नि. 26
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.श्री.ए.व्ही. देशपांडे, अध्यक्ष
मा.सौ.वर्षा शिंदे, सदस्य
मा.सौ. मनिषा कुलकर्णी, सदस्य.
ग्राहक तक्रार क्र. 210/2013
तक्रार नोंद तारीख : 21-12-2013
तक्रार दाखल तारीख : 24-12-2013
निकाल तारीख : 19-11-2015
श्री. ज्ञानू नारायण कोळी
रा. हनुमाननगर, 5 वी गल्ली, जुना धामणी रोड,
सांगली, ता.मिरज, जि.सांगली. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.
तर्फे मॅनेजर, शाखा सांगली
रणजित एम्पायर, पुढारी भवनचे माडीवर
जिल्हा परिष्देसमोर, सांगली
2. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीस
101-105, पहिला मजला, बी-विंग, शिव चेंबर्स,
सेक्टर 11, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614 .... जाबदार
तक्रारदारतर्फे - अॅड. श्री एफ.जी.मुजावर
जाबदार तर्फे - अॅड. श्री ए.यु.शेटे
- नि का ल प त्र -
व्दारा- मा. अध्यक्ष- श्री. ए.व्ही. देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली, जाबदारांनी त्यास दिलेल्या कथीत दूषीत सेवेबद्दल दाखल केलेली असून, त्यात त्यांनी जाबदार कंपनीस, योग्य व्याज आकारुन व उशिरा भरलेल्या हप्त्यापोटी केलेला दंड कमी करुन व योग्य रकमेचा हिशोब करुन अर्जदाराकडून पुढील रकमा भरुन घ्याव्यात तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याशिवाय त्याचे वाहन ओढून नेऊ नये तसेच त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- दंड आकारावा व तो नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारास देण्याचा आदेश व्हावा आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- त्यास देवविण्यात यावेत असे आदेश करावेत अशी मागणी केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने जाबदार या वित्तीय संस्थेकडून ऑक्टोबर 2010 मध्ये मालवाहतूक वाहन खरेदी करण्याकरिता रक्कम रु.13,40,000/- चे कर्ज घेतले व सदर कर्जाच्या सर्व अटी व शर्ती मान्य करुन आवश्यक ती सर्व कागदपत्रे जाबदार संस्थेच्या हक्कामध्ये करुन दिली. तक्रारदाराने विकत घेतलेल्या वाहनाचा नं.MH-10-AQ-4846 असा होता व आहे. सदरचे कर्ज रक्कम रु.33,388/- मासिक हप्त्याने फेडावयाचे होते.
3. तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे त्याने वेळोवेळी तक्रार अर्जातील कलम 3 मध्ये नमूद केलेल्या तारखांना, आजअखेरपर्यंत रक्कम रु.7,34,888/- इतकी रक्कम रोखीने भरलेली आहे व त्याचा जाबदार कंपनीचे कर्ज फेडण्याचा प्रामाणिक हेतू आहे. परंतु जाबदार वित्तीय कंपनीने त्याच्या भोळया स्वभावाचा व त्याला हिशोबातले काही कळत नसल्याचा गैरफायदा घेवून कर्जखात्यावर भरमसाठ व्याजआकारणी करुन, वेळोवेळी दंड लावून, डिलेड पेमेंट चार्जेस या मथळयाखाली भरमसाठ आकारणी करुन, ज्यादा रकमा नावे टाकून, तक्रारदारकडून येणे असलेल्या रकमा जाबदारांनी फुगविलेल्या आहेत आणि तक्रारदाराने रु.7,34,888/- भरलेले असूनदेखील त्याच्याकडून अद्यापही रु.12,93,244.22 पैसे इतकी रक्कम येणे बाकी दाखविलेली आहे. नियमाप्रमाणे आकारणी करुन योग्य ती थकबाकी दाखवा अशी तक्रारदाराने वेळोवेळी विनंती केली असता जाबदार कंपनीच्या अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व ते तक्रारदारास कोणतीही दाद देत नाहीत आणि तक्रारदारास त्याचे वाहन ओढून नेऊ अशी धमकी देत आहेत. दि. 28/11/2013 रोजी जाबदार कंपनीचे प्रतिनिधी तक्रारदाराचे घरी येऊन त्याचे कर्जखाते दि.15/12/2013 पर्यंत निल करा अन्यथा गाडी ओढून नेऊ अशा धमक्या देऊन तक्रारदाराच्या सहया काही को-या स्टँपपेपरवर घेऊन त्यास रक्कम न दिल्यास सदर स्टँपपेपरवर तक्रारदाराने स्वखुशीने त्याचे वाहन जाबदाराच्या ताब्यात दिले असे लिहू अशी धमकी दिली व त्याने दिलेले कोरे चेक्स थकबाकीसाठी बँकेत जमा करुन तक्रारदारावर फौजदारी केस करु, अशा धमक्या दिल्या. त्यामुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केल्याप्रमाणे मागण्या तक्रारदाराने प्रस्तुत कामी केल्या आहेत.
4. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जातील कथनांचे पुष्ठयर्थ नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्तसोबत 21 कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. जाबदार कंपनीने याकामी हजर होवून आपली लेखी कैफियत नि.17 ला दाखल केली असून त्यात त्यांनी तक्रारदाराची संपूर्ण केस व कथन अमान्य केले आहे. तक्रारदाराने जाबदार वित्तीय संस्थेकडून कर्ज घेवून मालवाहतूक वाहन विकत घेतले ही बाब मान्य केली आहे. सदर कर्जाकरिता आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने केलेली आहे ही बाबदेखील जाबदारने मान्य केली आहे. तथापि तक्रारदाराने आजतागायत कर्जापोटी रक्कम रु.7,34,888/- ची परतफेड केली आहे हे तक्रारदाराचे कथन अमान्य केले आहे. कर्जखात्यामध्ये तक्रारदार म्हणतो तसे वाढीव रक्कम येणे बाकी दाखविलेल्या आहेत हा आरोपही जाबदारांनी अमान्य केला आहे. तक्रारदाराने सदरचे वाहन व्यावसायिक कारणाकरिता विकत घेतले होते. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणार हे नातेसंबंध निर्माण झालेले नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार कायद्याने चालण्यास पात्र नाही. तक्रारअर्जात तक्रारदाराने धादांत खोटी विधाने केली आहेत. जाबदारचे विशेष कथन असे आहे की, दि.25/10/2010 रोजी तक्रारदाराने जाबदार संस्थेकडून रु.13,40,000/- चे कर्ज घेवून त्याबाबतचे करारपत्र करुन दिलेले आहे. सदरचे कर्ज विम्याची रक्कम सोडून एकूण 47 मासिक हप्त्यांत परतफेड करावयाचे होते. त्यापैकी हप्ता क्र.1 ते 46 रक्कम रु.37,388/- चे तर शेवटचा हप्ता र.37,394/- चा ठरलेला होता. सदर कर्जास 8.13 टक्के व्याज देणे होते. दि.25/10/10 च्या करारानुसार हप्त्यांची रक्कम भरण्यास कसूर/विलंब झाल्यास, विलंबआकार, दंडव्याज किंवा इतर तदनुषंगिक खर्च देण्याचे तक्रारदाराने कबूल केले होते. वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकल्यास सदरचे वाहन कोणत्याही न्यायालयाच्या परवानगी किंवा हुकूमाशिवाय जप्त करुन विक्री करण्याचे अधिकार जाबदार वित्तीय संस्थेला तक्रारदाराने सदर करारान्वये दिलेला होता व आहे. त्या अटीबाबत तक्रारदाराने आजतागायत कोणतीही लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. सदर वाहनाच्या आर.टी.ओ. रेकॉर्डमध्ये जाबदारांच्या बोजाची/हायपोथिकेशनची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदाराने नियमितपणे कर्जाच्या हप्त्यांची फेड करण्याचे जाणीवपूर्वक टाळलेले असून सदरचे वाहन कराराप्रमाणे जाबदारास ताब्यात घेता येवू नये म्हणून प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे. वास्तविक तक्रारअर्जातील कथनांमध्येच तक्रारदाराने सदर कर्जाची थकबाकी असलेबाबत व तो थकीत कर्जदार असल्याचे कबूल केलेले आहे तसेच सदरचे वाहन जाबदारची कोणतीही परवानगी न घेता त्रयस्थ इसमाचे ताब्यात दिले आहे. जाबदारांनी करारपत्रातील अटी व शर्तीनुसार आपल्या संरक्षणार्थ सदर वाहनाचा विमा वेळोवेळी उतरविलेला असून सदर विम्याच्या हप्त्यांच्या रकमा भरलेल्या असून त्या कर्जरुपी रकमा तक्रारदाराच्या कर्जखात्यात नावे टाकल्या आहेत व त्या रकमा मूळ कर्जाव्यतिरिक्त अतिरिक्त कर्ज म्हणून तक्रारदारकडून येणे बाकी असून त्यावरही व्याज तक्रारदाराने देणे अपेक्षित आहे. ज्या ज्या रकमा तक्रारदाराच्या वतीने जाबदार कंपनीने भरलेल्या आहेत, त्या त्या रकमा तक्रारदाराच्या कर्ज खात्यात नावे टाकल्या आहेत. तसेच तक्रारदाराने मुदतीत हप्ते भरले नसल्याने करारातील अटी व शर्तीनुसार जाबदार कंपनीने थकीत हप्त्यांवर दंडव्याज व थकबाकी चार्जेस लावले असून तक्रारदाराकडून येणे बाकी रक्कम दर्शविली असून तक्रारदाराने करारात ठरलेप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत हप्ते भरलेले नाहीत. कर्जाच हप्ते थकीत असल्याचे बघून जाबदारांनी तक्रारदारास थकीत हप्ते भरणेची व कर्जखाते निरंक किंवा रेग्युलर करण्याची सूचना दिली. त्याचा गैरअर्थ काढून कोणतेही कारण घडलेले नसताना कर्जाची रक्कम बुडविण्याच्या हेतूने तक्रारदाराने ही खोटी केस दाखल केली आहे व ती फेटाळण्यास पात्र आहे. अशा कथनांवरुन जाबदार वित्तीय संस्थेने प्रस्तुतची तक्रार नुकसानभरपाईदाखल रक्कम रु.5,000/- चा खर्च तक्रारदारावर बसवून खारीज करावी अशी मागणी केली आहे.
6. जाबदार वित्तीय संस्थेने सदर लेखी कैफियतीखालीच आपले अधिकृत इसम श्री कैलास चव्हाण यांचे शपथपत्र दाखल केलेले असून त्यासोबत कर्ज प्रकरणाशी संबंधीत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स नकला देखील दाखल केल्या आहेत. नि.20 ला पुरसीस दाखल करुन जाबदार क्र.2 ने जाबदार क्र.1 ची कैफियत आपली कैफियत म्हणून अंगीकृत केली आहे.
7. तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.21 ला दाखल करुन नि.22 या पुरसीसने आपला पुरावा संपविला आहे तर नि.23 या अर्जाने जाबदरांनी आपल्या लेखी कैफियतीसोबत सादर कलेले शपथपत्र हाच आपला पुरावा समजावा अशी विंनती केली आहे. तक्रारदाराने आपला लेखी युक्तिवाद नि.25 ला दाखल केला असून आम्ही तक्रारदाराचे विद्वान वकील श्री वंजोळे व जाबदारचे वकील श्री ए.यु.शेटे यांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. जाबदारचे वतीने त्यांच्या विद्वान वकीलांनी केवळ एकाच मुद्यावर असा युक्तिवाद केला की, तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जात मागितलेल्या मागण्या या कर्जखात्यात घेण्यात आलेल्या नोंदी योग्य व अयोग्य आहे किंवा कसे व सदर कर्जखात्याचा हिशेब होण्यावरती अवलंबून आहेत व कोणत्याही खात्यातील नोंदींचा हिशोब घेणे ग्राहक संरक्षण कायद्यास अभिप्रेत नाही व अशी प्रकरणे ग्राहक मंचासमोर चालू शकत नाही तसेच तक्रारदाराने जी जाबदाराविरुध्द तक्रारदाराचे वाहन जप्त करु नये किंवा ताब्यात घेवू नये अशा स्वरुपाची कायम मनाईची मागणी केली आहे, ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 14 मध्ये नमूद केलेल्या बाबी पलीकडची आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ही कायद्याने चालण्यास पात्र नाही व त्यामुळे ती खारीज करण्यास पात्र आहे. या एकाच मुद्यावरुन प्रस्तुतची तक्रार खारीज करावी असा जाबदारचे विद्वान वकीलांनी युक्तिवाद केला. आपल्या लेखी कैफियतीमधील इतर कोणत्याही आक्षेपाबद्दल जाबदारचे विद्वान वकीलांनी काहीही युक्तिवाद केला नाही व वर नमूद केल्याप्रमाणे जाबदारांनी कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे जाबदारांनी आपल्या लेखी कैफियतीतील उपस्थित केलेले मुद्दे सोडून दिल्याचे गृहित धरुन आम्ही खालील मुद्यांवर प्रस्तुत प्रकरणाचा निर्णय करीत आहोत.
8. सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. प्रस्तुतची तक्रार आहे त्या स्वरुपात कायद्याचे चालण्यास
पात्र आहे काय ? नाही.
2. तक्रारदार मागतो त्याप्रमाणे त्यास दादी मिळण्यास तो पात्र
आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- < > - आदेश
1. तक्रारदाराची तक्रार ही नामंजूर करणेत येत आहे.
2. उभय पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावयाचा आहे.
3. प्रस्तुत आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य देण्यात याव्यात.
सांगली
दि. 19/11/2015
सौ मनिषा कुलकर्णी सौ वर्षा नं. शिंदे ए.व्ही.देशपांडे
सदस्या सदस्या अध्यक्ष