द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 21 जानेवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या शुभंकर रेसिडन्सी, आंबेगाव या योजनेमध्ये दिनांक 12/5/2003 रोजीच्या नोंदणीकृत करारान्वये रो हाऊस विकत घेतले होते. ऑगस्ट 2003 मध्ये तक्रारदारांनी रो हाऊसचा ताबा घेतला होता. जाबदेणार यांनी करारामध्ये कम्प्लीशन सर्टिफिकीट देण्याचे मान्य करुनही, ताबा घेईपर्यन्त कम्प्लीशन सर्टिफिकीट दिले नाही, रो हाऊसचे डीड ऑफ डिक्लरेशनचे रजिस्ट्रेशन करुन दिले नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 22/6/2007 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. जाबदेणार यांनी दिनांक 5/7/2007 रोजीच्या पत्रान्वये कागदपत्रे देण्याचे मान्य करुनही दिले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून कम्प्लीशन सर्टिफिकीट, डीड ऑफ डिक्लरेशन तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 5,00,000/- 18टक्के व्याजासह, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. काही रो हाऊस धारकांनी बेसिक स्ट्रक्चरमध्येच बदल केल्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून कम्प्लीशन सर्टिफिकीट मिळण्यास विलंब झाला. शुभंकर रेसिडन्सी यांच्या नावे डीड ऑफ डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट दिनांक 13/7/2010 रोजी नोंदणीकृत करुन दिलेले आहे व कम्प्लीशन सर्टिफिकीटसाठी आवश्यक चलन जमा करण्यात आलेले आहे ते काही दिवसात प्राप्त होईल. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. जाबदेणार यांनी दिनांक 17/10/2011 रोजीच्या अर्जान्वये तक्रारीत विषयांकीत रो हाऊस तक्रारदारांनी दिनांक 7/5/2011 रोजी श्री. राकेश दयाळ व श्रीमती रितू दयाळ यांना विकलेली असल्याने तक्रारदारांना प्रस्तूत तक्रार दाखल करण्यास लोकस स्टॅन्डी नसल्यामुळे तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी विनंती केली. अर्जासोबत दिनांक 7/5/2011 रोजीचे डिड ऑफ अपार्टमेंट दाखल करण्यात आले आहे.
4. तक्रारदारांनी दिनांक 9/1/2012 रोजीच्या अर्जान्वये तक्रारदार ग्राहक आहेत, जाबदेणार यांनी कम्प्लीशन सर्टिफिकीट दिनांक 29/3/2011 रोजी दिलेले आहे व डिड ऑफ डिक्लरेशन 2011 मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी त्यांचे रो हाऊस सन 2003 मध्ये घेतलेले आहे. जाबदेणार यांनी वर नमूद कागदपत्रे सन 2011 मधील असल्याने नुकसान भरपाई मिळण्याची विनंती केली.
सदरहू अर्जावर जाबदेणार यांनी म्हणणे मांडून तक्रारदार ग्राहक नाहीत, जाबदेणार यांनी तक्रारीमधील सर्व मागण्या पुर्ण केलेल्या आहेत, तक्रारदारांना तक्रार कॉन्टेस्ट करण्यासाठी लोकस-स्टॅन्डी नाही, म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी केली.
5. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी दिनांक 17/10/2011 च्या अर्जासोबत दाखल केलेल्या डीड ऑफ अपार्टमेंट दिनांक 7/5/2011 चे अवलोकन केले असता तक्रारीतील विषयांकीत रो हाऊस तक्रारदारांनी श्री. राकेश दयाळ व श्रीमती रितू दयाळ यांना विकल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी मंचासमोर युक्तीवादा दरम्यान ही बाब मान्य केलेली आहे. तसेच जाबदेणार यांनी तक्रारीतील तक्रारदारांच्या मागण्या पुर्ण केल्याचेही दिसून येत असल्याने, आता तक्रारदार दिनांक 9/1/2012 च्या अर्जान्वये केवळ नुकसान भरपाईची मागणी करीत असल्याचे दिसून येते. परंतू तक्रारीत नमूद केलेले विषयांकीत रो हाऊस आता तक्रारदारांच्या नावे नसल्यामुळे, तक्रारदार आता ग्राहक नाहीत म्हणून त्यांना लोकस-स्टॅन्डी नसल्यामुळे, तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी मंच अमान्य करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अमान्य करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.