाले क्र.२ व ३ हे त्यास जबाबदार होऊ शकत नाही असे आमचे मत आहे. याचा विचार होता सामनेवाले क्र.२ व ३ यांच्या सेवेत त्रुटी नाही.
(११) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व कारणांचा, दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांचा तक्रार अर्ज योग्य व रास्त आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले क्र.२ व ३ यांचे विरुध्दचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(क) सामनेवाले क्र.१ यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना आंब्याची किंमत व वाहतूकीसाठी अदा केलेली रक्कम असे एकूण रक्कम ४,८००/- (अक्षरी रुपये चार हजार आठशे मात्र) द्यावेत.
(२) तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रुपये पाचशे मात्र) द्यावेत.
(ड) उपरोक्त आदेश कलम “क” मधील नमूद रक्कम मुदतीत परत न केल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले क्र.१ जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांकः २८/११/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)