द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 15 डिसेंबर 2011
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या कडे त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाचे काम दिले होते. त्यासाठी तक्रारदारांनी आर्किटेक्ट श्री. नेने यांना नेमले. त्यानुसार तक्रारदार, जाबदेणार आणि आर्किटेक्ट श्री. नेने यांच्यात सप्टेंबर 2008 मध्ये ठरलेल्या अटी आणि शर्तीनुसार काम करण्यासाठी जाबदेणार यांना सांगण्यात आले होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या साईट विकसित करणे, बांधकाम करणे, मजूरांना नेमणे व त्यांच्या कामावर देखरेख करणे, नकाशानुसार व करारानुसार कामासाठी लागणारे साहित्य आणणे, तसेच नकाशा, स्पेसिफिकेशन्स, ड्रॉईंग्स आर्किटेक्ट कडून घेऊन काम सुरु करणे अशा प्रकारचे काम जाबदेणार यांना देण्यात आले होते. जाबदेणार यांनी या कामासाठी मान्यता दिली, त्याचबरोबर लेबर व मटेरिअल कॉस्ट च्या 15 टक्के रक्कम जाबदेणार यांना देण्याचे ठरले. जाबदेणार हे तक्रारदारास वेळोवेळी तोंडी हिशेब सांगून तक्रारदारांकडून रक्कम घेत असत, प्रत्यक्ष काम झाल्यापेक्षा जाबदेणार अनेक वेळा तक्रारदारांकडून जास्त पैसे घेत असत. अनेक वेळा मागणी करुनही जाबदेणार यांनी लिखीत स्वरुपात तक्रारदारांना बिले दिली नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर जाबदेणार यांनी बिले दिली. मे 2009 मध्ये जाबदेणार यांनी तक्रारदारांना बिले दिली त्यात मटेरिअल कॉस्ट रुपये 2,72,884/- आणि लेबर कॉस्ट 35 टक्क्याप्रमाणे रुपये 95,509/- असे एकूण रुपये 3,68,393/- होतात. त्याऐवजी तक्रारदारांकडून जाबदेणार यांनी रुपये 10,30,001/- घेतले. मे 2009 अखेर जाबदेणार यांना रुपये 4,23,652/- दयायच्या ऐवजी रुपये 6,06,349/- देण्यात आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी दिनांक 31/1/2010 च्या पुर्वी किंवा त्या दिनांकापर्यन्त त्यांच्या बंगल्याचे बांधकाम पूर्ण करणार असे आश्वासन दिले होते. तरीसुध्दा जाबदेणार यांनी कालमर्यादा पाळली नाही. अनेक वेळा तक्रारदारांकडून रक्कम मागत गेले. तक्रारदारांना रक्कम देणे भाग पडले. अशा प्रकारे तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 31,29,876/- दिले. जाबदेणार यांनी दिनांक 5/6/2010 पर्यन्त संपूर्ण काम करुन देऊ असे सांगितले परंतू त्या तारखेपर्यन्त देखील काम पूर्ण केले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून एम.एस.ई.बी साठी रुपये 53,000/-, ग्रामपंचायत कामासाठी रुपये 35,000/- असे एकूण 32,17,876/- घेतले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी दिनांक 23/5/2010 पर्यन्त काम पूर्ण केले नाही. अनेक वेळा जाबदेणार यांना विनंती करुनही त्यांनी कामामधील दोष काढून दुरुस्ती केली नाही. सर्व मटेरिअलचा राडारोडा तेथे टाकून दिला आणि काम सोडून निघून गेले. तक्रारदारांना घराची सक्त निकड/घाई होती. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिलेले काम दिनांक 31/5/2010 रोजी रद्द केले. उर्वरित काम दुस-यांकडून करुन घेतले. जाबदेणार यांनी केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते. प्लास्टरमध्ये भेगा पडलेल्या होत्या, आर.सी.सी चे काम व्यवस्थित नव्हते, दार-खिडक्या व्यवस्थित बसविलेल्या नव्हत्या, रंगाचे काम असमाधानकारक होते, इलेक्ट्रिक चे काम संपूर्णत: चुकीचे होते. त्यामुळे तक्रारदारास जाबदेणार यांनी केलेल्या कामामध्ये बरेच बदल, दुरुस्त्या कराव्या लागल्या. त्यासाठी तक्रारदारांना रुपये 2,83,687/- खर्च आला. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 7/7/2010 रोजी नोटीस पाठविली आणि अधिकच्या रकमेचा परतावा मागितला. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या नोटीसला उत्तर देऊन तक्रारदारांच्या मागणीस नकार दिला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जास्तीची घेतलेली रक्कम रुपये 2,43,631/- परत मागतात, तसेच जाबदेणार यांनी केलेल्या कामामध्ये दुरुस्त्या, बदल व उर्वरित काम पूर्ण करुन घेणेसाठी आलेला खर्च रुपये 2,83,687/- परत मागतात. सबमर्सिबल पंप केबल बदलीच्या कामी आलेला खर्च रुपये 19,830/- परत मागतात. जाबदेणार यांनी कामामध्ये केलेल्या दिरंगाई पोटी वेळोवेळी साईट व्हिजीटसाठी आलेला खर्च रुपये 50,000/-, इतरत्र भाडयाने रहावे लागल्यामुळे आलेला खर्च रुपये 75,000/-, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मागतात. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून एकूण रक्कम रुपये 7,72,148/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. जाबदेणार हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून तक्रारदारांच्या बंगल्याचे काम करीत होते. तक्रारदारांच्या चीफ आर्किटेक्ट श्री. नेने यांनी जाबदेणार यांची कॉन्ट्रॅक्टर म्हणून नियुक्ती केलेली होती. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात कुठलाही करार झालेला नव्हता, करार नाही, जाबदेणार यांनी कुठलीही सेवा दिलेली नाही म्हणून तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार हे फक्त तक्रारदारांच्या बंगल्याचे बांधकाम व देखरेखीचे काम करणार होते. तक्रारदार प्रत्येक वेळी कामामध्ये बदल करण्याच्या सुचना देत होते. फिनीशिंग मटेरिअल तक्रारदार स्वत:च्या निवडीने आणत असत. तक्रारदार सप्लायर्स, व व्हेन्डॉर्स यांना रोख स्वरुपात अथवा चेकद्वारा रक्कम अदा करत असत. जाबदेणार यांना सुपरव्हिजन चार्जेस मिळालेले नाहीत. जाबदेणार यांनी अतिरिक्त रक्कम आकारलेली नाही. तक्रारदारांच्या समोर दर आठवडयाला मजुरांची मजूरी दिली जात होती. दैनंदिन मटेरिअल च्या खर्चासाठी लागणा-या रकमेसंदर्भात जाबदेणार डिमांड लेटर देत असत. तक्रारदारांनी किंवा श्री. नेने यांनी जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी आहे असे जाबदेणार यांना कधीच सांगितले नाही. तक्रारदार व त्यांच्या आर्किटेक्ट श्री. नेने यांच्या सांगण्यावरुन स्ट्रक्चरल बदल जाबदेणार यांना घडवून आणावे लागत होते. ब-याच वेळा नकाशाप्रमाणे केलेल्या बांधकामात बदल करावे लागत होते. मंजूर नकाशा दिनांक 30/4/2008 व रिव्हाईज्ड नकाशा दिनांक 9/9/2009 नुसार बांधकामात बदल होते. त्यामुळे बांधकाम खर्च व मजुरीचा खर्च वाढला. तक्रारदारांनी अतिरिक्त खर्चाची रक्कम देण्याचे मान्य करुनही प्रत्यक्षात दिली नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांना पूर्ण रक्कम दिली नाही. त्यामुळे काम पूर्ण करण्यास विलंब झाला त्यास फक्त जाबदेणार जबाबदार नसून तक्रारदार सुध्दा जबाबदार आहेत. जाबदेणार व तक्रारदार यांच्यात कुठलाही करार झालेला नव्हता, कुठलेही एस्टिमेट देण्यात आलेले नव्हते ज्यानुसार जाबदेणार यांनी काम करावयाचे होते. अनेक सप्लायर्स यांनी सामान/मटेरिअल जागेवर आणून टाकले त्याची सर्व बिले श्री. नेने यांना देण्यात आली होती. अचानक तक्रारदारांनी जाबदेणार यांना काम करण्यास मनाई केली. त्यामुळे साईटवर पडलेले मटेरिअल जाबदेणार जमा करु शकले नाहीत. तक्रारदारांनी दिनांक 31/5/2010 पर्यन्त कुठलीही तक्रार, दोष जाबदेणार यांच्या निदर्शनास आणून दिले नाहीत. यासर्वांवरुन तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी लेखी जबाबात मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे नमूद केले आहेत व इतर कागदपत्रे दाखल केली. जाबदेणार यांनी लेखी जबाबा सोबत यु.व्ही धोंगडे, टाऊन प्लॅनर अॅन्ड गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर यांचा व्हॅल्युएशन रिपोर्ट दिनांक 5/8/2011 दाखल केलेला आहे. त्यानुसार जाबदेणार यांनी रुपये 44,19,505/- चे काम केलेले आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी आर्किटेक्ट श्री. नेने यांच्या मार्फत जाबदेणार श्री. साठे यांना त्यांच्या बंगल्याचे काम करण्यासाठी म्हणून नियुक्त केले होते. वेळोवेळी तक्रारदार जाबदेणार यांना रक्कम देत होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाबदेणार यांना रक्कम रुपये 32,17,876/- देऊन सुध्दा जाबदेणार यांनी वेळेमध्ये, व्यवस्थित व संपूर्ण काम केले नाही, कामाचा दर्जा निकृष्ट होता. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात जाबदेणार यांनी कुठले काम करावयाचे होते, केव्हापर्यन्त पूर्ण करावयाचे होते, त्यासाठी किती रक्कम ठरली होती यासंदर्भात झालेला करार – पुरावा दाखल केलेला नाही. लिखीत स्वरुपात उभय पक्षकारात करार झाल्याचे दिसून येत नाही. वेळोवेळी पत्र व्यवहार झालेला दिसून येतो. परंतू त्या पत्र व्यवहारातून जाबदेणार यांनी नेमके कोणते काम करावयाचे होते, जाबदेणार यांना किती रक्कम दयायचे ठरले होते, किती कालावधीत काम पूर्ण करावयाचे होते याचा बोध त्यातून होत नाही, त्याबाबतचा उल्लेख पत्रांमध्ये केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदारांची जी तक्रार आहे की जाबदेणार यांनी त्यांच्याकडून 2,43,631/- अधिकची रक्कम घेतली, जाबदेणार यांनी केलेल्या कामामध्ये दुरुस्त्या, बदल व उर्वरित काम पूर्ण करुन घेणेसाठी त्यांना रुपये 2,83,687/- खर्च आला व इतर रकमे संदर्भात तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही. तसेच उर्वरित काम ज्यांच्याकडून पूर्ण करुन घेतले त्यांचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पुराव्या अभावी तक्रारदारांची तक्रार अमान्य करण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अमान्य करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.