(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 08 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्तीच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ती ही मच्छिंद्रनाथ हातमाग विणकर सहकारी संस्था मर्यादीत या संस्थेचे अध्यक्ष असून ही संस्था गरीब व कुशल कारागीरांची कापड विणणारी संस्था असून, सदर विणलेले कापड विकून कारागीर आपला उदरनिवार्ह करतात. विरुध्दपक्ष हे ट्रान्सपोर्ट या क्षेत्रातील असून ते आपल्या परिवहनाव्दारे ग्राहकांचे सामान, माल किंवा वस्तु आवश्यक शुल्क आकारुन नियोजीत स्थळी पोहचविण्याचे काम करतात.
3. सदर प्रकरणातील विवादीत हातमाग सुती कापडाचे सात बंडल (निशाणी क्र.2) वर दाखविल्याप्रमाणे तक्रारकर्तीने श्री कृष्णा बोकडे, मच्छिंद्रनाथ हातमाग विणकर सहकारी संस्था मर्यादीत, धुळे यांचेकडे यांचेकडे पाठविण्याकरीता विरुध्दपक्षाकडे दिनांक 28.12.2010 रोजी रुपये 1,150/- शुल्क देवून बुकींग केली होती. त्याबद्दलची पावती क्रमांक L.R.No.3100110530 ही निशाणी क्र.1 वर दाखल केली आहे. या कापडाच्या सात बंडलाची एकूण किंमत रुपये 1,46,850/- इतकी होती. विरुध्दपक्षाने सुती कपडाच्या सात बंडल पैकी पाच बंडल दिनांक 31.12.2010 रोजी संबंधीत व्यक्तीला पोहचविले. सदर पाच बंडल उतरविण्याकरीता त्यांना रुपये 60/- शुल्क आकारण्यात आले होते, त्याबाबतची पावती देण्यात आली होती. या पावतीवर नमूद असल्याप्रमाणे पाच डाग विरुध्दपक्षाच्या धुळे कार्यालयात उतरविण्यात आल्याचे निशाणी क्र.3 वरुन स्पष्ट होते व सदर पावतीवरुन केवळ पाच डाग धुळे येथे उतरविल्याचे स्पष्ट होते.
4. सदर घटनेची चौकशी करुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला दिनांक 3.1.2011 ला पत्र पाठवून निशाणी क्र.4 वर नमूद असल्याप्रमाणे न पोहचलेल्या किंवा गहाळ झालेल्या दोन कापडाच्या (साडीचे) बंडलाच्या किंमतीची मागणी केली. तक्रारकर्तीने दिलेल्या देयकावरुन दोन बंडलाची किंमत रुपये 63,000/- अशी आहे. त्यानंतर, तक्रारकर्तीने पुन्हा दिनांक 19.1.2011 रोजी विरुध्दपक्षाला पत्र पाठवून दोन बंडलाची किंमत रुपये 63,000/- ची मागणी केली.
5. वारंवार पत्र पाठवूनही व प्रत्यक्ष संपर्क साधुनही विरुध्दपक्ष तक्रारकर्तीच्या गहाळ झालेल्या बंडलाचा शोध घेत नाही व त्या बंडलाची किंमतही तक्रारकर्त्याला देत नाही. त्यामुळे, तक्रारकर्तीच्या साड्याचे बंडल न मिळाल्याने नुकसान होत आहे व उलटपक्षी विरुध्दपक्षाच्या हलगर्जीचा नमुना म्हणजे त्याने तक्रारकर्तीस पाठविलेले पत्र निशाणी क्र.6 मध्ये म्हटल्याप्रमाणे विरुध्दपक्षाच्या धुळे कार्यालयातील त्याच्या ग्राहक निवारण विभागाकडून पाठविलेल्या तक्रारी संदर्भातील माहिती आहे. त्यात त्याने अन्य एका त्रयस्थ नांदेड येथील संस्थेला त्याच्या दोन डागा हरविल्या आहे व त्याचा तपास करण्यात येत आहेत, अशा आशयाचा मजकुर नमूद आहे. त्यामुळे, तक्रारकर्तीने खालील प्रामणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाच्या चुकीमुळे गहाळ झालेले दोन साड्याचे बंडलाची किंमत रुपये 63,000/- तक्रारकर्तीला देण्याचा आदेश करण्यात यावा.
2) विरुध्दपक्षाला बुकींग बाबत दिलेल्या रकमेतून दोन गहाळ झालेल्या बंडलाचे शुल्क तक्रारकर्तीस परत मिळावे.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक, व आर्थिक नुकसानीबाबत रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- मागितला आहे.
6. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष यानी आपले लेखी बयाण दाखल करुन नमूद केले की, प्रस्तुत तक्रार ही मंचाचे न्यायकक्षेत येत नसल्याने सदर तक्रार ही मंचाचे अधिकार क्षेत्रात नाही. दोन्ही पक्षास मान्य असलेल्या अटी व शर्तीनुसार केवळ धुळे येथील न्यायालयात ही तक्रार, तसेच दोन्ही पक्षातील वाद चालविण्याकरीता योग्य मंच आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाचे ग्राहक नव्हती, कारण दोघांमधील व्यवहार हा पूर्णतः व्यावहारीक होता त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही खारीज करण्यात यावी.
7. विरुध्दपक्ष हे मान्य करतो की, त्याचा पार्सल ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आहे. त्यांनी हे देखील मान्य आहे की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाची सेवा दिनांक 28.12.2010 ला धुळे येथे काही वस्तु पोहचविण्याकरीता घेतली होती. विरुध्दपक्षास हे देखील मान्य आहे की, तक्रारकर्तीने रुपये 1,150/- एवढी विरुध्दपक्षाकडे बुकींग शुल्क भरले होते. परंतु, हे स्पष्टपणे अमान्य केले की, पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये कापड होते व त्याची एकत्रित किंमत रुपये 1,46,850/- एवढी होती. तक्रारकर्तीने बुकींगचेवेळी पार्सलची किंमत उघड केली नव्हती. जर, तक्रारकर्तीने बुकींगचेवेळेस किंमत उघड केली असती तर विरुध्दपक्षाचे अटी व शर्ती नुसार तक्रारकर्तीस प्रत्येक रुपये 1000/- मागे रुपये 3/- प्रमाणे चार्ज भरावा लागला असता. मात्र, याच कारणामुळे तक्रारकर्तीने पाठविण्यात येणा-या बंडलची किंमत सांगितली नाही. तक्रारकर्तीस जी पावती देण्यात आली हाती, त्यामध्ये मालाची किंमत रुपये ‘शुन्य’ लिहिले आहे. तक्रारकर्तीचे हे म्हणणे नाकारण्यात येते की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास कळविले की त्यांना दोन बंडल कमी प्राप्त झाले व त्या गहाळ झालेल्या दोन बंडलाची किंमत रुपये 63,000/- अशी आहे. त्यामुळे, विरुध्दपक्षा तर्फे नमूद करण्यात आले की, त्याच्यातील आपसातील करारनाम्यातील शर्ती व अटीनुसार विरुध्दपक्ष क्र.2 गहाळ बंडल प्रकरणी केवळ रुपये 100/- देण्यास पात्र ठरु शकते. कारण, पाठविण्यात येणा-या मालाची किंमत विरुध्दपक्षास माहित नव्हती व विरुध्दपक्षास त्या सदर वस्तुची किंमत ठरविता येणे शक्य नाही. कारण, त्या वस्तुची किंमत बुकींग केलेल्या पावत्यावर लिहिण्यात आली नव्हती, तसेच परिवहन निगम यांच्या नियमाप्रमाणे कोणी वस्तुची किंमत जर रुपये 25,000/- चे वर असेल तर ती वस्तु परिवहन करण्यास विरुध्दपक्ष पात्र नाही व ही बाब तक्रारकर्तीस माहिती आहे व याच कारणावरुन तक्रारकर्तीने सदर वस्तुची त्या मालाची हेतुपुरस्परपणे बुकींग करतांना त्यावर मालाची किंमत नमूद केली नाही. त्यामुळे, प्रस्तुत कारणाकरीता विरुध्दपक्षास जबाबदार धरण्यात येऊ शकत नाही. तक्रारकर्तीचा एकमेव उद्देश न्यायालयाची दिशाभुल करणे व न्यायालयाची सहानुभुती संपादन करणे एवढेच आहे. विरुध्दपक्षास हे म्हणणे नाकबूल आहे की, सदर गहाळ दोन बंडलाची रक्कम रुपये 63,000/- एवढी आहे व त्यावर 12 % टक्के व्याज देण्यास जबाबदार आहे. त्यामुळे, प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
8. सदर प्रकरणात तक्रारकर्तीच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षास संधी मिळूनही युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेली तक्रार, लेखी बयाण, युक्तीवाद व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
9. तक्रारकर्ती ही मच्छिंद्रनाथ हातमाग विणकर सहकारी संस्था मर्यादीत या संस्थचे अध्यक्ष असून ही संस्था विणलेले कापड विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी हातमाग सुती कापडाचे सात बंडल श्री कृष्णा बोकडे, मच्छिंद्रनाथ हातमाग विणकर सहकारी संस्था मर्यादीत, धुळे यांचेकडे पाठविण्याकरीता विरुध्दपक्षाकडे दिनांक 28.12.2010 रोजी रुपये 1,150/- शुल्क देवून बुकींग केली होती. विरुध्दपक्षाने त्यासंबंधी पावती देखील तक्रारकर्त्यास दिली होती ती निशाणी क्र.3 नुसार दाखल दस्त क्र.1 वर दाखल केली आहे, त्यात नागपुर वरुन विणलेले कापडाचे सात बंडल पाठविल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यानंतर, दिनांक 31.12.2010 रोजी धुळे येथे केवळ पाच बंडल पोहचल्याचे डिलीवरी रसीदवर नमूद आहे, ती निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.3 वर दाखल आहे. यावरुन, दोन साड्याचे बंडल गहाळ असल्याचे निदर्शनास येते. परंतु, विरुध्दपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे हातमागचे कोणते बंडल किती किंमतीचे आहे हे तक्रारकर्तीने नमूद केले नव्हते. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्ष हे पार्सल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात व त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक रुपये 1,000/- च्या किंमतीच्या ट्रान्सपोर्टवर अतिरिक्त रुपये 3/- चार्ज आकारावा लागतो. परंतु, तक्रारकर्तीने मालाची किंमत उघड न केल्याने यासंबंधी कुठलीही किंमत विरुध्दपक्षास दिली नव्हती. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे जर वस्तुची किंमत रुपये 25,000/- चे वर असेल तर ती वस्तु परिवहन करण्याकरीता विरुध्दपक्ष पात्र नाही. कदाचीत या कारणास्तव तक्रारकर्तीने रसीदमध्ये नमूद केलेल्या मालाची किंमत ‘शुन्य’ अशी टाकली होती. विरुध्दपक्षाचे शाखा कार्यालय नागपुर येथे आहे त्यामुळे सदर घटनेचे कारण नागपुर मध्ये घडले असे म्हणावे लागेल, त्याकरीता धुळे येथील न्यायालयाचे अधिकारक्षेत्र येते अशी आवश्यकता नाही.
10. तक्रारकर्तीने सात बंडलाची किंमत निशाणी क्र.3 नुसार दाखल दस्त क्र.2 प्रमाणे रुपये 1,46,850/- व गहाळ दोन बंडलाची किंमत रुपये 63,000/- निशाणी क्र.3 नुसार पान क्र.8 वर दाखल आहे, परंतु त्यावर विरुध्दपक्षाची स्वाक्षरी नाही. त्यामुळे निश्चित रुपये 63,000/- चे बंडल गहाळ झाले असेल याचा ठोस पुरवा नाही. गहाळ झालेल्या बंडलाची अंदाजे किंमत रुपये 20,000/- असावी असे मंच गृहीत धरतो. परंतु, निशाणी क्र.3 वर दाखल डिलीवरी रसीदवर नमूद असल्याप्रमाणे केवळ पाच साड्याचे बंडल धुळे येथे पोहचल्याचे निश्चित होत आहे, याचाच अर्थ तक्रारकर्त्याचे दोन साड्याचे बंडल गहाळ झाले व तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षासोबत वारंवार चर्चा व पत्र व्यवहार करुनही त्याचे दोन साड्याचे बंडल आजतागायत वापस मिळाले नाही, यावरुन विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असल्याचे निदर्शनास येते. करीता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांचे चुकीमुळे गहाळ झालेले दोन साड्याचे बंडलाची किंमत रुपये 20,000/- तक्रारकर्तीस द्यावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळून रुपये 3,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 08/12/2017