द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(03/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणार क्र. 1 व 2 चे विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील तक्रारदार क्र. 1 व 2 हे सी.टी.एस. नं. 508ए आणि 508बी, कसबा पेठ, पुणे येथील भाडेकरु आहेत. सदरच्या जागेच्या मुळ मालकांनी जाबदेणार यांना त्यांची जागा विकसीत करण्याचे अधिकार दिले व त्या अधिकाराअन्वये जाबदेणारांनी तक्रारदारांना ते बांधत असलेल्या “केशवा अपार्टमेंट्स” या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील 350 चौ. फु. क्षेत्रफळ असलेली सदनिका क्र. 102 विक्री करण्याचे ठरविले. सदरच्या सदनिकेचा मोबदला हा, तक्रारदार राहत असलेली जागा जाबदेणारांच्या स्वाधीन करणे, त्याशिवाय रक्कम रु. 5,03,920/- सदनिका खरेदीपोटी जाबदेणार यांना देणे असा ठरला. त्यानुसार तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये दि. 6/12/2007 रोजी नोंदणीकृत करारनामा झाला व तो सब रजिस्ट्रार हवेली क्र. 11 यांच्या कार्यालयामध्ये 10498/2007 या क्रमांकाअन्वये नोंदविण्यात आला. त्यानंतर दि. 11/2/2008 रोजी तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये सदनिकेमध्ये दिल्या जाणार्या सोयी-सुविधांबाबत समजुतीचा लेख (Memorandum of Understanding) करण्यात आला. यातील तक्रारदारांच्या कथनानुसार, त्यांनी जाबदेणारांना ठरलेली एकुण किंमत रु. 5,03,920/- पैकी रु. 3,61,140/- वेळोवेळी बांधकामाच्या प्रगतीनुसार दिले. परंतु जाबदेणार यांनी इमारत बांधकाम पूर्णपणे थांबविल्यामुळे त्यांनी जाबदेणारांना उर्वरीत रक्कम रु. 1,42,780/- दिली नाही. सदरची उर्वरीत रक्कम रु. 1,42,780/- तक्रारदार आजही जाबदेणार यांना देण्यास तयार आहेत. दि. 6/12/2007 रोजीचा नोंदणीकृत कराराअन्वये जाबदेणार यांनी बांधकाम सुरु केल्यापासून 16 महिन्यांच्या आंत सदनिकेचा ताबा देण्याचे कबुल केले होते, परंतु जाबदेणार यांनी कबुल केल्याप्रमाणे वेळेमध्ये सदनिकेचा ताबा दिला नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी अॅड. श्री प्रशांत भोयने यांच्यामार्फत दि. 14/7/2009 रोजी जाबदेणार यांना कायदेशिर नोटीस पाठविली व सदनिकेच्या ताब्याची मागणी केली. त्यानंतर दि. 29/7/2009 रोजी पुन्हा जाबदेणार यांना बांधकाम सुरु करण्याची विनंती केली, तरीही जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना करारामध्ये ठरल्याप्रमाणे व कबूल केल्या प्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन सदोष व दोषपूर्ण सेवा दिलेली आहे तसेच सेवेत कमतरता केलेली आहे. म्हणून सदरील तक्रार तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. यातील तक्रारदार, जाबदेणार यांच्याकडून नोंदणीकृत करारनाम्यानुसार सदनिकेचा ताबा, रक्कम रु. 3,61,140/- वर व्याज, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
तक्रारदार यांनी या तक्रारीच्या कामी त्यांचे शपथपत्र, दि. 6/12/2007 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्याची प्रत, दि. 11/2/2008 रोजीच्या समजुतीच्या लेख्याची प्रत, त्यांनी जाबदेणार यांना अदा केलेल्या रकमेच्या पावत्या, वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीशीची प्रत व त्याच्या आर.पी.ए.डी. आणि यु.सी.पी. च्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2] सदर प्रकरणी यातील जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये वकीलामार्फत उपस्थित राहिले व त्यांची लेखी कैफियत सादर केली. यातील जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने शपथेवर खोडून काढली व याकामी तक्रारदार यांनी त्यांना नोंदणीकृत करारनाम्यानुसार रक्कम दिलेली नाही त्यामुळे सदनिकेचा ताबा दिला नाही, असे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी भाड्यापोटी प्रति महिना रु. 3,000/- दिलेले आहेत, त्याच्या पावत्याही जाबदेणार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासहित फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
जाबदेणार यांनी या कामी त्यांचे शपथपत्र, फोटोग्राप्स, भाड्यापोटी तक्रारदारांना दिलेल्या रकमेच्या पावत्या व स्टेटमेंट, भोगवटा प्रमाणपत्राची प्रत तसेच श्री. प्रकाश चांडक, आर्किटेक्ट्स & इंटेरिअर डिझायनर यांचे सदनिकेच्या क्षेत्रफळाबाबतचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3] प्रस्तुतच्या प्रकरणातील तक्रारदार व जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच दि. 21/4/2011 रोजीच्या रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना दि. 21/4/2011 रोजी रक्कम रु. 71,388/- व रु. 71,392/- चेक क्र. 756323 व 756324 ने अदा केलेली आहे व जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदनिकेची मे. मंचासमोर चावी दिलेली आहे. यावरुन तक्रारदार यांची मुळ तक्रार संपुष्टात आलेली दिसून येते. तक्रारदार यांनी सदरच्या तक्रारीअन्वये सदनिकेच्या ताब्याव्यतीरिक्त, त्यांनी जाबदेणार यांना अदा केलेल्या रक्कम रु. 3,61,140/- वर व्याज मागितलेले आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व दोन्ही बाजूंच्या कथनावरुन असे स्पष्ट दिसून येते की, तक्रारदारांनी जाबदेणार यांना सदनिकेपोटी पूर्ण रक्कम अदा केलेली नव्हती, त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी भाड्यापोटी रक्कम अदा केलेली आहे, त्यामुळे तक्रारदार हे रक्कम रु. 3,61,140/- वर व्याज मिळण्यास पात्र नाहीत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. मात्र, तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा मिळविणेकरीता बराच पाठपुरावा करावा लागला, जाबदेणार यांना वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली, या मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली व त्या अनुषंगाने पैसा व वेळ खर्च करावा लागला, त्यामुळे तक्रारदार हे रक्कम रु. 5,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- मिळण्यास पात्र होतात, असे या मंचाचे मत आहे.
4] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
2] असे जाहिर करण्यात येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार
यांना कबूल करुनही ठरलेवेळेत सदनिका न देऊन सदोष
सेवा दिलेली आहे.
3] जाबदेणार क्र. 1 व 2 यांना असे आदेश देण्यात येतात
की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना रक्कम
रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) नुकसान भरपाई व
तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- (रु. दोन हजार मात्र)
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावी.
4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.