नि. 22
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1951/2009
तक्रार नोंद तारीख : 03/07/2009
तक्रार दाखल तारीख : 13/07/2009
निकाल तारीख : 16/07/2013
----------------------------------------------
श्री र्इश्वरा महादेव माळी
रा.तानंग ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
सिध्देश्वर फॅब्रीकेशन
प्रोप्रा. श्री विजय एस.माळी
सांगली रोड, कवलापूर, ता.मिरज जि.सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एन.पी.मेडसिंगे
जाबदारतर्फे: अॅड एस.बी.घोरपडे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवालांकडे दुरुस्तीसाठी दिलेले मशीन पूर्णपणे दुरुस्त न केलेने चालत नसलेबदृल दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला वकीलामार्फत मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.13 वर लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
तक्रारदार हे तानंग येथील रहिवासी असून ते आपल्या आई-वडील भावासह एकत्र कुटुंबात राहतात. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. त्याची सुमारे 8 एकर शेतजमीन आहे. सदर शेतीमध्ये 4 एकर द्राक्षबाग आहे. तक्रारदाराचे चोरोची ता.कवठेमहांकाळ जि. सांगली येथे बेदाणा शेड आहे. द्राक्षबागेसाठी व द्राक्षावर प्रक्रिया करुन बेदाणा तयार करणेसाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामग्री तक्रारदारांचेकडे होती व आहे.
सामनेवालांचा सिध्देश्वर फॅब्रिकेशन या नावाने कवलापूर येथे बेदाणा ग्रेडींग मशिन, बेदाणा वॉशिंग मशीन, द्राक्ष बागेस औषधे फवारणीचे ब्लोअर, स्टील फॅब्रीकेशन इ. शेती अवजारे व विक्री दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने बेदाणा मळणी मशीन दि.24/2/2005 रोजी घेतले आहे ते 2008 पर्यंत विनातक्रार वापरले आहे. सामनेवाला यांना सदर मशीन किरकोळ दुरुस्ती, रोटर काम, रंगकाम करुन देणेसाठी तक्रारदाराने विचारणा केली असता त्यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करुन देत असलेचे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने नमूद काम करुन देणेसाठी दि.26/9/08 रोजी सदर मशीन सामनेवालाकडे दिले होते. सदर मशीनला एक टाकी व एक फॅन होता. तो वाढवून दोन टाकी व दोन फॅन बसविणेचे होते. तसेच चाळण व स्टँड वाढवणे, चाळणीसाठी लागणारी अनुषंगिक दुरुस्ती करणे, स्प्रे पेंटींग करणे इ. कामे सामनेवाल्याच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार करणेकरिता मशीन सामनेवालांकडे दिले होते.
वर नमूद कामे करणेकरिता सामनेवालाने रु.32,360/- इतका अंदाजे खर्च सांगितला होता. तक्रारदाराने सामनेवालांना रक्कम रु.29,000/- रोख दिले आहेत. सदर मशीन पूर्णपणे दुरुस्त होऊन चालविणेसाठी तक्रारदाराने दि.7/1/2009 रोजी तक्रारदाराचे स्वखर्चाने जागेवर चोरोची येथे आणून दिले होते. सदर मशीन देतेवेळी इंजिनला बेल्ट घातलेले नव्हते तसेच इंजीनचे फाऊंडेशन दिलेले नव्हते, वेळोवेळी विचारणा केलेनंतर दि.21/1/09 रोजी फाऊंडेशन करुन दिले, मात्र ते चुकीचे पध्दतीने केले, ते आजतागायत सुस्थितीत नाही. तसेच इंजिनच्या बेल्टबाबत तगादा लावलेनंतर दि.1/2/09 रोजी सामनेवालांचे दुकानातील मदतनीस श्री रोहन यांना बेल्ट बसविणेस पाठवून दिले. तथापि सामनेवालांच्या निष्णात बुध्दीने तयार केलेले मशीन श्री रोहन यास प्रयत्न करुनही सुरु झाले नाही. त्यामुळे दि.2/2/09 रोजी श्री गणेश यास मशीन चालू करणेसाठी पाठविले तरीही मशीन चालू झाले नाही. तदनंतर दि.5/02/09 रोजी सामनेवाला व त्याचे मदतनीस गणेश याने दिवसभर खटाटोप करुन सायंकाळी मशीन चालू केली. मात्र सदर मशीन आजअखेर सतत व व्यवस्थित चालू रहात नाही याबाबत जाबदारांकडे वेळोवेळी हेलपाटे व फोनद्वारे संपर्क साधला असता दि.21/2/09 रोजी स्वतः मदतनीसास जागेवर येवून मशीनची दुरुस्ती केली तरीही मशीन चालू झाली नाही. यावरुन सामनेवालांनी सुमारे अडीच महिने मशीन स्वतःकडे दुरुस्तीच्या नावाखाली ठेवून तक्रारदाराकडून रु.29,999/- घेवूनही मशीन दुरुस्त केली नाही. उलट मशीन खराब केलेली आहे. यामुळे तक्रारदारास म्हणेल तो दर देवून दुसरीकडून द्राक्षावरील प्रक्रिया करुन घ्यावी लागली असलेने तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारदार व सामनेवालामध्ये ग्राहक व मालक असे नाते असलेने त्याने सेवेत त्रुटी केली. तक्रार कलम 5 प्रमाणे रु.1,52,000/- ची मागणी केली. तक्रारदाराने दि.6/3/2009 रोजी अॅड मेडसिंगे यांचेमार्फत सामनेवालास नोटीस पाठविली असता त्यास सामनेवालाने दाद दिली नाही, त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन दुरुस्तीपोटी घेतलेली रक्कम रु.29,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/-, सेवात्रुटीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रु.1,00,000/-, नोटीस खर्च रु.1,000/, अर्जाचा खर्च रु.2,000/- असे एकूण रु.1,52,000/- देणेबाबत हुकुम व्हावा अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.5 वरील कागदयादीप्रमाणे मशीन खरेदीची पावती, रक्कम मिळालेबाबत सामनेवाला यांच्या पावत्या, मशीनरी इन्स्पेक्शन रिपोर्ट, सामनेवाला यांना अॅड एन.पी.मेडसिंगे यांचेमार्फत पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती, सामनेवाला यांची उत्तरी नोटीस, बेदाणा मळणीची बिले व पावती अशी एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सामनेवाला यांनी याकामी हजर होवून नि.13 वर आपले म्हणणे दाखल केले. सदर दाखल सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराची तक्रार, मान्य केल्या कथनाखेरिज, नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार हा शेतकरी नसून तो बेदाणा मशीनने इतर शेतक-यांच्या बेदाण्यावर मशीन भाडयाने देवून प्रक्रिया करण्याचे काम करीत असलेचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार हा व्यवसायासाठी मशिनचा वापर करीत होता. सामनेवालाचा शेती औजारे दुरुस्तीचा व्यवसाय आहे, शेती औजारे विक्रीचा व्यवसाय नाही. सामनेवालाने तक्रारदाराचे मशीन दुरुस्तीचे काम केल्याचे सामनेवालाने मान्य केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व मालक असे नातेसंबंध निर्माण होत नाहीत. तक्रारदाराचे सांगणेवरुन सामनेवालाने मशीनमध्ये बदल करुन दुरुस्ती करुन देणेचे काम केले आहे. सामनेवालाने स्वतःचे मनाने कोणताही बदल केलेला नाही. तक्रारदाराचे सदरचे मशीन सामनेवालाकडे आणले, त्यावेळी मशीनची अवस्था काय होती याबाबत तज्ञांचा रिपोर्ट तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे मशीनबाबत तक्रारींचा जो उल्लेख केला आहे तो ग्राहय धरता येणार नाही. तक्रारदाराने मशिन व्यवस्थितपणे असलेची खात्री करुनच दुरुस्तीची रक्कम सामनेवाला यांना दिली आहे. तक्रारदाराने दाखल केलेली बेदाणा मळणीची बिले ही खोटी आहेत. तक्रारदाराने सामनेवालाचे बिल दि.22/2/09 रोजी अदा करुन मशिन ताब्यात घेतले असताना तक्रारदाराने सदरचे मशीन दि.21/1/09 रोजी इंजिन फांऊडेशन करुन दिले, ता.1/2/09 रोजी बेल्ट बसविणेस पाठवून दिले, दि.2/2/09 रोजी मशीन चालू करणेस पाठवून दिले, ता.21/1/09 रोजी स्वतः मदतनिससह मशीन चालू केले अशा खोटया तारखांचा उल्लेख केला आहे. सबब तक्रारदराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी विनंती केलेली आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले असून नि.15 चे फेरिस्तसोबत तक्रारदाराचे मिळकतीचा सातबारा उतारा व तक्रारदाराचे बंधूचा सातबारा उतारा अशी 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचे म्हणणे, उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल पुरावे यांचा विचार करता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे का ? होय.
2. तक्रारदार नमूद मशीनचा वापर वाणिज्य हेतूने करीत होता काय ? नाही.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय, अंशतः
4. तक्रारदाराने केलेल्या मागण्या मिळण्यास तो पात्र आहे काय ? होय, अंशतः
5. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1
6. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक विक्रेता हे नाते निर्माण होत नसलेचा आक्षेप घेतला आहे. वस्तुतः सामनेवाला यांचा व्यवसाय हा शेती अवजारे निर्मिती करणेचा नसून तो दुरुस्ती करणेचा असलेचे त्यांचे म्हणण्यामधील कलम 5 मध्ये मान्य केले आहे. तसेच प्रस्तुत बेदाना मशिन हे सामनेवालाने उत्पादित केलेले नसून केवळ बेदाणा मशिनची दुरुस्ती करुन दिली आहे ही बाब त्याने मान्य केली आहे. सदर मशिनमध्ये काही बदल करुन ते दुरुस्त करुन कार्यान्वीत करण्याचे होते व त्या अनुषंगिक येणा-या खर्चापैकी रु.29,000/- तक्रारदाराकडून त्यास मिळाले आहेत हेही त्याने त्यांचे म्हणणेचे कलम 7 मध्ये मान्य केलेले आहे. नि.5/3 वर सदर मशिन डबल ब्लोअर करणेबाबत नमूद असून त्यासंदर्भात काही रकमा आगाऊ तसेच नि.5/4 वर अॅडव्हान्सपोटी रु.1,000/-, तदनंतर रु.20,000/- व नंतर रु.3,000/- व रु.5,000/- अशी एकूण रु.29,000/- रक्कम मिळाल्याचे निदर्शनास येते. यावरुन सदर बेदाणा मशिन डबल ब्लोअर करुन देण्याची वस्तुथिती निर्विवाद आहे व त्यासाठीचा मोबदला सामनेवालाने घेतला आहे, त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 चा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
7. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेतील कलम 4 मध्ये वाणिज्य हेतूचा (commercial purpose) मुद्दा उठविलेला आहे. त्याचे म्हणणेप्रमाणे तक्रारदार इतर शेतक-यांच्या बेदाण्यावर प्रक्रिया करणेसाठी सदर मशिन भाडयाने देत होता व त्यातून भाडे मिळविण्याचा व्यवसाय करीत होता. या कथनाचा विचार करता त्याअनुषंगिक कोणताही पुरावा सामनेवाला यांनी हजर केलेला नाही. तसेच शेती अनुषंगिक असणारे जोडव्यवसाय म्हणून प्रस्तुत बाबीचा विचार केला तरीही प्रस्तुत प्रकरणी कोणत्याही प्रकारचा वाणीज्य हेतू निदर्शनास येत नाही. सबब सामनेवालांचा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळीत आहे व प्रस्तुत मशिनचा वापर हा वाणिज्य हेतूने केलेला नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
8. सामनेवाला याने त्याचे लेखी म्हणणेतील कलम 6 मध्ये प्रस्तुत बेदाणा मशिन हे तक्रारदाराने मूळ मालक उत्तम भिमराव थोरात रा. कवठेएकंद ता.मिरज यांचेकडून दि.24/2/2005 रोजी खरेदी केले होते हे खरेदीपावतीवरुन दिसून येते. तर नमूद थोरात याने सदर मशिन दि.26/12/02 रोजी माने इंजिनिअरींग एंटरप्राइझेस कुंडल यांचेकडून विकत घेतल्याचे पावतीत स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे त्याचे म्हणणेतील कलम 7 मध्ये तक्रारदार हा सदर मशिनचा सेकंड ओनर असलेने त्यास सदर मशिन उत्पादित कंपनीकडे दाद मागता येत नाही याची जाणीव असलेने प्रस्तुत खोटा अर्ज दाखल केल्याचे नमूद केले आहे. सामनेवालाचे या कथनाचा विचार करता सदर कथनानुसार नि.5/1 वर नमूद थोरात याने दि.26/12/02 रोजी माने इंजिनिअरींग एंटरप्राइझेसकडून मशिन रक्कम रु.65,000/- ला खरेदी केल्याचे दिसून येते तर नि.5/2 वर खरेदीपावतीनुसार तक्रारदाराने दि.24/2/2005 रोजी सदर मशिन थोरात यांचेकडून रु.57,000/- या किंमतीला रोखीने खरेदी केल्याचे दिसून येते. तेव्हापासून म्हणजे दि.24/2/2005 पासून प्रस्तुत मशिन तक्रारदाराकडे वापरात होते. मात्र सदर मशिनची क्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये काही तांत्रिक बदल तक्रारदाराने करणेचे ठरविले व सामनेवाला हे सदर कामात निष्णात असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला. सदर बेदाणा मशिनमध्ये किरकोळ दुरुस्ती, रोटर काम, रंगकाम, तसेच मूळ मशिनला एक टाकी व एक फॅन होता, तो वाढवून दोन टाक्या व दोन फॅन बसविणेचे होते तसेच चाळण व स्टँड वाढविणेचे होते व चाळण्यासाठी लागणारी अनुषंगिक दुरुस्ती, स्प्रे पेटींग इ. कामे करणे करिता सामनेवालांकडे दि.26/9/2008 रोजी मशिन दिलेले होते. त्यासाठी अंदाजित खर्च रु.32,360/- सामनेवालाने सांगितला होता. त्यापैकी नि.5/6 प्रमाणे रु.29,000/- सामनेवाला याला मिळाले आहेत. सदर मशिन देणेपूर्वी नि.5/3 व 5/4 प्रमाणे तक्रारदाराने सदर कामासाठीच्या आगाऊ रकमा दिल्याचे निदर्शनास येते.
9. प्रस्तुत मशिन सामनेवाला याने दुरुस्त करुन तक्रारदाराच्या सूचनेप्रमाणे त्यात बदल करुन दि.7/1/2009 रोजी तक्रारदाराचे जागेवर चोरोची येथे आणून दिले मात्र त्यावेळी मशिनला बेल्ट नव्हता व इंजिनचे फाऊंडेशन केले नव्हते. तदनंतर इंजिनचे फाऊंडेशन केले. मात्र बेल्टचा तगादा लावलेनंतर सामनेवालांचे मदतनीस रोहन याने दि.1/2/2009 रोजी बेल्ट बसवून दिला. तरीही मशिन सुरु झाले नाही. तदनंतर त्याने गणेश यांना पाठवून दिले. तरीही मशिन सुरु झाले नाही. त्यानंतर बरेच हेलपाटे व फोनवर संपर्क साधलेनंतर दि.5/2/09 रोजी सामनेवाला स्वतः मदतनीसांसह चोरोची येथे येवून दिवसभर खटाटोप करुन संध्याकाळी मशिन चालू केली. मात्र तदनंतर सदर मशिन व्यवस्थित चालू नसलेने तक्रारदाराने कथन केले आहे, सदर घटनेच्या तारखांबाबत सामनेवालांनी आक्षेप घेतला तसेच सामनेवाला यांनी नमूद मशिन ताब्यात घेतेवेळीच व्यवस्थित चालू होते, त्यामुळेच तक्रारदाराने ते ताब्यात घेतले असे म्हणण्यात निवेदन केले आहे. त्याअनुषंगाने उभय पक्षकारांनी नि.5/8 वकील नोटीस व नि.5/10 उत्तरी नोटीसमध्येही नमूद केलेचे दिसून येते. मात्र सामनेवाला यांना उर्वरीत देय असणारी रु.4,500/- ही रक्कम तक्रारदारास देणेची नसलेने प्रस्तुत खोटी नोटीस पाठविल्याचे नमूद केले आहे.
10. सदर कथनांचा विचार करता नि.5/4 नमूद कागदाप्रमाणे मशिन डबल ब्लोअर करणेसाठी करावयाच्या कामांची अनुक्रमांक 1 ते 12 ही यादी दाखल केली आहे. सदर यादीनुसार टाकी, फॅन, एक्स्ट्रीक प्रॉब्लेम, कुली बदलणे, सॉफ्ट फिटींग, किरकोळ वेल्डींग, साईट कनेक्शन, सोंड, स्टॅंड वाढवणे, स्प्रे पेंटींग, चाळण वाढवणे इ.ची नोंद दिसून येते. त्याअनुषंगाने नि.5/5 वर दि.1/1/2009 रोजीचे रबर बेल्ट चार नग, चाळण बेरींग 3 नग, एक्स्ट्रीक बेरींग 1 नग असे एकूण रु.2,360/- नगाचे बिल दिसून येते. तसेच नि.5/7 वरती तक्रारदाराने श्री आर.एम.ढेरे यांचा मशिनरी इनस्पेक्शन रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर रिपोर्टनुसार अनुक्रमांक 1 ते 5 अन्वये त्रुटी नोंदविलेल्या आहेत. तसेच सदर त्रुटी दूर करण्यासाठी रु.25,000/- इतका अपेक्षित खर्च नोंदविलेला आहे. तसेच प्रस्तुत मशिनवर मेक, मॉडेल, तारखेसह नमूद असून सिरियल नंबर आढळून आला नसलेबाबत नोंद आहे. त्यामुळे सामनेवाला याने याबाबत आक्षेप घेतलेला आहे. केवळ त्याच्यावर सिरियल नंबर नाही म्हणजे ते मशिन नव्हते हा सामेनवाला यांचा आक्षेप सदर मंच ग्राहय धरत नाही कारण मशिन मॉडेल व तारीख तीच असल्याने प्रस्तुत खरेदीदाराचेच ते मशिन होते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11. तसेच नमूद रिपोर्टप्रमाणे सदर मशिन 7 वर्षे वापरात असल्याने त्याच्या रिकंडीशनींगची गरज होती, त्यामुळेच प्रस्तुतचे मशिन सामनेवालांकडे दिले होते. मात्र प्रस्तुत दुरुस्तीचे काम सामनेवाला यांनी योग्यरित्या केले नसल्याचे सर्व्हेअरने नमूद केलेले आहे. दाखल पुराव्यांवरुन सदर मशिन व्यवस्थितरित्या चालत नसल्याची वस्तुस्थिती सदर मंचाचे निदर्शनास आलेली आहे. मात्र सामनेवाला यांने सदर रिपोर्टला हरकत घेतलेली आहे. मात्र त्याअनुषंगिक उलटतपास अथवा स्वतःहून मशिन तपासणी करुन रिपोर्ट घेणेबाबत तज्ञ मत अथवा अहवाल घेणेबाबत किंवा तशा प्रकारे पुरावा दाखल करणेबाबत कोणतीही कार्यवाही, संधी असूनही केलेली नाही. त्यामुळे केवळ सामनेवालाची केवळ लेखी हरकत, प्रस्तुत मशिन चालू आहे हे सिध्द करु शकत नाही. त्यासाठी सामनेवाला याने सदर मशिन सुरु असलेबाबतचा सबळ पुरावा घेणेचा गरजेचे होते, ते त्याने केलेले नाही. याउलट तक्रारदाराने मशिन खरेदीपासून ती दुरुस्ती व दुरुस्ती नंतर ते चालत नसलेबाबतचा सबळ पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे व तो सामनेवाला यांनी खोडून काढलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनास पुष्टी मिळते.
12. सबब वरील विस्तृत विवेचन व दाखल पुराव्याचा विचार करता नि.5/4 प्रमाणे सामनेवालाने काम करण्यासाठी तक्रारदाराकडून रु.29,000/- घेतलेले आहेत. मात्र त्याअनुषंगिक करावयाचे दुरुस्तीचे काम सामनेवाला याने केले असले तरी ते योग्यरित्या न झाल्याने सदर मशिन योग्यप्रकारे कार्यान्वीत नाही व त्यामुळे तक्रारदारास त्याचा स्वतःच्या चार एकर बागायतीतील बेदाणा त्याला बाहेरुन प्रक्रिया करु घ्यावा लागला याबाबत नि.5/13 वरती बेदाणा प्रक्रिया बिलाची पावती जोडलेली आहे. सदर पावतीवर तारीख नसल्याचा आक्षेप सामनेवालाने घेतला आहे तसेच नि.5/11 व 5/12 वर तक्रारदाराचे नावे कॅश मेमो आहे मात्र अर्जुन माळकर व शरद माळकर यांची नावे प्रस्तुत कॅशमेमोत नमूद आहेत. सबब सदर पुराव्यावरुन तक्रारदाराने बाहेरुन बेदाणा मळणी करुन घेतल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच सामनेवाला याने तक्रारदार बाहेरच्या शेतक-यांचाही बेदाणा भाडे घेवून मळणी करुन देत असलेचा मुद्दा उठविलेला आहे. तक्रारदाराची एवढी मोठी मशिन घेवून बेदाणा मळणी करण्याइतके जमीनीचे क्षेत्र नसलेचे नमूद केले आहे याचा विचार करता नि. 15/1 व 15/2 अन्वये तक्रारदार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांची नावे शेतजमीन दिसून येते. अनुक्रमे 91 आर व 1 हे 37 आर इतकी जमीन दिसून येते. तसेच पिकाखालील क्षेत्रामध्ये द्राक्षे केल्याबाबतच्या नोंदी दिसून येतात. यावरुन तक्रारदाराची स्वतःचे शेतातील द्राक्ष बागायत होती व त्यातून येणा-या द्राक्षावर प्रक्रिया करण्यासाठी सदर मशिनचा तो वापर करीत होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
13. सामनेवाला याने प्रस्तुत मशिनमध्ये जरी तक्रारदाराच्या सूचनेप्रमाणे बदल केले तरी सामनेवाला यांच्या सदर कामाचा अनुभव, निष्णातपणा याच्यावर अतिव विश्वास ठेवून तक्रारदाराने त्यांचा योग्य तो ठरलेला मोबदला अदा करुन दुरुस्तीचे काम करुन घेतले सामनेवाला याने दुरुस्तीचे काम केल्याचे मान्य केले आहे. मात्र दुरुस्तीचा अर्थ निव्वळ मशीनमध्ये बदल करणे व अनुषंगिक मशिनमध्ये पार्ट घालणे असा नसून प्रस्तुत मशिन कामकाज करण्यास योग्यरित्या सुस्थितीत कार्यान्वीत करणे असा आहे. सबब तक्रारदाराने रु.29,000/- एवढी रक्कम सामनेवालास देवूनही प्रस्तुत मशिन योग्यरित्या कार्यान्वीत झालेले नाही ही सामनेवाला यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
14. तक्रारदाराने त्याचे तक्रारीतील कलम 5 मध्ये सामनेवाला याने दुरुस्तीपोटी घेतलेली रक्कम रु.29,000/- तसेच मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.20,000/-, सेवात्रुटीमुळे झालेले आर्थिक नुकसान रु.1 लाख, नोटीस खर्च रु.1000/- व अर्जाचा खर्च रु.2000/- अशी एकूण रु.1,52,000/- ची मागणी केलेली आहे. नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता सामनेवाला याने सदर मशिनमध्ये बदल व दुरुस्ती करणेबाबत लागणारे आवश्यक साहित्य खरेदी केलेले आहे व ते सदर मशिनमध्ये वापरलेले आहे. त्याअनुषंगाने नि.5/5 प्रमाणे लागणारे मटेरियल खरेदी केलेले आहे व त्याची रक्कम रु.2,360/- आहे. सदर रक्कम ही तक्रारदाराने अदा केलेबाबत त्याचे प्रतिपादन नाही. यावरुन प्रस्तुत रक्कम सामनेवाला याने खर्च केल्याची वस्तुस्थिती गृहीत धरणे चुकीचे ठरणार नाही. तसेच सदर बेदाणा मशिनमध्ये करावा लागणारा बदल, वाढीव टाकी, फॅन, चाळण इ. बाबतही सामनेवाला यांनी खर्च केलेला असणार आहे. मात्र त्याने प्रस्तुत प्रकरणी प्रस्तुत मशिनच्या पार्टसाठी काय खर्च केला याचे सविस्तर स्पष्टीकरण म्हणणेतही दिलेले नाही तसेच त्याअनुषंगिक कुठलाही पुरावाही दाखल केलेला नाही. सबब सामनेवाला याने तक्रारदाराकडून घेतलेल्या रकमांमधून रु.2,360/- खर्च केल्याची बाब निदर्शनास येते. मात्र अन्य अनुषंगिक कामांच्या बिलांसंदर्भात पुरावा नसल्याने त्याबाबत हे मंच आदेश करु शकत नाही.
15. तसेच नमूद सर्व्हेअर यांनी अहवालामध्ये अंदाजीत रक्कम रु.25,000/- प्रस्तुत मशिन कार्यान्वीत करणेसाठी खर्च येईल असे नमूद केले आहे. मात्र त्याअनुषंगानेही सविस्तर एस्टिमेट दाखल केलेले नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांना सदर रु.29,000/- रक्कम ही केवळ कामाच्या मजूरीपोटी दिलेली नाही तर मशिनला लागणारे नि.5/4 प्रमाणे साहित्य खरेदी व त्याअनुषंगिक येणारा खर्च व मजूरी अशी एकत्रितरित्या रक्कम दिल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर मंचासमोर साहित्य खरेदीची रक्कम रु.2,360/- केल्याचे दिसून येते. मात्र मजूरीची रक्कम किती याचे स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे तक्रारदारास संपूर्ण रु.29,000/- ची मागणी हे मंच ग्राहय धरु शकत नाही. तक्रारदाराने केलेल्या मागणीच्या रकमेतून सदर रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम देण्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदारास प्रस्तुत मशिन योग्यरित्या कार्यान्वीत न झाल्याने ते वापरता आले नाही त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल केलेली बेदाणा मळणीची बिले अन्य व्यक्तींची आहेत, एक बिल त्याचे आहे. मात्र त्या अनुषंगिक आर्थिक पुरावा नसल्यामुळे हे मंच सर्वसाधारण रक्कम देण्याचे निष्कर्षाप्रत येत आहे. तसेच तक्रारदारास प्रस्तुत दाखल करावी लागल्यामुळे मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. सबब त्यापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. सामनेवाला याने केलेल्या सेवात्रुटीमुळे झालेल्या नुकसानीस ते व्यक्तीशः जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे प्रस्तुत मशिन कार्यान्वीत न झाल्याने
त्यापोटी रक्कम रु.26,640/- सामनेवाला यांनी तक्रारदारास अदा करावेत.
3. तक्रारदारास सामनेवाला यांनी आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
6. सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 16/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष