तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवालेतर्फे : वकील श्री.रणधीर झुंजारराव हजर.
निकालपत्रः- श्री.एस.झेड.पवार, सदस्य. ठिकाणः ठाणे
न्यायनिर्णय
1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे आहे की, तक्रारदार ही तक्रारीच्या मथळयात नमुद केलेल्या पंत्यावर राहते. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक व विकासक असून तक्रारीच्या मथळयात नमुद केलेल्या पंत्यावर राहतात. तक्रारदारांच्या मुलाचा विवाह झालेला आहे. मुलाला स्वतंत्र रुम असावी या उद्देशाने रुम विकत घेण्याचे ठरले होते.
3. तक्रारदार व सामनेवाला यांचेत ठाणे येथे दिनांक 28.12.2012 रोजी सामनेवाला यांच्या मालकीच्या मौजे दिवा सर्व्हे नं.98अ, साईसृष्टी अपार्टमेंट, साईनाथ नगर, दिवा आगासन रोड, वक्रतुंड नगर समोर, दिवा (पूर्व) ता.जि. ठाणे येथील 380 चौ.फुटाच्या रुमचा खरेदी खताचा व्यवहार झाला.
4. सदरच्या खरेदी खतापूर्वी असे ठरले होते की, तक्रारदाराने सामनेवाला यांना रुपये 2,60,000/- ऐवजी रुपये 3,20,000/- द्यायचे व 265 चौ.फुट क्षेत्रफळाच्या रुमऐवजी 380 चौ.फुटाची रुम तो तक्रारदारांस देईल. या तोंडी बोलण्या प्रमाणे तक्रारदाराने सामतनेवाला यांना एकूण रुपये 3,20,000/- दिले. परंतु सामनेवाला याने खरेदीखतात रक्कम रुपये 3,20,000/- न लिहीता फक्त रुपये 2,60,000/- मिळाल्याचे लिहून दिले. तसेच रुमच्या क्षेत्रफळाचा रकाना रिकामाच ठेवला. तक्रारदाराने त्या बाबत हरकत घेतल्यावर सामनेवाला यांनी तक्रारदारास तो खरेदी खतातील त्रुटीमध्ये सुधारणा करुन सुधारीत खरेदीखत करुन देईल असे तोंडी कबुल करुन नोटरी केलेले खरेदी खत तक्रारदारांकडून घेवून दुरुस्ती करिता वर्षभर स्वतःकडे ठेवून घेतले. सामनेवाले यांनी सदरच्या खरेदीखातात खरेदीखतापोटी रुमची सर्व किंमत मिळाली असल्याने तक्रारदारास रुमचा ताबा दिला असल्याचे लिहून दिले आहे. प्रत्यक्षात मात्र सामनेवाले यांनी तक्रारदारास रुमचा ताबा दिला नव्हता.
5. दिनांक 29.12.2012 पासून तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे रुमचा ताबा मिळण्यासाठी अनेक वेळा फे-या मारल्या, अनेक वेळा फोन केले. परंतु प्रत्येक वेळेस काही ना काही कारणे सांगून रुमचा ताबा देण्याचे टाळीत असे व म्हणत असे “ दिव्यात त्यांची अनेक ठिकाणी बांधकामे चालु आहेत व कोणत्या ना केणत्या बिल्डींगमध्ये मी तुम्हाला रुम देईन”. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या घरी व ऑफिसमध्ये खरेदी खत दुरुस्त करुन देण्यासाठी व रुमचा ताबा देण्यासाठी तक्रारदाराने सारखा तागादा लावला असता सामनेवाला यांनी ते खरेदीखत डिसेंबर 2014 मध्ये दुरुस्त न करताच परत दिले व म्हणाला “ माझी दिव्यातच इतर ठिकाणी बांधकामे चालू आहेत. कोणत्या इमारतीत रुम देता येईल हे आत्ताच सांगतायेत नाही व जेव्हा रुमचा ताबा देईन तेव्हा खरेदीखत दुरुस्त करुन देईल. त्यामूळे तक्रारदाराने सामनेवाला यांचेवर विश्वास ठेवला.
6. त्यानंतर सामनेवाला तक्रारदारास भेटण्याचे तसेच तक्रारदाराचे फोन उचलण्याचे टाळू लागला. शेवटी तक्रारदाराने दिनांक 29.06.2015 सामनेवाला यांना प्रत्यक्षपणे भेटून ठामपणे सांगीतले की, “ मला तु कोणत्याही बिल्डींगमध्ये व मजल्यावर रुम दे नाहीतर मी तुझ्या विरुध्द कारवाई करील”. तेव्हा सामनेवाले यांनी तक्रारदारास उत्तर दिले की, “ तुला काय करायचे ते कर”, कोणत्या कोर्टात जायचे ते जा, मी तुला रुमचा ताबा देणार नाही. रुमचा ताबा देण्याविषयी व नुकसान भरपाई रु.1,50,000/- मिळणेसाठी तक्रारदाराने दिनांक 30.06.2015 रोजी वकीलां मार्फत सामनेवाला यांना नोटीस पठविली असता “सदर मालक नोटीस घेण्यास येत नाही” असा रिमार्क मारुन पोष्ट खात्याने ती नोटीस तक्रारदाराचे वकीलास परत पाठविली.
7. सबब तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल करुन झालेलया मानसिक त्रासासाठी रु.1,50,000/- शाररिक त्रासासाठी रु.1,00,000/- आर्थिक झळ, खर्च, इ. साठी रु.1,50,000/- फायद्यापासून वंचित राहील्यामुळे नुकसान भरपाई रु.1,00,000/- नोटीस व वकील फी यासाठी रु.20,000/- आणि सदरच्या तक्रारीचा खर्च रु.30,000/- अशी एकूण नुकसान भरपाई रु.5,00,000/- , सा.वाले यांनी बांधलेल्या कोणत्याही माळयावर 380 चौ.फुट क्षेत्रफळाच्या रुमचा ताबा, दिनांक 28.12.2012 चे खरेदी खत दुरुस्त करुन नोंदणी करुन द्यावे, इमारतीच्या जागेचा नकाशा, 7 X 12 उतारा, भोगवटा प्रमाणपत्र व बांधकाम परवान्याची सर्टिफाईड नक्कल मिळाव्यात आणि सामनेवाला तक्रारदारास 380 चौ.फु. क्षेत्रफळाची रुम देऊ शकत नसल्यास आजच्या बाजार भावाप्रमाणे रुमची किंमत रु.15,00,000/- (रु.पंधरा लाख ) सामनेवाले कडून मिळावेत अशा मागण्या तक्रारदारांने मंचासमोर केल्या आहेत.
8. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ तक्रारीच्या सोबत पान क्र. 17 वर तक्रारदाराने सामनेवाला यांना वेळोवेळी दिलेल्या एकूण रु.4,20,000/- च्या एकूण 6 (सहा) पावत्या , सामेवाला यांनी तक्रारदारास नोटरीकृत करुन दिलेले खत दि.28.12.2012, तक्रारदाराने सा.वाले यांना वकिलामार्फत दि.30.06.2015 रोजी स्पीड पोस्टाने पाठविलेल्या नोटीसीची प्रत, स्पीट पोस्टाच्या पावत्या, इ. (छायांकित सत्यप्रती) कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. सामनेवाला यांना मंचातर्फे पाठविण्यात आलेल्या नोटीसीस अनुसरुन सामनेवाला वकीलामार्फत मंचापुढे हजर झाले. तक्रारी सोबतची कागदपत्रे मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी कैफियत दाखल केली. सामनेवाला यांची कैफियत पाहता सामनेवाला यांचा बचाव थोडक्यात दिसून येईल की, तक्रारदारांच्या तक्रारीमधील सर्व कथन खोटे आहे. सदरची तक्रार दाखल करण्यास कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही. तक्रारदाराने सन 2011 पासून सन 2015 पर्यत कोठेही तक्रार केलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार मुदतीबाहेर गेलेली आहे. सामनेवाला यांना तक्रारदार यांनी एक छदामही पैसे दिलेले नाही. त्यांनी सामनेवाला यांचे बरोबर 265 चौ.फु. रुमचा किंवा 380 चौ.फु. रुमचा असा कुठलाही व्यवहार केलेला नाही. तक्रारी सोबत दाखल केलेल्या सर्व पावत्या खोटया व बनावट आहेत. सामनेवाला यांनी कुठलीही पावती तक्रारदार यांना दिलेली नाही. खरेदीखतात पावत्या व पावत्यांमध्ये दाखविले प्रमाणे रक्कम दिलेल्याचा कुठेही उल्लेख नाही. सामनेवाल्याच्या इतर दोन खोल्यांसाठी तक्रारदारांनी पूर्वी गि-हाईक/खरेदीदार नावे 1) श्री. विक्रम शिंदे 2) शांता शिदे आणली होती. सामनेवाला यांनी त्या खरेदीदारांना सामनेवला यांनी योग्य मोबदला घेऊन त्यांच्या खोल्या ताब्यात दिल्या आहेत. अशी ओळख असल्याने तक्रारदार यांना इतर कामासाठी बँक किंवा वित्तिय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाला यांना तिचे लाभात खोटे खोटे एका रुमचे करारपत्र/खरेदीखत दिखाऊ स्वरुपात नोटरी करुन देण्याची विनंती केली. ज्या खरेदी खताच्या अनुषंगाने तक्रारदार यांना इतर कारणांसाठी कर्जाची रक्कम वापरता येईल. ख-या खु-या रुमसाठी तक्रारदार व सामनेवाला यांचेत कोणताही व्यवहार नव्हता. सबब सदरची तक्रार खोटी असून ती खर्चासहीत फेटाळण्यात यावी.
10. निष्कर्षासाठी मुद्दे व त्यावरील मंचाचे निष्कर्ष कारणांसहीत खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रार विषय
असलेल्या रुमचा ताबा न देऊन तसेच दुरुस्त
विक्रीपत्र करुन न देऊन सेवेत कसूर केली
आहे काय ? होय.
2. आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
11. तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत करण्यासाठी दिनांक 03.10.2016 रोजी स्वतःच्या पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सदरचे शपथपत्र पाहता ते सामनेवाला यांच्या जबाबास पुराव्यासह प्रतिजबाब अशा स्वरुपात आहे.
तसेच तक्रारदाराने 31.05.2018 रोजी आपला लेखी युक्तीवाद दाखल करुन कोणताही तोंडी युक्तीवाद दाखल करणार नसल्याची पुरसीस दि.23.08.2018 रोजी दाखल केली आहे.
12. या उलट सा.वाले यांनी दि.31.05.2018 रोजी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन दि.31.10.2018 रोजी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच तोंडी युक्तीवादही केला.
13. मंचाने तक्रारदारांच्या तक्रारीचे, दस्तऐवजांचे, पुरावा शपथपत्राचे तसेच सामनेवाला यांच्या कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे वाचन केले.
14. तक्रारदाराने सामनेवाले यांना तक्रार विषय असलेल्या रुमसाठी वेळोवेळी रोख रक्कम देऊन एकूण रक्कम रुपये 4,20,000/- दिल्याचे दिसून येते. त्या प्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.13.02.2011 रोजी रु.5,000/-, दि.14.02.2011 रोजी रुपये 5,000/-, दि.20.04.2011 रोजी रु.15,000/-, दि.05.05.2011 रोजी रु.85,000/-, दि.14.10.2011 रोजी रु.50,000/-, आणि दि.22.07.2012 रोजी रु.2,60,000/- दिले असून सामनेवाले यांनी त्या त्या रक्कमेच्या पावत्या तक्रारदारास दिलेल्या आहेत.
15. त्याच प्रमाणे सामनेवाला यांनी दि.28.12.2012 रोजी तक्रारदाराचे लाभात तक्रार विषय असलेल्या रुमचे नोटराईज खरेदीखत करुन दिल्याचे दिसून येते. सदरचे खत पाहता खरेदीखतात ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील मौजे दिवा येथील जमीन सर्व्हे नं.98 A, चा उल्लेख असून इमारत क्र.बिल्डींग क्र.रुम क्रमांक व तिचे क्षेत्रफळ इ. बाबी को-याच ठेवलेल्या आहेत. सदरच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून श्री.विक्रम कृष्णा शिंदे आणि शांता विक्रम शिंदे या दोन साक्षीदारांच्या सहया आहेत. तक्रारदाराने या दोन्ही साक्षीदारांची खरेदीखतेही दाखल केलेली आहेत. सदरची खरेदीखते ही सामनेवाला याने मौजे दिवा, सर्व्हे नं.98 हिस्सा नं.अ,साईनाथ नगर या नावाने ओळखली जाणा-या सामनेवाला यांच्या मालकीच्या इमारती मधील बिलडींग नं.1 साईसृष्टी अपार्टमेंट मधील दुस-या माळयावरील रुम नं.201 व रुम नं.202 प्रत्येकी क्षेत्रफळ 380 चौ.फु.रुमचे असून प्रत्येकी किंमत रु.6,00,000/- (रुपये सहा लाख मात्र) नमूद आहे.
16. सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार सदरचे साक्षीदार हे तक्रारदाराने पूर्वी आणलेली गि-हाइके होती व सामनेवाला यांनी त्यांना योग्य मोबदला घेवून त्यांच्या खोल्या त्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. एवढया ओळखीवरुन ते खरेदीदार तक्रारदाराने सामनेवाला यांना एक छदाम पैसे न देता सामनेवाले यांच्या विरोधात खोटया व बनावट खरेदीखतावर सहया करतील ही बाब एखाद्याच्या बुध्दीस न पटणारी आहे. शिवाय तक्रारदाराचे लाभात सामनेवाला यांनी करुन दिलेले खरेदीखत हे नोटराइज आहे. त्यामूळे केवळ रुमसाठी गि-हाईक आणून देण्याच्या ओळखीमुळे एखादा बांधकाम व्यवसायिक गि-हाईक आणून देणा-या व्यक्तीस इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी खोटे व दिखाऊ स्वरुपाचे खरेदीखत करुन देणार नाही. त्यामुळे सामनेवाला यांचा बचाव मान्य होण्यासारखा नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास सामनेवाला यांच्या दिवा येथील बांधकाम चालू असणा-या कोणत्याही इमारतीत 380 चौ.फु. ची बांधीव रुम देण्याच्या उद्देशानेच सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रु.4,20,000/- (रुपये चार लाख विस हजार मात्र) घेऊन बिल्डींग नंबर, रुम नंबर, इ.चा उल्लेख न करता नोटराईज खरेदीखत करुन दिले आणि नंतर कुठेही रुम न देता तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली असल्याचे दिसून येते. सबब मुद्दा क्र. 1 समोर होकारार्थी निष्कर्ष नोंदविण्यात येत आहे.
17. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असेही दिसून येते की, तक्रारदारांचे वकील श्री.महेश आनंद वाघोलीकर यांना माहितीच्या अधिकारात ठाणे महानगर पालिकेकडून दि.19.08.2015 च्या पत्राने सर्व्हे नं.98, हिस्सा नं.1 या जमीनीवरील इमारतीकरिता बांधकामास परवानगी दिलेली नव्हती व सदरचे बांधकाम हे मंजूरी न घेता केल्याचे आढळून आले आहे.
18. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रुमचा ताबा न दऊन त्रुटीची सेवा दिली असल्याने तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे. तथापी तक्रारदार यांनी रुमच्या मागणीस बाजारभावाने रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) मिळण्याचा विकल्प दिला आहे. परंतु त्यासाठी कोणताही लेखी पुरावा दिलेला नाही. त्यामुळे मंचाचे मते जर सामनेवाला दिवा येथील त्यांच्या कुठल्याही कायदेशीर बांधकाम असलेल्या इमारतीत 380 चौ.फु. बांधकाम झालेली, सोयिंनी युक्त अशी रुम देऊ शकत नसल्यास त्यांनी तक्रारदारास रु.4,20,000/- (रुपये चार लाख विस हजार मात्र) दिनांक 28.12.2012 पासून 18 टक्के वार्षिक व्याज दराने परत करणे, तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक, शाररिक त्रासापोटी आणि तक्रारदारास रुमच्या फायद्यापासून वंचीत रहावे लागल्यामुळे नुकसानी दाखल एकूण रु.1,50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- देणे न्यायोचित होईल.
19. परिणामी मंच खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 882/2015 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. या आदेशाच्या दिनांकापासून 03 (तीन) महिन्याचे आंत सामनेवला यांनी तक्रारदार यांना ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील मौजे दिवा येथील त्यांच्या कायदेशीर बांधकाम केलेल्या कोणत्याही इमारतीत 380 चौ.फु. क्षेत्रफळाच्या सर्व सोयिंनी युक्त अशा रुमचा ताबा नोंदणीकृत खरेदीखत करुन द्यावे
किंवा
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून घेतलेले रु.4,20,000/- (रुपये चार लाख विस हजार मात्र ) तक्रारदारास दिनांक 28.12.2012 पासून 18 टक्के वार्षिक व्याज दराने परत करावे.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक, शाररिक त्रासापोटी तसेच तक्रारदारास रुमच्या फायद्यापासून वंचित राहावे लागल्यामुळे नुकसानी दाखल एकूण रु.1,50,000/- (रुपये एक लाख पंन्नास हजार मात्र) व तक्रारीच्या खर्च रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) तक्रारदारास या आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याचे आंत द्यावेत. अन्यथा दोन्ही रक्कमांवर संपूर्ण रक्कम फिटेपावेतो 9 टक्के वार्षिक व्याजदर द्यावा लागेल.
4. सदरहू आदेशाच्या पती उभय पक्षकारांना विनाखर्च व विना विलंब पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः ठाणे.
दिनांकः 05/01/2019