निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 10/01/2013 तक्रार निकाल दिनांकः- 04/04/2014
कालावधी 01 वर्ष 02 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सूनील राघोजी खंदारे, अर्जदार
वय 35 वर्षे. कामधंदा.वाहतूक व्यवसाय. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा. सिध्दार्थ नगर, पूर्णा, ता.पूर्णा, जि.परभणी.
विरुध्द
1 श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. गैरअर्जदार.
व्दारा – अधिकृत प्रतिनिधी, परभणी कार्यालय अॅड.ए.ए.वैद्य.
वसमत रोड, परभणी.
2 अधिकृत प्रतिनिधी,
जे.व्ही.पी.सुप्रीम फायनान्शियल सर्व्हिसेस,
मुख्य कार्यालय, पूणे, शाखा कार्यालय
पिनाटे कॉम्प्लेक्स, पिनाटे नगर, लातूर.
3 अधिकृत प्रतिनिधी,
संभवनाथ फायनान्स, परभणी शाखा, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने जास्त दराने व्याज व दंड आकारणी करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो पूर्णा येथे अॅटोरिक्षा चालवून उपजिवीका करतो व अर्जदाराचे कुटूंब याच उत्पन्नावर अवलंबून आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने अॅटो क्रमांक MH-22-H-4924 खरेदी करतांना गैरअर्जदार क्रमांक 1 कडून दिनांक 28/10/2009 रोजी 1,10,000/- रु. चे कर्ज घेतले होते व त्यावेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 चे प्रतिनिधी गैरअर्जदार क्रमाक 3 यांचेकडे स्वतःचे 40,000/- रु. सदर अॅटोचे Down Payment म्हणून भरले होते. सदर कर्जाची परतफेड डिसेंबर 2009 ते ऑक्टोबर 2012 पर्यंत एकुण 35 हप्त्यात पूढील प्रमाणे करायचे ठरले होते.
रु. 5042/- चे एकुण 17 हप्त्ेा 85,714/- रु.
रु. 3361/- चे एकुण 18 हप्ते 60,498/- रु.
----------------
1,46,212/-
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे यांचे प्रतिनिधी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 काम पाहतात व त्यांचे प्रतिनिधी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 काम पाहतात म्हणून डिसेंबर 2009 पासून अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडे हप्ते भरण्यास सुरुवात केली व दिनांक 17/12/2009 पासून 16/08/2011 पर्यंत पहिल्या 17 हप्त्यापैकी एकुण 14 हप्त्यांची रक्कम म्हणून 12 पावत्या प्रमाणे 70,588/- रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरली व उरलेल्या 3 हप्त्याची रक्कम दिनांक 23/09/2011 व दिनांक 24/11/2011 रोजली 15,150/- रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरली.
अर्जदाराचे म्हणणे की, 3361/- रु. च्या 18 हप्त्यापैंकी 7 हप्त्याबाबत 23,511/- एवढी रक्कम दिनांक 28/12/2011 पासून दिनांक 17/07/2012 पर्यंत 6 हप्त्याव्दारे भरली.
अर्जदाराचे म्हणणे की, करारा प्रमाणे अर्जदारास ऑक्टोबर 2012 पर्यंत 1,46,212/- रु. चा भरण करायचा होता, परंतु कांही घरगुती अडचणीमुळे अर्जदार हप्ते वेळेवर भरु शकला नाही, तरी देखील जुलै 2012 पर्यंत 1,09,249/- रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरली होती. व करारा प्रमाणे ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2012 या तिन महिन्यात 36,963/- रु. एवढी रक्कम भरणे बाकी होती.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 05/03/2012 रोजी अर्जदारास नोटीस पाठविली व एकुण 47,609/- रु. ची मागणी केली, त्यानंतर अर्जदाराने दिनांक 12/03/2012 पासून 17/07/2012 पर्यंत 16,786/- रु. गैरअर्जदाराकडे भरली. म्हणजे त्यांच्या म्हणणे नुसार फक्त 30,823/- रु. शिल्लक राहते, परंतु तरी देखील ऑगस्ट 2012 पासून ऑक्टोबर 2012 पर्यंत करारा प्रमाणे 36,963/- अर्जदार भरावयास तयार होता. असे असतांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 14/08/2012 रोजी अर्जदारास नोटीस पाठवुन 50,065/- रु. भरावेत अन्यथा गैरअर्जदार पुढची कार्यवाही करतील असे कळविले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरची नोटीस ही खोटी आहे. कारण कराराची मुदत ही ऑक्टोबर 2012 पर्यंत होती व अर्जदार उर्वरित थकीत रक्कम 36,963/- भरावयास तयार होता, परंतु गैरअर्जदाराने स्पष्टपणे इन्कार केला व 7 दिवसात 50,065/- रु. न भरल्यास वाहन जप्त करु व कर्ज वसूली करु असे सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने ऑक्टोबर 2012 च्या शेवटच्या आठवडयात पुन्हा गैरअर्जदाराची भेट घेवुन 36,963/- रु. घेण्याबाबत विनंती केली असता गैरअर्जदारांनी एकदम 80,000/- ची मागणी केली जे की, अन्यायकारक आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन आदेश करावा की, गैरअर्जदारानी दिनांक 14/08/2012 ची पाठविलेली नोटीस रद्द ठरवण्यात यावी. व बँक दरा प्रमाणे व्याजदर व्यवस्थीत आकारुन नवीन खाते उतारा तयार करावा व थकीत योग्य ती अर्जदाराकडून रक्कम घेवुन अर्जदारास NOC द्यावे. तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 23 कागदपत्राच्या यादीसह 23 कागदपत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये दिनांक 17/12/2009 ची पावती, दिनांक 16/02/2010 ची पावती दिनांक 20/04/2010 ची पावती, दिनांक 26/05/2010 ची पावती, दिनांक 26/08/2010 ची पावती, दिनारकं 24/09/2010 ची पावती, दिनांक 20/11/2010 ची पावती, दिनांक 26/03/2011 ची पावती, दिनाक 12/05/2011 ची पावती, दिनांक 13/06/2011 ची पावती, दिनांक 04/07/2011 ची पावती, दिनांक 16/08/2011 ची पावती, दिनाक 23/09/2011 ची पावती, दिनांक 24/11/2011 ची पावती दिनांक 28/12/2011 ची पावती, दिनांक 18/01/2012 ची पावती, दिनांक 12/03/2012 ची पावती, दिनांक 18/05/2012 ची पावती, दिनांक 14/06/2012 ची पावती, दिनांक 17/07/2012 ची पावती, दिनांक 28/10/2009 ची पावती, दिनांक 05/03/2012 ची पावती, दिनांक 14/08/2012 ची पावती कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मध्ये वाहन खरेदी संबंधी कर्जाचा करार झाला. त्या कराराचा नंबर AURF -10912040006 होता. सदरचा करार दिनांक 04/12/2009 रोजी झाला होता व कराराव्दारे अर्जदारास 1,10,000/- रु. चे कर्ज देण्यात आले होते व ज्याची एकुण परतफेड रक्कम रु. 1,51,330/- इतकी होती.
सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने एकुण 36 हप्त्यामध्ये करायची ठरली होती एकुण 36 हप्त्यापैकी 17 हप्ते 5042/- रु. चे होते नंतर 5118/- रु. चा एक हप्ता व 18 हप्ते 3361/- रु. चे ठरले होते. यापैकी अर्जदाराने पहिला हप्ता कर्जाची रक्कम देते वेळी भरला होता व उर्वरित हप्ते 05/01/2010 पासून सुरु होणार होते. सदर करारानुसार दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत हप्ते भरणे अर्जदारास आवश्यक होते व पाच तारखेनंतर हप्ता भरल्यास अर्जदारास Overdues Charges लावण्याचा अधिकार करारातील तरतुदीनुसार गैरअर्जदारास आहे. Overdues Charges म्हणून रु. कमीत कमी 100/- व 3 टक्के प्रतीमहिना पर्यंत Overdues Charges लावण्याचा अधिकार आहे. सदरच्या करारावर अर्जदाराने सहया केल्या आहेत व अर्जदारास अटी मान्य आहेत.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने ठरल्याप्रमाणे कर्जाची परतफेड वेळेवर केलेली नाही, ज्यामुळे त्यास Overdues Charges लावण्यात आले व अर्जदाराकडे ती रक्कम बाकी दिसून येते. अर्जदार हा गैरअर्जदाराचा Defaulter आहे. आम्ही व्याज आकारणी करारा प्रमाणेच केलेली आहे. सदरच्या करार कर्जा प्रमाणे अर्जदार व गैरअर्जदारा मध्ये करारा बाबत वाद उदभवल्यास तो Arbitrator कडे दाखल करावे. असे करारात स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्यामुळे सदरची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द नोटीसीची पेपर मध्ये जाहीर प्रगटन होवुनही गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी ज्यादा
रक्कमेची मागणी करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून दिनांक 04/12/2009 रोजी PIAGGIO APE ऑटो खरेदीसाठी 1,10,000/- रु. चे कर्ज घेतले होते व सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने एकुण 36 हप्त्यामध्ये करायची ठरली होती, व एकुण 36 हप्त्यापैकी पहिले एकुण 17 हप्ते 5042/- रु. चे व 5118/- रु. चा एक हप्ता व 3361/- रु. चे 18 हप्ते होते. व सदरचा हप्ता हा अर्जदाराने दर महिन्याच्या 5 तारखेला करायचा ठरला होता. व पहिला हप्ता 5 जानेवारी 2010 पासून ते 05/11/2012 पर्यंत सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने करायची ठरली होती. ही बाब नि.क्रमांक 14/1 वर दाखल केलेल्या Loan Agreement च्या प्रतीवरुन सिध्द होते. तसेच एकुण परतफेडीची रक्कम 1,51,330/- रु. होती. ही बाब देखील सदर Loan Agreement च्या प्रतीवरुन सिध्द होते. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 याने देखील सदरचा करार कर्ज लेखी जबाबात मान्य केले आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, 36,963/- रु. भरणे बाकी आहे. या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 याने लेखी जबाबात साफपणे इन्कार केला आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही, म्हणून करारा प्रमाणे त्यास Overdues Charges आकारण्यात आले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर कर्जाच्या परतफेडी पोटी खालील प्रमाणे रक्कम जमा केल्याचे दिसून येते.
------------------------------------------------------------------------------------------------------
अ.क्रमांक पावती क्रमांक तारीख नि.क्रमांक रक्कम
------------------------------------------------------------------------------------------------------
1) 14465 17/12/2009 5/1 5042/-
2) 17909 16/02/2010 5/2 5042/-
3) 16752 20/04/2010 5/3 10084/-
4) 18747 26/05/2010 5/4 5042
5) 19342 26/08/2010 5/5 5042/-
6) 30310 24/09/2010 5/6 5042
7) 41108 20/11/2010 5/7 5042
8) 44120 26/03/2011 5/8 10100
9) 44182 12/05/2011 5/9 5042
10) 46437 13/06/2011 5/10 5042
11) 46622 04/07/2011 5/11 5050
12) 46636 16/08/2011 5/12 5040
13) AD 2119908 23/09/2011 5/13 5050
14) AD 9830031 24/11/2011 5/14 10100
15) AD 9831028 28/12/2011 5/15 3360
16) AD 9831778 19/01/2012 5/16 3365
17) AD 9842096 12/03/2012 5/17 3365
18) AE 7144258 18/05/2012 5/18 6700
19) AE 7145235 14/06/2012 5/19 3360
20) AE 7151063 01/07/2012 5/20 3361 --------------------- एकुण 1,09,311/-
अर्जदाराने थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी गैरअर्जदाराकडे एकुण 1,09,311/- भरले होते, हे वरील व्यवहारा वरुन सिध्द होते. अर्जदाराने कराराच्या नियमा प्रमाणे दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत हप्ता अदा करायचा होता, परंतु अर्जदाराने तसे न केल्याचे वरील कागदपत्रावरुन दिसून येते. नि.क्रमांक 14/1 वरील दाखल केलेल्या Loan Agreement च्या पावत्यावरुन हे दिसून येते की, अर्जदाराने सदरची कर्जाची परतफेड 05/11/2012 पर्यंत एकुण 1,51,330/- रु. गैरअर्जदाराकडे भरणे आवश्यक होते, परंतु अर्जदाराने थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी गैरअर्जदाराकडे एकुण 1,09,311/- एवढीच रक्कम जमा केली असल्याचे दिसून येते.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने जर हप्त्याची रक्कम वेळेत भरणा नाही केली तर, त्यास कमीत कमी 100/- रु. दंड आकारण्यात येईल व 3 टक्के व्याज देखील रक्कम अदा करे पर्यंत आकारले जाईल. असे आपल्या लेखी जबाबात म्हंटले आहे. याबाबत नि.क्रमांक 14/1 वर दाखल केलेल्या कराराच्या प्रतीचे अवलोकन केले असता सदर नियमांचा उल्लेख करार अट नं. 3 : 2 मध्ये केल्याचे आढळून येते, परंतु सदरचा नियम 100/- रु. च्या दंडाच्या हद्दी पर्यंत योग्य आहे, परंतु परत गैरअर्जदाराने दंड म्हणून 3 टक्के व्याज आकारणे हे अर्जदारावर अन्याय करणारे आहे. असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराने 1,51,000/- -- 1,09,311/- = 42,019/- + 3000/- (हप्ते वेळेवर भरले नाही म्हणून दंड ) = 45,019/- रु. गैरअर्जदाराकडे थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी भरणे आवश्यक होते, असे मंचास वाटते. असे असतांना गैरअर्जदाराने दिनांक 14/08/2012 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदारास 50,065/- रु.ची मागणी केली होती, ही बाब नि.क्रमांक 5/24 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरची नोटीस वरील कारणास्तव चुकीची आहे व ती रद्दबातल ठरवणे योग्य होईल. असे मंचास वाटते. निश्चित गैरअर्जदाराने सदरच्या जास्तीच्या रक्कमेची मागणी करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 गैरअर्जदाराने दिनांक 14/08/2012 रोजी अर्जदारास रु. 50,065/- ची मागणी
केलेली नोटीस रद्द करण्यात येते.
2 अर्जदाराने थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
रु.45,019/- फक्त ( अक्षरी रु. पंचेचाळीसहजार एकोणिस फक्त )गैरअर्जदार
क्रमांक 1 कडे जमा करावे. व ते गैरअर्जदारानी स्वीकारावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदरची रक्कम प्राप्त झाल्यानंतर 08
दिवसाच्या आत अर्जदारास NOC द्यावे.
4 गैरअर्जदाराने आदेश मुदतीत तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 2500/- फक्त ( अक्षरी
रु. दोनहजार पाचशे फक्त ) अर्जदारास द्यावेत.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.