अर्जदारा तर्फे वकील - श्री.जी.के.पोफळे
गैरअर्जदार तर्फे वकील - श्री.पी.एस.भक्कड
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. वरील सर्व प्रकरणात गैरअर्जदार हे एकच असून अर्जदाराने गैरअर्जदार यांचेविरुध्द केलेली मागणी ही एकाच प्रकारची असल्याने वरील सर्व प्रकरणात मंच एकत्रितरीत्या निकाल देत आहे.
2. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदारने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठीची आहे.
अर्जदारची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
3 . वरील तक्रारीतील सर्व अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून कर्ज काढून ट्रक खरेदी केलेले आहेत. त्यांचा तपशिल खालील प्रमाणेः-
तक्रार क्रमांक | ट्रक क्रमांक | कर्जाची रक्कम रुपये |
130/2012 | एम एच 26 एच 6735 | 10,96,000/- |
131/2012 | एम एच 26 एच 7293 | 10,00,000/- |
132/2012 | एम एच 26 एच 7284 | 11,45,000/- |
133/2012 | एम एच 26 एच 6870 | 10,00,000/- |
134/2012 | एम एच 26 एच 6780 व एम एच 26 एच 6834 | 11,45,000/- |
वरील प्रमाणे गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराने ट्रक खरेदी करणेसाठी कर्ज घेतलेले असून त्यासाठी अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये करार झालेला आहे. करारानुसार कर्ज परतफेड व्याजासहीत ठरलेल्या मुदतीमध्ये करावयाची होती. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार दाखल दिनांकापर्यंत कर्ज परतफेडीपोटी रक्कमा खालील प्रमाणे भरलेल्या आहेतः-
तक्रार क्रमांक | ट्रक क्रमांक | कर्जापोटी भरलेली रक्कम रुपये |
130/2012 | एम एच 26 एच 6735 | 11,92,155/- |
131/2012 | एम एच 26 एच 7293 | 10,17,941/- |
132/2012 | एम एच 26 एच 7284 | 08,08,825/- |
133/2012 | एम एच 26 एच 6870 | 10,08,798/- |
134/2012 | एम एच 26 एच 6780 व एम एच 26 एच 6834 | 20,50,311/- |
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम भरलेली असतांनाही उर्वरीत रक्कम भरण्याचीही अर्जदार तयार आहेत. परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास आजपर्यंत भरलेल्या हप्याचा हिशोब व करारपत्र दिलेले नाही. अर्जदार यांनी आजपर्यंत भरलेल्या हप्याचा हिशोब व करारपत्र गैरअर्जदार यांना मागीतले असता अर्जदारास दमदाटी करुन कार्यालयातून हाकलून दिले. तसेच अर्जदाराचे वाहन जप्त करण्याची धमकी दिली. अर्जदार यांचे वाहन वेळोवेळी नादुरुस्त होऊन त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडे उर्वरीत रक्कम भरु शकला नाही. परंतु अर्जदार हा गैरअर्जदार यांनी कर्जाच्या रक्कमेवरील दंड व व्याज कमी केल्यास एकमुस्त रक्कम भरण्यास तयार आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जाणिवपूर्वक हप्ता भरलेला नाही असे नाही. अर्जदार हा तडजोडीस तयार आहे. गैरअर्जदाराचे एजंट हे अर्जदाराचे ट्रक जप्त करणेसाठी चकरा मारत असल्याने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांना असे आदेशीत करावे की, अर्जदाराचे वाहन गैरअर्जदार यांनी बेकायदेशीर बळाचा वापर करुन अर्जदाराचे ताब्यातून घेऊ नये. तसेच वाहनासाठी केलेला अर्थपुरवठा दुरुस्त हिशोबाने दंड व व्याज न लावता उर्वरीत हप्ते स्विकारुन नाहरकत प्रमाणपत्र गैरअर्जदार यांनी द्यावे. अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/-,दाव्याच्या खर्चापोटी रक्कम र.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीव्दारे अर्जदार करतात.
4. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः-
5. अर्जदार यांनी ज्या कारणासाठी सदरची तक्रार यांनी दाखल केलेल्या केलेली आहे त्या कारणासाठी अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मंचास चालविणेचा अधिकार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या कर्जाची परतफेड अर्जदाराने केलेली नाही. अर्जदाराकडून आजमितीस गैरअर्जदार यांना रक्कम येणे बाकी आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वाहनाच्या विम्यापोटी रक्कमा जमा केलेल्या आहेत. विम्याची व डिपॉझिटचा हप्ता मिळून मासिक हप्ता ठरलेला होता. अर्जदार हा सुरुवातीपासूनच थकबाकीदार होता व त्याचे कर्जखाते थकीत झाल्याने अर्जदाराने नवीन कर्ज घेऊन ती रक्कम जुन्या कर्जाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वाहनाचा विमा वेळोवेळी काढलेला असल्याने विमा हप्त्याची रक्कम अर्जदाराकडून येणे बाकी आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नेहमीच चांगली सेवा दिलेली आहे. गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करण्यात आला नाही. गैरअर्जदार यांना सर्व अर्जदारांकडून खालील प्रमाणे रक्कम येणे बाकी आहेतः-
तक्रार क्रमांक | ट्रक क्रमांक | कर्जापोटी येणे असलेली रक्कम रुपये |
130/2012 | एम एच 26 एच 6735 | 10,68,972/- |
131/2012 | एम एच 26 एच 7293 | 10,96,479/- |
132/2012 | एम एच 26 एच 7284 | 24,35,660/- |
133/2012 | एम एच 26 एच 6870 | 15,41,857/- |
134/2012 | एम एच 26 एच 6780 व एम एच 26 एच 6834 | 13,22,564/- |
गैरअर्जदार यांनी अर्जदारास वेळोवेळी सुचना देऊनही अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कर्जाची परतफेड करारानुसार नियमीत केलेली नाही. त्यामुळे करारातील नियम व अटी दोन्ही पक्षकारावर बंधनकारक आहे. अर्जदाराने नवीन कर्ज घेतल्याची बाब जाणूनबुजून लपवून ठेवलेली आहे. त्यामुळे अर्जदार जोपर्यंत संपुर्ण रक्कम देत नाही त्या तारखेपर्यंतचे दंड व्याज मागणेचा अधिकार गैरअर्जदार यांना आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
6. अर्जदार यांनी तक्रारीच्या पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांनी तक्रारीतील केलेली मागणी बघितली असता अर्जदाराने त्यांचे वाहन गैरअर्जदार यांनी जप्त करु नये तसेच गैरअर्जदार यांनी वाहनासाठी केलेला कर्ज पुरवठयाचा दुरुस्त हिशोब देऊन दंड व व्याज न लावता उर्वरीत हप्ते स्विकारावे अशी प्रमुख मागणी तक्रारीमध्ये केलेली आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या सर्व तक्रारींचे अवलोकन केले असता सर्व अर्जदार हे एकाच कुटूंबातील व्यक्ती असल्याचे निदर्शनास येते. अर्जदार यांनी यापुर्वीही मंचासमोर ट्रकच्या कर्ज परतफेडीबाबत अनेक फायनान्स कंपनींच्या विरुध्द तक्रारी दाखल केलेल्या होत्या. अर्जदाराच्या पुर्वीच्या तक्रारी व या तक्रारींचे अवलोकन केले असता अर्जदार व त्यांचे कुटूंबीयांकडे मिळून एकूण 20 ते 25 ट्रक असल्याचे निदर्शनास येते. अर्जदार यांनी युक्तीवादाच्या वेळी ही बाब मान्य केलेली आहे. त्यामुळे अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत मोडतो किंवा नाही असा प्राथमिक मुद्या उपस्थित होतो. अर्जदार व त्यांच्या कुटूंबीयांकडे एकूण 20 ते 25 ट्रक असल्याने अर्जदार हा ट्रकचा वापर निश्चितच व्यावसायीक कारणासाठी करत आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा,1986 नुसार अर्जदार हा ग्राहक नाही. अर्जदार हे व्यापारी कारणासाठी वाहन वापरीत असल्याने अर्जदार हे ग्राहक होऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे. मा. राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या ( III (2013) CPJ (NC) प्रकरण क्रमांक Revision Petition NO. 3267 of 2012 , Indusind Bank Ltd. Vs. Avtar Singh , decided on: 02.05.2013 Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(d),21(b)- Complainant is having more than 4 vehicles in his name- loan was taken for purchasing another vehicle for commercial purpose- Complainant has not availed services of OP for purpose of his livelihood by means of self employment- Complainant not falls within purview of consumer मधील निर्णयानुसार मा. राष्ट्रीय आयोगाच्या मताप्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होत नाही. अर्जदार हे त्यांचे वाहन व्यापारी कारणासाठी वापरत असल्याने अर्जदार यांच्या तक्रारी मंचासमोर चालू शकत नाही. तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे कर्जाची परतफेड नियमानुसार केलेली नाही हे अर्जदार यांनी तक्रारीमध्ये मान्य केलेले आहे. परंतु कर्जाची परतफेड न करणेसाठी दिलेले कारण हे संयुक्तीक नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदार हा थकबाकीदार आहे असे कथन केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे नियमितपणे कर्जाचे हप्ते भरलेले असल्याचा पुरावा मंचासमोर दिलेला नाही. त्यामुळे अर्जदार हे थकबाकीदार आहेत हे स्पष्ट होते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. मुळ निकालपत्र प्रकरण क्रमांक 130/2012 मध्ये ठेवावे व निकालाच्या सत्य प्रती उर्वरीत प्रकरणांमध्ये ठेवाव्यात.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.