जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 229/2010. तक्रार दाखल दिनांक : 07/05/2010. तक्रार आदेश दिनांक :09/03/2011. उज्वला ज्ञानदेव फरतडे, वय 28 वर्षे, व्यवसाय : वकिली, रा. मु. सातोली, पो. उपळवाटे, ता. करमाळा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द डेपो मॅनेजर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग, सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : स्वत: / यु.डी. फरतडे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.जे. पाटील आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, दि.10/4/2010 रोजी सकाळी 10.00 वाजता विरुध्द पक्ष यांच्या बस क्र.एम.एच.12/सी.एच.7257 द्वारे त्यांच्यासह इतर 47 प्रवाशी बार्शी-सोलापूर प्रवास करीत होते. वैराग गावाजवळ बस येताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात येताच त्यांनी मोबाईलद्वारे सोलापूर डेपोस कळविले. तेथून बस चालक श्री. महंमद पटेल यांनी बस बाळेनजिक आणून उभी केली आणि येईपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास वारंवार कळवूनही डेपो मॅनेजरने दखल घेतली नाही. तक्रारदार यांच्यासह इतर प्रवाशांना दुपारच्या ऊन्हात पाऊन तास उभे रहावे लागले आणि त्यांची कामे होऊ शकली नाहीत. तक्रारदार व इतर प्रवाशांनी सोलापूर डेपोमध्ये वारंवार मोबाईलद्वारे संपर्क साधूनही दखल घेण्यात आली नाही. तक्रारदार व्यवसायाने अभियोक्ता असल्यामुळे त्यांची न्यायालयीन कामे होऊ शकली नाहीत. विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडून शारीरिक व मानसिक त्रासासह आर्थिक नुकसानीपोटी रु.30,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बसच्या एअरचा दाब कमी झाल्याचे चालकाचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाळेच्या जवळ बस उभी करुन 11.15 वाजता सोलापूर डेपोमध्ये तसे कळवून पर्यायी बस पाठविण्याचे सूचित केले. त्याप्रमाणे डेपो मॅनेजर, सोलापूर यांनी पर्यायी बस उपलब्ध करुन 11.45 वाजता बिघाड झालेल्या बसच्या ठिकाणी पाठविली. तोपर्यंत बसचालकाने इतर बसमध्ये प्रवाशांना पाठवून दिले. बसमधील यांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा निष्काळजीपणा नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी दि.10/4/2010 रोजी विरुध्द पक्ष यांच्या बस क्र.एम.एच.12/सी.एच.7257 द्वारे प्रवास केल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार प्रवास करीत असलेली बस ब्रेक निकामी झाल्यामुळे बाळे गावानजिक बंद पडल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार बस वैराग गावाजवळ येताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात आले आणि त्यांनी मोबाईलद्वारे सोलापूर डेपोस कळविले होते. तरीही बसचालक श्री. महंमद पटेल यांनी सदर बस बाळेनजिक आणून उभी केली आणि येईपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास वारंवार कळवूनही डेपो मॅनेजरने दखल न घेतल्यामुळे तक्रारदार यांना ऊन्हाचा त्रास झाला आणि न्यायालयीन कामे होऊ शकली नाहीत, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. 5. विरुध्द पक्ष यांनी बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बसच्या एअरचा दाब कमी झाल्याचे चालकाचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाळेच्या जवळ बस उभी करुन 11.15 वाजता सोलापूर डेपोमध्ये तसे कळवून पर्यायी बस पाठविण्याचे सूचित केले आणि त्याप्रमाणे डेपो मॅनेजर, सोलापूर यांनी पर्यायी बस उपलब्ध करुन 11.45 वाजता बिघाड झालेल्या बसच्या ठिकाणी पाठविली असता तोपर्यंत बसचालकाने इतर बसमध्ये प्रवाशांना पाठवून दिले होते. तसेच बसमधील यांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास झालेला असून त्यांचा निष्काळजीपणा नाही. 6. तक्रारदार प्रवास करीत असलेली बस विनाथांबा व विनावाहक होती, हे स्पष्ट आहे. तसेच बार्शी ते सोलापूर अंतर 65 ते 70 कि.मी. आहे. बस वैराग गावानजिक आल्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे निदर्शनास आले आणि तरीही बसचालकाने बाळे गावानजिक बस आणून उभी केली. सदरची घटना घडली त्यावेळी एप्रिल महिना हा ऊन्हाळयाचा महिना होता आणि बसमध्ये तक्रारदार यांच्यासह इतर 47 प्रवाशी होते. बस प्रवासामध्ये बंद पडल्यानंतर व तेथून प्रवासाचे अंतर विचारात घेता विरुध्द पक्ष यांनी पर्यायी बसची व्यवस्था करणे अत्यावश्यक होते. विरुध्द पक्ष यांनी पर्यायी बसची व्यवस्था केल्याचे नमूद केले असले तरी त्याकरिता पुराव्याकामी कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच त्यांनी नादुरुस्त झालेल्या बसचालकासह पर्यायी बसचालकाचे शपथपत्र रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. तक्रारदार यांच्यासह इतर प्रवाशांना विरुध्द पक्ष यांच्याकडून निश्चितच गैरसोय झाल्याचे सिध्द होते आणि सदर कृत्य सेवेतील त्रुटी ठरते. सबब, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
(सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/8311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |