(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 17 जानेवारी 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्तीने दिनांक 6.9.2012 रोजी राञी 8.25 वाजता विरुध्दपक्ष यांचे दुकानातून रुपये 24,900/- ची साडी खरेदी केली आणि विरुध्दपक्षाने ती साडी पिको फॉल करण्याकरीता त्यांचेकडे ठेवून घेतली आणि फक्त ब्लाऊज पीस विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास देण्यात आले. दिनांक 10.9.2012 रोजी तक्रारकर्ती विरुध्दपक्ष यांचेकडे जावून ब्लाऊजपीसचे डायमंड खाली पडत असल्याची तक्रार केली, तेंव्हा विरुध्दपक्षाने ते ब्लाऊजपीस स्वतःकडे ठेवून घेतले आणि तक्रारकर्तीस सांगितले की, ब्लाऊजपीसला डायमंड लावून देऊ आणि साडीला पिको फॉल लावण्याचे काम पूर्ण व्हायचे आहे असे कळवीले. तक्रारकर्ती पुन्हा दिनांक 24.9.2012 रोजी पिको फॉलसह साली आणि ब्लाऊजपीस घेण्याकरीता विरुध्दपक्ष यांचेकडे आली, परंतु विरुध्दपक्षाने त्यांना पुन्हा दिनांक 26.9.2012 रोजी बालावीले व विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस साडी व ब्लाऊजपीस बंद पाकीटात दिले. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षावर विश्वास ठेवून बंद पाकीट स्विकारुन घरी आणले. तक्रारकर्तीने घरी गेल्यावर बंद पाकीट उघडले तेंव्हा तक्रारकर्तीस आढळून आले की, बंद पाकीटमधील साडी डॅमेज आहे आणि पहिल्या प्रमाणेच ब्लाऊजपीसला लावलेले डायमंड खाली पडत आहे. तक्रारकर्तीने याबाबतची सुचना विरुध्दपक्षास दुरध्वनीव्दारे ताबडतोब दिनांक 26.9.2012 रोजी दिली आणि सदर साडी बदलवून देण्याची विनंती तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास केली. परंतु, विरुध्दपक्षाने दुरध्वनीव्दारे तक्रारकर्तीस उत्तर दिले की, साडी विकत घेतल्या तारखेपासून 7 दिवसाचे आत साडी बदलायची असते. तक्रारकर्तीने पुन्हा दिनांक 27.9.2012 रोजी विरुध्दपक्षाच्या दुकानात जावून साडी बदलविण्याची विनंती केली, अथवा साडीची रक्कम परत करावी अशी विनंती केली. परंतु, विरुध्दपक्षाने साडी बदलविण्यास नकार दिला व साडीची रक्कम तक्रारकर्तीस परत करण्याची विनंती नामंजूर केली.
3. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून विकत घेतलेली साडी ही विकत घेतल्याचे तारखेपासून म्हणजेच दिनांक 6.9.2012 ते 26.9.2012 पर्यंत सतत 21 दिवसापर्यंत विरुध्दपक्ष यांचेकडे पिको फॉल लावण्याकरीता ठेवली होती, त्यामुळे साडी घेतल्याच्या तारखेपासून 7 दिवसाचे आत विरुध्दपक्षाकडून साडी बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीची फसवणूक आणि धोकेबाजी केली आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस विकलेली साडी डॅमेज आहे व आंगावर घालण्यायोग्य नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याचे प्रार्थनेनुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीची फसवणूक केली या कारणास्तव रुपये 1,00,000/- दंड विरुध्दपक्षावर ठोठावण्यात यावा व त्यापैकी रक्कम रुपये 65,000/- तक्रारकर्तीस मिळावे. त्यातील रुपये 35,000/- ग्राहक मंचाचे लिगलहेडमध्ये जमा करण्यात यावे. तसेच रुपये 65,000/- चे विवरणाप्रमाणे साडीची नुकसान भरपाई रक्कम 24,900/- रुपये 18 टक्के व्याजासह, मानसिक ञासापोटी रुपये 25,000/-, येणे-जाण्याचा खर्च रुपये 5,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- असे एकूण रुपये 65,000/- तक्रारकर्तीने आपल्या प्रार्थनेत मागीतले आहे.
विरुध्दपक्षाचे म्हणणे खालील प्रमाणे -
4. तक्रारकर्तीचे तक्रारीनुसार विरुध्दपक्षाला नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष मंचात हजर होऊन लेखीउत्तर सादर केले. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने घेतलेली साडी ही दिनांक 6.9.2012 रोजी राञी 8.25 वाजता विरुध्दपक्षाचे दुकानातून घेतली हे म्हणणे चुकीचे असून, तीने ती साडी दुपारी 3.13 वाजता खरेदी केली. यावेळी तीने ती साडी रुपये 13,000/- रोख देवून घरच्या लोकांना दाखविल्यानंतरच घेण्यात येईल असे सांगून सुरक्षीत ठेवण्यास सांगितले. तक्रारकर्तीने ती साडी विकत घेण्याचे आधी स्वतः संपूर्णपणे तपासून घेतली व तीचे पूर्ण समाधान व खाञी झाल्यानंतरच तीने ती साडी विकत घेण्याची तयारी दर्शविली. तीने ती साडी दुकानात स्वतः नेसून सुध्दा पाहिल्यानंतरच ती विकत घेतली आणि म्हणून तिला त्या साडीसोबत असलेले ब्लाऊजचे कापड कापून देण्यात आले आणि विरुध्दपक्ष ग्राहकांच्या सोयी आणि समाधानाकरीता स्वतःच विकलेल्या साडीला पिको फॉल आणि पॉलिशींग करुन देतात, म्हणून दिनांक 7.9.2012 रोजी तिच्याकडून उर्वरीत रक्कम रुपये 11,990/- घेवून उत्तम अवस्थेत आणि तक्रारकर्तीचे पूर्ण समाधान होईल अशा स्थितीत देण्यात आली.
5. तक्रारकर्तीच्या कथनानुसार की, तीने ब्लाऊजपीसचे डायमंड खाली पडत असल्याची तक्रार दिनांक 10.9.2012 रोजी केली आणि विरुध्दपक्षाने ब्लाऊजपीसला डायमंड लावून देण्यासाठी स्वतःकडे ठेवून घेतले, हे अक्षरशः खोटे आणि निराधार आहे. तक्रारकर्तीच्या कथन की, दिनांक 24.9.2012 रोजी तक्रारकर्ता पिको फॉलसह साडी व ब्लाऊजपीसला डायमंड लावण्याचे काम झाले असल्यास घेवून जाण्यासाठी विरुध्दपक्ष यांचेकडे गेला असता काम व्हायचे आहे असे सांगून दिनांक 26.9.2012 रोजी पिको फॉलसह साडी व ब्लाऊजपीस घेवून जाण्यास सांगितले, हे सुध्दा अक्षरशः खोटे आहे. तक्रारकर्त्याने स्वतःच्या उद्देशपूर्तीसाठी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या कथनानुसार ती दिनांक 26.9.2012 रोजी विरुध्दपक्षाच्या दुकानात आले आणि विरुध्दपक्ष यांनी सदर साडी व ब्लाऊजपीस बंद पाकीटात तक्रारकर्त्यास दिले आणि तक्रारकर्तीने विरुध्दपक्षावर विश्वास ठेवून बंद पाकीट घरी आणले व पाकीट उघडले असता आढळून आले की, बंद पाकीटात दिलेली साडी डॅमेज आहे आणि ब्लाऊजपीसला लावलेले डायमंड सुध्दा खालील पडत आहे, तक्रारकर्त्याचे हे कथन सुध्दा खोटे आहे. तीने याबाबतची सुचना विरुध्दपक्षास दुरध्वनीव्दारे ताबडतोब दिली आणि साडी बदलवून देण्याची विनंती केली आणि विरुध्दपक्षाने तीला दुरध्वनीवर सांगितले की, साडी विकत घेतलेल्या तारखेपासून 7 दिवसाचे आत बदलावयाची असते.
6. उलट, तक्रारकर्त्याने घेतलेली साडी दिनांक 7.9.2012 रोजी घरी नेल्यानंतर साडी चांगल्यारितीने वापरुन आणि डॅमेजकरुन दिनांक 7.11.2012 रोजी ती विरुध्दपक्षाच्या दुकानात आली आणि साडी बदलवून मागीतली. विरुध्दपक्षाच्या बिलावर स्पष्टपणे छापील अटी व नियमाप्रमाणे एकदा घेतलेली साडी किंवा इतर कोणतेही वस्ञ परत घेतल्या जाणार नाही, तसेच जर कुठलिही साडी किंवा अन्य वस्ञ जर बदलवून घ्यावयाची असेल तर खरेदी केल्याचे तारखेपासून 7 दिवसाचे आत बदल करुन घ्यावे लागेल आणि कुठल्याही हालतीत विकलेली वस्तु परत घेतल्या जाणार नाही आणि रक्कम परत दिल्या जाणार नाही. साडी संबंधी कुठलीही गॅरंटी दिल्या गेली नाही असे तक्रारकर्त्यास स्पष्टपणे खरेदी करतेवेळेस सांगण्यात आले होते.
7. तक्रारकर्त्याचे कथनानुसार विरुध्दपक्षाने तीची फसवणूक व धोकेबाजी केली आहे, हे शब्दशः खोटे, निराधार आणि सुडबुध्दीने केली आहे. तक्रारकर्तीने साडी व ब्लाऊज वापरुन व डॅमेज करुन विरुध्दपक्षास नुकसान पोहचविण्याचे उद्देशाने गैरकायदेशिररित्या त्यांचेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तीने सदरची खोटी तक्रार मा.मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्तीने जेंव्हा साडी आणि ब्लाऊज दुकानात परत करण्याकरीता व बदलविण्यासाठी आले होते, तेंव्हा साडी वापरलेली होती आणि ब्लाऊज सुध्दा शिवलेले होते. विरुध्दपक्षाने आपल्या बिलाशिवाय दुकानात सुध्दा जागो-जागी वरीलप्रमाणे सुचना लिहिलेल्या आहेत, त्यामुळे ग्राहकाची फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट, असा बिनबुडाचा आरोप लावून तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाची मानहानी केलेली आहे व त्याकरीता तक्रारकर्ती दंडास पाञ आहे, त्यामुळे तक्रारकर्तीची ही तक्रार दंडासह खारीज होण्यास पाञ आहे.
8. सदर प्रकरण विरुध्दपक्षाचे मौखीक युक्तीवादाकरीता प्रलंबित होते, विरुध्दपक्षाचा मौखीक युक्तीवादाकरीता पुकारा करुनही मंचात हजर झाले नाही व संधी मिळूनही मौखीक युक्तीवाद केला नाही, त्यामुळे सदर प्रकरण पुढे निकालपञाकरीता ठेवण्यात आले. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले लेखी युक्तीवाद, दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
9. तक्रारकर्ती हीने दिनांक 6.9.2012 रोजी विरुध्दपक्ष यांचे दुकानातून रुपये 24,900/- ची साडी खरेदी केली. निशाणी क्र.2 वरील दस्त क्र.1 वर साडीचे बिल लावलेले आहे. त्यानंतर साडीसंबंधी वाद निर्माण झाल्यावर दिनांक 17.11.2012 रोजी तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास वकीला मार्फत नोटीस पाठविली, तसेच पुन्हा दिनांक 1.12.2012 रोजी तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास वकीला मार्फत नोटीस पाठविली. तक्रारकर्तीने प्रथम रुपये 13,000/- देवून साडी आरक्षित केली होती व त्यानंतर उर्वरीत रक्कम रुपये 11,990/- दिनांक 7.9.2012 रोजी तक्रारकर्तीस दिले.
10. विरुध्दपक्षाने पाकीट बंद परिस्थितीत तक्रारकर्त्यास साडी व ब्लाऊजपीस दिले. घरी जाऊन साडी बघितल्यानंतर तक्रारकर्तीस साडी डॅमेज दिसली व ब्लाऊजपीसचे डायमंड निघत होते हे बघितल्यानंतर जेंव्हा तक्रारकर्तीने साडी बदलवून मागितली, तेंव्हा विरुध्दपक्षाने बिलावर छापलेले अटी व नियम तक्रारकर्तीच्या लक्षात आणून दिले की, एकदा विकलेली साडी किंवा कोणतीही इतर वस्ञ परत घेतल्या जाणार नाही किंवा कुठल्याही परिस्थितीत रक्कम वापस घेतल्या जाणार नाही, तसेच साडी बदलायची असेल तर 7 दिवसाचे आत बदलवून घ्यावयाची असते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्ञासंबंधी कुठलिही गॅरंटी दिल्या गेली नाही असे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस कळवीले. परंतु, तक्रारकर्तीने साडी खरेदी दिनांक 6.9.2012 ला विकत घेतल्या तारखेपासून दिनांक 26.9.2012 पर्यंत सतत 20 दिवस विरुध्दपक्ष यांचेकडे ती पिको फॉल व पॉलीश करण्याकरीता ठेवलेली होती, त्यामुळे 7 दिवसाचे आत तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून साडी बदलवून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, ही साडी विरुध्दपक्ष यांच्या ताब्यात होती. घरी आणल्यानंतर तक्रारकर्तीस साडी डॅमेज परिस्थितीमध्ये आढळून आली.
11. विरुध्दपक्ष बिलावरील छापील अटी व नियमाप्रमाणे एकदा विकलेली साडी किंवा इतर कुठलिही वस्ञ परत घेतल्या जाणार नाही अशी अट दुकानदार तक्रारकर्त्यावर लादू शकत नाही. जेंव्हा विरुध्दपक्ष पैसे देवून दुकानातून वस्तु विकत घेतो, तेंव्हा दुकानदाराचे प्रथम कर्तव्य आहे की, त्याने आपल्या ग्राहकाचे समाधान केले पाहीले. दुकानदाराने आपल्या बिला किंवा दुकानात जागो-जागी असे लिहून ठेवले की, घेतलेला माल किंवा वस्तु परत करता येणार नाही किंवा रक्कम वापस मिळणार नाही, हे गैरकायदेशिर आहे. तक्रारकर्त्याने एका साडीपोटी रुपये 24,990/- दिले तेंव्हा दुकानदाराचे कर्तव्य आहे की, त्याने आपल्या ग्राहकाचे संपूर्णपणे समाधान केले पाहीजे. करीता तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विकत घेतलेली साडी त्याचेकडे ज्यास्थितीमध्ये असेल त्यास्थितीत परत घेवून, तक्रारकर्तीस साडीची बिलाप्रमाणे नमूद किंमत रुपये 24,990/- साडी घेतल्याचा दिनांक 26.9.2012 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह रक्कम तक्रारकर्तीस मिळेपर्यंत देण्यात यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 5,000/- द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- तक्रारकर्तीस द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 17/01/2017