निकालपत्र :- (दि.14/12/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर सामनेवाला यांनी वाहन ओढून नेऊ नये व वाहनाची एन.ओ.सी.मिळणेसाठी दाखल केलेली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार हे व्यवसायाने ड्रायव्हर असून तक्रारदार माल वाहतूकीचा व्यवसाय करतात. सामनेवाला ही वाहनांच्या खरेदीसाठी अर्थपुरवठा करते. सामनेवाला यांनी तक्रारदारास टाटा ट्रक क्र.MH-07-444 खरेदीकरणेसाठी रक्कम रु.2,25,000/- इतका वित्त पुरवठा द.सा.द.शे.12 टक्के दराने करण्याची तयारी दर्शविली व माहे फेब्रुवारी-2008 मध्ये कर्ज रक्कम अदा करताना तक्रारदाराच्या ब-याच छापील व को-या फॉर्मवर सहया घेतल्या. सामनेवाला यांनी ठरवून दिलेले मासिक हप्ते तक्रारादाराने कर्ज खात्यावर सुरळीतपणे जमा केलेले आहेत. तक्रारदार यांनी आजअखेर सामनेवालांकडे कर्ज रक्कमेपोटी रु.2,15,000:/- इतकी रक्कम जमा केलेली आहे. तरीही सामनेवाला यांनी अदयाप रक्कम रु.3,50,000/- व व्याज भरणा करणे आवश्यक आहे व भरणा न केलेस वाहनाचा कब्जा घेणार अशी धमकी दिलेली आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचे कार्यालयात चौकशी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्ज खाते फुगवून दाखविले असल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. तसेच व्याजाचा दरही 16.87 टक्के इतका लावला आहे. सदरील सामनेवालांची कृती ही पूर्णपणे बेकायदेशीर व चुकीचा आहे. सामनेवाला यांचे कथनाप्रमाणे तक्रारदार रु.3,50,000/- व व्याज अशी कोणतीही रक्कम देय लागत नाही. तक्रारदार जास्तीत जास्त रु.50,000/- इतकी रक्कम देय लागतात. तक्रारदाराचे संमतीशिवाय सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे नांवे वेगवेगळी कर्ज खाती तयार केलेली आहेत. तक्रारदार यांनी कर्ज खाते रिन्यूअल अगर नवीन कर्ज खाते करणेसाठी सामनेवालांना केव्हाही कळविलेले नव्हते अगर नाही. सामनेवालांचे नाहक त्रासास कंटाळून तक्रारदाराने शेवटी दि.25/11/2010 रोजी आपले वकीलामार्फत नोटीस पाठवून कायदेशीर देय रक्कम एकरकमी भरणेची तयारी दर्शविली. सदर नोटीस सामनेवाला यांना मिळूनही सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर तक्रारदार यांना दिले नाही. अगर कर्जखातेचा कायदेशीर हिशोब करुन खातेउतारा दिलेला नाही. तसेच हायपोथिकेशन अॅग्रीमेंटच्या नक्कला मागणी करुनही दिलेल्या नाहीत. तथापि सामनेवाला कंपनीचे वसुली अधिकारी आजही तक्रारदाराचे घरी येऊन अवास्तव व देय न लागणारी कर्ज रक्कम भरणा करणेबाबत तक्रारदारास व त्याचे कुटूंबियास धमकावतात. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन तक्रारदार यांचे कर्जखातेचा कायदेशीर हिशोब करुन कायदेशीर देय रक्कमेचा खातेउतारा व इतर कागदपत्रे तक्रारदार यांना देणेबाबत आदेश, तसेच तक्रारदार यांच्या ट्रक जप्तीची कोणतीही कारवाई करु नये, तक्रारदारास मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांचा खातेउतारा, वकीलामार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांचा प्रस्तुत तक्रार अर्ज सामनेवाला यांचा निव्वळ कर्ज बुडविणेच्या हेतूने व कर्जाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्याकरिता केलेला असून तसेच त्या संदर्भात कोणताही सबळ पुरावा मे. मंचासमोर दाखल न करता निव्वळ आपली चूक लपविण्याकरिता दाखल केली आहे. वस्तुत: तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये करार झाला असून त्या करारान्वये सर्व लिखीत अटी व शर्ती यातील तक्रारदार यांनी मान्य केल्या आहेत. सदर कराराचा क्र.STFC KLPR 0003080005 व कराराची तारीख 08/03/2010 असून तक्रारदार यांनी सदर कराराची मूळ प्रत त्यांचे कायदेशीर सल्लागार व नातेवाईकांना दाखवून व त्यांचा जामीनदार राजाराम द. पाटील रा.आवळी ता.राधानगरी जि.कोल्हापूर यांच्यासह येऊन दि.08/03/2010 रोजी सदर करार लिहून दिलेला आहे. तसेच रु.11,434/- इतके कर्ज घेऊन त्याकरिता मासिक हप्ता रु.1135/- इतका बारा महिन्यामध्ये भरणेचे होते. त्यास करारामधील नमुद तारखेस वरील रक्कम भरावयाची होती. ती तक्रारदाराने वेळेवर भरलेली नाही. तसेच तक्रारदार मे. मंचास त्यांचे खाते व त्यासंबंधीत दुरुस्ती होऊन मिळावी म्हणून प्रस्तुत अर्ज दाखल केला आहे. सदर तक्रार अर्ज सेटलमेंट ऑफ अकौन्ट असलेने मे. मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नसून तो दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारिचा प्रश्न आहे. सबब तक्रारदाराकडून सामनेवाला यांना देय असलेली रक्कम देणेबाबत आदेश व्हावा तसेच तक्रारदार यांनी थकीत कर्जापोटी रक्कम भरली असली तर ती सामनेवाला यांना देणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कर्ज करारपत्र क्र.STFC KLPR 0003080005 दाखल केलेले आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार चालवणेचा अधिकार मे. मंचास आहे काय? --- होय. 1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- होय. 2. काय आदेश? ---शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 :- प्रस्तुतचे कर्ज हे वाहन खरेदीसाठी दिलेले आहे व प्रस्तुत वाहन हे ट्रक असून त्यामधून येणा-या उत्पन्नावर तक्रारदाराचा उदरनिर्वाह चालत असलेचे तक्रारदाराने तक्रारीत कथन केले आहे; सामनेवाला यांनी त्यास आक्षेप घेऊन तक्रारदाराची शेती असलेने प्रस्तुत वाहन हे त्याचे एकमेव उपजिवीकेचे साधन नाही. तसेच प्रस्तुतचे कर्ज हे वाणिज्य हेतूने घेतलेले आहे. त्यामुळे तो ग्राहक नाही असा आक्षेप घेतलेला आहे. मात्र त्या संदर्भातील कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच फायनान्स कंपनी यांनी केलेला वित्त पुरवठा हा वाहन खरेदीसाठी आहे. प्रस्तुतचे वाहन हे एकतर स्वत: वापरासाठी अथवा व्यवसायाकरिता उपयोग केला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहन हे वाणिज्य हेतूने घेतलेले आहे असे म्हणता येणार नाही. याबाबत मा. राष्ट्रीय आयोग,दिल्ली यांचे कितीतरी पूर्वाधार आहेत. तक्रारदार हा सामनेवाला यांचा कर्जदार ग्राहक आहे. त्यामुळे सदरचा वाद हा ग्राहक वाद असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज करारपत्र क्र.STFC KLPR 0000920 दि.18/01/2008नुसार सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.2,25,000/- इतका कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यासाठीचा व्याजदर 15.69 टक्के असून तो दर महिन्याच्या शिल्ल्क रक्कमेवर आकारला जातो. तसेच धनादेशाचा अनादर झालेस रु.200/- प्रतिधनादेशामागे आकार आहे. एकूण 56 हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड दि.20/02/2008 ते 20/09/2012 अखेर करणेची आहे. शेडयूल 3 प्रमाणे दर महिन्याचे 15 तारखेस हप्ता रक्कम भरणेची आहे. पहिले 1 ते 14 हप्ते रु.10,105/- चे, 15 ते 55 हप्ते रु.6,595/- चे व 56 वा हप्ता रु.1,246/- प्रमाणे देणेचे आहे. प्रस्तुतचा कर्जपुरवठा हा टाटा ट्रक रजिस्ट्रेशन क्र.MH-07-444 या वाहनासाठी केलेला आहे व सदर वाहन हायपोथीकेशन केलेले आहे ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी दि.03/11/2011 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रस्तुत कर्ज खातेचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता लोन क्र.TSLKLPR 0000920 करार दि.18/01/2008 वाहन क्र.MH-07-444 कर्जाऊ रक्कम रु.2,25,000/- एफसी रक्कम 17 टक्क्याने रु.1,14,750/-(व्याज), इन्शुरन्स डिपॉझीट रु.24,000/-, अशी एकूण कर्ज कराराची रक्कम रु.3,63,750/- नमुद केलेली आहे. तसेच पॅरेंट लोन TBC Rs.3,39,750/- पैकी जमा रु.1,39,900/- व देय रु.1,99,850/- नमुद केले आहे. प्रस्तुत नोंदी या मूळ कर्ज रक्कम रु.2,25,000/- व 17 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.1,14,750/- अशी एकूण देय रक्कम रु.3,39,750/- नोंद केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच पॅरेन्ट लोनमध्ये टीबीसी- रु.11,920/- जमा रु.5,250/- व रु.6,670/- ची नोंद दिसून येते. तसेच ओडीसी पॅरेन्ट लोनमध्ये रु.1,50,458/- देय असलेची रक्कम दिसून येते. तसेच पॅरेन्ट लोन सेटलमेंट रक्कम रु.3,56,978/- तसेच चाइ्रल्ड लोन सेटलमेंट रक्कम रु.27,060.08 ची नोंद दिसून येते. प्रस्तुत नोंदीचे अवलोकन केले असता कर्ज करारपत्रामध्ये शेडयूल-3 मध्ये द.सा.द.शे. 15.63 टक्के व्याजदराची नोंद असून प्रस्तुत खातेउता-यावर मात्र 17 टक्केची नेांद केलेली आहे ही सामनेवालांची सेवात्रुटी आहे. मूळ कर्ज करारपत्र हे रु.2,25,000/- चे असून सदर कर्जाव्यतिरिक्त प्रस्तुत खातेउता-यावर रु.24,000/- इतके इन्शुरन्सपोटी रक्कमेची कर्जरक्कमेत जादाची नोंद आहे व त्यानुसार इफेक्टीव्ह दि.15/10/2008 रोजी डॉक्यूमेंट नं.KLPR0809300007 अन्वये डॉक्युमेंट तारीख 30/09/2008 अन्वये इन्शुरन्सपोटी (INS Due ) रु.11,920/- दर्शविलेली आहे. सदर रक्कम दि.27/11/2008 रोजी आयएनएस म्हणून रु.5,250/-, रिसिव्हड म्हणून नोंद केलेली आहे. सदर नोंदीवरुन विमा रक्कम भरणेची जबाबदारी सामनेवाला कंपनीची असलेचे स्पष्ट होते व सदर विमा रक्कम अदा करणेपोटी एकूण कर्जरक्कमेत रु.24,000/- इतकी रक्कम मिळवलेली आहे. सबब तक्रारदाराने त्याचे तक्रारीत कथन केलेप्रमाणे प्रस्तुत कर्जकरारातील व्याजदर द.सा.द.शे. 12 टक्के नसून लिखीत करारानुसार तो 15.63 टक्के इतका आहे. मात्र खातेउता-यावर 17 टक्के अशी चुकीची नोंद केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रारदाराचे पॅरेन्ट लोन व चाईल्ड लोन या नोंदी का केल्या आहेत याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही. तसेच त्यावरुन कोणताही अर्थबोध होत नाही. तसेच तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या नमुद खातेचे दि.25/11/2010 चे हायर लेजर डिटेल्सचे अवलोकन केले असता करार क्रमांक, तारीख, वाहन नंबर, कर्जदार, जामीनदार, कर्ज रक्कम, इन्शुरन्स डिपॉझीट रक्कम, तसेच कर्ज कालावधी, कर्ज हप्त्याच्या नोंदी इत्यादीबाबत साम्य दिसून येते. तसेच करारपत्राप्रमाणे व्याज दर 15.63 टक्के कालावधी 56 महिनेची नोंद बरोबर आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेले खातेउता-यामध्ये कर्ज रक्कम, इन्शुरन्स डिपॉझीट यामध्ये साम्य आहे. मात्र सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावर रु.1,14,750/- इतक्या फायनान्शिअल चार्जेस (व्याजाची) नोंद आहे. तर तक्रारदाराने दाखल केलेल्या खाते उता-यावर सदर फायनान्शिअल चार्जेसची नोंद रु.1,64,111/- इतकी आहे. सदर नोंदीत तफावत आढळते. प्रस्तुत खाते उतारा सामनेवाला यांनी त्यांचे सहीशिक्का नसलेने नाकारलेला आहे. तक्रारदाराने वेळोवेळी नमुद कर्ज खातेवर रक्कमांचा भरणा केलेला दिसून येतो. तक्रारदाराने मागणी करुनही तक्रारदारास कर्ज खातेउतारा दिलेला नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास येते. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज खाते उता-यावर विविध केलेल्या कर्जाच्या नोंदीचा कोणताही अर्थबोध होत नाही; तसेच कर्ज कराराव्यतिरिक्त विविध कर्जांची नोंद दिसून येते ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. कर्जदारास त्याचे कर्ज खातेबाबत कर्ज रक्कम, व्याजदर, इतर आकार, अन्य कर्जे इत्यादीबाबत असणा-या शंकाचे निरसन करुन घेणेचा एक ग्राहक म्हणून पूर्ण अधिकार आहे. तसेच अनुषंगिक कागदपत्रे मागणी करणेचा पूर्ण अधिकार आहे. सामनेवालास तक्रारदाराने दि.25/11/2010 रोजी नोटीस पाठवून कर्ज खातेच्या अनुषंगिक माहितीची मागणी केलेली आहे. तसेच कर्ज कागदपत्रांचीही मागणी केलेली आहे. त्यास सामनेवाला यांनी उत्तर दिलेचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदाराने मागणी केलेप्रमाणे त्यास नमुद कागदपत्रे दिली असलेबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास येत नाही; सबब तक्रारदार हे कर्जदारग्राहक असलेने त्यास प्राप्त असलेलया अधिकाराची पायमल्ली सामनेवाला यांनी केलेली आहे. कर्जकरारपत्राचे बाहेर जाउुन अर्थबोध न होणा-या कर्ज रक्कमांची आकारणी केलेचे दिसून येते. तसेच व्याजदरात फरक दिसून येतो. कर्ज करारपत्र उभय पक्षांवर बंधनकारक असून त्याप्रमाणे उभय पक्षांनी वागणे सामनेवालांवर बंधनकारक आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार थकबाकीदार आहे याबाबत त्यांचे लेखी म्हणणेतील कलम 10 मध्ये नमुद केलेल्या मजकूराचे अवलोकन केले असता दि.08/03/2010 रोजी कर्ज करार क्र. STFC KLPR 0003080005 चा उल्लेख केलेला आहे व तयानुसार रु.11,434/- इतकी कर्ज रक्कम व तयाकरिता रु.1135/- इतका मासिक हप्ता भरणेचा होता व तो वेळेवर भरला नसलेबाबत नमुद केले आहे. मात्र त्या संदर्भातील कागदपत्रे दाखल नाहीत. दाखल कागदपत्रांनुसार कर्जकरारपत्र क्र.TSLKLPR 0000920 करार दि.18/01/2008 चा आहे. सबब तक्रारदाराची तक्रार रु.2,25,000/- इतक्या कर्ज रक्कमेचा वाद उपस्थित केलेला आहे. मात्र सामनेवालांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये नमुद केलेप्रमाणे वेगळेच करारपत्र व वेगळयाच कर्ज रक्कमेचा उल्लेख केलेला आहे. तसेच तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेल्या कर्ज रक्कमेबाबत सामनेवालांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये काहीही भाष्य केलेले नाही ही आश्चर्याची बाब आहे. सबब सामनेवालांचे हे वर्तनच त्यांचे सेवेतील गंभीर त्रुटीसाठी जबाबदार आहे. तक्रारदारचे कर्जाची नेमकी माहिती सामनेवालांचे म्हणणेमध्ये नाही ही सामनेवालांचे सेवेतील एक गंभीर त्रुटी आहे. सबब कर्जकरारपत्राच्या बाहेर जाऊन केलेल्या नोंदी, व्याजदरातील चुकीच्या नोंदी, चुकीच्या कर्जाची आकारणी, तसेच कर्जकरारपत्राबाहेर जाउुन केलेले इतर दंडव्याज व अन्य आकार आकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने सामनेवालांचे नाहक त्रासाला कंटाळून वकील नोटीस पाठवून कर्ज रक्कम एकरकमी भरणेची तयारी दर्शविली आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतेही जादा व्याजदंड व आकार न घेता कर्जकरारात नमुद असणारी रक्कम व नमुद व्याजदराप्रमाणे कायदेशीर रक्कम एकरकमी तक्रारदाराकडून वसूल करुन घ्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच त्या अनुषंगीक खातेउतारा व कागदपत्रे तक्रारदाराला दयावीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतेही दंड, जादा व्याज व इतर आकार न घेता कर्जकरारपत्राप्रमाणे नमुद व्याजदराप्रमाणे कायदेशीर कर्जाची देय रक्कम भरणा करुन घ्यावी व तक्रारदाराने सदर रक्कम 90 दिवसात सामनेवालांकडे भरणा केलेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास त्या अनुषंगीक खातेउतारा व कागदपत्रे तक्रारदाराला दयावीत. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |