तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. जी.व्ही. बोचे
विरुध्दपक्ष क्रमांक 1 तर्फे वकील :- ॲड. एम.एस. बोर्डे
विरुध्दपक्ष क्रमांक 2 तर्फे वकील :- ॲड. एस.ए. पाटील
::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा ड्रायव्हर असून त्याने स्वयंरोजगाराकरिता व कुटूंबाचे उदरनिर्वाहाकरिता दिनांक 30-12-2012 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून ट्रक खरेदी केला होता. सदर वाहन क्रमांक एमएच-28बी-7657 या वाहनावर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून ₹ 5,75,000/- वित्तपुरवठा/कर्ज घेतले होते व त्याची परतफेड ₹ 20,393/- प्रमाणे 39 मासिक हप्त्यात करावयाची होती. पहिला हप्ता दिनांक 05-01-2013 रोजी भरावयाचा होता आणि शेवटचा हप्ता दिनांक 05-02-2016 पर्यंत भरावयाचा होता. सदर टाटा ट्रकचा चेचीस क्रमांक 444026JTZ748949 व इंजिन क्रमांक 697TC57JTEZ896315 हा आहे. करारानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे अकोला कार्यालयात जमा करावयाचे होते. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 या कंपनीकडून सदर वाहनाचा विमा रक्कम ₹ 7,50,000/- चा काढला होता. विम्याच्या हप्त्याची रक्कम तक्रारकर्त्याने भरली होती. तक्रारकर्त्याने दिनांक 01-12-2012 रोजी पावती क्रमांक 07965078 नुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे विम्याची रक्कम एक ईएमआय ची ॲडव्हान्स रक्कम व इतर चार्जेस एकूण ₹ 53,067/- जमा केले होते.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडे रितसर नियमित मासिक हप्ते दिनांक 05-02-2014 पर्यंत जमा केलेत. तक्रारकर्ता त्याचे वाहनाद्वारे आकोट येथून रुईच्या गाठीणीचे भाडे घेऊन सिल्वसा येथे जात असतांना दिनांक 21-02-2014 चे मध्यरात्रीनंतर त्याचे ट्रकला भयानक अपघात विसरवाडी ता. नवापूर, जि. नंदूरबार येथे झाला. या अपघातात तक्रारकर्ता व क्लिनर यांचा मृत्यू होता-होता राहिला. अपघातानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी रितसर आपले कंपनीचे सर्व्हेअर जळगांव खानदेश येथून झालेल्या नुकसानीची पडताळणी करण्याकरिता पाठविले होते. सर्व्हेअर यांनी त्यावेळी झालेल्या नुकसानाच्या साडे पाच ते सहा लाख रुपये मुल्यांकन केले. तसेच तक्रारकर्त्यास एवढी रक्कम विमा भरपाई म्हणून मिळेल, असे नमूद केले. सर्व्हेअर यांनी गाडीचे खूप नुकसान झाल्याने वाहन टोटल लॉस मध्ये गेल्याचे सांगितले आणि अहवाल विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे पाठविण्याचे कळविले. तक्रारकर्त्याने 3 दिवसानंतर दुस-या वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक आकोट येथे ओढून आणला.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे विमा रकमेबाबत मागणी केली. त्यावेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे व्यवस्थापक यांनी तक्रारकर्त्यास स्वत:च्या खात्यातील रक्कम रुपये एक लाखाचा चेक दिला व तुम्ही दुरुस्तीचे काम सुरु करा, तुमची विम्याची रक्कम 2 ते 3 महिन्यात तुम्हाला मिळून जाईल, असे सांगितले. तक्रारकर्त्याने वाहनाचे राहिलेल्या कामाचे अंदाजपत्रक ₹ 4,50,000/- कंपनीकडे सादर केले. तक्रारकर्त्याने त्यांचे नातेवाईकाकडून उधार रक्कम घेऊन वाहनाची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. वाहन पूर्ण दुरुस्त करुन चालू स्थितीत आणण्याकरिता तक्रारकर्त्यास 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागला. परंतु, विम्याची रक्कम तक्रारकर्त्यास मिळाली नाही. नियमानुसार विमा कंपनी अपघातानंतर 90 दिवसांचे आत विम्याची रक्कम देतात. नियमानुसार तक्रारकर्त्यास दिनांक 30-05-2014 रोजी पर्यंत रक्कम देणे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना बंधनकारक होते. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी मुदतीत रक्कम उपलब्ध करुन दिली असती तर वाहन दिनांक 01 जून 2014 पासून व्यवस्थित होऊन तक्रारकर्त्यास उत्पन्न सुरु झाले असते. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी व्यापारातील अनुचित प्रथेचा अवलंब करुन आजपर्यंत रक्कम दिली नाही.
तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचे कार्यालयात विमा क्लेमची रक्कम मिळण्याकरिता भेट दिली. परंतु, त्याला आश्वासनच देण्यात आले. उलटपक्षी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी मागील 1 महिन्यापासून वाहनांचे हप्ते भरण्याकरिता दडपण आणणे व वारंवार फोन करुन वाहन जप्त करण्याची धमकी देणे सुरु केले. वाहनाच्या अपघातानंतर तक्रारकर्त्याने वाहन विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे टोटल लॉस झाल्यामुळे जमा करण्याचे ठरविले होते. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी वाहन स्वत: दुरुस्त करुन सुरु करण्याकरिता तक्रारकर्त्यास प्रवृत्त करुन आजपर्यंत रक्क्म प्राप्त करुन दिली नाही. तक्रारकर्त्याने स्वत:जवळील व नातेवाईकांकडून प्राप्त झालेली उधार रक्कम ₹ 4,50,000/- व राहूल महल्ले यांनी दिलेली रक्कम ₹ 1,00,000/- वाहनाच्या दुरुस्तीवर खर्च करुन वाहन चालू स्थितीत आणले आहे. वाहन वाहतुकीकरिता तयार झालेले असतांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे विरुध्दपक्ष कमांक 2 कडून विम्याची रक्कम मिळून देण्याऐवजी वाहन जप्त करण्याची कार्यवाही करण्याची धमकी देत आहेत. सदरचे वाहन तक्रारकर्त्याचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी व्यापारातील अनुचित प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्त्यास गंभीर आर्थिक संकटात आणून ठेवले आहे. विरुध्दपक्ष कमांक 1 व 2 यांनी रक्कम देण्यास विलब केल्यामुळे तक्रारकर्त्याचे दिनांक 01-06-2014 पासून दररोजचे व वाहनापासूनचे उत्पन्न सरासरी ₹ 1,500/- प्रतिदिन प्रमाणे मासिक ₹ 37,500/- चे नुकसान झालेले आहे. जी रक्कम एकूण ₹ 2,60,000/- होते तसेच दुरुस्तीकरिता झालेले ₹ 4,50,000/- इतर लोकांचे देणे आहेत. सबब, तक्रारकर्त्याची प्रार्थना की, 1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होऊन विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी व्यापारातील अनुचित प्रथेचा अवलंब केला असे घोषित करुन दयावे. 2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना आदेश दयावेत की, त्यांनी तक्रारकर्त्याचे वाहन क्रमांक एमएच-28-बी-7657 चे विमा क्लेमची रक्कम ₹ 5,50,000/- त्याला व्याजासह देण्यात यावी आणि या रकमेतून दुरुस्तीकरिता दिलेले अग्रीम रक्कम ₹ 1,00,000/- व थकित मासिक हप्त्यांची रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी परस्पर जमा करुन घ्यावी. 3) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 01-06-2014 पासून वाहन त्यांचे दिरंगाईमुळे उभे राहिल्याने झालेले नुकसान रक्कम ₹ 1,500/- प्रतिदिन प्रमाणे एकूण ₹ 2,60,000/- व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. 4) अपघातग्रस्त वाहनाचा विमा दिला नसल्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी क्लेमची रक्कम देईपर्यंत वाहन क्रमांक एमएच-28-बी-7657 ची जप्ती व विक्री करण्यास कायमची मनाई करण्यात यावी. 5) तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी व सदर तक्रारीचे खर्चापोटी एकत्रितपणे ₹ 1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 47 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, हे म्हणणे बरोबर नाही की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडे रितसर मासिक हप्ते दिनांक 05-02-2014 पर्यात जमा केलेत. हे म्हणणे माहितीअभावी नाकबूल आहे की, तक्रारकर्ता त्याचे वाहनाद्वारे आकोट येथून रुईचा गाठीणीचे भाडे घेऊन सिल्वासा येथे जात असतांना दिनांक 21-02-2014 चे मध्यरात्रीनंतर त्याचे ट्रकला भयनक अपघात झाला. हे म्हणणे नाकबूल आहे की, अपघातानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी रितसर आपले कंपनीचे सर्व्हेअर जळगांव खान्देश येथून झालेल्या नुकसानीची पडताळणी करण्याकरिता पाठविले होते. हे म्हणणे नाकबूल आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे रकमेबाबत मागणी केली त्यावेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे व्यवस्थापक श्री. राहूल महल्ले यांनी तक्रारकर्त्यास स्वत:च्या खात्यातील रक्कम 1,00,000/- चा चेक दिला.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 हया कंपनीच्या व्यवस्थापनासोबत विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा कोणताही संबंध नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा कार्यभार पूर्णपणे वेगळा असून त्यांच्या ऐकमेकांच्या कामासोबत कोणताही संबंध नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडे येऊन त्याच्याजवळ ट्रकची दुरुस्ती करण्याकरिता काहीही रक्कम उपलब्ध नाही असे म्हणून वैयक्तिक कर्ज दया, अशी लेखी विनंती विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे व्यवस्थापक राहूल महल्ले यांच्याकडे केल्यानंतर व तक्रारकर्त्यास योग्य ती मदत व्हावी म्हणून विरुध्दपक्ष कमांक 1 यांनी तक्रारकर्त्याची विनंती मान्य करुन त्याला एक लाख रुपये वैयक्तिक कर्ज देऊन गाडी दुरुस्त करुन त्याने नियमित हप्ते भरण्याच्या उद्देशाने दिले होते. राहूल महल्ले यांनी त्यांच्या स्वत:च्या खात्यातून कोणतीही रक्कम तक्रारकर्त्यास दिलेली नाही.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याने गाडी दुरुस्तीकरिता केलेला खर्च व त्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी बरेच दिवसपर्यंत तक्रारकर्त्यास त्याच्या थकित किस्तीबाबत मागणी केली नाही. परंतु, तक्रारकर्त्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर सुध्दा व त्यास विम्याची रक्कम मिळून सुध्दा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे सुरु केल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्यास कर्जाची किस्त भरण्यास विनंती केली व ते न भरल्यास योग्य ती कार्यवाही करण्याची नोटीस दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सदर खोटी केस, खोटया तथ्याच्या आधारे दाखल करुन मनाई हुकूम घेतला आहे. तक्रारकर्त्याकडे विरुध्दपक्ष क्रमांक 1 ची बरीच मोठी किस्तीची रक्कम व इतर रकमा येणे आहे. तरी तक्रारकर्त्याची खोटी तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी तसेच तक्रारकर्त्यास त्याचेकडे बाकी असलेल्या किस्तीच्या व इतर रकमा भरण्याचा आदेश देण्यात यावा, ही विनंती. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या खोटया तक्रारीमुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना अतिशय मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याकरिता तक्रारकर्त्याची तक्रार ₹ 25,000/- खर्च लावून खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने त्याच्या व्यावसायिक वाहनासंबंधी केलेली असून त्याच्या वैयक्तिक उपयोगाच्या ट्रकबाबत केलेली नाही. सदर ट्रकचा परवाना सुध्दा व्यावसायिक असून व्यावसायिक विमा पॉलीसी अंतर्गतच पॉलीसी काढलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत येत नाही. करिता तक्रार या मुदयावर खारीज करण्यालायक आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 श्रीराम जनरल इन्शुरंस कंपनी लिमिटेड ही एक स्वतंत्र विमा कंपनी असून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही स्वतंत्र वित्तीय कंपनी आहे. सदर केसमध्ये फक्त हा योगायोग असून विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे सदर गाडीवर हायपोथिकेशन आहे. तक्रारकर्त्याचा ट्रक एमएच-28/बी-7657 हा भाडे तत्वावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडून खरेदी केलेला आहे. विमा पॉलीसीवर सुध्दा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. कार्यालय अकोला यांच्या अर्थसहाय्याबद्दल हायपोथिकेशन ॲग्रीमेंट विमा पॉलीसीवर नमूद आहे. सदर विमा पॉलीसीच्या करारानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड हे नुकसान भरपाईची रक्कम घेण्यास पात्र आहेत व तसा त्यांना अधिकार आहे.
अपघाताची सूचना प्राप्त होता बरोबर कंपनीकडे दावा क्रमांक 100031/31/14/सी/0522132 पॉलीसी क्रमांक 10003/31/14/454046 विमा कालावधी 17-10-2013 ते 18-10-2014 आय.डी.बी. ₹ 7,01,162/- नुसार नोंदविण्यात आला. कंपनीने सर्व्हेअर नेमून अपघातस्थळी भागवत जी. महाजन अधिकृत लायसन्सधारक सर्व्हेअर जळगांव खान्देश यांच्यामार्फत दिनांक 24-02-2014 रोजी 22-02-2014 रोजी झालेल्या अपघातग्रस्त ट्रकचे सर्वेक्षण करण्यात आले.
विमा दावा निकाली काढण्याचे उद्देशाने विमा कंपनीने झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्याकरिता अधिकृत लायसन्स धारक सर्व्हेअर व्ही.एस. कलंत्री, अकोला यांची नेमणूक केली. त्यानुसार त्यांनी दिनांक 04-03-2014 रोजी मुल्यांकन करुन त्यांनी झालेल्या नुकसानाचा सर्व्हे रिपोर्ट सादर केला. दरम्यान त्यांनी दिनांक 25-03-2014 रोजी गाडी दुरुस्तीअंतर्गत सुध्दा पाहणी केली. अधिकृत सर्व्हेअर यांच्या मुल्यांकन अहवालानुसार विमा कंपनीचे दायित्व ₹ 1,15,000/- ठरविण्यात आले. त्याबाबतचा सविस्तर सर्व्हे रिपोर्ट न्यायमंचासमारे सादर केला आहे. तक्रारकर्त्याचा दावा व सर्वे रिपोर्ट यानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी ₹ 1,15,000/- ची नुकसान भरपाई मंजूर करुन नियमानुसार दिनांक 22-04-2015 रोजी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड यांना दिले आहेत. कारण याच कंपनीचे सदर ट्रकवर हायपोथिकेशन नमूद आहे. याप्रमाणे कायदेशीररित्या तक्रारकर्त्याचा क्लेम विमा कंपनीने योग्य मुल्यांकनाच्या आधारावर मंजूर करुन दिलेला आहे, त्यामुळे सदरच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. क्लेमबाबतची कागदपत्रे दस्तऐवज यादीसोबत न्यायमंचासमोर सादर केली आहे. करिता सदरची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
का र णे व नि ष्क र्ष
तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, उभयपक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच उभयपक्षाने दाखल केलेले सर्व न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात उभयपक्षाला ही बाब मान्य आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 30-12-2012 रोजी ट्रक हे वाहन विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून ₹ 5,75,000/- कर्ज घेवून विकत घेतला होता. करारानुसार सदर कर्जाची परतफेड मासिक हप्ता ₹ 20,393/- प्रमाणे 39 मासिक हप्त्यात करावयाची होती. पहिला हप्ता दिनांक 05-01-2013 ला भरावयाचा होता व शेवटचा हप्ता दिनांक 05-02-2016 पर्यंत भरावयाचा आहे. सदर कर्जाचे हप्ते विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या अकोला कार्यालयात जमा करावयाचे होते तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत. तक्रारकर्त्याचे सदर ट्रकचा विमा विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून काढलेला होता ही बाब विरुध्दपक्ष क्रमांक 2 ला मान्य आहे. विमा कालावधी बद्दल वाद नाही. तसेच या ट्रकचा अपघात झाला होता याबद्दल देखील विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 ला वाद नाही.
तक्रारकर्त्याच्या युक्तीवादानुसार अपघातानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी त्यांच्या कंपनीचे सर्व्हेअर, जे जळगांव खान्देशचे होते. त्यांना नुकसानीची पडताळणी करण्याकरिता पाठविले होते व त्यांनी वाहन टोटल लॉस मध्ये गेल्याचे सांगितले व साडे पाच ते सहा लाख रुपये मुल्यांकन केले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या व्यवस्थापकाने तक्रारकर्त्यास स्वत:च्या खात्यातील एक लाख रुपये देवून ट्रकच्या दुरुस्तीचे काम करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने राहिलेल्या कामाचे अंदाजपत्रक ₹ 4,50,000/- चे विरुध्दपक्षाकडे सादर केले व नातेवाईकांकडून उधार रक्कम घेवून ट्रक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. सदर दुरुस्तीला 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागला. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी विमा दाव्याची रक्कम दिली नाही. उलट विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी वाहन जप्त करण्याची धमकी दिली, हे योग्य नाही. यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा युक्तीवाद असा आहे की, तक्रारदारास वाहन अपघातानंतर त्याच्या विनंतीवरुन ₹ 1,00,000/- वैयक्तिक कर्ज दिले होते व बरेच कालावधीपर्यंत त्याच्या थकित किस्तीबाबत मागणी केली नाही. परंतु, नंतर ट्रक सुस्थितीत झाल्यावर देखील तक्रारकर्त्याने थकीत कर्जाचे हप्ते भरले नाही. सदर ट्रक हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 ची हायपोथिकेटेड संपत्ती आहे, त्यामुळे कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही कंपनी सदर ट्रकची मालक आहे म्हणून ट्रकच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास विरुध्दपक्ष क्रमांक 1 पात्र आहेत व विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदाराच्या कर्ज खात्यात वळती करण्यात आली आहे. म्हणून यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही. तक्रारकर्त्याकडून कर्जाच्या थकित हप्त्याच्या किस्ती व्याजासह घेणे आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याकडून त्याचे वाहन ट्रकच्या अपघाताची सूचना मिळाल्यानंतर विमा कंपनी या नात्याने लगेच विमा करारानुसार सर्व्हे करुन त्यांनी काढलेली दायित्व रक्कम ₹ 1,15,000/- नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना दिनांक 22-04-2015 रोजी त्यांचे सदर वाहनावर हायपोथिकेशन नमूद आहे म्हणून दिलेली आहे.
उभयपक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, तक्रारकर्त्याच्या सदर ट्रकच्या वाहन पॉलीसी प्रतीचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर Insured म्हणून तक्रारदाराचे नाव नमूद आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या कर्ज हप्ता परतफेडीचा तक्ता व पावत्या पाहिल्या असता त्यात सदर विम्यापोटी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे प्रिमीअमची रक्कम तक्रारदाराने भरली होती असे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी सदर विमा रक्कम तक्रारकर्त्यालाच देणे भाग होते ती त्यांनी तक्रारकर्त्याने हे प्रकरण दाखल केल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना दिलेली आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना विमा क्लेमची रक्कम तक्रारकर्त्यातर्फे स्विकारण्याचा हक्क व अधिकार हा तक्रारकर्त्याच्या संमतीशिवाय नाही. कारण विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे तक्रारकर्त्याविरुध्द थकित कर्ज हप्ते रक्कम वसूल करुन घेण्यास अलग रितीने त्यांच्या नियमानुसार पात्र आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 2 विमा कंपनीने रेकॉर्डवर स्थळ निरीक्षण अहवालाच्या प्रती दाखल केल्या आहेत, दोन्ही अहवाल एकसारखे आहेत. परंतु, तक्रारकर्त्याने सदर ट्रकची दुरुस्ती केलेली असून त्यापोटीचे देयकांचे बिल जवळपास ₹ 4,50,000/- ईतक्या रकमेचे, त्याबद्दल रक्कम स्विकारणा-या व्यक्तींच्या प्रतिज्ञालेखसह रेकॉर्डवर दाखल केले आहेत, ही सर्व देयके व कागदपत्रे, विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या सर्व्हे रिपोर्टवरुन तपासले असता असे दिसते की, तक्रारकर्त्याच्या ट्रक या वाहनाचा अपघात हा विसरवाडी ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे झाला होता. तेथून ट्रक अकोट येथे आणण्याकरिता त्याला ₹ 35,000/- टोईंग चार्ज लागला व त्याबद्दलचे बिल, स्विकारणा-या व्यक्तीच्या प्रतिज्ञालेखासह रेकॉर्डवर दाखल आहे. परंतु, ही रक्कम सर्व्हे रिपोर्टमध्ये अगदी नगण्य उल्लेखित आहे. घटनास्थळावरील सर्व्हे रिपोर्ट व वाहनाची दुरुस्ती सुरु असतांना अकोट येथे घेतलेला सर्व्हे रिपोर्ट हे दोन्ही वेगवेगळे असणे आवश्यक होते. परंतु, दोन्ही सर्व्हे रिपोर्ट एकसारखे आहेत. त्यामुळे हे सर्व्हे रिपोर्ट संदिग्ध आहेत. कारण तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन असे स्पष्टपणे माहीत होते की, सदर ट्रकमध्ये 16,525 किलो वजन होते व वाहनाचे वजन 8,950 किलो होते, त्यामुळे अशा वजनदार वाहनाचा अपघात झाल्यानंतर नुकसान हे साहजिकच मोठया प्रमाणात संभवते. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचे मुल्यांकन पत्र दाखल केले. त्यावरुन असा बोध होतो की, वाहनाची केबीन व बॉडी नवीन बनवून वाहन सुस्थितीत आणल्या गेले आहे. रेकॉर्डवरील तक्रारकर्त्याने दाखल केलेले बिल व ईतर पुरावा यावरुन तक्रारकर्त्याने वाहनास स्वत: जवळून पूर्ण खर्च लावून वाहन दुरुस्त केल्याचे सिध्द् होते व ही रक्कम सर्व्हे रिपोर्ट अहवालापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेला कागदोपत्री पुरावा दुर्लक्षित करता येणार नाही, असे मंचाला वाटते. सबब, तक्रारकर्त्याचे वाहनाचे दुरुस्ती करणा-या, स्पेअर पार्ट देणा-या व ईतर संबंधित सर्व व्यक्तींचे प्रतिज्ञालेख मंचाने स्विकारुन, तक्रारकर्त्याला सदर वाहन दुरुस्त करण्यास जवळपास अंदाजे ₹ 4,50,000/- ईतकी रक्कम लागली व ती सर्व तक्रारकर्त्याने दिलेली आहे. त्यामुळे हया रकमेतून विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना सदर वाहनाच्या विम्यापोटी दिलेली रक्कम ₹ 1,15,000/- वजा करुन उरलेली रक्कम ₹ 3,35,000/- व्याजासह ट्रकच्या नुकसान भरपाईपोटी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी ₹ 5,000/- व प्रकरण खर्च ₹ 3,000/- दयावा, असे ही आदेश पारित करण्यात येतात. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे जसे की, ...
- III (2012) CPJ 4 (SC)
Suryapalsingh Vs. Siddha Vinayak Motors & Anr.
- III (2015) CPJ 43 (Mah)
L & T. Finance Ltd., Vs. Ramdas Urkudaji Gajbhiye
यातील तथ्ये विचारात घेऊन अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याचे वाहन क्रमांक MH-28-B-7657 च्या विमा क्लेमची उर्वरित रक्कम ₹ 3,35,000/- ( अक्षरी रुपये तीन लाख पस्तीस हजार फक्त ) दर साल दर शेकडा 8 टक्के व्याज दराने प्रकरण दाखल दिनांक 01-01-2015 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहित दयावी तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी ₹ 5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च ₹ 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) ईतका तक्रारकर्ते यांना दयावा.
3) विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याच्या सदर वाहनावरील कर्जाऊ रक्कम रितसर कायदयातील तरतुदीनुसार वसूल करुन घ्यावी.
4) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
4) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.